‘300 रुपये रोजानं जाण्यापेक्षा चांगलं नियोजन केलं, तर 1 एकर शेतीत रोजचे 1000 रुपये कमावता येतात’

मनोज दिलवाले

फोटो स्रोत, ganesh wasalwar

फोटो कॅप्शन, मनोज दिलवाले

“आम्ही 3 वर्षांपासून गुलाब शेती करतोय. आम्हाला कधीच असं वाटलं नाही की, आपल्याकडे पैशाची कमी आहे. कुणाकडून पैसे घ्यावे लागतील, असंही कधीच वाटलं नाही. त्यामुळे आमच्यासाठी गुलाब शेती वरदानच ठरलीय.”

तरुण शेतकरी मनोज दिलवाले सांगत होता.

मनोज हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगर गावात राहतो. त्याच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यापैकी 3 एकरवर फुलशेती, 3 एकरवर फळबाग तर 2 एकर क्षेत्रावर 2 शेततळी आहेत.

फुलशेतीमध्ये तो 2 एकरवर गुलाब शेती करतो. शिर्डी गुलाबाची तो लागवड करतो. एक एकरमध्ये मोसंबी पिकात निशिगंधाची लागवड केली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मनोजचं शिक्षण एमबीए झालंय. पण नोकरीऐवजी तो शेतीकडे वळालाय.

फुलशेतीच्या निर्णयाविषयी विचारल्यावर तो सांगतो,“2019च्या आधी आम्ही पारंपरिक शेती करत होतो. म्हणजे कपाशी, मका आणि तूर पिके घेतो होतो. त्यानंतर 2019 मध्ये पहिल्यांदा आम्ही शिर्डी गुलाबची लागवड केली.

"सुरुवातीला 1 हजार झाडं लावली होती. त्यात आम्हाला चांगलं वाटलं की, पारंपरिक शेतीपेक्षा याच्यामध्ये आपल्याला रोजची कमाई येऊ लागली. 500-1000 रुपये रोज येऊ लागले तर आम्हाला याच्यामध्ये रस वाढला. मग आम्ही परत 2000 कलम आणले.”

मनोजकडे सध्या गुलाबाची 2200 झाडं आहेत.

गुलाब शेती

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

गुलाबाची तोडणी दिवसात साधारणत: दोन वेळेस केली. गुलाबाचं फुल एकदाच तोडलं तर फुलून जातं. त्याला कळीमध्ये तोडायचं तर सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 6 असं एका तासामध्ये तोडून घ्यावं लागतं.

दररोजच्या उत्पादनाविषयी विचारल्यावर मनोज सांगतो, “याचा बहर कमी ज्यादा होत राहतो. 2200 झाडांमध्ये 30 किलो माल मार्केटला चालला जातो. संध्याकाळपर्यंत हार्वेस्टिंग झालेली असते. फुलांना घरी जाऊन ओल्या कपड्यामध्ये ठेवावं लागतं. नंतर सकाळी साडेपाच उठून पॅकिंग करायची आणि छत्रपती संभाजीनगर मार्केट आहे, तिथं नेऊन विक्री करायची.

“साधारणत: भाव 100-120 रुपये किलोचा चालू आहे. हाच भाव सीझनमध्ये 200-300 रुपयांपर्यंत पण जातो. सरासरी दर पकडला तर 100 रुपये भाव मिळतो. खर्च जाता 2000 रुपये आपल्याला रोजचे राहतात.”

गणपती, महालक्ष्मी आणि दिवाळीच्या सीझनमध्ये फुलांच्या किंमतीत चांगली वाढ होते आणि त्याचा फायदा फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होतो.

10 महिने दररोज पैशांची हमी

गुलाब पिकाची वर्षातून फक्त एकदाच कापणी करावी लागती.

मनोज सांगतो, “3 फुंटावरुन कटिंग करावी लागती. त्यानंतर पुन्हा 2 महिन्यांनी तुमचा बगीचा चालू होतो. म्हणजे वर्षभरात 12 महिन्यांपैकी 10 महिने फुल येणं चालू असतं.”

दिलवाले कुटुंबीय.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, दिलवाले कुटुंबीय.

तो पुढे सांगतो, “गुलाब घरच्याच मॅनपॉवरची गरज आहे, कारण यात दिवसभर काम नसतं. यात फक्त 2 ते 3 तास काम असतं. त्यामुळे यात घरची मॅनपॉवर ठेवली तर ही शेती खूप सक्सेस आहे.”

फुलशेतीसमोर हवामान बदलाचं आव्हान

कृषी तज्ज्ञांच्या मते, फुलशेती दुष्काळी भागासाठी पूरक आहे. पण हवामान बदलामुळे गुलाबावर रोगाचा प्रादुर्भाव होतोय.

कीटकशास्त्राचे अभ्यासक विवेक सवडे सांगतात, “हवामान बदलाचा फुलशेतीवर थेट परिणाम होतो. ढगाळ वातावरणामुळे रषशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. यात मावा, तुडतुडे, फुलकिडी( थ्रिप्स) यांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे फुलशेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते.

“याशिवाय, अवेळी आणि सतत पडणारा पाऊस यामुळे फुलशेतीवर रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. गुलाबात भुरी या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. याचा परिणाम गुलाबाच्या पानावर आणि कळ्यांवर होता. आणि यामुळे मार्केटमध्ये फुलांना कमी भाव मिळतो. याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो.”

गुलाब शेती

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

गुलाबावर पडणारा मुख्य रोग थ्रिप्स असल्याचं मनोज सांगतो.

फुलांवर 8 दिवस सतत फवारणी केली, तर हा रोग येत नसल्याचंही तो पुढे सांगतो.

याशिवाय, पावसाळ्यात गुलाबाला जास्त पाणी चालत नाही. त्याच्यामुळे पानगळ होते.

“आम्ही गुलाबाला बेड पद्धत केली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. झाडाला जास्त ओलावा राहत नाही, ओलावा नसल्यामुळे पानगळ होत नाही.

“पाण्यासाठी आम्ही ठिंबक सिंचन वापरतो. कारण सध्या पाण्याची खूप कमतरता आहे. ठिबकला 10 मिनिटं मोटर चालू केली तरी त्यात भागू शकतं,” मनोज सांगतो.

नियोजनबद्ध शेती फायद्याची

मनोज दिलावालेचं गाव एमआयडीसी एरियामध्ये येतं.

तो सांगतो, “आम्ही एमआयडीसी एरियामध्ये येतो. आपण बघतो की तरुण शेतकरी 300 रुपये रोजानं कामाला जातात. पण जर आपण एक एकरमध्ये चांगलं नियोजन करुन शेतीत व्यवस्थित लक्ष देऊन शेती केली, तर तो तरुण आज रोजचे 1 हजार रुपये कमावू शकतो.”

मनोज दररोज सकाळी साडे पाच वाजता संभाजीनगरच्या मार्केटमध्ये फुल विक्रीसाठी घेऊन येतो.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, मनोज दररोज सकाळी साडे पाच वाजता संभाजीनगरच्या मार्केटमध्ये फुल विक्रीसाठी घेऊन येतो.

महाराष्ट्र सरकारनं 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

पण, नियोजनबद्ध शेती केल्यास दुष्काळावर मात करता येते, असा मनोजचा अनुभव आहे.

“समजा आपल्याकडे 10 एकर शेती आहे. तर त्यातली 2 एकर शेती नवीन तंत्रज्ञान वापरुन केली पाहिजे, जेणेकरुन आपल्याकडे दररोजचे 2 हजार रुपये आले पाहिजे. जेणेकरुन आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. तसंच दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करू शकतो."

दुष्काळात हातभार देणारी फुलशेती

फुलशेती दुष्काळी भागासाठी पूरक असल्याची दोन कारण तज्ज्ञ सांगतात.

संभाजीनगरचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मते, “फुलशेती ही मार्केटची डिमांड आहे. सध्या मार्केटमध्ये फुलांची गरज खूप आहे. यामुळे फुलांचं उत्पादन घेतल्यास दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहतो.

“दुसरं म्हणजे दुष्काळी भागात फुलशेतीसाठी ठिबकच्या माध्यमातून फार पाणी लागत नाही. दुष्काळात जे काही पाणी उपलब्ध आहे त्यात फुलशेती सस्टेन होते आणि फुलांना चांगला बाजारभावही मिळतो.”

गुलाबांचा वार हार, बुके तयार करण्यात होतो.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, गुलाबांचा वार हार, बुके तयार करण्यात होतो.

शेतकरी आणि व्यापारी यांचं नेटवर्क नसणं हे फुलशेतीसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.

देशमुख सांगतात की, “सध्या फुलशेतीतून उत्पादित होणारा माल पुरेशा प्रमाणित नाही. परिणामी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी नेटवर्क नसणं हे फुलशेती समोरील मोठं आव्हान आहे.

"फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं एक मोठं नेटवर्क तयार केल्यास दूरवरचे व्यापारीही माल खरेदीसाठी येतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)