ओपेनहायमर यांच्याबरोबर अणूबॉम्ब बनवण्यात अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सहभाग होता?

ओपनहायमर आणि आईन्स्टाईन

फोटो स्रोत, Getty Images/Keystone-France

“Now it's your turn to deal with the consequences of your achievement.”

म्हणजे, "तुझ्या कर्तृत्वाचे परिणाम भोगण्याची आता तुझी वेळ आहे. "

‘ओपेनहायमर’ सिनेमातल्या एका दृश्यातलं हे वाक्य. भौतिकशास्त्रज्ज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांचा सहकारी असलेल्या रॉबर्ट ओपनहायमर यांना उद्देशून हे वाक्य म्हणतात.

हा सिनेमा आपल्याला 1940 च्या दशकात मॅनहॅटन प्रोजेक्टचं नेतृत्त्व करून अणुबॉम्ब बनवणारे रॉबर्ट ओपेनहायमर हे ‘फादर ऑफ द ऑटोमिक बॉम्ब’ कसे बनले, याची कथा सांगतो.

या सिनेमात एका दृश्यात आईन्स्टाईन दिसतात. आईन्स्टाईन यांच्या आयुष्याच्या संध्याकाळचा हा काळ. आईन्स्टाईन आणि ओपेनहायमर हे दोघेही तेव्हा प्रिन्स्टन इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीमध्ये होते. याच प्रिन्स्टन इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीचे संचालक म्हणून 1947 ते 1966 दरम्यान ओपनहायमर यांनी काम पाहिलं.

ओपेनहायमर आणि आईन्स्टाईन हे दोघेही त्यांच्या काळातील सर्वात मोठे शास्त्रज्ज्ञ होते. दोघांमध्ये मतभेद होते. मात्र, या दोघांनाही एक कळले होते की, भौतिकशास्त्र जगाची कशा पद्धतीने सेवा करू शकतं आणि जगाला कशी हानी पोहोचवू शकतं.

“आम्ही दोघेही अगदी जवळचे सहकारी होतो आणि काहीअंशी मित्रही होतो,” असं स्वत: ओपेनहायमर यांनी 1965 साली पॅरिसमध्ये आईन्स्टाईन यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित परिषदेत सांगितलं होतं.

दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी ‘ओपेनहायमर’ सिनेमात या दोन्ही भौतिकशास्त्रज्ज्ञांमध्ये एका भेटीचं दृश्य दाखवलंय. या भेटीत ओपेनहायमर हे ज्या पद्धतीनं आईन्स्टाईन यांना भेटतात, त्यावरून आईन्स्टाईन यांच्याबाबत ओपेनहायमर यांच्या मनात असलेलं प्रेम आणि आदर दिसून येतं. ‘वडीलधारे’ म्हणून आईन्स्टाईन यांच्याकडे ओपनहायमर पाहत असत.

खऱ्या आयुष्यात ओपेनहायमर आणि आईन्स्टाईन यांच्यात बरेच मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदरही होता.

टॉम कॉन्टी यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि सिलियन मर्फी यांनी रॉबर्ट ओपेनहायमर यांची भूमिका या सिनेमात साकारलीय.

दोन समांतर आयुष्य

रॉबर्ट ओपेनहायमर यांनी पदवीचं शिक्षण घेऊन 1920 साली जेव्हा सैद्धांतिक भौतिकशास्त्र (Theoretical Physics) विषयाचं शिक्षण घेतलं, तेव्हा अल्बर्ट आईन्स्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि जगातील महत्त्वाच्या शास्त्रज्ज्ञांपैकी ते एक होते. 1915 सालीच त्यांनी सापक्षतेचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला होता. आईन्स्टाईन यांचे इतर कार्यही अमेरिकन शास्त्रज्ज्ञांना प्रेरक ठरत होते.

जर्मनीत ज्यू धर्मियांवरील अत्याचार वाढू लागल्यानंतर आईन्स्टाईन यांनी युरोप सोडून अमेरिकेत गेले. 1932 मध्ये न्यू जर्सीतीली प्रिन्स्टनमध्ये त्यांनी आपलं काम सुरू केलं.

काही वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 1939 मध्ये आईन्स्टाईन यांचे सहकारी लिओ झिलार्ड यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांना पत्र लिहिलं आणि इशारा दिला की, युरेनियमच्या विखंडनाच्या वैज्ञानिक संशोधनामुळे जर्मनी अणूबॉम्ब विकसित करू शकतं. या पत्रावर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीही स्वाक्षरी केली होती.

आईन्स्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या अत्यंत गुप्त इशाऱ्यामुळेच पुढे मॅनहॅटन प्रोजेक्टची सुरुवात झाल्याचं मानलं जातं आणि या प्रोजेक्टचं प्रमुखपद अमेरिकन सरकारनं 1942 साली रॉबर्ट ओपनहायमर यांच्याकडे दिलं. ओपेनहायमर तोपर्यंत संशोधन क्षेत्रात नावाजले होते.

ज्या पत्राचा वर उल्लेख केला गेलाय, म्हणजे झिलार्ड यांनी लिहिलेलं आणि आईन्स्टाईन यांनी स्वाक्षरी केलेलं पत्र, ते 1939 च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांच्याकडे पोहोचलं.

वेगेवगळ्या स्रोतानुसार, 64 वर्षीय आइनस्टाईन यांना मॅनहॅटन प्रोजेक्टचा भाग बनवण्यात आलं नाही. याचं कारण ते जर्मन होते आणि शिवाय ते वैचारिकदृष्ट्या डाव्या विचारांकडे झुकणारे होते. शिवाय, आईन्स्टाईन आणि ओपेनहायमर यांच्या भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांच्या संकल्पनांमधील फरकही कारणीभूत होता.

केई बिर्ड आणि मार्टिन जे. शेर्विन यांनी त्यांच्या ‘American Prometheus: The Triumph and Tragedy of J. Robert Oppenheimer’ या चरित्रात्मक पुस्तकात म्हटलंय की, आईन्स्टाईन हे ‘लिव्हिंग पॅट्रन सेंट ऑफ फिजिक्स’ आहेत, पण ते कार्यरत शास्त्रज्ञ नाहीत, असं ओपनहायमरना वाटत असे.

क्रिस्टोफर नोलन यांनी ओपनहायमर आणि आईन्स्टाईन यांच्यातील संबंध सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केलाय. द न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना नोलन म्हणाले की, “मला त्या दोघांमधील संबंध अशा प्रकारे दिसले, जसे एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला बाजूला करून, त्याचं काम त्याच्या कनिष्ठानं हिसकावलं असावं.”

अणूबॉम्ब बनवण्यात अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सहभाग होता?

सिनेमात दाखवल्याप्रमाणे, मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू असतानाच ओपनहायमरना अणूबॉम्बच्या स्फोटाची तीव्रता किती असू शकते, याबद्दल शंका होती. त्यामुळे ते आईन्स्टाईनना जाऊन भेटतात आणि त्यांचं मत जाणून घेतात.

मात्र, सिनेमॅटिक लिबर्टी घेत नोलन यांनी हे दृश्य दाखवलंय. प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं.

नोलन यांनी सांगितलं की, “सिनेमॅटिक लिबर्टी घेत जे बदल केले, त्यातली एक गोष्ट म्हणजे, ओपेनहायमर यांनी आईन्स्टाईन यांना भेटून सल्ला घेतला नव्हता, तर सल्ला घेणारे शिकागो विद्यापीठात मॅनहॅटन प्रोजेक्टची आऊटपोस्ट चालवणारे आर्थक कॉम्प्टन हे होते.”

आईन्स्टाईन यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना चांगलं माहित आहे, असंही नोलन म्हणतात.

ओपनहायमर आणि त्यांच्या टीमनं पहिला अणूबॉम्ब तयार केला.

ओपनहायमर

फोटो स्रोत, Getty Images

प्रिन्स्टनपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या न्यू मेक्सिको मधील लॉस अलामोस लॅबोरेटरीमध्ये 1943 ते 1945 दरम्यान ओपनहायमर यांनी अणूबॉम्ब बनवण्यासाठी काम केलं. या दरम्यान ओपेनहायमर यांनी आईन्स्टाईन यांच्याशी चर्चा केली का किंवा सल्ला घेतला का, याबाबत कुठेही नोंद केलेली माहिती नाहीय.

आईन्स्टाईन यांनी अणूबॉम्ब बनवण्याच्या कामात सहभाग घेतला होता की नाही, याबाबत 1965 मध्ये ओपनहायमर यांनी स्वत: यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “आईन्स्टाईन यांनी अणूबॉम्ब बनण्याच्या कामात सहभाग घेतल्याचे दावे खोटे आहेत.”

किंबहुना, ओपनहायमर यांचं मत होतं की, 1939 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना जे पत्र पाठवलं गेलं होतं, ज्यात जर्मनी अणूबॉम्ब तयार करू शकतं, असा इशारा देण्यात आला होता, त्याचा अमेरिकन सरकारवर ‘काहीच’ परिणाम झाला नव्हता.

पहिल्या अणुबॉम्बच्या यशस्वी चाचणीनंतर ओपनहायमर यांना ‘नैतिक प्रश्ना’चा सामना करावा लागला. कारण त्यांच्या संशोधनाचा वापर केवळ इशारा म्हणून नव्हे, तर सामूहिक विनाशासाठी (मास डिस्ट्रक्शन) केला गेला. कारण 1945 साली जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी इथे अमेरिकेनं ओपनहायमर यांनी बनवलेले अणुबॉम्ब टाकले.

आइन्स्टाईन, झिलार्ड आणि इतर शास्त्रज्ञांनी जपानमधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याचा निषेध केला. कारण या शास्त्रज्ज्ञांच्या मते, जपान तसाही व्यावहारिकदृष्ट्या पराभूत झाला होता.

नोलनच्या चित्रपटाच्या कथानकात दाखवलंय की, ओपेनहायमरनं अमेरिकन सरकारला अणुबॉम्ब बनवण्याच्या त्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा घालण्याची गरज पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण राजकारणी त्याच्या विरोधात गेले आणि कम्युनिस्टांशी त्याच्या पूर्वीच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणानं त्याला सरकारी समितीसमोर साक्षही द्यावी लागली.

एन्रिको फर्मी पुरस्कार स्वीकारताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एन्रिको फर्मी पुरस्कार स्वीकारताना

नोलन यांनी या सिनेमात अणूबॉम्बच्या परिणामांमुळे ओपेनहायमर यांच्यावर कसे एकप्रकारे ओझं होतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

बर्ड आणि शेर्विन यांनी त्यांच्या चरित्रात्मक पुस्तकात म्हटलंय की, आईन्स्टाईन यांनी ओपेनहायमर यांना सांगितलं की, त्यांनी देशाची चांगली सेवा केल्यानं 'विच हंट'ला सामोरं जावं लागलं नाही. ओपनहायमर यांचे सचिव वर्ना हॉब्सन हे या संवादाचे साक्षीदार असल्याचं पुस्तकात म्हटलं गेलंय आणि त्यांच्याच हवाल्यानं हा संवाद देण्यात आलाय.

आईन्स्टाईननं ओपेनहायमरना पुढे म्हटलं की, जर अमेरिका तुम्हाला हे पक्षीस देत असेल, तर तुम्ही माघारी फिरलं पाहिजे.

मात्र, हॉब्सन दावा करतात की, ओपनहायमर यांचं अमेरिकेवर प्रचंड प्रेम होतं आणि ते प्रेम जितकं विज्ञानावर होतं, तितकंच प्रचंड होतं.

आईन्स्टाईनना समजत नाही, असं ओपेनहायमर यांनी हॉब्सनना सांगितलं.

आईन्स्टाईनना वाटत होतं की, ओपेनहायमर यांनी अमेरिकन सरकारकडून फारशी अपेक्षा बाळगू नये. या संवादानंतर ओपेनहायमर तिथून निघाले. त्यावेळी आईन्स्टाईन यांनी ओपेनहायमर यांच्याकडे बोट दाखवत त्यांच्या सचिवाला म्हटलं की, 'There goes a narr'. (Narr या जर्मन शब्दाचा अर्थ 'मुर्ख' असा होतो.)

ओपेनहायमर हे प्रिन्स्टनचे संचालक असताना त्यांनी आईन्स्टाईन यांच्या घरावर अँटेना बसवला होता, जेणेकरून ते शास्त्रीय संगीत ऐकू शकतील. कारण त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती, असं बर्ड आणि शेर्विन यांनी नोंदवलंय.

आईन्स्टाईन आणि ओपेनहायमर यांच्यात असहमती असतानाही दोघांमध्ये एकप्रकारचा समजूतदारपणा होता आणि एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता.

आईन्स्टाईननं ओपेनहायमर यांच्याबद्दल असं म्हटलं होतं की, ओपेनहायमर हा बहुआयामी शिक्षण घेतलेला सक्षम माणूस आहे. त्याच्या केवळ भौतिकशास्त्राबाबतच नव्हे, माणूस म्हणूनही आदर वाटतो.

दुसरीकडे, आइन्स्टाईन यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त ओपेनहायमर यांनी मोठ्या आदरानं आईन्स्टाईन यांच्या योगदानाचा गौरव केला.

"आईन्स्टाईन यांचे सुरुवातीचे काम अत्यंत सुंदर आहे. मात्र, त्यात अनेक त्रुटी आहेत," असं ओपेनहायमर यांनी पॅरिसमध्ये म्हटलं होतं. आईन्स्टाईन यांच्या कामाचं प्रूफरिडिंग करण्यासाठी ओपेनहायमर यांना दहा वर्षे लागली.

ओपेनहायमर यांनी यावेळी पुढे म्हटलं होतं की, "ज्या माणसाच्या चुका सुधारायला सुद्धा दहा वर्षे लागतात, तो माणूस नक्कीच महान असतो."

हे वाचलंत का?