You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅलेक्सी नवालनी यांच्या अंडरवेअरमध्ये विष ठेवून मारण्याचा होता कट?
रशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अॅलेक्सी नवालनी यांच्यावर मध्यंतरी विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
नवालनी यांच्यावरील विषप्रयोग हा पाण्याच्या बाटलीतून किंवा चहातून करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
पण हा विषप्रयोग पाण्याच्या बाटलीत किंवा चहात विष ठेवून नव्हे तर अंडरवेअरमध्ये विष ठेवून करण्यात आल्याचा गौप्यस्फोट नवालनी यांनी केला होता.
अॅलेक्सी नवालनी यांनी स्वतःच या प्रकरणाचा शोध घेतल्याचं त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं होतं. याप्रकरणी त्यांनी रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हीस (FSB) वर आरोप केले होते.
याबाबतची सविस्तर बातमी बेलिंगकट नावाच्या शोधपत्रिकारिता करणाऱ्या माध्यमाने केली होती
संबंधित बातमीनुसार, "अॅलेक्सी नवालनी यांनी हल्ल्यातील संशयिताला फोन केला. कोनस्टॅंटिन कुदरित्सेव्ह असं या संशयिताचं नाव आहे. नवालनी यांनी आपण एक रशियन FSB एजंट असून FSB च्याच फोनवरून बोलत असल्याचं भासवलं. नवालनी यांच्यावरील हल्ला अयशस्वी का ठरला, असा जाब त्यांनी कुदरित्सेव्ह यांना विचारला. त्यावेळी विषप्रयोगासाठीचं द्रव्य म्हणजेच नोविचोक हे नर्व्ह एजंट नवालनी यांच्या अंडरवेअरमध्ये ठेवण्यात आलं होतं, असा खुलासा कुदरित्सेव्ह याने संभाषणादरम्यान केला, असं नवालनी म्हणाले होते.
संभाषणादरम्यान, कुदरित्सेव्हने नवालनी यांना सांगितलं की विमानाचे पायलट आणि सायबेरियातील ओम्स्क येथील मेडिकल इमर्जन्सी टीम ही 'मोहीम' अयशस्वी ठरण्याचं कारण आहे. त्यानंतर नोवोचिकचा पुरावा नष्ट करण्यासाठी नवालनी यांचे कपडे गायब करण्यासाठीही कुदरित्सेव्ह यांना ओम्स्क येथे पाठवण्यात आलं होतं, असं त्याने सांगितलं.
रशियातील बीबीसी प्रतिनिधी स्टीव्हन रोसेनबर्ग यांच्या मते, ही रेकॉर्डिंग उघड होणं क्रेमलीनसाठी त्रासदायक ठरू शकतं. ते आतापर्यंत विषप्रयोगाशी आपला संबंध नसल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावत होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी बेलिंगकॅटकडून घेतल्या जाणाऱ्या शोधामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला होता.
काय आहे प्रकरण?
रशियातील विरोधी पक्षनेते त्यांच्यावरील विषप्रयोग ऑगस्ट महिन्यात झाला होता. विमानप्रवासादरम्यान अस्वस्थ होऊन नवालनी खाली पडले, त्यांच्यावर जर्मनीत उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, नवालनी हे बराच काळ कोमामध्ये होते.
अॅलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला आहे. लष्करी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या विषशास्त्राच्या चाचणीत नोविचोक एजंटचा एक 'अस्पष्ट पुरावा' दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.
नवालनी यांच्या गटाच्या दाव्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशानुसारच नवालनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मात्र, क्रेमलीननं (पुतीन सरकार) हे आरोप फेटाळले होते.
कोण आहेत नवालनी?
अॅलेक्सी नवालनी रशियातील भ्रष्टाचारविरोधी पक्षाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते आहेत.
ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक मानले जातात. पुतिन सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.
नवालनी यांना टॉम्स्क विमानतळावर 20 ऑगस्ट रोजी चहामधून विष देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विमान प्रवासादरम्यानच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी नावालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं.
2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे नोव्हिचोक ग्रुपमधील नर्व्ह एजंट रसायनाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर इंग्लंडच्या सॅल्सबरी भागात विषप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.
हे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.
विष काय करतं?
यामध्ये नर्व्ह एजंट सरीन, वीएक्स, आणखी विषारी अशा नोवीचोक एजंटचा प्रभाव असू शकतो.
हे विष मेंदूच्या मांसपेशीच्या रासायनिक संकेत प्रणालीत अडथळा निर्माण करतं. ज्यामुळे श्वास अडकतो, हृद्याचे ठोके वाढू लागतात.
नवालनी यांना हे विष टोम्स्क विमानतळावर ब्लॅक टीच्या कपातून देण्यात आलं असावं असा आरोप त्यांच्या प्रवक्त्याने केला आहे. विमान प्रवास करायच्या काही मिनिटं आधी त्यांनी ब्लॅक टीचं सेवन केलं होतं.
विमानात बसण्यापूर्वी दुसरं काहीही खाल्लं प्यायलं नव्हतं.
लित्वीनेंको यांनीही विष मिसळण्यात आलेला चहा प्यायला होता. हे प्रकरण त्यासारखंच वाटतं आहे.
अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध पुतिनविरोधी चळवळवादी व्लादिमीर कारा मुर्जा यांनीही आपल्यावर विष प्रयोग झाल्याचा दावा केला. 2015 आणि 2017 मध्ये विष दिल्यानंतर जी लक्षणं जाणवतात तसं वाटल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा दावाही एक रहस्य बनून राहिला आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, विष हे रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचं आवडतं अस्त्र होत चाललं आहे. विषाच्या यातना सहन करणं अतिशय कठीण असतं, विषप्रयोग झाल्यानंतर मी कोमात गेलो. बाहेर आलो तेव्हा मला चालायलाही नव्याने शिकावं लागलं.
20 ऑगस्टला नावालनी ज्या विमानात होते ते विमान ओम्स्कमध्ये उतरलं तेव्हा ते कोमाच्या स्थितीतच होते. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)