You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चे गवेरा : तरुणांच्या टी शर्टवर सर्रास दिसणारा हा क्रांतिकारक कोण आहे?
चे गवेरा व्यवसायानं डॉक्टर होते. वयाच्या 30व्या वर्षी ते क्युबाचे उद्योगमंत्री बनले. पण लॅटीन अमेरिकेत क्रांतीचा विचार पोहचवण्यासाठी पदाचा त्याग करून ते जंगलांत गेले.
एकेकाळी अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू म्हणून ओळखले जाणारे चे गवेरा आज जगभरातल्या अनेक लोकांसाठी क्रांतिकारक आहेत.
अमेरिकेच्या वाढत्या शक्तीला 50 आणि 60च्या दशकात आव्हान देणारा हा युवक. अर्नेस्तो चे गवेरा यांचा जन्म 14 जून 1928ला मध्यवर्गीय कुटुंबात अर्जेंटिनामध्ये झाला होता.
सत्तेतून संघर्षाकडे
अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आर्यसमधल्या एका कॉलेजमधून डॉक्टर बनलेल्या चे गवेरा यांच्या मनात आलं असतं तर त्यांना निवांत आयुष्य जगता आलं असतं.
पण आपल्या आजूबाजूला गरिबी आणि शोषण पाहून तरुण चे गवेरा यांचा कल मार्क्सवादाकडे झुकला. दक्षिण अमेरिकेच्या समस्यांचा उपाय सशस्त्र क्रांती हाच आहे, असं त्यांचं मत बनलं होतं.
1955ला 27 वर्षांच्या चे गवेराची भेट फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी झाली. काही दिवसांतच चे यांच नाव सर्वसामान्यांना ओळखीचं झालं.
क्युबामधल्या कॅस्ट्रो यांच्या जवळच्या तरुण क्रांतिकारकांमध्ये त्यांचा समावेश झाला.
क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे चे गवेरा वयाच्या 31व्या वर्षी क्युबाच्या राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर क्युबाचे उद्योगमंत्री झाले.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 1964ला ते क्युबाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. किती तरी ज्येष्ठ मंत्री या 36 वर्षीय नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर होते.
लोकप्रिय नाव
आज क्युबातील लहान मुलं चे गवेरांची पूजा करतात. क्युबाच काय सर्व जगात चे गवेराचं नाव म्हणजे आशेचा किरण झालं आहे.
जगभरातील अनेक नेत्यांना त्यांच्या कार्यानं प्रेरणा दिली आहे.
चे गवेरा यांचं चरित्र लिहिणारे जॉन अँडरसन म्हणतात, "चे गवेरा क्युबा आणि लॅटीन अमेरिकाच नाही तर जगभरातल्या कितीतरी लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत."
ते म्हणतात, "मी त्यांचे फोटो पाकिस्तानात ट्रक आणि इतर वाहनांवर, जपानमधील मुलांच्या स्नो बोर्डवर पाहिले आहेत. चे गवेरांनी क्युबाला सोविएत संघाच्या जवळ उभं केलं. क्युबा या मार्गावर अनेक दशकं चालत राहिला. चे गवेरानं एक दोन नाही तर अनेक व्हिएतनाम उभे राहण्याची शक्ती दिली. व्यवस्थेच्या विरोधात युवकांच्या संतापाचे आणि त्यांच्या आदर्शांच्या लढ्याचे गवेरा एक प्रतीक आहेत."
चे यांची बोलिव्हियामध्ये हत्या
वयाच्या 37 व्या वर्षी चे गवेरा यांनी क्रांतीचा संदेश आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकामध्ये नेण्याचा निश्चय केला होता.
काँगोमध्ये चे गवेरा यांनी बंडखोरांना गनिमीकाव्याची लढाई शिकवली होती. त्यानंतर त्यांनी बोलिव्हियातील बंडखोरांना प्रशिक्षण देणं सुरू केलं होतं.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा चे गवेरांना शोधत होती. बोलिव्हियातल्या सैन्याच्या मदतीनं त्यांनी चे गवेरांना पकडून त्यांची हत्या केली.
अर्नेस्टो चे गवेरांचे फोटो असलेले टी शर्ट आजही मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटपासून ते देशातल्या कितीतरी शहरांमध्ये आणि गावांमध्ये मिळतात. लंडनच्या फॅशनेबल जीन्सवरही चे गवेराचे फोटो दिसतात. क्युबा आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आज चे गवेरा देवापेक्षा कमी नाहीत.
आज जर ते जिवंत असते तर त्यांचं वय 89 असतं. 8 ऑक्टोबर 1967ला फक्त 39 वर्षांचे असताना त्यांची हत्या करण्यात आली.
भारत भेट
चे गवेरा भारत भेटीवर आले होते याची माहिती फार कमी लोकांना आहे. क्युबा सरकारमध्ये मंत्री असताना ते भारतात आले होते.
भारत भेटी नंतर त्यांनी 1959ला भारत रिपोर्ट लिहिला होता. तो त्यांनी फिडेल कॅस्ट्रो यांना सोपवला होता.
त्या ते लिहितात, "कैरोमधून आम्ही भारतात जाण्यासाठी विमानात बसलो. 39 कोटी लोकसंख्या आणि 30 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा हा देश आहे. आमच्या या दौऱ्यात भारताच्या सर्व उच्चपदस्थांना आम्ही भेटलो. नेहरूंनी मोठ्या भावासारखं आमचं स्वागत तर केलंच शिवाय क्युबातल्या जनतेचा संघर्ष आणि त्याग यामध्ये रस दाखवला."
ते लिहितात, "निरोपावेळी शाळेतील मुलं घोषणा देत होती. क्युबा भारत भाऊ भाऊ, असा या घोषणांचा अर्थ होता. खरोखर क्युबा आणि भारत भाऊ आहेत."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)