मान कापली तरी तो कोंबडा 18 महिने जिवंत होता...

    • Author, क्रिस स्टोकल वॉकर
    • Role, बीबीसी मॅग्झीन प्रतिनिधी

अमेरिकेत 70 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्यानं एका कोंबड्याची मान कापली, पण तो कोंबडा मेलाच नाही. उलट, तो कोंबडा चक्क 18 महिने जिवंत राहिला. आश्चर्यचकित करणाऱ्या या घटनेमुळे हा कोंबडा 'मिरॅकल माईक' नावानं प्रसिद्ध झाला. पण, डोकं नसलेला हा कोंबडा इतक्या दिवसांपर्यंत जिवंत कसा राहिला?

अधिक विस्तारानं जाणून घ्या?

10 सप्टेंबर 1945मध्ये कोलोरॅडोमधल्या फ्रूटा गावातल्या आपल्या शेतावर लॉयड ओल्सेन आणि त्यांची पत्नी क्लारा कोंबड्या कापत होते. त्यादिवशी 40 ते 50 कोंबडे-कोंबड्या कापल्यानंतर एकाची मान कापली गेल्यानंतरही तो मेला नाही.

ओल्सेन आणि क्लारा यांचे पणतू ट्रॉय वॉटर्स सांगतात, "आपलं काम संपवून जेव्हा ते कापलेल्या कोंबड्यांचं मांस उचलू लागले तेव्हा त्यातला एक कोंबडा जिवंत होता. जो डोक्याविनाच इकडे-तिकडे धावत होता."

त्या दांपत्यानं या कोंबड्याला सफरचंदांच्या एका रिकाम्या खोक्यात बंद करून टाकलं. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी ओल्सेन यांनी तो खोका पाहिला, तेव्हा कोंबडा जिवंत असल्याचं पाहून ते अवाक झाले.

लहानपणी वॉटर्स यांना त्यांच्या पणजोबांनी ही गोष्ट ऐकवली होती. अमेरिकेतल्या फ्रूटामध्ये दरवर्षी 'हेडलेस चिकन' महोत्सव साजरा केला जातो.

वॉटर्स सांगतात, "पणजोबा बाजारात मांस विक्रीसाठी गेले आणि आपल्या सोबत त्या 'हेडलेस चिकन'लाही घेऊन गेले. त्यावेळी घोडागाडीतून हे सगळं न्यावं लागायचं. बाजारात त्यांनी या विचित्र घटनेवर बिअर किंवा तत्सम गोष्टींची पैज लावायला सुरुवात केली."

ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण फ्रूटामध्ये पसरली. एका स्थानिक वृत्तपत्रानं ओल्सेन यांना भेटण्यासाठी आपला रिपोर्टरही पाठवला. काही दिवसांनंतर फ्रूटापासून 300 मैलांच्या अंतरावर असलेल्या युटा प्रांतातल्या सॉल्ट लेक सिटीमधले एक साईडशो प्रमोटर होप वेड यांनी आपल्या शोमध्ये येण्यासाठी ओल्सेन यांना आमंत्रण दिलं.

अमेरिकेची टूर

ओल्सेन पहिले सॉल्ट सिटी लेक इथं गेले आणि मग, युटा विद्यापीठात गेले. विद्यापीठात 'माईक' म्हणजे त्या कोंबड्याची तपासणी केली गेली. त्यावेळी एक भलतीच अफवा उडाली. अफवा अशी होती की, विद्यापीठातील वैज्ञानिकांनी अनेक कोंबड्यांची मान कापली. कारण, त्यांना मान कापल्यावर कोंबड्या जिवंत राहतात का हे पाहायचं होतं.

माईकला 'मिरॅकल माईक' नाव होप वेड यांनीच दिलं. त्यावर लाईफ मॅग्झीनमध्येही बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर लॉयड ओल्सेन, क्लारा आणि माइक संपूर्ण अमेरिकेच्या दौऱ्यावरच निघाले. ते कॅलिफोर्निया, अॅरीझोना आणि अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेले.

पण, 1947च्या वसंत ऋतूत अॅरिझोना इथल्या फिनिक्समध्ये पोहोलचल्यावर माईकचा मृत्यू झाला. माईकला नेहमीच ड्रॉपनं ज्यूस वगैरे दिला जात असे आणि त्याची अन्ननलिका एका इंजेक्शनची सुईनं साफ केली जात असे, जेणेकरून त्याच्या घशात काही अडकणार नाही.

पण, त्या रात्री ते सुई एका कार्यक्रमात विसरले आणि दुसरी सुई आणेपर्यंत माईकचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला.

आर्थिक स्थिती सुधारली

वॉटर्स सांगतात, "अनेक वर्षांपर्यंत माईकला विकलं हा दावा ओल्सेन करत होते. पण, एका रात्री त्यांनी मला सांगितलं की, त्याचा मृत्यू झाला होता."

ओल्सेन यांनी कधीच स्पष्ट केलं नाही की, त्यांनी माईकचं नेमकं केलं काय? मात्र, त्याच्यामुळे ओल्सेन यांची आर्थिक स्थिती मात्र सुधारली.

न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर बिहेविअर अँड इवोल्यूशन संस्थेसोबत काम करत असलेले चिकन एक्सपर्ट डॉ. टॉम स्मल्डर्स सांगतात, "तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, कोंबडीचं संपूर्ण डोकं तिच्या डोळ्यांमागील एका छोट्या भागात असतं."

अहवालानुसार, माईकची चोच, चेहरा आणि डोळे काढले गेले होते. स्मल्डर्स सांगतात, "माईकच्या मेंदूचा 80 टक्के भाग वाचला होता. ज्यामुळे माईकचं शरीर, हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, भूक आणि पचनसंस्था कार्यरत राहिली."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)