You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कम्युनिस्ट क्युबाची अर्थव्यवस्था आता खासगी व्यावसायिकांसाठी खुली
क्युबा सरकारने खासगी व्यावसायिकांना आता बहुतांश विभागांमध्ये काम करण्याची परवानगी देणार असल्याची घोषणा केली आहे. क्युबाच्या सरकारनियंत्रित अर्थव्यवस्थेतील ही एक मोठी सुधारणा असल्याचे म्हटले जात आहे.
क्युबाच्या कामगार मंत्री मार्टा एलीना फेडतो म्हणाल्या, "अधिकृत उद्योगांची यादी आता 127 वरून 2,000 एवढी झाली आहे. सरकार केवळ काही क्षेत्रातील उद्योगधंद्यांनाच आपल्या कार्यक्षेत्रात कायम ठेवणार असून उर्वरित क्षेत्रातील कामांसाठी खासगी व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाईल."
क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारच्या नवीन धोरणानुसार, कोरोना आरोग्य संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यातच ट्रम्प सरकारने क्युबावर घातलेल्या निर्बंधांमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली.
गेल्या सात वर्षांत क्युबाच्या अर्थव्यवस्थेत 11 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या तीन दशकातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती असल्याचे सांगितले जाते.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, "क्युबामध्ये मुलभूत वस्तूंचा पुरवठाही कमी झाला आहे. 124 उद्योगांना खासगी भागीदारीपासून वेगळे ठेवण्यात आल्याचे कामगारमंत्री फेडतो यांनी सांगितले. हे उद्योग कोणते असतील याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही."
'खासगी व्यवसायांचा विकास सुरू राहू शकेल यासाठीच अशी सुधारणा केली जात आहे. या सुधारणेमुळे खासगी क्षेत्राची उत्पादक क्षमता स्वतंत्र राहण्यास मदत मिळेल असाही दावा फेडतो यांनी एएफशी या वृत्तसंस्थेंशी बोलताना केला.
सरकारच्या या नवीन धोरणामुळे क्युबामध्ये खासगी कंपन्यांचा जवळपास सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खुला होईल असे जाणकारांना वाटते.
हवाना येथे असलेल्या बीबीसीच्या विल ग्रँट यांनी क्युबाच्या किचकट आणि बिकट अर्थव्यवस्थेत झालेल्या या बदलांबाबत लिहिताना म्हटले, "लघू उद्योगांमार्फत नफा मिळवण्याची आशा असलेल्या उद्योजकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे."
क्युबामध्ये हजारोंच्या संख्येने छोटी शेती केली जाते. शेती हा क्युबातील मुख्य व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त खासगी क्षेत्रांत कामगार, टॅक्सी चालक आणि छोटे उद्योजक काम करतात. जवळपास 6 लाख लोक खासगी क्षेत्रात काम करतात. हे लोक क्युबाच्या वर्कफोर्स म्हणजेच कामगार लोकसंख्येच्या 13 टक्के आहेत.
क्युबामध्ये सर्वांत मोठा खासगी व्यवसाय म्हणजे पर्यटन हा आहे. पण कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी विल ग्रँट यांच्यानुसार, याठिकाणी वेगाने सुधारणा केल्या जात नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात त्याचे फायदे दिसण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
क्युबा आणि अमेरिका यांच्यात जवळपास 60 वर्षं शत्रुत्व होते. 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे नेते राउल कॅस्ट्रो यांच्या भेटीनंतर दोन्ही देशाचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली.
क्युबा अमेरिकन नागरिकांना प्रवेश देईल आणि स्थानिक खासगी व्यवसायांना बळ देण्यासाठी परवानगी देईल असे या भेटीत ठरले.
बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतले. ओबामा यांनी कॅस्ट्रो यांच्या कम्युनिस्ट सरकारच्या समाधानासाठी हे निर्णय घेतेले होते असा दावा ट्रम्प यांच्या समर्थकांनी केला.
अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे ओबामा यांच्या कार्यकाळात उप-राष्ट्राध्यक्ष होते. क्युबा आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी ते पुढाकार घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पण प्राधान्याने याकडे लक्ष दिले जाईल याबाबत मात्र अस्पष्टता कायम आहे असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)