You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजगरानं 5 वर्षांच्या मुलाला स्वीमिंग पूलमध्ये फरपटत नेलं आणि...
- Author, टिफनी टर्नबॉल
- Role, बीबीसी न्यूज, सिडनी
ऑस्ट्रेलियात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. एका भल्यामोठ्या अजगराने पाच वर्षांच्या मुलाला फरपटत स्वीमिंग पूलमध्ये नेण्याची घटना घडली आहे.
हा अजगर त्या मुलाच्या तिप्पट मोठा होता. अनेक जागी चावूनही, फरपटत नेऊनही या मुलाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
बोऊ ब्लेक नावाचा मुलगा घरातल्या पोहायच्या तलावाजवळ खेळत होता. त्याच्यावर अजगराने हल्ला केल्यानंतर अजगराच्या तावडीतून त्याचे वडील आणि आजोबांनी त्याची सुटका केली.
या घटनेनंतर बोऊची तब्येत ठिक असून त्याला काही जखमा झाल्या आहेत.
त्याचे वडील बेन मेलबर्न रेडिओ स्टेशन 3 एडब्ल्यू शी बोलताना म्हणाले, “रक्त वगैरे सगळं साफ केल्यावर आम्ही त्याची समजूत काढली. तो अजगर विषारी नसल्यामुळे तू मरणार नाही अशी त्याला खात्री करुन दिली. त्याची तब्येत आता बरी आहे.”
आता बोऊच्या या जखमांवर आपण लक्ष ठेवत आहोत, त्यात संसर्गाची चिन्हं दिसली की पुढचे उपचार करता येतील असं बेन सांगतात.
बेन यांचं कुटुंब न्यू साऊथ वेल्सच्या बायरन बे या समुद्रकाठच्या गावात राहातात.
नशीबाने बोऊ वाचला असला तरी तो सगळा प्रकार नाट्यमय आणि कसोटी पाहणारा होता, असं बेन यांनी सांगितलं आहे.
“बोऊ तलावाच्या काठाने सहज चालत होता. माझ्यामते तो अजगर भक्ष्याच्या शोधात तिथे बसला होता. सावज टप्प्यात येण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि ते सावज बोऊ होतं.”
ते सांगतात, एक काळी सावली झुडपातून बाहेर आली क्षणातच तिने बोऊच्या पायाला विळखा घातला.
कोणतंही संरक्षणाचं साधन नसताना बोऊच्या 76 वर्षांच्या आजोबांनी अॅलन यांनी पाण्यात उडी मारली आणि अजगर व बोऊला बेनकडे ढकलले.
बोऊची 15 ते 20 सेकंदात अजगराच्या पकडीतून सूटका केली. त्यानंतर आधी वडील व मुलाला आपण शांत केले आणि नंतर 10 मिनिटांनी अजगराला झाडीत सोडले असं बेन सांगतात.
अजगर या परिसरात सर्रास आढळतात असं बेन सांगतात. त्यांचं गाव सिडनीपासून आठ तासांच्या अंतरावर आहे. हे ऑस्ट्रेलिया आहे, इथं हे होणारचं असं बेन सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)