You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाब्लो एस्कोबार : जगातला खतरनाक गँगस्टर ज्याला भाडोत्री गुंडही मारू शकले नाहीत
- Author, स्टीव्हन ब्रोकलेहर्स्ट
- Role, बीबीसी स्कॉटलंड न्यूज
पैसे घेऊन माणसांची हत्या करणाऱ्या एका ब्रिटिश गटाने 1989मध्ये जगातल्या सगळ्यांत खतरनाक मानल्या जाणाऱ्या अपराध्याच्या साम्राज्यात प्रवेश केला.
जगातल्या सगळ्यांत धोकादायक समजल्या जाणाऱ्या माणसाचा खात्मा करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. या तुकडीचं नेतृत्व करत होते स्कॉटलंडचे पीटर मॅक्लेज.
फक्त कोलंबियात नव्हे तर जगात सर्वांत भीतीदायक मानलं जाणाऱ्या मॅडलिन ड्रग्स कार्टेलचा तो सर्वेसर्वा होता. गुन्हेगारी जगतात पाब्लो हा सगळ्यांत श्रीमंत गँगस्टर मानला जातो.
कोकेनचा सगळ्यांत मोठा निर्माता आणि वितरक यासाठी तो जगात ओळखला जात असे. जगभरात चालणाऱ्या कोकेनच्या एकूण व्यापारापैकी 80 टक्के हिस्सा पाब्लोच्या नावावर होता.
ब्रिटिश सैन्यातील स्पेशल एअर सर्व्हिसचे माजी कर्मचारी मॅक्लेज यांच्यावर पाब्लोला मारण्याची जबाबदारी कोलंबियातील त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी सोपवली होती.
अपयशी ठरलेल्या या मोहिमेबद्दल आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या माणसाबद्दल 'किलिंग एस्कोबार' नावाच्या डॉक्युमेंटरीत सविस्तर ऐकायला आणि पाहायला मिळतं.
ग्लासगो इथे 1942मध्ये जन्मलेल्या मॅक्लेज यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं होतं आणि त्यांनी आयुष्यात खूप चढउतार पाहिल्याचं चित्रपट निर्माते डेव्हिड व्हिटनी सांगतात.
स्कॉटलंडमधल्या सगळ्यांत मोठ्या शहराच्या उपनगरात म्हणजेच रिडडिरी या ठिकाणी ते लहानाचे मोठे झाले.
यापासून जवळच बर्लिननेचा कुख्यात असा तुरुंग होता. तिथेच त्यांचे वडील होते. त्यांचे बाबा कठोर आणि हिंसक स्वभावाचे होते.
आता 78 वर्षांचे झालेले मॅक्लेज डॉक्युमेंटरीत सांगतात, कोणाचीही हत्या करण्याचं प्रशिक्षण मला लष्करात मिळालं होतं. परंतु माझ्यातली विजीगिषु वृत्ती ग्लासगो इथली होती.
ते पुढे सांगतात, घर सोडल्यानंतर 17व्या वर्षी मी लष्करात भरती झालो. माझ्या आक्रमकतेला तिथे दिशा मिळाली. ते ब्रिटिश लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा भाग झाले. त्यानंतर लष्कराच्या अतिमहत्त्वाच्या अशा एलिट22 रेजिमेंटचे सदस्य झाले.
स्पेशल एअर सर्व्हिस युनिटचा भाग म्हणून ते बोर्नियाच्या जंगलात झालेल्या युद्धात देखील होते. 1969 मध्ये त्यांनी ब्रिटिश लष्कराला रामराम केला. आयुष्यातला तो सगळ्यांत चुकीचा निर्णय असल्याचं ते सांगतात.
त्यानंतर एकामागोमाग एक नोकऱ्या बदलत राहिले. अनेक नोकऱ्यांमध्ये ते स्वत:ला सामावून घेऊ शकत नसत. त्यामुळे ते अलिप्त राहू लागले. त्यांच्यातली आक्रमकता वाढीस लागली होती. गर्लफ्रेंडचा छळ केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
मॅक्लेज यांना या चित्रपटासाठी भाडोत्री मारेकरी म्हणून अंगोलियातील नागरी युद्ध, झिम्बाब्वे तसंच दक्षिण आफ्रिकेतील आठवणींना उजाळा द्या असं सांगण्यात आलं.
अंगोला इथं 1976मध्ये मॅक्लेज यांची भेट डेव्ह टॉमकिंस यांच्याशी झाली. टॉमकिंस सैन्याचा भाग नव्हते. मात्र व्यवहार ठरला की ते हत्यारं पुरवत असत. हे दोघं घट्ट मित्र बनले. पाब्लो एस्कोबारच्या हत्येसाठी टॉमकिंस यांनीच मॅक्लेज यांच्याशी संपर्क साधला होता.
जॉर्ज सालसेडो कोलंबियात एस्कोबारविरोधी काली कार्टेलचा भाग होते. ते एस्कोबारवर हल्ला करण्याची योजना तयार करत होते. त्यासाठी टॉमकिंस यांना त्यांनी एक चमू तयार करायला सांगितलं. मॅक्लेज यांना सगळ्यांत आधी पाचारण करण्यात आलं.
मॅक्लेज सांगतात की, तुमच्याकडे पुरेसा अनुभव नसेल तर पाब्लोची हत्या करण्यासाठी तुम्हाला संपर्कच केला जाणार नाही. त्याची हत्या करण्याबाबत माझ्या मनात कोणतीही साशंकता नव्हती. मी याकडे हत्या म्हणून पाहतच नव्हतो. मी याकडे माझं लक्ष्य अशा पद्धतीने बघत असे.
पाब्लो त्याच्या नेपल्स इस्टेटमधल्या आलिशान फार्महाऊसवर असतानाच त्याला मारलं जाऊ शकतं असं काली कार्टेलला वाटत होतं.
बंदुका आणि बॉम्ब
हे फार्महाऊस प्रचंड मोठं आहे. यामध्ये एक प्राणीसंग्रहालयही आहे. अनेक अनोखे प्राणी याठिकाणी ठेवलेले आहेत. त्याशिवाय जुन्या आणि लक्झरी गाड्याही मोठ्या संख्येने आहेत. खाजगी विमानतळ आहे. बैलांच्या झुंजीसाठी स्वतंत्र मैदान आहे.
मॅक्लेज यांनी बेत आखण्यासाठी फार्महाऊसला भेट दिली. इथे पाब्लोची हत्या केली जाऊ शकते यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं.
टॉमकिंस यांनी पाब्लोची हत्या करण्यासाठी बारा जणांचं पथक तयार केलं. यापैकी बहुतांश जणांनी टॉमकिंस यांच्याबरोबर काम केलं होतं किंवा त्यांच्या मित्रांनी त्यापैकी कुणाची तरी शिफारस केलेली होती.
जॉर्ज सोलसेडो यांनी या बारा जणांना कोलंबियातील वागण्याबोलण्याची पद्धत सांगितली. काली कार्टेलने त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली.
तुकडीतल्या प्रत्येकाला दर महिन्याला पाच हजार डॉलर्सव्यतिरिक्त खाण्यापिण्याचा वेगळा भत्ता दिला जात असे. टॉमकिंसला दर दिवसासाठी हजार डॉलर मिळत होते.
या चित्रपटात एक व्हीडिओ वापरण्यात आला होता. टॉमकिंसने हा व्हीडिओ चित्रित केला होता. यामध्ये हे सगळेजण पैशाची बंडलं उघडताना दिसत आहेत.
सुरुवातीला हे सगळे काली सिटी मध्ये राहिले. मात्र लोकांच्या नजरेत येऊ लागल्याने धोका वाढला त्यामुळे हे सगळे शहराच्या अन्य भागात स्थिरावले. त्याठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर हत्यारं पुरवण्यात आली.
मॅक्लेज सांगतात, "अगदी ख्रिसमसप्रमाणे वातावरण होतं. आम्हाला जी हत्यारं लागत होती ती उपलब्ध करून देण्यात आली."
भाडोत्री मारेकरी असलेल्या त्या सगळ्याचं कठोर प्रशिक्षण सुरू होतं. टॉमकिंस आणि मॅक्लेजवगळता अन्य कुणाला लक्ष्य कोण आहे याची कल्पना देण्यात आली नव्हती.
जोवर कोणाला लक्ष्य करायचं हे हे कळण्याआधीच या पथकातल्या काहीजणांनी मोहिमेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या लोकांनी वर्तमानपत्राला कहाणी सांगितली मात्र नाव आणि मोहीम कुठली ते सांगितलं नाही.
हल्ल्याचा दिवस जवळ येऊ लागला तसं उरलेल्या लोकांनी बाँब आणि बंदुकांसह जंगलात सरावाला सुरुवात केली. जंगलात सराव केला जेणेकरून आवाज अन्य लोकांना कळू नये.
हल्ल्याच्या योजनेनुसार दोन हेलिकॉप्टरं पाब्लोच्या फार्महाऊसवर उतरून हल्ला करणार होती. तिथल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करून पाब्लोची हत्या करून त्याचा शिरच्छेद करून डोकं चषक म्हणून घेऊन जाण्याचा त्यांचा मनसुबा होता.
मुखबिरहून पाब्लोच्या फार्महाऊसला जाण्यासाठी माहिती मिळाली, तशी त्यांनी तयारी सुरू केली मात्र हा हल्ला कधी होऊच शकला नाही.
मॅक्लेज आणि टॉमकिंस यांना घेऊन उडालेलं हेलिकॉप्टर अँडीज पर्वतरांगेत दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला.
वचन
या हल्ल्यात बाकी सगळे जण वाचले पण मॅक्लेज गंभीररीत्या जखमी झाले. वेदनेने विव्हळत ते डोंगरामध्ये पडून राहिले, तेव्हा त्यांना वाचवण्यात आलं.
पाब्लो यांना हल्ल्याची माहिती मिळाली, त्यांनीही डोंगरांमध्ये या लोकांना शोधण्यासाठी आपली माणसं धाडली.
मॅक्लेज सांगतात, पाब्लोच्या माणसांना मी सापडलो असतो तर माझा मृत्यू वेदनेने तळमळत झाला असता हे नक्की.
मॅक्लेज तिथून निसटण्यात यशस्वी ठरले. अँडीज पर्वताच्या खाली पहुडलेल्या स्थितीत त्यांनी यापुढे चांगलं काम करेन असं देवाला वचन दिलं.
मी वाईट, नीच आणि मूर्ख होतं हे मॅक्लेज यांनी स्वीकारलं आणि हे बदलण्याची आवश्यकता त्यांना वाटू लागली.
युद्ध क्षेत्रातील कामगिरीबाबत त्यांना खजील वाटत नसे. पती आणि बाप म्हणून अपयशी ठरलो असं त्यांना वाटत असे.
ते म्हणतात, मला पश्चाताप होतो. कुटुंबातलं कोणीही माझ्या सैन्यात असण्याच्या बाजूने उभं राहिलं नाही.
मॅक्लेज यांच्या मते, 78व्या वर्षी आयुष्यात त्यांना शांतता लाभली आहे. दुसरीकडे 1993 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात गोळी लागून पाब्लो यांचा मृत्यू झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)