You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑक्टोपस बाबत जाणून घ्या या 10 रंजक गोष्टी
संपूर्ण शरीरभर मेंदूच्या पेशी असलेला ऑक्टोपस हा जीव एक खेळकर, जिज्ञासू आणि खोडकर प्राणी म्हणून ओळखला जातो.
ऑक्टोपसच्या शरीरात असलेली क्षमता पाहिली तर आपल्याला आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही.
या लेखात आपण ऑक्टोपसविषयी 10 अशा रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित आपल्या सर्वांना माहीत नसतील.
विचारवंत आणि स्कूबा डायव्हर पीटर गॉडफ्रे-स्मिथ यांच्याशी बीबीसी रेडिओ 4 ने साधलेल्या संवादावर हा लेख आधारित आहे.
1. भुजांमध्ये मेंदू
ऑक्टोपसच्या मज्जासंस्थेची रचना प्रचंड मोठी असते. एका सामान्य ऑक्टोपसमध्ये अंदाजे 500 दशलक्ष न्यूरॉन किंवा ब्रेन सेल्स असतात.
एखाद्या छोट्या सस्तन प्राण्यात म्हणजेच कुत्र्यामध्ये आढळून येणाऱ्या ब्रेन सेल्सच्या क्षमतेइतकंच हे प्रमाण आहे.
पण, कुत्री किंवा मानव यांच्याप्रमाणे ऑक्टोपसचे ब्रेन सेल्स डोक्यात नसतात, तर ते त्यांच्या भुजांमध्ये असतात.
ऑक्टोपसच्या हातांमध्ये चव आणि स्पर्श ओळखणाऱ्या सुमारे 10 हजार कोशिका असू शकतात.
2. ऑक्टोपसना शिकवलं जाऊ शकतं, त्यांना स्मरणशक्तीही असते
गेल्या 70 वर्षांत ऑक्टोपसवर अनेक संशोधनं आणि प्रयोग करण्यात आले. ऑक्टोपसना एखाद्या साध्या-सोप्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, तसंच त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते, असं या प्रयोगांमधून समोर आलं आहे.
एका प्रयोगातून काही ऑक्टोपसना बक्षीस म्हणून सारडाईन (छोटा मासा) देण्याच्या मोबदल्यात त्यांना एक गोष्ट करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण केली.
याशिवाय, काही ऑक्टोपसची दृश्यमानता चाचणीही एकदा घेण्यात आली होती. त्यांचा एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने एक गोष्ट पाहण्यास लावण्यात आली. त्यानंतर पुढच्या वेळी डोळ्यांची आदलाबदली करून हाच प्रयोग दुसऱ्यांदा करण्यात आला.
हा प्रयोग तसा लांबलचक चालला. पण ऑक्टोपसने पाहिलेल्या गोष्टी जसे की कबतूर इ. त्यांनी लक्षात ठेवल्याचं यामधून निष्पन्न झालं होतं.
3. अत्यंत खोडकर स्वभाव
सारडाईन बक्षीस म्हणून देण्यात येत असलेल्या प्रयोगात तीन ऑक्टोपसनी सहभाग नोंदवला होता. अल्बर्ट, बर्टरॅम आणि चार्ल्स अशी तिघांची नावे होते.
अल्बर्ट आणि बर्टरॅम यांची कामगिरी या प्रयोगात सातत्यपूर्ण होती. ते संदेशाचं पालन करत होते. पण चार्ल्स हा काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हता. एकदा तर त्याने उचलण्यास सांगितलेली गोष्ट थेट फोडूनच टाकली.
याशिवाय, त्यादिवशी प्रयोग घेत असलेल्या शास्त्रज्ञांवर पाण्याचे फवारे मारण्यासारख्या खोड्या करणं चार्ल्सकडून सुरू होतं.
अशा प्रकारे इतरांच्या खोड्या करणारे ऑक्टोपस जगभरातील विविध संग्रहालयांमध्ये आढळून आले आहेत.
कहर म्हणजे, न्यूझीलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ओटागो येथील संग्रहालयात तर एक ऑक्टोपस सतत पाण्याचे फवारे वीजेच्या बल्बवर मारायचा. जेणेकरून त्यामध्ये शॉर्टसर्किट होऊन बल्ब बंद पाडण्याचं काम तो वारंवार करायचा.
वारंवार बल्ब बदलणं आणि तेथील डागडुजी करणं हे संग्रहालय प्रशासनाला इतकं महाग पडलं की अखेर त्यांनी त्या ऑक्टोपसला समुद्रात परत पाठवणंच योग्य समजलं.
4. व्यक्तींना ओळखतात
न्यूझीलंडच्याच ओटागो संग्रहालयात एका ऑक्टोपसबाबत आणखी एक गोष्ट शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आली.
शास्त्रज्ञांच्या पथकातील एक महिला संशोधक तेथील ऑक्टोपसला आवडत नव्हती. ती संशोधक जेव्हा-जेव्हा त्याच्यासमोर यायची. तिच्यावर पाण्याचा फवारा मारून तो तिला पूर्णपणे भिजवत असे.
पण, त्या महिला संशोधक त्या न आवडण्याचं एकही कारण शास्त्रज्ञांना स्पष्ट करता आलं नाही.
5. खेळाची आवड
ऑक्टोपस हे खोडकर असतातच, पण त्याचसोबत ते खेळकरही असतात. त्यांना खेळायला प्रचंड आवडतं.
प्रयोगशाळांमधील अनेक ऑक्टोपस हे आपसांत खेळत असल्याचं दिसून आलं आहे. ते बाटल्यांसोबत तसंच पाणी जिथून पडतं त्या ठिकाणी जाऊन खेळतात, हेसुद्धा अनेकवेळा दिसून येतं.
6. भुजांमार्फतच प्रजनन क्रिया
ऑक्टोपसची प्रजनन क्रियासुद्धा भुजांमार्फतच चालते. नर ऑक्टोपसची उजव्या बाजूची तिसरी भुजा ही प्रजनन क्रियेत महत्त्वाची ठरते.
लैंगिक क्रियेदरम्यान नर ऑक्टोपस ही भुजा मादीच्या दिशेने ताणतात. मादी ऑक्टोपसने त्याचा स्वीकार केल्यास दोघांमध्ये संबंध निर्माण होतात.
या भुजेतून नर ऑक्टोपस शक्राणू मादीमध्ये सोडतो. मादी ऑक्टोपस हे शुक्राणू आपल्या भुजांमध्येच साठवतात. पुढे त्यांच्या मदतीने अंडी फलित होतात.
7. भुजांच्या साहाय्याने अभिवादन
ऑक्टोपस इतर ऑक्टोपसना भुजा हलवून अभिवादन करत असल्याचं निरीक्षणही प्रयोगांमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
ऑक्टोपसच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ प्रा. स्टिफन लिनक्विस्ट यांच्या मते, ही एकमेकांना ओळख दाखवण्यासाठी केली जाणारी कृती आहे.
8. तीन हृदय
हो हे खरं आहे. ऑक्टोपसला एक नव्हे तर तीन हृदयं असतात. यामधूनच ऑक्टोपसच्या निळसर हिरव्या रंगाच्या रक्ताचं अभिसरण होतं.
ऑक्टोपसचं रक्त निळसर हिरवं असतं कारण त्यांच्या रक्तामध्ये माणसाप्रमाणे लोह नसतं. त्यांच्या रक्तात तांबं हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात. त्यामुळेच रक्ताला निळसर हिरवा रंग येतो.
9. रंग, आकार बदलणारे ऑक्टोपस
ऑक्टोपस हे त्यांचा रंग बदलू शकतात.
नर ऑक्टोपस जेव्हा आक्रमकपणे इतर ऑक्टोपसवर हल्ला चढवणार असतो, त्यावेळी साधारपणे त्याचा रंग काहीसा गडद होऊ शकतो.
शिवाय, यावेळी तो आपल्या भुजांना ताणून स्वतःचा आकार आणखी मोठा दर्शवण्याचाही प्रयत्न करतो.
10. सांगाडा नसल्याचे फायदे
ऑक्टोपस हा शरीराने प्रचंड लवचिक असतो. केवळ त्याच्या डोळ्याच्या आकाराच्या छिद्रातूनही तो आरपार जाऊ शकतो.
ऑक्टोपसच्या शरीरात एकही हाड नसतं, त्याचा फायदा त्याला आकार बदलण्यासाठी होतो.
खरंतर ऑक्टोपसच्या आकाराइतक्या प्राण्यामध्ये एकही हाड नसणं ही गोष्टच मुळात आश्चर्यकारक आहे.
पण हाडे नसणं हीच गोष्ट ऑक्टोपससाठी अनेकवेळा नुकसानीची ठरते. परंतु, ऑक्टोपस आपल्या भुजांच्या मदतीने त्यावर काही प्रमाणात मात करतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)