‘ते शब्द खटकले, मी खिशात पैसे टाकून परत आलो आणि...’, भाजीपाला विकणारा शेतकरी बनला 32 हार्वेस्टरचा मालक

सतीश तौर

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, सतीश तौर
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी 10 एकर गहू केला होता. पण मळणी मशीननं गहू काढणं होत नव्हतं. आम्ही परेशान होतो. मग पंजाबचं एक मशीन आलं. त्याच्या मालकाकडे आम्ही रोज फिरायचो. त्यानं 900 वरुन 1800 पर्यंत भाव नेला.

"8-10 दिवस झाल्यावर मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो की, हे 2 हजार एकरप्रमाणे पैसे घे आणि माझ्याकडे मशीन घेऊन चल. तर तो म्हणला, तू काय या मशीनचा मालक आहे का? ते शब्द मला खटकले. मी पैसे माझ्या खिशात टाकले आणि परत आलो."

2007-08 सालच्या या अनुभवानंतर शेतकरी सतीश तौर यांनी हार्वेस्टर विकत घ्यायचं ठरवलं. सतीश जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या लिंबी गावात राहतात. त्यांच्या घरी पोहचल्यानंतर घराच्या मागच्या बाजूस हार्वेस्टर रांगेनं उभे केलेले दिसून येतात.

सध्या सतीश यांच्याकडे 32 हार्वेस्टर आहेत. एकेकाळी भाजीपाला विकणाऱ्या सतीश यांनी वडिलांची 18 एकर जमीन स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर 35 एकरपर्यंत नेली. हार्वेस्टरचा व्यवसाय उभा केला. याची सुरुवात 2007-08 सालच्या एका अनुभवामुळे झाली.

या अनुभवानंतर सतीश यांनी मनामध्ये जिद्द ठेवली की काही झालं तरी आपल्याला मशीन घ्यायचं. मग ते सरळ पंजाबला गेले.

“पंजाबमध्ये 35 कंपन्या बघितल्या. मला शेतकऱ्याचा फायदा असणारं मशीन पाहिजे होतं,” असं सतीश सांगतात.

पुढे सतीश यांनी एका बँकेकडून लोन घेत पहिलं हार्वेस्टर विकत घेतलं आणि व्यवसायाला सुरुवात केली. 8 फेब्रुवारी 2009 चा तो दिवस होता.

“8 फेब्रुवारी 2009ला माझं मशीन सुरू झालं आणि पहिल्याच वर्षी मी 650 एकर गहू कापला,” सतीश सांगतात.

व्हीडिओ कॅप्शन, शेतकरी यशोगाथा: जालना जिल्ह्यातील शेतकरी जे आज आहेत 32 हार्वेस्टर

8 महिने चालतो सीझन

2009 मध्येच सतीश यांनी दुसरं मशीन खरेदी केलं. सध्या त्यांच्याकडे 32 हार्वेस्टर आहेत. या मशीनमधून मूग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, गहू, हरभरा इ. पिकांची काढणी केली जाते. जवळपास 8 महिने सीझन चालत असल्याचं ते सांगतात.

“मूगाचं सीझन साधारणत: 15 ऑगस्टपासून चालू होतं. निसर्ग समाधानकारक असेल तर ऑगस्टपासून एप्रिल ते मे पर्यंत कंटिन्यू चालू शकतं. यापद्धतीनं 8 महिने हे मशीन मी चालवलेलं आहे.”

सतीश यांच्या घरामागे उभे असलेले हार्वेस्टर

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, सतीश यांच्या घरामागे उभे असलेले हार्वेस्टर

या 8 महिन्यांमध्ये सतीश पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील जवळपास 70 तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देतात. पण, कौशल्य असलेलं मनुष्यबळ (Skilled manpower) आणि निसर्गाचा लहरीपणा, ही या व्यवसायासमोरची आव्हानं आहेत.

सतीश सांगतात, “या व्यवसायामध्ये एकच आहे, फक्त काढणीच्या वेळी निसर्गानं साथ द्यायला पाहिजे. सोयाबीन आणि मूगाचंच पीक असतं जे पावसात येतं. बाकीचे पिके तर पावसाच्या नंतर असतात. त्यामुळे अवकाळीचा एक फटका बसतो.”

आपल्याला आलेला एक अनुभव सांगताना सतीश पुढे म्हणतात, “मला 2013-13 ला जो दुष्काळ पडला तेव्हा अडचण आली, आर्थिक अडचण आली नाही. पण मॅनपॉवरच्या अडचणी, स्किल्ड माणसं निघून गेली की मग काय करायचं? हा प्रश्न होता. पण मी त्याच्यातून काही गोष्टी शिकलो. जी माणसं सोडून गेली, त्यामुळे नवीन शिकवली पाहिजे हे त्याच्यातून मला शिकायला मिळालं.”

सतीश यांच्याकडे मशीन्सवर गावातील काही तरुण मुलं सध्या काम करतात. मशीन चालवण्यापासून तिची देखभाल करणे, दुरुस्ती करणे ही कामं ही मुलं करतात.

लाल रेष

शेतीत नवीन प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या 'गावाकडच्या गोष्टी' इथे वाचू शकता-

लाल रेष

'स्वत: सारखे 100 जण तयार करायचे'

शेतीतली वेगवेगळी कामं सोपी होण्यासाठी ग्रामीण भागातल्या तरुणांनी तंत्रज्ञानासंदर्भातले वेगवेगळे प्रयोग जाणून घ्यायला हवेत आणि तंत्रज्ञानआधारित शेतीपूरक व्यवसाय करायला पाहिजे, असं मत सतीश तौर आवर्जून नोंदवतात.

“साधारणपणे शेतकऱ्यांला कुठलंही पीक काढायचं असेल तर कापणीला चार, साडे-चार हजार रुपये जातात. त्याला ताडपत्री लागते, मळयंत्रातून काढावे लागते. या सगळ्या प्रोसेसला साडेसात ते 8 हजार खर्च होतो. पण त्यासाठी 8 ते 10 दिवसबी जातात. पण हेच पीक हार्वेस्टरनं काढलं तर ते तीन-साडेतीन हजारात आणि एका दिवसात घरी येतं.”

सतीश यांनी या व्यवसायातून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, सतीश यांनी या व्यवसायातून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

सतीश यांच्याकडे दररोज लोक येतात, हार्वेस्टरची माहिती घेतात. आम्ही त्यांच्याकडे असताना शेजारच्या गावांमधून काही माणसं आली होती. हार्वेस्टरची माहिती आणि पीक काढणीच्या खर्चाबाबत ते सतीश यांना विचारणा करत होते.

सतीश यांनी आतापर्यंत 44 जणांना हार्वेस्टर मशीन घेऊन दिलेत. स्वत:सारखे 100 जण तयार करायचा त्यांचा मानस आहे. हार्वेस्टरच्या व्यवसायामुळे त्यांचं आयुष्य बदललं आहे.

'जालन्याचं मशीन'

“मी शाळेत शिकत असताना वडिलांना साडेतीन एकर जमीन वाटून आलेली होती. त्यांनी त्यावर 18 एकर कमावली. त्याच्यानंतर माझ्या हातात व्यवहार आला. मी 18 एकरपासनं 35 एकरपर्यंत जमीन घेतली आणि हे 32 हार्वेस्टर उभे केले.”

सतीश लहानपणी वडिलांसोबत भाजीपाला विकायला जायचे. त्यातूनच आपल्यात व्यवसायाची बीजं रोवली गेल्याचं ते सांगतात.

“वडिलांनी लहानपासून भाजीपाला किंवा व्यापार कसा करायचा, हे मला शिकवलं. शाळेत सुट्टी असली की बाजारात जाऊन भाजीपाला विकायचो. 1998 सालचा विषय आहे, मी बाजारामध्ये जाऊन 200 ते 300 रुपये रोज कमवायचो,” सतीश सांगतात.

सतीश यांचं घर

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, सतीश यांचं घर

सतीश यांचे हार्वेस्टर तेलंगणा आणि कर्नाटकमधील गुलबर्गा, धारवाड या जिल्ह्यांमध्ये जातात. तिथं हे 'जालन्याचं मशीन' म्हणून प्रसिद्ध आहे.

सतीश सांगतात, "मी हे खात्रीपूर्वक सांगतो की नोकरी ही कधीच व्यवसायापेक्षा मोठी नाही. पण त्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक काम करावं लागेल. आणि झालेल्या चुका सुधारत राहाव्या लागतील."

शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलं, तर शेतकरी चांगल्या पद्धतीचा माल निर्यात करू शकतो.

शेतकरी म्हणून आपण आपल्या पद्धतीनं काय विकतं ते पिकवलं पाहिजे आणि ते मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत कसं पोहचवू याच्यावर विचार केला पाहिजे, असं सतीश यांचं सांगणं आहे.