पुणे दुर्घटना: 'माझा सख्खा भाऊ आणि अनेक साथीदार गेले'

पुण्याच्या कोंढवा भागातील तालाब कंपनीजवळ झोपडपट्टीवर भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती NDRF च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत आपला सख्खा भाऊ गमवल्याचं रंजन सहानी यांनी बीबीसीला सांगितलं.

"माझा भाऊ तिथे काम करत होता. आम्हाला भिंत पडल्याची बातमी मिळाली. आम्ही इथे आलो तर सगळ्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं. आम्ही आलो तेव्हा NDRF चे लोक मृतदेह काढत होते. आता आम्ही ससूनमध्ये आलो आहोत. या घटनेत माझा सख्खा भाऊ आणि अनेक साथीदार गेले", असं रंजन सहानी यांनी सांगितलं. रंजन आणि त्यांचे साथीदार बिहारचे राहणारे आहेत.

सहानींच्या भावासह मृतांमध्ये 10 पुरुष, एक स्त्री, आणि चार बालकांचा समावेश आहे. यापैकी दोन मृतदेह NDRF च्या अधिकाऱ्यांनी तर इतर मृतदेह पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी काढले.

काल पुण्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. त्याचप्रमाणे रात्रभर शहरामध्ये पाऊस पडत होता. काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. NDRF च्या पथकाकडून घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

आलोक शर्मा (28), मोहन शर्मा (24), अमन शर्मा (19), रवी शर्मा (19), लक्ष्मीकांत सहानी (33), सुनील सिंग (35), ओवी दास (2), सोनाली दास (6), भीमा दास (38), संगिता देवी (26), अजितकुमार शर्मा (7), रेखालकुमार शर्मा (5), निवा देवी (30), दीपरंजन शर्मा, अवदेश सिंग अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

"कोंढव्यात घडलेल्या घटनेमुळे मला तीव्र दु:ख झालं आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. जे लोक जखमी झालेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत", असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं आहे.

घटनास्थळाची पाहणी केल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर म्हणाले, "दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदतकार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. कोंढवा येथील दुर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल."

"मुसळधार पावसामुळे ही भिंत पडली आहे. बांधकाम कंपनीचा निष्काळजीपणा या घटनेमुळे उघड झाला आहे. 15 लोकांचा मृत्यू ही साधीसुधी बाब नाही." असं नवलकिशोर राम म्हणाले. मृत मजूर बिहार आणि पश्चिम बंगालचे आहेत. शासनातर्फे पीडितांना मदतीचं आश्वासनही दिलं.

जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह विमानाने बिहारला नेण्यात येणार आहे. ही व्यवस्था पुण्याचे जिल्हाधिकारी पाहत आहेत. ते तिथल्या प्रशासनाशी संपर्कात आहे." NDRF च्या माध्यमातून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये देण्यात येतील तसंच मुख्यमंत्री मदतनिधीतून काही मदत देण्यात येणार असल्याचं ते पुढे म्हणाले.

पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, "आमची टीम या घटनेमागच्या कारणांची चौकशी करत आहे. जे लोक या घटनेला जबाबदार आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. योग्य परवानग्या आणि खबरदारीचे उपाय घेतले की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत."

"या ठिकाणी काम थांबवण्याचा आदेश देणार आहोत आणि या घटनेची चौकशी करण्यात येईल", असं आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

बालेश्वर शर्मा या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, "मी तिथेच झोपायचो. मला पत्रा पडलेला दिसला. तेव्हा मी एका माणसाला ओढून बाहेर काढलं. तिथे एक दगड पडला. त्यामुळे एक माणूस त्याखाली चेपला गेला. तसंच चार लहान मुलंही चिरडली गेली. मला वाटतं 17-18 लोकं मृत्युमुखी पडली आहेत."

गेल्या तीन चार महिन्यांपासून या ठिकाणी बालेश्वर काम करत आहेत. या घटनेची माहिती त्यांनी गावी दिली. 'गावात सगळ्यांना फोन करून सांगितलं तिथे सगळे रडत आहेत,' असं बालेश्वर सांगतात.

'नोंदणी फक्त 50 हजार मजुरांचीच'

आजच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नोंदणी झालेली नसल्याचं कामगार आयुक्त शैलेश पोळ यांनी दिलीय. 50 हजार कामगारांच्या नोंदी कामगार विभागाकडे झालेल्या आहेत. मात्र यापेक्षा कितीतरी अधिक कामगार पुण्यात असण्याची शक्यता आहे.

ज्या ठिकाणी घटना घडली आहे ते बांधकाम व्यावसायिक फरार असल्याचं कामगार आयुक्तांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)