फुटबॉल : मॅच हरल्यावर युद्ध भडकलं आणि हजारो लोकांचा जीव गेला

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

त्या दोन देशांमध्ये खुन्नस होतीच. खटकेही उडायचे. दोन्ही देशांचं न पटायला म्हटलं तर अनेक कारणं होती - स्थलांतर, बेकायदा घुसखोर, सीमावाद... पण एक कारण पुरलं आणि युद्ध भडकलं.

ना... कोणी कोणावर हल्ला केला नव्हता, कुठे एकमेकांचे अतिरेकी पकडले गेले नव्हते, कोणी घुसखोर घुसवले नव्हते. फक्त एक फुटबॉलची मॅच झाली आणि एक देश जिंकला - एक हरला. एवढा अपमान पुरेसा होता.

फुटबॉलच्या इतिहासातलं प्रसिद्ध युद्ध - 100 अवर्स वॉर म्हणूनही ओळखलं जातं.

फुटबॉलचे फॅन्स 'करो या मरो' याच मानसिकतेचे असतात. अनेक देशांमधल्या मॅचेस युद्धापेक्षा कमी नसतात.

बऱ्याचदा हरलेल्या-जिंकलेल्या संघाचे फॅन्स एकमेकांशी भिडतात, डोकी फुटतात. जगभरात हे घडत आलेलं आहे, आणि त्यामुळचे कदाचित या फुटबॉलच्या आतातायी फॅन्सला आवरण्यासाठी प्रत्येक मोठ्या स्पर्धेदरम्यान पोलिसांची खास कुमक तैनात असते.

पण हा किस्सा आहे एका युद्धाचा. साधंसुधं युद्ध नाही, फुटबॉलमुळे झालेलं खरंखुरं युद्ध. या रक्तपाताची आठवण लोक आजही फुटबॉल वॉर म्हणून काढतात.

गोष्ट आहे 1969 सालची. पुढच्याच वर्षी मेक्सिकोत होणाऱ्या वर्ल्डकपच्या क्वालिफायर मॅचेस सुरू होत्या.

एल साल्वाडोर आणि होंडुरास हे दोन दक्षिण आफ्रिकेतले देश एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळची परिस्थिती अशी होती की दोन्ही देशांमधून आडवा विस्तव जात नव्हता.

त्यामागे अनेक कारणं होती.

सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं जागेचा वाद आणि बेकायदा स्थलांतर. त्यावेळी होंडुरासचं क्षेत्रफळ एल साल्वाडोरच्या जवळपास पाचपट होतं आणि लोकसंख्या होती जवळपास 24 लाख. दुसरीकडे एल साल्वाडोर क्षेत्रफळाने लहान असूनही तिथे लोकसंख्या होती 30 लाख.

त्यामुळे एल साल्वाडोरमधलं आयुष्य जगणं सामान्य माणसांना कठीण झालं होतं आणि त्यामुळे ही माणसं चांगल्या संधीच्या शोधात जवळच्या होंडुरासमध्ये जायची.

अनेकदा हे स्थलांतर बेकायदा असायचं. त्यामुळे होंडुरासच्या लोकांच्या मनात एल साल्वाडोर आणि तिथल्या लोकांबद्दल अढी होती.

हे लोक येऊन आपला रोजगार चोरतात असा स्थानिक विरुद्ध परके असा झगडा शीगेला पोचला होता.

एका बाजूला एल साल्वाडोरहून आलेले स्थलांतरित वाट्टेल ते काम करत होते, आणि साहाजिकच हळूहळू पैसा गाठीशी बांधत होते तर होंडुरासच्या स्थानिकांना आयुष्यात फारसा त्रास नव्हता त्यामुळे खूप कष्ट करण्याचीही सवय नव्हती.

पडीक पडलेल्या जमिनीवर अल साल्वाडोरच्या स्थलांतरितांनी कब्जा केला आणि तिथे वेगवेगळी पिकं घ्यायला सुरूवात केली.

अनेक दशकं हा सिलसिला सुरू होता त्यामुळे स्थलांतरितांच्या पुढच्या पिढ्या स्थानिकांपेक्षा श्रीमंत झाल्या.

दुसरं म्हणजे होंडुसारमध्ये जमीनदारी पद्धत होती आणि अनेक अमेरिकन कंपन्या कॉर्पोरेट शेती करायच्या. या शेतांवर काम करायला एल साल्वाडोरचे मजूर त्यांना बरे पडायचे.

राग धुमसत होता. दोन्ही देशातल्या राज्यकर्त्यांनी या बेकायदेशीर स्थलांतरावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले खरे, पण मुळात हा प्रश्न भिजत ठेवून त्यांना लोकांची डोकी भडकवण्यात जास्त रस होता.

एल साल्वाडोरचे तेव्हाचे राष्ट्रप्रमुख कर्नल फिडेल हर्नांडेझ यांनी 1967 देशाची सूत्रं हातात घेतली तेव्हा परिस्थिती बिकट होती.

एल साल्वाडोर शेतीप्रधान देश होता आणि त्यांच्याकडे परकीय चलन यायचं ते मुख्यत्वेकरून कॉफी आणि कापसाच्या निर्यातीतून. देशाची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून होती.

पण 1969 साली कॉफी आणि कापसाच्या किंमती जगभरात घसरल्या आणि एल साल्वाडोरमध्ये एक प्रकारची मंदी आली. लोकांमध्ये असंतोष उफाळला.

याच वर्षी झालं फुटबॉल युद्ध. त्यामुळे अनेक अभ्यासकांना असं वाटतं की हा देशांतर्गत प्रश्नांकडून जनतेचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न होता.

आता येऊ पुन्हा आपल्या मॅचेसकडे.

एल साल्वाडोर आणि होंडुरास हे संघ फिफा वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पहिल्यांदा आमनेसामने 1967 साली आहे.

क्वालिफायर म्हणजे 1970 साली होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये कोणते संघ खेळणार याची निवड चाचणीच.

या मॅचेस जून 1969 मध्ये होणार होत्या आणि तोवर जवळपास 3 लाख एल साल्वाडोरचे स्थलांतरित होंडुरासमध्ये राहात होते, काम करत होते. होंडुरासच्या कष्टकरी वर्गाची जी लोकसंख्या होती त्यातले जवळपास 20 टक्के लोक एल साल्वाडोरहून स्थलांतरित झाले होते.

दोन्ही देशांच्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल राग होता आणि त्यामुळेच कोणतीही फुटबॉल मॅच असेल तर त्याला युद्धाचं स्वरूप यायचं.

दोन्ही देशांमधले राष्ट्रवादी लोक, माध्यमं आणि राजकारणी या व्देषाच्या राजकारणाला हवा द्यायचे.

दोन्ही देश एकूण तीन क्वालिफायर मॅचेस खेळणार होते. मॅचेस सुरू होण्याच्या आधीपासून दोन्ही बाजूचे प्रेक्षक, फॅन्स एकमेकांना त्रास द्यायला लागले होते.

काही रिपोर्टनुसार पहिल्या मॅचच्या आधी होंडुरासच्या फॅन्स एल साल्वाडोरचे फॅन्स जिथे थांबले होते त्या हॉटेलच्या बाहेर एवढा दंगा केला की ते खेळाडू रात्रभर झोपू शकले नाहीत. जवळपास दंगलच झाली होती.

पहिली मॅच होंडुरासची राजधानी टेगुलसीगालपामध्ये होणार होती.

पहिल्या मॅचचा दिवस उजाडला. बाहेर तणावाचं वातावरण होतं. दोन्ही टीम मॅचच्या 90 व्या मिनिटापर्यंत एकही गोल करू शकल्या नव्हत्या. मॅच ओव्हरटाईममध्ये गेली.

शेवटच्या क्षणाला होंडुरासच्या टीमने गोल केला आणि मॅच जिंकली. ज्या क्षणाला मॅच जिंकली गेली, त्या क्षणाला स्टेडियममध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या.

दोन्ही देशांचे प्रेक्षक एकमेकांना भिडले. काचेच्या बाटल्या एकमेकांवर फेकल्या गेल्या, स्टेडियमच्या एका भागात आगही भडकली. डोकी फुटली होती, रक्त सांडलं होतं.

दोन्ही देशांच्या लोकांनी मॅच जीवनमरणाचा, त्याहीपेक्षा जास्त आपल्या देशाच्या इज्जतीचा प्रश्न बनवला होता.

जो कोणता देश मॅच हरेल त्या देशाची इज्जत मातीत मिळणार असं वातावरण तयार झालं होतं. एल साल्वाडोरचे फॅन्स आधीच आपला देश हरला म्हणून चिडले होते.

त्यातच एक बातमी आली की मॅच हरल्यानंतर एल साल्वाडोरच्या एका महिलेने आत्महत्या केली. तिथल्या मीडियाने त्या महिलेची अंत्ययात्रा लाईव्ह दाखवली. लोकांच्या मनात या कव्हरेजनंतर होंडुरासमधले लोक आणि त्या देशाबद्दल आणखी नकारात्मक भावना तयार झाली.

तणाव शिगेला पोचला होता.

दुसरी क्वालिफायर मॅच एल साल्वाडोरमध्ये होणार होती. लोकांची माथी पद्धतशीरपणे भडकवली गेली होती. होंडुरासची फुटबॉल टीम एल साल्वाडोरच्या विमानतळावर पोचल्या पोचल्या धक्काबुक्की झाली.

होंडुरासचा स्टार खेळाडू होता एन्रिके कार्डोना, ज्याला रॅबिट असंही म्हणायचे. बस, त्याच्यावर हल्ला करून त्याचं खच्चीकरण करण्याचा फॅन्सचा प्रयत्न होता. सगळीकडे पोस्टर लागले होते की एक ससा एन्रिकेला धुवून काढतोय, दणादण चोपतोय.

बरं, या मॅचच्या आदल्या रात्री होंडुरासमध्ये फॅन्सने जे केलं त्याची पुनरावृत्ती झाली. एल साल्वाडोरच्या लोकांनी होंडुरासची टीम जिथे थांबली होती त्या हॉटेलबाहेर रात्रभर तोडफोड केली, धिंगाणा घातला.

हेतू एकच की प्रतिस्पर्धी टीमला एक सेंकदही झोपता येऊ नये.

रात्र संपली तेव्हा दोन लोकांचा मृत्यू झाला होता आणि नऊ लोक जखमी झाले होते. याच्या बातम्या त्यावेळी स्थानिक मीडियात झळकल्या होत्या.

होंडुरासच्या राष्ट्रध्वजाचा रस्त्यात अपमान केला गेला. परिस्थिती एवढी चिघळली की रातोरात होंडुरासच्या खेळाडूंना हॉटेलमधून काढून गुप्तपणे त्यांच्या दुतावासात आश्रयाला नेलं की बुवा इथे तरी ते सुरक्षित राहातील.

रात्रभर जे एल साल्वाडोरच्या रस्त्यावर झालं ते मॅचच्या स्टेडियममध्ये होणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य होतं.

होंडुरासचे खेळाडू घाबरलेले होते, त्यांना लपून ठेवण्यात आलं होतं. मॅच सुरू झाली तेव्हा होंडुरासचा झेंडा फडकवला गेला नाही तर त्याऐवजी फरशी पुसायचा कपडा फडकवला गेला.

मॅच सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच एल साल्वाडोरची टीम आक्रमक होती. पहिल्या चार मिनीटातच त्यांच्या टीमने तीन गोल केले.

एल साल्वाडोर मॅच जिंकलं तेव्हा पुन्हा रस्त्यावर धिंगाणा सुरू झाला. लोक आता आनंद साजरा करत होते.

त्यानंतर प्रतिक्रिया देताना होंडुरासचा स्टार खेळाडू एन्रिके कार्डोनोने म्हटलं होतं, "आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही जिंकलो, चुकून हरलो असतो, तर जिवंत परत आलो नसतो."

एल साल्वाडोरमध्ये जे झालं त्याचं प्रत्युत्तर होंडुरासमधल्या स्थानिक गँग्स, गुंडांनी तिथल्या स्थलांतरितांना त्रास देऊन दिलं.

हे गुंड एल साल्वाडोरचे जे स्थलांतरित आले होते त्यांच्या शेतात घुसून, मारहाण करून त्यांना पळवून लावत होते. ज्यांनी निघून जायला नकार दिला त्यांच्या घरांना आगी लावल्या.

एल साल्वाडोरचा मीडिया गप्प बसणार होता काय? त्यांनी सरळ युद्धाच्या घोषणा करायला सुरुवात केली. (पन्नास वर्षांपूर्वी, दूरवरच्या खंडात घडलेल्या या गोष्टीचा आजच्या काळात संदर्भ लागला, आपल्या बाबतीत हे घडून गेलंय, घडतंय असं वाटलं तर तो योगायोग नाही.)

वर्तमानपत्रं बातम्या छापायला लागली की यांच्यावर हल्ला करून यांना धडा शिकवा.

दोन्ही मॅचदरम्यान एवढा तमाशा झाल्यानंतर तिसरी क्वालिफायर मॅच एका तटस्थ ठिकाणी घेण्याचं फुटबॉल संघटनांनी ठरवलं. ही मॅच मेक्सिकोची राजधानी मेक्सिकोसिटी इथे झाली.

दोन्ही टीम्सवर भयानक दबाव होता. आपल्या देशाची जणूकाही संपूर्ण इज्जत त्या खेळाडूंच्या हातात आहे असं चित्र उभं केलं गेलं. लोकांच्या अवास्तव अपेक्षा होता, आणि जगभराचं लक्ष या तिसऱ्या मॅचकडे लागलं होतं.

टाचणी लागली तरी फटकन स्फोट होईल अशा तणावाच्या वातावरणात तिसरी मॅच सुरू झाली. आधी एल साल्वाडोरच्या टीमने दोन गोल केले, त्याला लगोलग उत्तर दिलं होंडुरासने. त्यांनीही दोन गोल ठोकले.

मॅच टाय झाली आणि ओव्हरटाईममध्ये गेली. शेवटी 101 व्या मिनिटाला एल साल्वाडोरने विजयी गोल केला. गोल झाल्या झाल्या दोन्ही देशांनी जाहीररित्या आपल्यातले राजनैतिक संबंध तोडून टाकले.

युद्धाची तयारी सुरू झाली होती.

26 जूनला तिसरी क्वालिफायर मॅच संपली आणि बरोबर 20 दिवसांनी एल साल्वाडोरने होंडुरासवर हल्ला केला.

14 जुलै 1969 ला एल साल्वाडोरची तीन लढाऊ विमानं होंडुरासमध्ये शिरली आणि हल्ले केले. या हल्ल्यानंतर लगेचच एल साल्वाडोरच्या सैन्याने होंडुरासच्या भूमीवर हल्ला केला. एल साल्वाडोरचं सैन्य होंडुरासच्या राजधानीच्या दिशेने निघालं.

होंडुरासपेक्षा एल साल्वाडोरची सैन्य क्षमता अधिक होती त्यामुळे त्यांना आक्रमण करणं, आणि राजधानीच्या दिशेन पुढे सरकणं सोपं होतं.

पण हळूहळू होंडुरासच्या नागरिकांनी प्रतिकार करायला सुरुवात केली. एल साल्वाडोरच्या सैनिकांकडे फारशी शस्त्र उरली नाहीत.

इकडे हे सैन्य घुसलं असताना होंडुरासने शिस्तबद्ध पद्धतीने एल साल्वाडोरच्या तेलविहिरी, मोठे प्रकल्प आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले.

दोन्ही देश माघार घेत नाही हे पाहून ऑर्गनाझेशन ऑफ अमेरिकन स्टेट या संस्थेने मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांवर कडक निर्बंध लादण्याची धमकी दिली.

शेवटी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी मान्य केली. 20 जुलैला शस्त्रसंधी झाली पण तोवर दोन्ही बाजूच्या 2000 पेक्षा जास्त लोकांचे जीव गेले होते.

युद्ध भले फक्त 100 तास चाललं असेल पण त्याचे परिणाम दोन्ही देशांना पुढची अनेक दशकं भोगावे लागले.

एक लाखाहून जास्त एल साल्वाडोरियन स्थलांतरित होंडुरास सोडून पळून गेले. यातले बहुतांश मजूर, कामगार, शेतमजूर होते.

होंडुरासमध्ये एकदम कामगारांचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.

दुसरीकडे एल साल्वाडोरने युद्ध सुरू केलं म्हणून त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्बंध लादले त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था धडपडली.

खरंतरं दोन्ही देशांमधल्या लोकांच्या असंतोषाचं कारण जमीनदारी आणि अमेरिकन कंपन्यांच्या हातात गेलेली जमीन हे होतं.

दोन्हीकडच्या गरीबांच्या हातात स्वतःच्या उपजिवीकेसाठी जमीनच शिल्लक राहिली नव्हती. पण दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांनी आपल्या फायद्यासाठी यावर कधीच तोडगा काढला नाही.

वरवरचे तात्पुरते प्रयत्न म्हणून एल साल्वाडोरचे राज्यकर्ते होंडुरासला शिव्या द्यायचे, मीडिया प्रखर राष्ट्रवादी भावनेला खतपाणी घालायचा, होंडुरास एल साल्वाडोरच्या स्थलांतरितांवर करत असलेल्या अत्याचाराच्या खऱ्याखोट्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या.

तर होंडुरासमध्येही जमीनदारांच्या विरोधात, ज्या जमीनदारांच्या शेतावर स्थलांतरित मजूर म्हणून काम करायचे, काहीही कारवाई व्हायची नाही.

लोकांमध्ये असंतोष भडकला की एल साल्वाडोरहून स्थलांतरित झालेल्या मजुरांना हाकललं जायचं.

'द हंड्रेड अवर वॉर' या पुस्तकाचे लेखक डॅन हेजडॉर्न बीबीसीच्या टोबी लकहर्स्ट यांच्याशी बोलताना म्हणतात, "या युद्धाचा खरंतर जमिनीशी संबंध होता. फार मोठी जमीन फार थोड्या लोकांच्या हातात होती आणि दुसरीकडे प्रचंड लोकसंख्या अल्पशा जमिनीवर गुजराण करत होती. सत्ता जमीनदारांची होती आणि ते मीडियाला हाताशी धरून लोकांना भडकवत होते."

मुळचे एल साल्वाडोरचे असलेले मेक्सिकन खेळ पत्रकार बीबीसीशी बोलताना म्हणतात, "मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या आणि योगायोगाने त्याचवेळी वर्ल्ड कप क्वालिफायरच्या तीन मॅचेस झाल्या. त्याने आगीत तेल ओतलं गेल. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये फुटबॉल म्हणजे जीव की प्राण. हे एका अर्थाने चांगलंही आहे आणि वाईटही."

ते पुढे म्हणतात, "जिंकणं म्हणजे देशप्रेम होतं, आमचं कर्तव्य होतं. मॅच हरण्याला सगळेच घाबरत होते. कारण त्याने जी बदनामी झाली असती ती आयुष्यभर पिच्छा पुरवत राहिली असती."

"ओव्हरटाईमध्ये एल साल्वाडोरने जो ऐतिहासिक गोल केला त्याची नोंद इतिहासात अशी होईल याची कोणालाच कल्पना नव्हती."

एल साल्वाडोर 1970 चा वर्ल्डकप खेळायला पात्र ठरला. पण वर्ल्डकपच्या पहिल्या तिन्ही मॅच दणकून हरला. मेक्सिको, सोव्हियत युनियन आणि बेल्जियम या तीन टीम्सच्या विरोधात झालेल्या मॅचेसमध्ये एल साल्वाडोरचे खेळाडू एकही गोल करू शकले नाहीत आणि घरी परत आले.

दोन हजार लोकांच्या नशीबात मात्र मृत्यू लिहिला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)