उंदराच्या ‘निर्घृण हत्ये'नंतर पोलिसांकडून पोस्टमॉर्टम, काय आहे प्रकरण?

    • Author, अनंत झणाणे,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी.

उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील बदायूँ जिल्ह्यात उंदराची 'निर्घृण हत्या' केल्याचं प्रकरण चर्चेत आलं आहे.

मनोज कुमार नामक एका व्यक्तीवर उंदराच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणात विकेंद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली आहे.

विकेंद्र यांनी या घटनेचं व्हीडिओ चित्रीकरण केलं. “मनोज कुमार नामक व्यक्तीने अत्यंत वाईट पद्धतीने या उंदराला मारलं. विट बांधून त्याला पाण्यात बुडवलं,” असं ते या व्हीडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये विकेंद्र हे मनोज कुमारला त्याचं नाव आणि पत्ता विचारताना दिसत आहेत.

पीपल्स फॉर अनिमल्स संस्थेचे विकेंद्र शर्मा यांनी याप्रकरणात बदायूँ पोलिसांना लेखी तक्रार दिली.

त्यानुसार, “मनोजने उंदराच्या शेपटीला वीट बांधून नाल्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. मी नाल्यात उडी मारून उंदराला बाहेर काढलं. पण तो वाचू शकला नाही,” असं ते म्हणाले.

उंदराला इतक्या क्रूरतेने मारल्याने पशू-क्रूरता निवारण कायद्यानुसार मनोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विकेंद्र शर्मा यांनी केली आहे.

याशिवाय, “हा उंदीर मी पोलीस ठाण्यात जमा करत आहे. कृपया त्याचा पोस्टमॉर्टम करण्याचे कष्ट घ्यावेत. पशुवैद्यकांनाही सूचना दिली आहे,” असंही ते म्हणाले.

ही तक्रार पीपल फॉर अनिमल्सच्या लेटरहेडवर देण्यात आली आहे. या संस्थेच्या प्रमुख मेनका गांधी असल्याचं खाली लिहिण्यात आलेलं आहे.

पोलिसांनी उंदराच्या पोस्टमॉर्टमसाठी पशुवैद्यक अधिकाऱ्यांनाही पत्र लिहिलं. त्याच्या उत्तरादाखल अधिकाऱ्यांनी म्हटलं की उंदराचं पोस्टमॉर्टम करण्याची सुविधा बदायूँमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह बरेलीला पाठवावं लागेल, असं त्यांनी म्हटलं.

पोलिसांनी सध्या तरी मनोज कुमार यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तक्रारीच्या आधारे केवळ त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं.

तसंच प्राथमिक स्वरुपाची चौकशी करून त्याच्या घरच्या पत्त्याची खात्री पटवली आहे.

तक्रारदार विकेंद्र शर्मा यांनी म्हटलं की त्यांनी स्वतः उंदराचा मृतदेह बरेली व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटला (IVRI) नेला. तिथे उंदराचं पोस्टमॉर्टमही करण्यात आलं. आता फक्त अहवाल मिळण्याची प्रतीक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

विकेंद्र शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना या घटनेविषयी अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, “उंदीर हा प्राणी संरक्षण कायद्यानुसार लहान जीवांच्या श्रेणीत येतो. मात्र मनोज कुमार यांची क्रूरता चुकीची होती. आपण कुणाचं काय नुकसान करत आहोत, हे मुक्या जनावरांना कळत नसतं. हा विषय फक्त उंदरापर्यंत मर्यादित नाही. मात्र लोकांना हा गंमतीचा मुद्दा वाटत आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)