रशिया: अलेक्सी नवालनी यांना पाण्याच्या बाटलीतून विष देण्याचा प्रयत्न?

रशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अलेक्सी नवालनी यांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटलीतून विष देण्यात आल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे. विमानप्रवास करण्याआधी नवालनी हे एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथेच पाण्याच्या बाटलीतून विष दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

नवालनी यांना विमानतळावर विष दिल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. "आता आम्हाला लक्षात आलंय की, विमानतळावर येण्यासाठी जिथे थांबले होते, तिथेच विषप्रयोग झाला होता," असं नवालनी यांच्या सहकाऱ्याने इन्स्टाग्रामवरील व्हीडिओ पोस्टमधून म्हटलंय.

ऑगस्ट महिन्यात रशियातील सायबेरिया प्रांतात हवाई प्रवासादरम्यान अलेक्सी नवालनी अचानक आजारी पडले. त्यानंतर त्यांना विमानानं बर्लिनमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. आता त्यांना शुद्ध आली असली, तरी अजूनही ते बर्लिनमध्येच उपचार घेत आहेत.

अलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला आहे. लष्करी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या विषशास्त्राच्या चाचणीत नोविचोक एजंटचा एक 'अस्पष्ट पुरावा' दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.

नवालनी यांच्या गटाच्या दाव्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशानुसारच नवालनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मात्र, क्रेमलीननं (पुतीन सरकार) हे आरोप फेटाळले आहेत.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत काय म्हटलंय?

अलेक्सी नवालनी यांच्या सहकाऱ्याने नवालनींच्या अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या व्हीडिओत दाखवण्यात आलंय की, कथित विषप्रयोगाची घटना घडल्यानंतर नवालनींची टीम त्या हॉटेलमध्ये गेली होती. तिथे काही संशयास्पद पुरावे सापडल्याचा दावा त्यांनी केलाय. हे पुरावे त्यांनी जर्मनीला पाठवले. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सरकारवर त्यांचा विश्वास नाहीय.

नवालनी थांबलेल्या रुममध्ये पाण्याच्या बाटल्या सापडल्या असून, या बाटलीवर जर्मनीतल्या प्रयोगशाळेला नोविचोकचे निशाण आढळले, असा दावा व्हीडिओतून करण्यात आलाय. मात्र, जर्मन प्रशासनाने या दाव्यांवर आणि आरोपांवर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीय.

अॅलेक्सी नवालनी रशियात परतणार?

काही दिवसांपूर्वी रशियातील विरोधी पक्षाचे नेते अॅलेक्सी नवालनी यांच्यावर कथित विषप्रयोग झाला होता. त्यानंतर उपचारासांठी नवालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं होतं.

या विषप्रयोगाच्या हल्ल्यातून अॅलेक्सी नवालनी बरे झाले असून लवकरच ते रशियात परतणार असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

नवालनी यांच्यावर काही दिवसांपूर्वी रशियात विषप्रयोग झाल्याचं सांगण्यात येत होतं. पण अशा स्थितीतही एखादा व्यक्ती पुन्हा देशात परत येण्याचा निर्णय घेतो, याचं आश्यर्य वाटतं, असं त्यांच्या प्रवक्त्या किरा यार्मेश यांनी म्हटलं.

नवालनी यांनी त्यांचा एक फोटोही इंस्टाग्रॅमवर पोस्ट केला. विषप्रयोगातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच ते सार्वजनिकरित्या समोर आले आहेत. आता व्हेंटीलेटरशिवाय मोकळेपणाने श्वासोच्छवास घेता येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

नवालनी हे 20 ऑगस्ट रोजी सायबेरियातून जर्मनीकडे येत असताना विमानातच बेशुद्ध होऊन पडले होते. त्यांना तातडीने बर्लिनच्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर नोविचोक नर्व्ह एजंट रसायनाचा विषप्रयोग झाल्याचा दावा जर्मनीनं केला होता.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानेच नावालनी यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. मात्र, क्रेमलीननं (पुतिन सरकार) हे आरोप फेटाळले होते.

नवालनी रशियाला खरंच परतणार आहेत का, याबाबत अनेक पत्रकार मला विचारत आहेत, त्यामुळे याबाबत आपण माहिती देत आहोत, असं यार्मेश म्हणाल्या.

नवालनी यांच्या इंस्टाग्रॅम पोस्टनंतर काही वेळातच ही माहिती समोर आली.

"हॅलो, मी नवालनी. मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती. मला अजूनही थोडा त्रास होत आहे. पण काल मला व्हेंटीलेटरशिवाय मोकळेपणाने श्वास घेता आला," असं कॅप्शन त्यांनी फोटोसोबत लिहिलं.

नवालनी दाखल असलेल्या रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दोन बंदुकधारी पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, क्रेमलिनने नवालनी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात एका बैठकीचं आयोजन केल्याबाबत चर्चा होती.

मात्र, अशा बैठकीची कोणतीही गरज नाही, अशा प्रकारची कोणतीही बैठक होणार नाही, असं क्रेमलिनचे प्रवक्ते दीमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केलं आहे.

कोण आहेत नवालनी?

एलेक्सी नवालनी रशियातील भ्रष्टाचारविरोधी पक्षाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते आहेत.

ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक मानले जातात. पुतिन सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.

नवालनी यांना टॉम्स्क विमानतळावर 20 ऑगस्ट रोजी चहामधून विष देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विमान प्रवासादरम्यानच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी नावालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं.

2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे नोव्हिचोक ग्रुपमधील नर्व्ह एजंट रसायनाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर इंग्लंडच्या सॅल्सबरी भागात विषप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.

हे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)