You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FIFA World Cup 2022 : कधी होणार आहे आणि कतारकडे यजमानपद का आहे?
कतारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. आखाती देशात विश्वचषकाचं आयोजन केलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कतारमध्ये स्पर्धा भरवण्याच्या निर्णयावरून याआधी वादही झाले होते.
2022चा विश्वचषक कधी आहे आणि तिथे किती तापमान असेल?
विश्वचषकातील सामने 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत खेळवले जातील. तेव्हा कतारमधील तापमान साधारण 25 अंश सेल्सिअस असते.
एरवी विश्वचषकाचं आयोजन जून किंवा जुलै महिन्यात होतं, पण या महिन्यांमध्ये कतारमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकतं. काही वेळा ते 50 अंश सेल्सिअसपर्यंतही पोहोचते.
कतारने सुरुवातीला प्रस्ताव ठेवला होता की विश्वचषकातील सामने उन्हाळ्यात वातानुकूलित स्टेडिअम्समध्ये खेळवण्यात येतील. पण ही योजना फेटाळण्यात आली.
विश्वचषक त्यानंतर आयोजित करण्यात काय अडचणी आहेत?
नोव्हेंबर व डिसेंबर हे युरोपियन फुटबॉल क्लबसाठी व्यस्त महिने असतात. पण याच काळात अनेक आघाडीच्या फुटबॉलर्सना त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कतारमध्ये जावं लागेल.
त्यामुळे इंग्लंडची प्रीमिअर लीग, इटलीची सीरी ए आणि स्पेनची ला लिगा या स्पर्धांच्या आयोजकांनी विश्वचषकाच्या एक आठवडा आधी त्यांच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर अशा स्पर्धांचे सामने पुन्हा सुरू होतील.
विश्वचषकाच्या यजमानपदी कतारची निवड का झाली?
2010 साली फिफाच्या 22 कार्यकारी सदस्यांच्या मतदानानंतर कतारने विश्वचषकाचे हक्क प्राप्त केले. अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान व ऑस्ट्रेलिया यांनीही यजमानपदासाठी बोली लावली होती, पण कतारने त्यांचा पराभव केला.
या स्पर्धेचे आयोजन करणारा कतार हा पहिलाच अरब देश आहे.
कतारने फिफा अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना 30 लाख पौंड (37 लाख डॉलर) लाच दिली होती, असा आरोप करण्यात आला होता. पण दोन वर्षांच्या चौकशीनंतर हा आरोप फेटाळला गेला.
त्या वेळी फाफाचे तत्कालिन अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी कतारच्या बोलीला पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर ते म्हणत आले आहेत की, या संघटनेने कदाचित हा चुकीचा निर्णय घेतला आहे.
कतारमध्ये विश्वचषक सुविधा उभारणाऱ्या परदेशी मजुरांना मिळणाऱ्या हीन वर्तणुकीबद्दल अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच या संस्थांनी आरोप केले होते.
विश्वचषक स्पर्धेत कोणते संघ खेळणार आहेत आणि कोण फेव्हरेट आहेत?
2022 च्या विश्वचषकाच्या पात्रता फेऱ्या 3 वर्षांपूर्वी सुरू झाल्या.
विविध खंडांमधील देशांचे विविध गटांमध्ये सामने झाले आणि आघाडीचे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचले तर इतरांना प्ले-ऑफच्या माध्यमातून त्यांची जागा मिळाली.
2018 च्या विश्वचषकाचा विजेता फ्रान्सचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला पण सध्याचा युरोपियन चॅम्पियन असलेला इटली मात्र पात्र झाला नाही.
मुख्य स्पर्धेसाठी चार संघांच्या आठ गटांची म्हणजे एकूण 32 संघांची निवड झाली. एकाच खंडातील दोन संघ वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात आले. याला युरोपियन देशांचा अपवाद आहे. एका गटात कमाल दोन युरोपीय देशांचे संघ ठेवण्यात आले आहेत.
ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स व स्पेन हे सट्टेबाजांचे सध्याचे फेव्हरेट संघ आहेत.
विश्वचषक चाहत्यांना कतारमध्ये काय मिळू शकेल?
कतारची लोकसंख्या सुमारे 29 लाख आहे आणि तेल व नैसर्गिक वायूच्या निर्यातीमुळे हा जगातील एक श्रीमंत देश बनला आहे.
कतारने खास या विश्वचषकासाठी सात स्टेडियम्स उभारली आहेत आणि एक संपूर्ण नवे शहरच उभे केले आहे, जिथे अंतिम सामन्याचं आयोजन केलं जाणार आहे.
इथे100 हून अधिक नवीन हॉटेल्स, नवीन मेट्रो आणि नवीन रस्तेही बांधण्यात येत आहेत.
स्पर्धेच्या आयोजन समितीच्या अंदाजानुसार या स्पर्धेसाठी 15 लाख लोक कतारमध्ये येण्याची शक्यता आहे.
कतार हा पुराणमतवादी इस्लामी देश आहे आणि चाहत्यांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
इथे मद्यप्राशनावर अनेक मर्यादा आहेत. लक्झरी हॉटेलमधील बारमध्येच मद्य विकत घेता येऊ शकते. बिअरच्या एका पाइंटची किंमत 10 पौंड (13 डॉलर) असू शकते.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार विश्वचषक स्पर्धेसाठीचे मद्यधोरण आखण्यात येत आहे. पण, स्टेडियममधील निवडक भागांमध्ये मद्य मिळू शकेल, यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
दोहा येथील 40,000 क्षमतेच्या फॅन झोन्समध्येही मद्य पेये उपलब्ध असतील.
गे हक्कांबद्दल कतारची भूमिका काय आहे?
समलैंगिकतेवर कतारमध्ये कायद्यानं बंदी आहे.
त्यामुळे गे फुटबॉल फॅन्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटांनी सुरक्षिततेची हमी देण्यासाठी कतार सरकारकडे विचारणा केली आहे.
वेल्सच्या काही चाहत्यांनी त्यांचा संघ पात्र ठरूनही स्पर्धेवर बहिष्कार घालणार असल्याचे म्हटले आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या आयोजकांनी याला उत्तर देताना म्हटले आहे की, "प्रत्येकाचे स्वागत आहे", पण या स्पर्धेसाठी कतार समलैंगिकतेविषयीचे कायदे शिथील करणार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)