You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅलेक्सी नवालनी यांनी सांगितला विषप्रयोगातून बाहेर येतानाचा अनुभव
- Author, आंद्रेय कोझेन्को
- Role, बीबीसी रशियन
विषप्रयोगातून बाहेर येणं एक दीर्घकालीन आणि त्रासदायक प्रक्रिया असल्याचं रशियाचे कट्टर पुतीन विरोधक अॅलेक्सी नवालनी म्हणतात. बीबीसी रशियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
आपण अनेक रात्र जागून काढल्याचं त्यांनी सांगितलं. अनेकदा साध्या-साध्या हालचाली करतानाही त्यात सुसूत्रता नसायची, असंही ते म्हणाले. मात्र, आता प्रकृती बरी असल्याचं आणि लवकरच रशियाला परतणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बर्लिनमधल्या कडेकोट सुरक्षा असणाऱ्या एका हॉटेलमध्ये बीबीसीच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. बर्लिनमधल्याच चॅरिट हॉस्पिटलमध्ये अॅलेक्सी तब्बल 32 दिवस भरती होते. यातला बराच काळ त्यांनी अतिदक्षता विभागातच काढला.
सुरुवातीला वेदना नव्हत्या. मात्र, थंडी वाजून अंग थरथरायचं. ते म्हणाले, "असं वाटायचं की आता शेवट जवळ आलाय."
"कसल्याच वेदना जाणवायच्या नाही. पॅनिक अटॅक सारखा प्रकार नव्हता. सुरुवातीला एवढंच जाणवतं की काहीतरी चुकतंय आणि नंतर डोक्यात एकच विचार येतो - आता मी मरणार आहे."
20 ऑगस्टला सायबेरियातल्या टॉम्स्कहून मॉस्कोला जात असताना ते विमानातच कोसळले होते. विमानाने ओम्स्कमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्यामुळे अॅलेक्सी यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करता आलं आणि त्यांचे प्राण वाचले.
यानंतर रशियातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना बर्लिनला नेण्यात आलं. बर्लिनमध्येच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सुरुवातीला बरेच दिवस त्यांना औषध देऊन कोमामध्ये ठेवण्यात आलं होतं.
नोव्हिचोक विषाचा प्रयोग
44 वर्षांचे अॅलेक्सी नवालनी यांच्यावर 'नोव्हिचोक' या नर्व्ह एजंट म्हणजेच विषाचा प्रयोग झाल्यावर ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन (OPCW) या संस्थेनेही शिक्कामोर्तब केलं आहे.
अॅलेक्सी यांच्या मूत्राच्या आणि रक्ताच्या नमुन्यांमध्ये जो पदार्थ आढळला तो आणि रासायनिक अस्त्रांच्या यादीत समावेश असणाऱ्या पदार्थामध्ये साम्य आढळल्याचं या संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
फ्रान्स आणि स्वीडनच्या प्रयोगशाळांमध्येसुद्धा तपासणी केली असता तिथल्याही शास्त्रज्ञांनी नवालीन यांच्यावर हाच विषप्रयोग झाल्याचं म्हटल्याचं जर्मनीचं म्हणणं आहे.
शीत युद्धाच्या काळात सोव्हिएतच्या शास्त्रज्ञांनी 'नोव्हिचोक विष' तयार केलं होतं. नोव्हिचोकचे अगदी काही थेंबसुद्धा एखाद्याला ठार करण्यासाठी पुरेसे असतात.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अॅलेक्सी नवालनी यांनी एक व्हीडियो संदेश दिला होता. यात पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण सत्ताधारी पक्षासमोर आव्हान उभं करू शकतो, या भीतीमुळेच रशियाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला असावा, असं नवालनी यांनी म्हटलं होतं.
रशियाच्या सरकारने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. इतकंच नाही तर नवलनी यांच्यावर कुठलाच विषप्रयोग झाला नाही, असं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.
गेल्या आठवड्यात एका जर्मन न्यूज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नवालनी म्हणाले होते, "मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या घटनेमागे पुतीन (रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन) यांचाच हात आहे. इतर कुठलंच कारण मला दिसत नाही."
सरबेरियामधल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलकांच्या प्रचारासाठी नवालनी गेले होते. त्या प्रचार मोहिमेनंतर नवालनी यांची प्रकृती ढासळली होती
अॅलेक्सी नवालनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे कडवे विरोधक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून नवालनी कायमच सरकारी भ्रष्टाचार उघड करत असतात तसंच पुतीन यांच्या नेतृत्त्वाखीलाल युनायटेड रशिया हा पक्ष 'चोरांचा पक्ष' असल्याचा आरोप ते करतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मला देशातून बाहेर काढण्यासाठी ते बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहेत."
मात्र, आपल्या हातात कुठल्याच प्रकारची सत्ता नाही. त्यामुळे पुढे काय घडेल, यावर कसलंही नियंत्रण नसल्याचं सांगताना ते म्हणाले, "पुढे काय वाढून ठेवलंय, मला याची कल्पना नाही. मी रिस्क घेणार नाही. मला माझं ध्येय आहे. माझा देश आहे."
भ्रम (हॅल्युसिनेशन्स)
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की फ्लाईटमध्ये विषाचा अंमल चढल्यानंतर अल्कोहोल घेतल्यावर जशी समोरची व्यक्ती हलताना दिसते तसं काही त्यांच्याबाबतीत घडलं नाही. पण त्यांना कुठल्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नव्हतं.
पुढे ते सांगतात, "हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाल्यानंतर बरेच दिवसांनी ते मध्येच शुद्धीत यायचे आणि शुद्धीत आल्यावर नरकयातना व्हायच्या. बरेचदा भास व्हायचे."
या भासांविषयी सांगताना नवालनी म्हणाले, त्यांना असं वाटायचं की त्यांची पत्नी युलिया, डॉक्टर्स आणि सहकारी लेओनॉईड व्होलकोव्ह त्यांना सांगताहेत की तुझा अपघात झालाय आणि त्यात तुझे पाय गेलेत. डॉक्टर्स तुम्हाला नवीन पाय बसवणार आहेत. नवालनी यांना हे सगळं खरंच घडतंय, असं वाटायचं.
"मला सर्वांत जास्त त्रास झोपेचा होता. झोपच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला झोपच यायची नाही. यापूर्वी मला कधीही हा त्रास नव्हता."
"माझे हात मधेच थरथरायचे." हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या बऱ्याच मेडिकल टेस्ट व्हायच्या. कॉग्नेटिव्ह (आकलन क्षमतेसंबंधी) टेस्टही व्हायच्या. आता मात्र, त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारतेय.
बीबीसीशी बोलताना ते पुढे म्हणाले, "कधी-कधी मला लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. मी दिवसातून दोन वेळा फिरायला जातो आणि बराच वेळ फिरतो. कारमध्ये बसणं आणि उतरणं, माझ्यासाठी सर्वांत अवघड आहे."
इतके दिवसांच्या उपचारांनंतर आता आपल्याला कुठल्याही वेदना होत नसल्याचं नवालनी सांगतात. पण, साधा बॉल फेकायचा असेल तरी अॅथलेटिक्समध्ये गोळाफेक करत असल्यासारखं वाटतं, असं अॅलेक्सी नवालनी म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)