पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवालनी यांना रशियात अटक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक आणि रशियाचे विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नवालनी यांना रशियात पोहोचताच अटक करण्यात आली आहे.

ते पाच महिन्यांनतर जर्मनीतून मॉस्कोला आले होते. गेल्या वर्षी त्यांच्यावर नर्व्ह एजंटचा वापर करून हल्ला करण्यात आला होता. त्यातून ते वाचले होते.

त्यांच्यावर जर्मनीत उपचार करण्यात आले होते. 44 वर्षांच्या नवालनी यांना पोलिसांनी पासपोर्ट कंट्रोलमधून ताब्यात घेतलं. नवालनी यांची बर्लिनहून आलेली फ्लाइट मॉस्कोच्या एका एअरपोर्टवरून दुसऱ्या एअरपोर्टवर नेण्यात आली होती. जमलेली गर्दी पाहून हे करण्यात आलं.

अनेक लोकांना असं वाटतं की नवालनी यांच्या हत्येचा प्रयत्न रशियन सरकारकडून करण्यात आला होता. काही शोध पत्रकारांनी या दाव्याला दुजोराही दिला आहे.

अटक होण्याच्या काही मिनिटं आधी नवालनी यांनी मॉस्कोमधल्या शेरेमेत्येवो एअरपोर्टवर समर्थक आणि माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, "मला माहीत आहे की मी बरोबर आहे. मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. माझ्या विरोधातले सर्व खटले बनावट आहेत."

नवालनी यांच्या वकिलांनाही त्यांच्यासोबत जाऊ दिलं नाही. नवालनी यांनी जाताना आपल्या पत्नीचं चुंबन घेतलं. जर आदेश झुगारून दिला तर बलप्रयोग करू, अशी धमकी पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना दिली होती. रविवारी (17 जानेवारी) विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

रविवारी मॉस्कोमधील वनुकोव एअरपोर्टच्या आत धातूचे बॅरिअरही लावण्यात आले होते. नवालनी यांचं विमान नियोजित कार्यक्रमानुसार याच विमानतळावर लँड करणार होती. रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनेक कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये नवालनी यांचे प्रमुख सहकारी ल्युबोव सोबोल यांचाही समावेश आहे.

नवालनी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी एअरपोर्टवरील पोलिसांच्या कारचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

नवालनी यांच्यावर जर्मनीत उपचार झाले होते आणि आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या परत येण्याविषयी समर्थकांमध्ये खूप उत्साह होता. फेसबुकवर रशियन भाषेत एक पेज तयार करण्यात आलं होतं, ज्यात नवालनी यांनी रशियात परत यावं असं आवाहनही केलं होतं.

कडाक्याची थंडी आणि कोव्हिड-19 चं संकट असतानाही हजारो लोकांनी नवालनी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नवालनी सैबेरियातील एका फ्लाइटमध्येच बेशुद्ध पडले होते. नंतर लक्षात आलं की, त्यांना विष देण्यात आलं होतं. रशियाच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. नवालनी यांनी दावा केला होता की, त्यांना रशियाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशावरून विष देण्यात आलं होतं.

नवालनी यांना अटक का?

रशियन अधिकाऱ्यांनी नवालनी यांना डिसेंबरमध्ये हजर व्हायला सांगितलं होतं, मात्र त्यांनी या सूचनेकडे लक्ष दिलं नाही. कारण हजर झालो, तर अटक होऊ अशी भीती त्यांना होती.

नवालनी यांना एका फसवणुकीच्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे आणि जेल सर्व्हिसच्या मते नवालनी यांनी त्यांच्यावरील निर्बंधांचं उल्लंघन केलं आहे.

आपल्यावरील सर्व खटले हे राजकीय विरोधातून दाखल केल्याचं नवालनी यांचं म्हणणं आहे. रशियन तपास समितीनं त्यांच्याविरोधात फसवणुकीच्या प्रकरणी नवीन फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यांच्यावर अनेक एनजीओंना पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यामध्ये नवालनी यांच्या अँटी करप्शन फाउंडेशनचा समावेश आहे.

हे सर्व पुतिन घडवून आणत असल्याचं नवालनी यांचा दावा आहे. बर्लिन एअरपोर्टवर जगातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवालनी यांना मॉस्कोला जाताना कव्हर करण्याच्या उद्देशाने ते उपस्थित राहिले होते. मात्र रशियन फेडरल टीव्ही चॅनेल आणि वृत्त संस्थांनी त्यांच्या येण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं.

नवालनी यांच्यासोबत काय घडलं होतं?

रशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अलेक्सी नवालनी यांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटलीतून विष देण्यात आल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे. विमानप्रवास करण्याआधी नवालनी हे एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथेच पाण्याच्या बाटलीतून विष दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

नवालनी यांना विमानतळावर विष दिल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. "आता आम्हाला लक्षात आलंय की, विमानतळावर येण्यासाठी जिथे थांबले होते, तिथेच विषप्रयोग झाला होता," असं नवालनी यांच्या सहकाऱ्याने इन्स्टाग्रामवरील व्हीडिओ पोस्टमधून म्हटलंय.

ऑगस्ट महिन्यात रशियातील सायबेरिया प्रांतात हवाई प्रवासादरम्यान अॅलेक्सी नवालनी अचानक आजारी पडले. त्यानंतर त्यांना विमानानं बर्लिनमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं.

अलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला होता.

कोण आहेत नवालनी?

अॅलेक्सी नवालनी रशियातील भ्रष्टाचारविरोधी पक्षाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते आहेत.

ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक मानले जातात. पुतिन सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.

नवालनी यांना टॉम्स्क विमानतळावर 20 ऑगस्ट रोजी चहामधून विष देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विमान प्रवासादरम्यानच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी नावालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं.

2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे नोव्हिचोक ग्रुपमधील नर्व्ह एजंट रसायनाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर इंग्लंडच्या सॅल्सबरी भागात विषप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.

हे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)