You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अलेक्सी नावालनी यांच्यावर नोविचोक नर्व्ह एजंट विषाचा प्रयोग - जर्मनी
रशियातील विरोधी पक्षाचे नेते अलेक्सी नावालनी यांना नोविचोक नर्व्ह एजंटद्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला आहे. लष्करी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या विषशास्त्राच्या चाचणीत नोविचोक एजंटचा एक 'अस्पष्ट पुरावा' दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात रशियातील सायबेरिया प्रांतात हवाई प्रवासादरम्यान अलेक्सी नावालनी अचानक आजारी पडले. त्यानंतर त्यांना विमानानं बर्लिनमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. नावालनी हे तेव्हापासून आजवर कोमात आहेत.
नावालनी यांच्या गटाच्या दाव्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशानुसारच नावालनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मात्र, क्रेमलीननं (पुतीन सरकार) हे आरोप फेटाळले आहेत.
जर्मनीनं नावालनी यांच्यावरील या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, 'तातडीनं स्पष्टीकरण' देण्याची मागणी रशियाकडे केलीय. शिवाय, नावालनी प्रकरणात पुढे काय पावलं उचलायची, याबाबतची चर्चा जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांनी वरिष्ठ मंत्र्यांशी केलीय.
दुसरीकडे, क्रेमलीनकडून वारंवार सांगण्यात येतंय की, नावालनी यांच्यावर नोविचोक नर्व्ह एजंटद्वारे विषप्रयोग झाल्याची कुठलीच माहिती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचली नाहीय, असं रशियाच्या टास न्यूज एजन्सीनं वृत्त दिलंय.
तर जर्मन सरकार नावालनी प्रकरणाची माहिती युरोपिनय संघ आणि नाटोला देणार आहे.
उड्डाणापूर्वी विष
एलेक्सी नावालनी रशियातले प्रसिद्ध असे भ्रष्टाचारविरोधी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.
मोठ्या हवाई प्रवासापूर्वी एखाद्याला विष देण्यात आलं तर तो माणूस प्रदीर्घ काळासाठी प्रवासातच अडकून राहतो. विष देणाऱ्याला फरार होण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो.
44 वर्षीय नावालनी यांची सायबेरियाच्या टोम्स्कहून निघालेल्या विमानात असताना तब्येत ढासळली. विमानाने मार्ग बदलून ते ओम्स्क इथे उतरवण्यात आलं.
रशियाच्या सिक्रेट सर्व्हिसच्या दोन एजंट्सना ब्रिटनमध्ये अशाच पद्धतीनं लक्ष्य करण्यात आलं होतं.
अलेक्झांडर लित्वीनेंको यांच्यावर रेडिओअक्टिव्ह पोलोनियम 210ने 2016 मध्ये हल्ला करण्यात आला होता. सर्जेई स्क्रीपाल यांना नर्व्ह एजंट नोविचोकने 2018 मध्ये मारण्यात आलं.
दोन्ही घटनांमध्ये सहभाग असल्याचा रशियाने इन्कार केला आहे.
विष देण्यात आल्याच्या रशियातील रहस्यमय घटना अनेकदा रहस्यमयच राहतात.
रॉयल युनायटेड सर्व्हिसेसशी संलग्न रशियासंदर्भातील विषयांचे जाणकार प्राध्यापक मार्क गेलियोटी सांगतात, "विषाचे दोन गुणधर्म असतात. सूक्ष्मता आणि नाटकीपणा. विष इतकं सूक्ष्म असतं की तुम्ही इन्कार करू शकता आणि विष देण्यात आलं हे सिद्ध करणं अवघड आहे. विषाचा परिणाम व्हायला वेळ लागतो, वेगवेगळ्या स्वरुपाचा त्रास होतो. विष देणारा डोळे मिचकावून विष दिलंच नाही असा इन्कार करू शकतो, जेणेकरून बाकीच्यांना इशारा मिळेल."
रशियातील शोधपत्रकार आणि पुतिन यांचे समीक्षक एना पोलितकोव्सकाया यांची 2006 मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
2004 मध्ये एका हवाई प्रवासादरम्यान त्यांना विष देण्यात आल्याचा दावा केला जातो. त्यांचीही प्रकृती अशीच ढासळली आणि त्या बेशुद्ध पडल्या.
याचपद्धतीने संथपणे शरीरात भिनणाऱ्या पोलोनियम-210ने लित्वीनोंको यांचा यातनामय मृत्यू झाला. दुर्लभ अशा या विषाचं परीक्षण करायलाही काही आठवडे गेले होते. यातून अल्फा पार्टिकल रेडिएशन बाहेर पडतं. गीगर काऊंटरच्या माध्यमातून याचं परीक्षण करता आलं नव्हतं.
ब्रिटनमध्ये झालेल्या परीक्षणात ज्या संशयित गुप्तहेरांचं नाव समोर आलं होतं त्यांच्याकडे संशयित म्हणून नजरेत न येता देश सोडण्यासाठी पुरेसा अवधी होता. ब्रिटनच्या म्हणण्यानुसार, लित्वीनेंको यांचा मृत्यू रशियाच्या दोन गुप्तहेरांमुळेच ओढवला.
नावालनी यांना रशियात अनेकांचं शत्रूत्व ओढवून घेतलं होतं. केवळ पुतिन समर्थक पक्षातली माणसं नाहीत. पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची त्यांनी चोर आणि बेईमान लोकांचा पक्ष अशी हेटाळणी केली होती.
पुतिन 2000 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी गुप्तहेर संघटना केजीबीत काम करत होते.
याप्रकरणात रशियाच्या सरकारचं धोरणं निसटताना दिसत आहे. याचाच अर्थ ऑपरेशनची योजना नीट पद्धतीने तयार करण्यात आली नव्हती असं जेलियोटी यांना वाटतं. असे संकेत आहेत की यामागे रशियातील कोणीतरी ताकदवान व्यक्ती असण्याची शक्यता आहे. रशियाचं सरकार याप्रकरणामागे असेल असं ठोसपणे सांगता येत नाही.
नावालनी सध्या जर्मनीची राजधानी बर्लिन इथे असून कोमात आहेत.
विष काय करतं?
यामध्ये नर्व्ह एजंट सरीन, वीएक्स, आणखी विषारी अशा नोवीचोक एजंटचा प्रभाव असू शकतो.
हे विष मेंदूच्या मांसपेशीच्या रासायनिक संकेत प्रणालीत अडथळा निर्माण करतं. ज्यामुळे श्वास अडकतो, हृद्याचे ठोके वाढू लागतात.
नावालनी यांना हे विष टोम्स्क विमानतळावर ब्लॅक टीच्या कपातून देण्यात आलं असावं असा आरोप त्यांच्या प्रवक्त्याने केला आहे. विमान प्रवास करायच्या काही मिनिटं आधी त्यांनी ब्लॅक टीचं सेवन केलं होतं.
विमानात बसण्यापूर्वी दुसरं काहीही खाल्लं प्यायलं नव्हतं.
लित्वीनेंको यांनीही विष मिसळण्यात आलेला चहा प्यायला होता. हे प्रकरण त्यासारखंच वाटतं आहे.
अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध पुतिनविरोधी चळवळवादी व्लादिमीर कारा मुर्जा यांनीही आपल्यावर विष प्रयोग झाल्याचा दावा केला. 2015 आणि 2017 मध्ये विष दिल्यानंतर जी लक्षणं जाणवतात तसं वाटल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा दावाही एक रहस्य बनून राहिला आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, विष हे रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचं आवडतं अस्त्र होत चाललं आहे. विषाच्या यातना सहन करणं अतिशय कठीण असतं, विषप्रयोग झाल्यानंतर मी कोमात गेलो. बाहेर आलो तेव्हा मला चालायलाही नव्याने शिकावं लागलं.
20 ऑगस्टला नावालनी ज्या विमानात होते ते विमान ओम्स्कमध्ये उतरलं तेव्हा ते कोमाच्या स्थितीतच होते. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
विषप्रयोगाचे पुरावे आधीच नष्ट करण्यात आले?
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोफ यांच्यानुसार नावालनी यांच्यावर विषप्रयोग झाला आहे की नाही याबाबत जर्मनीतील रुग्णालयाचं परीक्षण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे त्याची अधिकृत चौकशी करणं घाईचं ठरेल.
नावालनी यांना बर्लिनला आणण्याची परवानगी मिळाल्यानंतर पेस्कोफ यांनी त्यांच्या आयुआरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नावालनी यांना बर्लिनला नेण्यापूर्वीच विषप्रयोगाच्या खुणा-पुरावे मिटवून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
ओम्स्क इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की नावालनी यांचा रक्तातील साखरेची पातळी कमी झाली होती. नर्व्ह एजंटचे संकेत न ओळखण्यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे.
अमेरिकेत कार्यरत भूलतज्ज्ञ डॉ. कोंस्टेंटिन बालानोफ यांनी बीबीसी रशियाला सांगितलं की हे त्याच रसायन समूहाचं विष असेल.
हे प्रकरण दडपून टाकण्याचाही प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बिनाओळखीचे पोलीस झटपट घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना तिथे येण्यापासून रोखलं होतं.
नावालनी यांच्या मूत्र नमुन्यात विषाचे अंश सापडले नसल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं.
नावालनी यांना ओम्स्क इथल्या रुग्णालयात नर्व्ह एजंटच्या एंटीडोट एट्रोपाइनची मात्रा देण्यात आल्याचंही स्पष्ट होतं आहे.
सेंट पीटर्सबर्ग इथे इंटेन्सिव्ह केयर युनिटचे विशेषज्ञ मिखाइल फ्रेमडरमैन यांच्या मते विष देण्यात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये एट्रोपाइनला बराच वेळ नसांद्वारे देण्यात यावं.
रसायनांचा परिणाम
ब्रिटनचे अग्रगण्य विष विशेषज्ञ प्राध्यापक एलिस्टेयर हे यांच्या मते ओर्गेनोफोस्फेट्सच्या मोठ्या सूचीत नर्व्ह एजंट सगळ्यांत विषारी असतात.
नर्व्ह एजंटची ओळख पटवणं अवघड होऊन जातं.
थोड्या प्रमाणात विष असणाऱ्या ओर्गेनोफोस्फेट्सचा वापर कीटकनाशकं आणि मेडिकल थेरपीत केला जातो. एखाद्याचा जीव घेण्यासाठी मामुली डोसची आवश्यकता असते. ड्रिंक्समधून सहजतेने दिलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलं.
मारेकऱ्याच्या दृष्टीने पाहिलं तर याचे अनेक फायदे आहेत. रक्त चाचणीतून हे कळत नाही की एजंट काय होता? त्याचा शोध घेण्यासाठी जटिल चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी महागडी उपकरणं लागतात. अनेक रुग्णालयांमध्ये तसंच प्रयोगशाळेत ही सुविधा नसते.
ब्रिटनमध्ये ही व्यवस्था अतिसुरक्षित जैव आणि रसायन संशोधन केंद्रापुरती मर्यादित आहे. जगभरात 190 देशांनी जागतिक रासायनिक अस्त्रं निर्बंध करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये रशिया आणि ब्रिटनचा समावेश आहे. याद्वारे रासायनिक हत्यारांचा वापर आणि त्यांच्या शोधावर बंदी असते. अगदी छोट्या प्रमाणावर अॅंटिडोट आणि सुरक्षात्मक कारणांकरता उत्पादनाला परवानगी असते.
शीतयुद्धानंतर रशियाने रासायनिक अस्त्रांचं भांडार नष्ट केलं होतं. प्राध्यापकांच्या मते त्यात 40 हजार टन रसायनं होती.
शीतयुद्ध काळात काही हत्यांच्या प्रकरणात एक्झोटिक केमिकल्सचा वापरही करण्यात आला होता.
बल्गेरियाच्या डाव्या विचारसरणीचे पत्रकार जॉर्जी मार्कोफ यांची लंडन इथं 1978 साली छत्रीने रसायन टोचून हत्या करण्यात आली होती.
त्यावेळी बल्गेरिया सोवियत युनियनचा भाग होतं. त्यांची हत्या रीसिनने करण्यात आली असं मानलं गेलं. मार्कोफ यांच्या मृतदेहातून एक छर्रा मिळाला होता. त्यांना छर्ऱ्यातून विष देण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)