You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅलेक्सी नवालनी यांना साडेतीन वर्षांची शिक्षा, मॉस्कोत समर्थकांचीही धरपकड
मॉस्कोतील कोर्टाने अॅलेक्सी नवालनी यांना साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नवालनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. रद्द करण्यात आलेल्या शिक्षेच्या अटी मोडल्याचा नवालनी यांच्यावर आरोप आहे.
गेल्या महिन्यात रशियाला परत आल्यानंतर नवालनी यांना एअरपोर्टवरून अटक करण्यात आली होती. नवालनी यांच्यावर जीवघेणा विषहल्ला झाल्यानंतर, त्यांच्यावर जर्मनीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
नवालनी यांच्या अटकेनंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये पोलीस नवालनी यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना मारहाण करून अटक करत असल्याचं दिसून येत आहे.
नवालनी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.
अॅलेक्सी नवालनी यांच्या रद्द करण्यात आलेल्या शिक्षेची भरपाई त्यांना तुरुंगात बंद करून करण्यात आली आहे. त्यांनी आत्तापर्यंत एक वर्ष घरातच नजरकैदेत रहाण्याची शिक्षा भोगली आहे. एकूण शिक्षेमधून ही शिक्षा कमी केली जाईल.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवालनी यांना 17 जानेवारीला रशियामध्ये परत येताच अटक करण्यात आली. आपल्या अटकेनंतर समर्थकांना आंदोलन करण्याचे आवाहन केलं होतं.
बीबीसीच्या सराह रेनफोर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवालनी यांनी कोर्टात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला पुतीन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
नवालनी यांना शिक्षा सुनावल्यानंतर हजारो लोक मॉस्को आणि सेंट पिटर्सबर्गमध्ये रस्त्यांवर दाखल झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही लोकांनी आंदोलन सुरू केलं. जवळपास मॉस्कोमध्ये 850 पेक्षा जास्त समर्थकांना अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी संध्याकाळी, मॉस्कोतील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
बॉडी आर्मर आणि हेल्मेट घातलेल्या पोलिसांची संख्या फार मोठी होती. पोलिसांसमोर नवालनी समर्थकांची संख्या कमी दिसून येत होती.
क्रेमलिनच्या सत्तेला आव्हान देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असा स्पष्ट संदेश अॅलेक्सी नवालनी यांच्या अटकेने देण्यात आला आहे. पण, नवालनी यांचे समर्थक शांत रहाण्यात तयार नाहीत.
शेकडो समर्थकांना सेंट्रल मॉस्कोमध्ये अटक करण्यात आली. पण, मंगळवारच्या घटनेने लोकांमध्ये मोठा रोष आहे.
नवालनी यांची बिनशर्त सुटका करा - अमेरिका
नवालनी यांना शिक्षा ठोठावल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून यावर प्रतिक्रिया येणं सुरू झालंय. युरोपचा मानवी हक्क आयोग काउंसिल ऑफ युरोप यांनी "सर्व विश्वासार्हता गमावली" अशा शब्दांत अटकेचा विरोध केला आहे.
मानवी हक्क आयोगाचे दुंजा मिजाटोविक म्हणाले, "या निर्णयाने रशियन सरकारने मानवी हक्कांवर पुन्हा गदा आणली आहे."
यूकेचे परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांनी हा निर्णय "विकृत" असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एन्टोनी ब्लिनकेन यांनी नवालनी यांच्या तात्काळ बिनशर्त सुटकेची मागणी केली आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांनी पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या देशातील प्रश्नांवर लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
"एका सार्वभौम देशाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये कोणीही लूडबूड करू नये" असं त्या रशियन टीव्हीवर म्हणाल्या.
नवालनी यांच्यावर 2014 मध्ये रद्द करण्यात आलेल्या एका शिक्षेच्या अटी न पाळल्याचा आरोप आहे. त्यांच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार, हे आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांना माहिती होतं की, नवालनी बर्लिनमध्ये उपचार घेत आहेत.
शिक्षा ठोठावण्याआधी कोर्टाला उद्देशून बोलताना नवालनी म्हणाले, "विरोधकांना घाबरवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. लाखो लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांनी मला जेलमध्ये टाकलं."
क्रेमलिनने नवालनी यांच्यावरील हल्ल्याचे आरोप फेटाळून लावलेत. त्याचसोबत "नोव्हिचोक" नावाचं केमिकल वेपन वापरल्याचा इन्कार केला आहे.
अॅलेक्सी नवालनी कोण आहेत?
अॅलेक्सी नवालनी रशियातील भ्रष्टाचारविरोधी पक्षाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते आहेत.
ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक मानले जातात. पुतिन सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ लाखो लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.
नवालनी यांना टॉम्स्क विमानतळावर 20 ऑगस्ट 2020 रोजी चहामधून विष देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विमान प्रवासादरम्यानच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी नावालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं होतं. तिथून उपचार घेऊन ते पुन्हा रशियामध्ये परतले होते.
अलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला होता.
2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे नोव्हिचोक ग्रुपमधील नर्व्ह एजंट रसायनाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर इंग्लंडच्या सॅल्सबरी भागात विषप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.
हे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)