You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चे गवेरा 'या' व्यक्तीमुळे भारताच्या प्रेमात पडले
14 जून 1928 साली लॅटिन अमेरिकन क्रांतिकारी चे गवेरा यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
ते व्यवसायाने डॉक्टर होते. 33 वर्षांचे असताना क्यूबाचे उद्योग मंत्री बनले आणि मग लॅटिन अमेरिकेत क्रांतीचा संदेश पोहचवण्यासाठी मंत्रिपद सोडून जंगलात गेले.
एकेकाळी अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू असलेले चे आज अनेकांच्या नजरेत एक महान क्रांतिकारी आहेत.
अमेरिकेच्या वाढत्या ताकदीला 50 आणि 60 च्या दशकात आव्हान देणारा हा तरुण – अर्नोस्तो चे गवेराची जन्मभूमी म्हणजे अर्जेंटिना.
सत्तेकडून संघर्षाकडे
मनात आणलं असतं तर चे अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये डॉक्टर बनल्यानंतर एक सुखी आणि समृद्ध आयुष्य जगू शकले असते.
पण आपल्या आसपास गरिबी आणि शोषण पाहून चे गवेरा मार्क्सवादाकडे झुकले. त्यांना वाटू लागलं की दक्षिण अमेरिकेतल्या प्रश्नांना उत्तरं शोधायची असतील तर सशस्त्र आंदोलन हा एकच मार्ग आहे.
1955 साली, म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षी चे यांची भेट फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी झाली. त्यानंतर ते क्रांतिकाऱ्यांमध्येच नाही तर सामान्य लोकांमध्येही प्रसिद्ध झाले.
क्यूबातल्या क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर वयाच्या 31 व्या वर्षी चे गव्हेरा आधी क्यूबाच्या राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर क्यूबाचे उद्योगमंत्री बनले.
1964 साली ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत क्यूबाकडून प्रतिनिधी म्हणून गेले तेव्हा जगभरातले अनेक मोठे नेते त्यांना ऐकण्यासाठी आतूर होते.
लोकप्रिय नाव
आजही क्यूबातली लहान मुलं चे गवेरा यांची पूजा करतात कारण फक्त क्यूबाच नाही तर संपूर्ण जगात चे गवेरा हे नाव आशेचं प्रतिक बनलं आहे.
जगातल्या कोपऱ्याकोपऱ्यात लोक त्यांना ओळखतात आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतात.
चे गवेरा यांचं चरित्र लिहिणाऱ्या जॉन अँडरसन यांनी म्हटलं होतं की, “चे फक्त क्यूबा आणि लॅटिन अमेरिका नाही तर संपूर्ण जगातल्या लोकांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत.”
ते लिहितात, “मी चे गवेरा यांचा फोटो पाकिस्तानातल्या ट्रक्सच्या मागे पाहिलाय, जपानमध्ये मुलांच्या स्नो बोर्डवर पाहिलाय. चे यांनी क्यूबाला रशियाच्या बरोबरीला आणून ठेवलं. क्यूब चे यांनी दाखवलेल्या मार्गावर अनेक दशकं चालतोय. चे गवेरा यांनी शक्तीशाली अमेरिकेच्या विरोधात एक नाही, दोन नाही अनेक व्हिएतनाम उभं करण्याचं धाडस दाखवलं होतं. चे व्यवस्थेच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या तरुणांचा हुंकार आहेत.”
बोलिव्हियात हत्या
37 व्या वर्षी क्यूबाचे सर्वांत ताकदवान युवा नेते चे गवेरा यांनी क्रांतीचा संदेश आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत पसरवायचं ठरवलं.
कांगोमध्ये चे गवेरा यांनी बंडखोरांना गोरिला लढाई (गनिमी कावा) ची पद्धत शिकवली. मग बोलिव्हियातल्या बंडखोरांना प्रशिक्षित करायला सुरुवात केली.
अमेरिकेचे गुप्तचर चे गवेरा यांना शोधत राहिले आणि शेवटी त्यांनी बोलिव्हियाच्या सैन्याच्या मदतीने चे गवेरा यांची हत्या करवली.
आज अर्नेस्ता चे गवेरा यांचे टीशर्ट भारतातल्या कोणत्याही शहरातल्या बाजारात मिळतील. लंडनमध्ये कोणत्यातरी फॅशनेबल जीन्सवर त्यांची प्रतिमा असेल पण क्यूबा आणि दक्षिण अमेरिकेतल्या कोट्यवधी लोकांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत.
आज चे गवेरा जिवंत असते तर 89 वर्षांचे असते. पण जेव्हा 9 ऑक्टोबर 1967 साली त्यांची हत्या झाली तेव्हा त्याचं वय फक्त 39 वर्षं होतं.
भारत दौरा
फार कमी लोकांना माहिती असेल की चे गवेरा यांनी भारताचा दौरा केला होता. तेव्हा ते क्यूबा सरकारमध्ये मंत्री होते.
भारत दौऱ्यानंतर त्यांनी 1959 साली एक अहवालही लिहिला होता ज्याची एक प्रत त्यांनी फिडेल कॅस्ट्रो यांना दिली होती.
या अहवालात त्यांनी म्हटलं होतं, “कैरोहून आम्ही भारताकडे सरळ उड्डाण केलं. 39 कोटींची लोकसंख्या आणि 30 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आमच्या दौऱ्यात आम्ही सगळ्या वरिष्ठ भारतीय नेत्यांना भेटणार होतो. नेहरूंनी फक्त आजोबांच्या मायेने आमचं स्वागत केलं नाही तर क्यूबाच्या जनतेचा त्याग आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेण्यात रस दाखवला.”
“नेहरूंनी आम्हाला मोलाचे सल्ले दिले आणि आमच्या लक्ष्य प्राप्तीसाठी आढेवेढे न घेता आपलं मत सांगितलं.
भारत दौऱ्यात आम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आम्हाला कळली ती म्हणजे एक देश त्यांच्या आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञान विकासावर अवलंबून असतो.”
“त्यासाठी वैज्ञानिक, संशोधन संस्थां स्थापन करणं अत्यावश्यक आहे – विशेषतः औषधं, रसायन, विज्ञान, भौतिकशास्त्र आणि कृषी क्षेत्रात.”
आपल्या निरोप समारंभाबदद्ल ते लिहितात, “जेव्हा आम्ही भारतातून परतत होतो तेव्हा शाळकरी मुलांनी ज्या घोषणा देऊन आम्हाला निरोप दिला ते काहीसे असे होते – ‘क्यूबा भारत भाई भाई.’खरंच क्यूबा आणि भारत भाऊ आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)