You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोरबी पूल वेळेआधीच जनतेसाठी खुला करण्यात आला का?
- Author, पारस झा
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
मोरबी पूल दुर्घटनेत 140हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या पुलाची देखभाल आणि डागडुजी याची जबाबदारी ओरेवा उद्योगसमूहाकडे देण्यात आली होती. हाच समूह अजंठा ब्रँड घड्याळांची निर्मिती करतं. याव्यतिरिक्त बल्ब, लाईट आणि घरगुती उपकरणांची निर्मिती करतं.
ओरेवा उद्योगसमूह आणि मोरबी नगरपालिका यांच्यात 300 रुपयांच्या स्टॅम्पेपरवर करार झाला होता. चार पानी करारपत्रामध्ये तिकिटांच्या दरासंदर्भात जेवढं विस्तृतपणे लिहिण्यात आलं तेवढं पुलाच्या देखभाल, कामकाज आणि डागडुजीविषयी लिहिण्यात आलेलं नाही.
या कराराची एक प्रत बीबीसी गुजरातीकडे आहे.
करारानुसार दोन्ही पक्षांदरम्यान ऑपरेशन अँड मेंटेटन्स अंतर्गत सुरक्षा, सफाई, देखभाल, पैशांचा व्यवहार, कर्मचारी यासंदर्भात करार झाला आहे.
जिल्हाधिकारी, नगरपालिका, ओरेवा उद्योगसमूह यांच्यादरम्यान पुलावर जाण्यासाठी तिकिटांचे दर, 2027-28 पर्यंत या तिकिटांमध्ये दरवर्षी किती वाढ केली जाईल याबाबत तपशीलवार लिहिलं आहे.
यानुसार सध्याचं तिकीट 15 रुपये आहे. 2027-28 पर्यंत हे दर 25 पर्यंत जाणार होते.
2027-28 नंतर प्रत्येक वर्षी दोन रुपयांनी तिकिटाचे दर वाढतील. करारात 9 मुद्दे आहेत, यामध्ये तिकीट दरांचाही उल्लेख आहे. करारात तिकीट दरांव्यतिरिक्त कोणत्याही मुद्यावर सविस्तरपणे काहीही लिहिण्यात आलेलं नाही. कोणत्याही अटीशर्तीही देण्यात आलेल्या नाहीत.
करारात पुलाची देखभाल आणि डागडुजी घेण्यासंदर्भात कसलाही उल्लेख नाही.
करारानुसार तिसऱ्या प्रकरणात लिहिण्यात आलं की, पुलाची देखभाल आणि सुरू करण्याचा खर्च अजंठा मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड (ओरेवा उद्योगसमूह) करेल असा उल्लेख आहे.
पुलाची देखभाल आणि डागडुजी आवश्यक आहे आणि देखभाल कधी केली जाईल याबाबत कसलाच उल्लेख नाही.
चौथ्या प्रकरणात लिहिण्यात आलं की, करारानुसार पुलाच्या निर्मितीनंतर ओरेवा उद्योगसमूहाद्वारा तो जनतेसाठी खुला करण्यात येईल. करारानंतर साधारण 8 ते 12 महिन्यांचा अवधी लागेल असा उल्लेख आहे.
पुलाच्या डागडुजीसाठी 8 ते 12 महिन्यांचा कालावधी लागणार होता. पण करारानंतर सात महिन्यातच हा पूल खुला करण्यात आला.
पाचव्या आणि सहाव्या प्रकरणात ऑरेवा उद्योगसमूहाला ब्रँडिंग आणि व्यावसायिक व्यवहार सुरू करण्याची अनुमती देण्यात आली.
सातव्या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे कराराच्या कालावधीत महसूल आणि खर्च ओरेवा समूहाला दिला जाईल.
सर्व प्रशासकीय गोष्टी जसं कर्मचाऱ्यांची नियुक्ती, साफसफाई, तिकीट कक्ष, देखभाल, खर्च हे सगळं अजंठा मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड द्वारा नियंत्रित केलं जाईल. सरकारी, बिगरसरकारी, नगरपालिका कोणतीही यंत्रणा असो. अन्य कोणत्याही एजन्सीचा हस्तक्षेप यात होणार नाही असा स्पष्ट उल्लेख करारात करण्यात आला आहे.
म्युनिसिपल चीफ ऑफिसर संदीप सिंह झाला यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "7 मार्च रोजी झालेल्या करारानुसार ओरेवा उद्योगसमूहाला 15 वर्षांसाठी पुलाच्या देखभालीचं आणि नूतनीकरणाचं काम देण्यात आलं. त्यानुसार पुलाचं नूतनीकरण झालं. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर मंजुरी घेऊन सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पूल खुला करण्यात आला".
त्यांनी पुढे सांगितलं की, "या पुलावर 25-30 लोकांच्या गटाला टप्प्याटप्याने पाठवणं अपेक्षित होतं. नूतनीकरणासाठी त्यांनी कोणत्या सामग्रीचा वापर केला? पुलाची एकावेळी किती लोकांना सामावून घेण्याची क्षमता होती? हा तपासाचा विषय आहे. त्यासाठी तपास आयोग आहे".
ओरेवा उद्योगसमूहाने नगरपालिकेशी केलेल्या करारानुसार नूतनीकरण-देखभालीसाठी निर्धारित कालावधीच्या आधीच पूल जनतेसाठी खुला करण्यात आला.
पुलाच्या नूतनीकरणासाठी 12 महिन्यांचा वेळ लागणार होता. 7 मार्चला कराराच्या सातव्या महिन्यातच सगळं काम पूर्ण करून पूल जनतेसाठी खुला करण्यात आला.
हे झालं कसं?
मोरबी मधल्या माच्छू नदीवरचा हा पूल रविवारी संध्याकाळी कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 141 लोकांचा मृत्यू झाला आहे.
रात्रभर लोकांना पाण्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. पूल दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी घटनास्थळाला भेट दिली.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. बचावकार्यासाठी विविध यंत्रणांचे 200हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
याप्रकरणी आतापर्यंत 9 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)