FIFA वर्ल्ड कप -अॅलेक्स फर्ग्युसन : बेकहम, रोनाल्डोला घडवणाऱ्या जिगरबाज कोचची कथा

'बगळ्यांना विसरू नका'. अटीतटीच्या लढती आधी खेळाडूंच रक्त सळसळवणारा हा संदेश नाही. म्हणजे हे ऐकून तुमच्या धमन्यांमधलं रक्त फुरफुरत नाही, किंवा समोरच्यावर चाल करून जावं असं वाटत नाही आणि आज जिंकू किंवा मरूच असा आवेशही येत नाही.

फारफार तर विचाराल, कोणते बगळे बुवा? त्यांचं काय?

पण याच वाक्याने जगातल्या सगळ्यांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या फुटबॉल क्लब्सपैकी एक मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंचं रक्त एक नाही, दोन नाही तब्बल 26 वर्षं सळसळवलं.

एका माणसाच्या नेतृत्वाखाली या क्लबने फुटबॉलमधले उत्तमोत्तम खेळाडू दिले, जगातले आहे नाही ते फुटबॉलमधले सगळे किताब जिंकले.

काय होता या वाक्याचा अर्थ? आणि कोण होता ही किमया घडवणारा माणूस?

सर अॅलेक्स फर्ग्युसन, ब्रिटिश फुटबॉलच्या इतिहासातला सर्वोत्तम क्लब मॅनेजर. हे मी म्हणत नाहीये, ब्रिटिश जनतेनेच 2018 साली म्हटलं होतं. त्यांना 2006 साली ब्रिटनची 'सर' ही पदवी दिली गेली.

बरं मग यांचा आणि त्या पांढऱ्या पक्ष्यांचं काय? तेही सांगते.

मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंनी सांगितलेला हा किस्सा. बीबीसी स्पोर्ट्सच्या एका लेखात त्याचं वर्णन आहे.

ग्राऊंडवर प्रॅक्टिस चाललेली असताना अॅलेक्स फर्ग्युसन अनेकदा ती थांबवायचे, आकाशातून बगळ्यांचा थवा उडत असायचा. खेळाडूंना म्हणायचे, "ते पक्षी पाहा."

"त्यांच्या 8 हजार किलोमीटर्सच्या प्रवासातलं हे एक क्षणचित्र. या प्रवासात प्रत्येक पक्षी आळीपाळीने पुढे येतो आणि थव्याचं नेतृत्व करतो. जणू काही तो एका परफेक्ट मशीनचा भाग आहे, आणि ते मशीन न चुकता काम करतंय. या मशीनचं एकच ध्येय आहे, एकच लक्ष्य आहे."

मग ते खेळाडूंकडे वळायचे आणि म्हणायचे. "आता जर ते हे करू शकतात तर तुम्ही मला स्पर्धा जिंकण्यासाठी 38 मॅचेस देऊच शकता."

बगळे, एक साधं प्रतीक, पण सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी फुटबॉलच्या इतिहासात ते अजरामर करून टाकलं. हीच फिलोसॉफी घेऊन चालणाऱ्या फर्ग्युसन यांचा प्रभाव आज फक्त फुटबॉलच नाहीत तर इतर खेळ, बिझनेस आणि अगदी सैन्याच्या क्षेत्रातही आहे.

आज ते 81 वर्षांचे आहेत. लोक म्हणतात जिंकण्यासारखं जे जे काहीही होतं ते त्यांनी जिंकलं, एकदा नाही - अनेकदा. मँचेस्टर युनायटेडला जगातला सर्वांत प्रभावी फुटबॉल क्लब बनवण्याच्या त्यांच्या प्रवासाची चित्तथरारक कथा.

फॅन्स सर्वकाही आणि नाहीही

जेव्हा अॅलेक्स फर्ग्युसन यांनी 1986 साली मँचेस्टर युनायटेडच्या मॅनेजरपदाची सुत्रं हाती घेतली तेव्हा या क्लबची अवस्था काही फारशी चांगली नव्हती. त्याआधीच्या 20 वर्षांमध्ये क्लबने एकही मोठी स्पर्धा जिंकली नव्हती.

एक वेळ तर अशी आली होती की त्यांना प्रीमियर क्लब न म्हणता, साधी लोकल टीम घोषित करण्याचाही विचार सुरू झाला.

त्यावेळी या मॅनेजरने सुत्रं हातात घेतली. पुढे जाण्याआधी एक लहानशी नोंद - फुटबॉल टीमचे जे मॅनेजर असतात, ते एका अर्थाने त्या टीमचे सर्वेसर्वा असतात. ते मुख्य कोच असतात, टीममधल्या खेळाडूंच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल महत्त्वाचे निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे हक्क असतो.

कोण राहाणार, कोण खेळणार, कोण कोणत्या मॅचमध्ये कोणत्या पोझिशनला खेळणार हे सगळंच ते ठरवतात. एका अर्थाने क्लबच्या खेळाडूंचे पालकही असतात.

अर्थात या मॅनेजर्सवरही प्रेशर असतं, जिंकण्याचं. एखादा मॅनेजर जर सतत टीमला जिंकवून देत असेल तर मग त्याला हात लावायची हिंमत क्लबच्या टॉम मॅनजमेंटमध्येही नसते.

तर असा मॅनेजर असलेल्या अॅलेक्स फर्ग्युसन यांनी 26 वर्षांत मँचेस्टर युनायटेडला 39 मॅचेस जिंकवून दिल्या, आणि इंग्लंडने फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकला त्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.

अॅलेक्स फर्ग्युसन यांची काम करण्याची पद्धत कशी विरोधाभासी होती याचे दोन किस्से.

बीबीसीच्या सर अॅलेक्स फर्ग्युसन: सिक्रेट्स ऑफ सक्सेस या डॉक्युमेंट्रीतला एक सीन आहे. हार्वड बिझनेस स्कूलच्या प्राध्यापिका अनिता अल्बर्सी यांनी त्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास केला, त्यावर रिसर्च केला. एकदा त्यांनी अॅलेक्स फर्ग्युसन यांची लंडन बिझनेस स्कुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा ठेवली.

त्यात फर्ग्युसन यांनी एक प्रश्न विचारला, 'मी मॅनेजर म्हणून जे काही करतो, जे निर्णय घेतो, त्यासाठी मी कोणाकोणाचं ऐकायला हवं?'

विद्यार्थ्यांनी बरीच उत्तरं दिली, क्लब मॅनेजमेंट, खेळाडू, स्टाफ, मीडिया, क्रीडा समीक्षक आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक/फॅन्स. ही सगळी फळ्यावर लिहिली गेली.

फर्ग्युसन शांतपणे उठले आणि यातली बरीच नावं पुसून टाकली. एक नाव पुसताना म्हणाले, "हे काय म्हणतात, याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही." - ते उत्तर होतं प्रेक्षक/फॅन्स.

विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. ज्यांच्यासाठी हा सगळा घाट घातला जातो त्यांचंच ऐकायचं नाही म्हणजे काय? फर्ग्युसन यांनी उत्तर दिलं, "मी काय करतोय, कसं करतोय याच्याशी या लोकांना काही देणंघेणं नाहीये, मी फक्त जिंकायला हवंय. मग मी यांचं का ऐकू?"

ऑक्सफर्डच्या या कार्यशाळेत फॅन्सला मोडीत काढणारं त्यांचं एक रूप.

आता दुसरा किस्सा... पॅट्रीस एव्हरा या फ्रेंच खेळाडूने सांगितलेला. पॅट्रीस साडेआठ वर्षं मँचेस्टर युनायटेडकडून खेळले आहेत.

एका मुलाखतीत ते म्हणतात, "प्री-सिझनच्या मॅचेस सुरू होत्या. आम्ही ग्राऊंडमधून बसमध्ये बसायला जात होतो. बाहेर फॅन्सच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, त्यांना आमचे ऑटोग्राफ हवे होते. सगळे खेळाडू फारच थकले होते. आम्ही ठरवलं काही सह्याबिह्या द्यायच्या नाहीत. एकाने दिली नाही, म्हणजे दुसऱ्यालाही ते कंपल्शन येणार नाही. आम्ही सगळे सरळ बसमध्ये जाऊन बसलो. पण बस काही सुरू होईना."

"मी खिडकीपाशी बसलो होतो. बाहेर पाहिलं तर चक्क सर अॅलेक्स प्रत्येकाला ऑटोग्राफ देत होते. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक फॅनला त्यांनी ऑटोग्राफ दिला. पुढची 45 मिनिटं ते फक्त सह्या करत होते, बस जागची हलली नाही. मी म्हटलं, बॉस एकदा बसमध्ये आले की आपण मेलो."

झालंही तसंच. अॅलेक्स ऑटोग्राफ देऊन बसमध्ये चढले आणि सगळ्या खेळाडूंना असलं झापलं. "तुम्ही समजता कोण स्वतःला, त्या लोकांमुळे तुम्हाला पैसे मिळतात. ते लोक तुम्हाला पाहायला आलेत. आता गपगुमान खाली उतरा आणि सह्या द्या."

पॅट्रीस म्हणतात, "आम्हाला झक मारून खाली उतरावं लागलं आणि प्रत्येक फॅनला ऑटोग्राफ द्यावा लागला."

प्रेक्षक/फॅन्स आहेत म्हणून आपण आहोत, फुटबॉल आहे, मँचेस्टर युनायटेड आहे ही जाणीव असणं, पण त्याचवेळी प्रेक्षक तज्ज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांचं खेळाबद्दल ऐकायला हवं असं नाही अशी दोन टोकं म्हणजे अॅलेक्स फर्ग्युसन.

सामान्य कुटुंबातून सुरुवात

स्कॉटलंडमध्ये 1941 साली जन्मलेल्या अॅलेक्स यांचं कुटुंब तसं सामान्य होतं. त्यांचे वडील शिपयार्डमध्ये कामगार होते.

लहानपणापासूनच त्यांनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्याचे धाकटे भाऊही फुटबॉल खेळायचे. फुटबॉलची गोडी वडिलांमुळे लागली, असं त्यांनी बीबीसीच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मोठं झाल्यावर त्यांनीही एका हत्यारं बनवणाऱ्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. एका बाजूला त्यांचं फुटबॉल खेळणं सुरू होतंच.

ते खेळत होते तेव्हा स्कॉटिश क्लब्सचे स्टार खेळाडू होते. नंतर त्यांनी कोचिंगला सुरूवात केली. 1986 साली त्यांनी मॅचेस्टर युनायटेडच्या मॅनेजरपदाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही.

किशोरवयीन मुलांना खेळायला आणलं

फर्ग्युसन यांच्या मॅनेजरियल करियरमधला सगळ्यांत धोरणी, दूरदृष्टीने घेतलेला निर्णय ज्याचे पडसाद आजही फुडबॉल जगतात पहायला मिळतात तो म्हणजे किशोरवयीन मुलांना, 20 च्या खालच्या तरुण मुलांना खेळायला आणणं.

शालेय पातळीवरच उत्तम खेळाडू हेरून त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मँचेस्टर युनायटेडने सेंटर्स उघडली ती फर्ग्युसन यांच्या सांगण्यावरून.

प्रख्यात खेळाडू डेव्हिड बेकहमला त्यांनीच शोधलं, रोनाल्डो अवघा 15 वर्षांचा होता तेव्हा त्यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतलं.

रोनोल्डो बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हणतो, माझ्या वडिलांसारखेच होते ते. त्यांनी मला फुटबॉलच्या जगात लहानाचं मोठं केलं.

सर अॅलेक्स फर्ग्युसन यांच्या आधी कोणताही मोठा फुटबॉल क्लब नवख्या खेळाडूंना, वयाने लहान असणाऱ्या खेळाडूंना घेत नव्हता.

फर्ग्युसन यांनी फुटबॉलचा चेहरा आमुलाग्र बदलला. त्यांनी नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात जे नवे खेळाडू हेरले, ट्रेन केले, त्यांना क्लास ऑफ 92 असं म्हणतात.

यातल्या सगळ्यांच नावांनी पुढे फुटबॉल जगत अक्षरशः गाजवलं. डेव्हिड बेकहम, निकी बट, रायन गिग्स, गॅरी नेव्हिल, फिल नेव्हिल आणि पॉल श्लोल्स या सगळ्यांनी मँचेस्टर युनायटेड 1992 साली जॉईन केलं.

याच खेळाडूंनी मँचेस्टर युनायडेटला वलय मिळवून दिलं, क्लबला नवी ओळख मिळवून दिली.

त्यांनी आल्या आल्या शोधलं ते रायन गिग्स या 13 वर्षांच्या हडकुळ्या मुलाला. हाच मुलगा पुढे जाऊन ब्रिटिश इतिहासातला सर्वाधिक यशस्वी फुटबॉलर ठरला.

गिग्स आणि बेकहम एका टीमचा कणा बनले जिने नंतर फुटबॉलमध्ये इतिहास घडवला.

हावर्ड बिझनेस रिव्ह्यूला दिलेल्या एका मुलाखतीत फर्ग्युसन म्हणतात, "एक टीम बांधणं आणि एक फुटबॉल क्लब उभा करणं दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक मॅनेजर फक्त पुढची मॅच जिंकण्यासाठी टीम बांधण्यावर लक्ष केंद्रीत करतो.

मला तसं करायचं नव्हतं. मी जेव्हा मँचेस्टर युनायटेडमध्ये सुरुवात केली तेव्हा मला एक क्लब उभा करायचा होता. जुनं ते सगळं तोडून नव्याने सुरुवात करायची होती."

'नव्याने सुरुवात करणं' हा फर्ग्युसन यांच्या आयुष्यातला मंत्र बनला. त्याबद्दल पुढे येईलच सविस्तर.

पण क्लब बांधणं म्हणजे उत्तमोत्तम खेळाडू आपल्याकडे सतत खेळायला येतील, नवीन टँलेटचा प्रवाह आटणार नाही याची काळजी घेणं. त्यांच्या या धोरणाने अनेक दिग्गज खेळाडू एकत्रच लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्यांच्यातलं बॉडिंग घट्ट होतं. याचा टीमला जिंकायला फायदा झाला.

कडक शिस्तीचा कोच

फर्ग्युसन यांची मॅनजमेंटची स्टाईल नाही म्हटलं तरी काहीशी हुकुमशाहीकडेच झुकणारी होती. त्यांनी कधी हे नाकारलंही नाही.

याचा एक किस्सा. नव्वदच्या दशकात टोनी ब्लेयर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नुकतीच सुत्रं हातात घेतली होती. त्यांना आपल्या सहकाऱ्यांना हाताळणं कठीण जात होतं. अशात त्यांनी फर्ग्युसन यांचा सल्ला मागितला.

टोनी ब्लेयर यांनी त्यांना विचारलं, "तुमच्या संघात एखादा असा खेळाडू आहे जो ब्रिलियंट आहे, पण तुमचं अजिबात ऐकत नाही, अशा वेळेस तुम्ही काय कराल?"

फर्ग्युसन यांनी उत्तर दिलं, "सरळ बाहेरचा रस्ता दाखवेन."

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीत टोनी ब्लेयर यांनी स्वतः हा किस्सा सांगितला आहे.

तुम्ही फुटबॉलचे स्टार असाल, दुनिया तुमच्या मागे वेडी असेल... ते बाहेर. इथे ग्राऊंडवर मी सांगेन ते ऐकायला हवं, मी सांगेल तसंच करायला हवं असा फर्ग्युसन यांचा खाक्या होता.

प्रॅक्टीसला ग्राऊंडवर सर्वांत आधी येणारी व्यक्ती म्हणजे फर्ग्युसन. त्यांच्या नंतरच्या काळात इतरांनाही त्यांच्या शिस्तीची इतकी सवय झाली होती की ते पोहचायच्या आधी निम्मी टीम पोहचलेली असायची.

ते म्हणतात, "मी सतत माझ्या खेळाडूंना सांगायचो, आयुष्यभर कष्ट करणं म्हणजे एक कला आहे. सगळ्यांनी मेहनत करावी यासाठी मी आग्रही असायचोच, पण माझ्या स्टार खेळाडूंना जास्त मेहनत करायला लावायचो. माझं एकच म्हणणं होतं. तुम्ही टॉपला का आहात ते सिद्ध करा."

स्टार खेळाडूंच्या लहरींवर निवड समित्यांचे निर्णय बदलतात त्या पार्श्वभूमीवर स्टार खेळाडूंना दुप्पट मेहनत करायला लावणारा हा मॅनेजर वेगळाच होता.

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूला दिलेल्या मुलाखतीत फर्ग्युसन म्हणतात, "जगातले सर्वोत्तम 30 खेळाडू, जे कोट्यधीश आहेत, त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला तुमचा अधिकार सोडून चालत नाही. माझ्या निर्णयाला, आणि अधिकाराला कोणताही खेळाडू आव्हान देऊ शकत नाही, अशा प्रकारची व्यवस्था मला तयार करावीच लागली."

त्यांची शिस्त इतकी कडक होती की त्यांचं न ऐकणाऱ्या खेळाडूंना शिक्षा व्हायची. त्यांनी चुका केल्या तर त्यांना दंड भरावा लागायचा आणि त्यांच्या वागण्यामुळे टीमच्या परफॉरमन्सवर परिणाम होत असेल तर मग अशा खेळाडूंना सरळ बाहेर काढलं जायचं.

बीबीसीच्या सर अॅलेक्स फर्ग्युसन: सिक्रेट्स ऑफ सक्सेस या डॉक्युमेंट्रीत मँचेस्टर युनायटेडचे माजी खेळाडू रिओ फर्डिनंड एक प्रसंग सांगतात.

2005 सालची गोष्ट असेल, त्यावेळी टीमचे कॅप्टन होते रॉय कीन. त्यांच्याकडे अनेक वर्षं मँचेस्टर युनायटेड फुटबॉल टीमचं कॅप्टनपद होतं. पण त्यांनी एकदा जाहीररित्या टीमवरच्या काही सदस्यांवर टीका केली.

फर्ग्युसन यांना हे पचणारं नव्हतं. रॉय यांनी खूप मोठ्या नियमाचं उल्लंघन केलं होतं. रॉय कीन यांना तिथल्या तिथे टीममधून बाहेर काढण्यात आलं.

फर्डिनंड म्हणतात, "पुढच्या पिढ्यांसाठी, मँचेस्टर युनायटेडमध्ये येणाऱ्या नव्या पोरांसाठी हा महत्त्वाचा धडा होता. इतक्या मोठ्या पदावरच्या खेळाडूच्या चुकीलाही माफी नाही. नियम मोडलात तर तुम्ही गेलात."

त्याच्या पुढच्याच वर्षी क्लबचे आघाडीचे खेळाडू रूड व्हॅन यांनी फर्ग्युसन यांच्या त्यांना न खेळवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. रूड व्हॅन यांना तातडीने रिअल माद्रीद या क्लबला विकून टाकण्यात आलं.

कधी कधी आपल्या कडक शिस्तीचा फर्ग्युसन यांना फटकाही बसला. अनिता अल्बर्सी या डॉक्युमेंट्रीत म्हणतात की त्यांची कार्यपद्धती चांगली होती की वाईट, ती आजच्या जगात टिकेल का, यापेक्षा वेगळं काही करता येऊ शकत होतं का अशा अनेक मुद्द्यांवर मतभिन्नता असू शकते.

पण त्यांनी सातत्याने रिझल्ट दिले हे नाकारता येणार नाही.

हळवी बाजू

या हंटरवाल्या कोचला एक हळवी बाजूही होती. त्यांना त्यांच्या क्लबमधून खेळणारा खेळाडू, त्याच्या घरचे, त्यांची परिस्थिती, त्या खेळाडूची मनस्थिती, त्याच्या घरच्या अडचणी, इतकंच काय त्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य दुखापती यांची खडानखडा माहिती असायची.

फक्त स्टार खेळाडूच नाही, मँचेस्टर युनायटेडच्या ज्युनियर लीगचे खेळाडू, नवोदित खेळाडू, त्यांच्या एक्सलन्स प्रोग्रॅममध्ये शिकणारी पोरं, आणि ज्यांच्यावर मँचेस्टरचं लक्ष आहे अशी शाळकरी पोरं सगळ्यांची नावं-गावं फर्ग्युसन यांना पाठ असायची.

फर्डिनंड बीबीसीशी बोलताना म्हणतात, "ग्राऊंड्मन, कँटिनमध्ये काम करणाऱ्या बायका, आमचे कपडे धुणाऱ्या बायका, सफाई करणाऱ्या बायका सगळ्यांशी ते गप्पा मारायचे. त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे. आम्हाला आश्चर्य वाटायचं, एवढा मोठा माणूस आणि या स्टाफशी हसतखेळत गप्पा मारतो. आता बॉसच असे वागतात म्हटल्यावर आपसूक सगळे खेळाडू सपोर्ट स्टाफला आदर द्यायचे."

स्टार फुटबॉलर ख्रिस्तीआनो रोनाल्डोमध्ये अनेक वर्षं मँचेस्टर युनायटेडकडून खेळत नव्हते. मागच्याच वर्षी पुन्हा त्यांच्याकडे आले, पण ज्या काळात रोनाल्डो या क्लबकडून खेळत नव्हते तेव्हाही त्यांचे फर्ग्युसन यांच्याशी अत्यंत चांगले संबंध होते.

ते बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हणतात, "आम्ही प्रीमिअर लीग खेळत होतो आणि स्पर्धा निर्णायक टप्प्यात होती. माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली. माझं लक्ष विचलित झालं. त्याकाळात फर्ग्युसन माझ्याकडे आले आणि म्हणाले, हे बघ आता अतितटीची स्पर्धा सुरू आहे, पण तुझ्या वडिलांना बरं नाही हेही खरंय. तुला जायचं असेल तर जा, दोन-चार-पाच हवे तितके दिवस घे. तुझी कमतरता भासेल, पण शेवटी कुटुंब सगळ्यातं जास्त महत्त्वाचं असतं लक्षात ठेव."

कोणीच स्टार नाही, फक्त क्लब महत्त्वाचा

सर अॅलेक्स फर्ग्युसन यांची वेगवेगळी रूपं होती. हाच संवेदनशील मनाचा माणूस, कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आपुलकीने विचारपूस करणारा मॅनेजर खेळाडूंचं वय वाढलं आणि त्यांच्या कामगिरीवर परिणाम व्हायला लागला की त्यांना निष्ठूरपणे काढून टाकायला मागे पुढे पाहायचा नाही.

मँचेस्टर युनायटेड क्लबला एकापाठोपाठ विजेतेपदं मिळत होती आणि तरीही फर्ग्युसन यांनी अनेकदा विजेत्या टीममध्ये असणारे खेळाडू बदलले.

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी मँचेस्टर युनायटेड क्लबची टीम कमीत कमी पाच वेळा शून्यातून बदलली. हे करत असताना त्यांनी टीमचा पराभव होऊ दिला नाही.

कोणत्याही एका स्टार खेळाडूपेक्षा त्यांच्यासाठी क्लब महत्त्वाचा होता. त्या क्लबचा दबदबा, विजय महत्त्वाचा होता.

ज्या खेळाडूंचा मेंटॉर म्हणून काम केलं त्यांना डच्चू देण्याचे अवघड निर्णयही त्यांनी घेतले. बरं मोठ्या खेळाडूंची जागा घ्यायला तरुण खेळाडू मागे तयारच असायचे. फर्ग्युसन यांनी तशा लोकांना हेरून ट्रेनिंग दिलेलं असायचंच.

बरं त्यातही त्यांचा व्यवहारीपणा असा की एखाद्या खेळाडूचं वय वाढलं आणि परफॉरमन्स जरासा हलला की क्लब लगेच त्यांना प्रतिस्पर्धी क्लबला विकून टाकायचा. ते खेळाडू स्टार असायचे, त्यांची आजवरची कामगिरी मोठी असायची त्यामुळे क्लबला त्यांची चांगली किंमत मिळायची. आणि त्या बदल्यात मँचेस्टर युनायटेडमध्ये ताज्या दमाचा, पण फारसे पैसे न घेणारा नवा खेळाडू यायचा.

या मॉडेलचा अभ्यास हार्वर्डने केलाय आणि निष्कर्ष काढला की क्लबने अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये प्रतिस्पर्धी क्लब्सपेक्षा कित्येक पटीने जास्त पैसा कमवला आहे.

यामागे अर्थातच फर्ग्युसन यांचा मेंदू होता हे सांगायला नको. ते एका ठिकाणी स्वतःबद्दल म्हणतात की मी जुगारी आहे, मला रिस्क घ्यायला आवडते. त्यांच्या या 'रिस्क है तो इश्क है' या स्वभावामुळे मँचेस्टरला प्रचंड फायदा झाला नसता तर नवलच.

शिखरावर असताना बदल स्वीकारण्याची तयारी

इतकी यशस्वी कारकिर्द असणारे लोक सहसा यशाच्या शिखरावर असताना बदल स्वीकारत नाहीत. पण फर्ग्युसन यांचं तसं नव्हतं. त्यांचे सहकारी आणि मँचेस्टर युनायटेडचे माजी अध्यक्ष डेव्हिड गिल बीबीसीशी बोलताना म्हणतात, "त्यांच्या डोळ्यासमोर फुटबॉलचं जग बदलत होतं आणि हे त्यांनी हेरलं. शिखरावर असताना बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती."

फर्ग्युसन 26 वर्षं मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर होते. फुटबॉल या खेळात आलेला अवाढव्य पैसा, त्यांचं बदलत जाणारं स्वरूप, क्लब्सची बदलत जाणारी मालकी, मध्यपूर्वेतले, रशियातले नवे मालक, वाढती स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचं वाढत जाणारं ओझं हे सगळं त्यांनी अनुभवलं.

ते आपल्या टीममध्ये तसे बदल करत गेले. आधी पाहिलं तसं त्यांनी खेळात नव्या रक्ताचे, तरुण खेळाडू आणायला सुरुवात केली. असं करणारे ते पहिले मॅनेजर होते. यामुळे वादंगही झाला आणि आता प्रीमियर लीगमध्ये किशोरवयीन खेळाडू असणं सामान्य बाब झाली आहे.

त्यांनी खेळाच्या स्ट्रॅटेजी बदलल्या. आपल्या स्टाफमध्ये शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांचा भरणा केला. खेळाडूंचा फिटनेस वाढावा म्हणून मॉडर्न पर्याय स्वीकारले.

खेळात तंत्रज्ञान आणलं, आपल्या खेळाडूंच्या हालचालींचा अभ्यास करता यावा म्हणून त्यांना जीपीएस लावलेले जॅकेट्स दिली जी त्यांना खेळताना घालावी लागायची.

फर्ग्युसन एका ठिकाणी म्हणतात, मला कंट्रोल सोडायला आवडत नाही, आणि तुम्हाला बदलांना कंट्रोल करायचं असेल तर एकच रस्ता आहे, त्यांना स्वीकारा.

"माझ्या आयुष्यातली जिंकलेली प्रत्येक मॅच मी पहिली आहे असंच समजलो आणि दुसरी जिंकण्यासाठी तितक्याच ताकदीने प्रयत्न केले. माझ्या टीमला जिंकण्यासाठी शक्य त्या सगळ्या संधी देणं हेच माझं काम होतं आणि मी ते आयुष्यभर करत राहिलो."

फर्ग्युसन मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर म्हणून 2013 साली रिटायर झाले. त्यानंतर क्लबचा विजयाचा वारू अडखळला हे नाकारता येणार नाही.

सर अॅलेक्स फर्ग्युसन ब्रिटनच्या इतिहासातले सर्वोत्तम आणि सर्वांत यशस्वी मॅनेजर आहेत असा ब्रिटिश जनतेनेच कौल दिला. आजही याबद्दल कोणाचं दुमत नसावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)