फळांचं गाव धुमाळवाडी: ‘आधी घरात जायचं म्हटलं की वाकावं लागायचं, आता प्रत्येकानं बंगले बांधलेत’

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“मी जॉब सोडून शेतीत आलो तर शेतीतनं मला उत्पन्न भेटत चाललं. पैसे पण तसे भेटत चालले. जॉब करत होतो, त्याच्या डबल मी आज कमावतोय. माझ्याकडे आज चार गायी आहेत, तर त्यातून मला घर चालवण्यासाठी उपयोग होतो. माझा घरखर्च सगळा गायींतून भागतो आणि डाळिंबातून येणारी निव्वळ रक्कम सेव्हिंग म्हणून राहते.”
धुमाळवाडीत आमची भेट 30 वर्षांच्या विवेकानंद धुमाळ या तरुणाशी झाली. तो डाळिंबाच्या बागेत काम करत होता.
मेकॅनिकल इंजीनियर असलेला विवेकानंद बारामतीत 3 वर्ष एका खासगी कंपनीत नोकरीला होता. पण नोकरीतून पुरेसा पैसा मिळत नसल्यानं तो शेतीकडे वळाला.
विवेकानंद सांगतो, “माझ्याकडे 5 एकर शेती आहे. त्यात प्रामुख्याने डाळिंब, सीताफळ आणि पेरू ही तीन पिकं माझ्याकडे आहेत.
“डाळिंबाचे तीन बहार असतात. मृग, हस्त आणि उन्हाळी बहार. आम्ही मृग, पावसाळी बहार करतो. मे-जूनला आमची छाटणी असते. आमचा सीझन डिसेंबरपर्यंत संपून जातो. त्यात प्रामुख्याने एका एकराला आम्हाला 5 लाख रुपये इन्कम होऊन जातं.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
धुमाळवाडी हे गाव सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात येतं. चारही बाजूंनी डोंगरानं वेढलेल्या या गावाला कृषी विभागानं ‘फळांचं गाव’ म्हणून घोषित केलंय.
गावात द्राक्ष, सीताफळ, आवळा, डाळिंब, पेरू अशा 19 प्रकारच्या फळांचं उत्पादन घेतलं जातं.
धुमाळवाडीच्या सरपंच रेखा दत्तात्रय धुमाळ सांगतात, “आमच्या गावामध्ये 371 हेक्टर क्षेत्र असून 70-75 % फळबागांवर अवलंबून आहे. आमच्या गावात वर्षभरात 15 ते 20 कोटींची उलाढाल होते.”
धुमाळवाडीत जवळपास प्रत्येक शेतकऱ्यानं बंगले बांधलेत. फळांच्या कृपेनं हे शक्य झाल्याचं इथले शेतकरी सांगतात. गावातील प्रत्येक घरावर फळांबाबतचं घोषवाक्य लिहिलेलं दिसतं. पण, 30-35 वर्षांपूर्वी इथल्या लोकांनाही दुष्काळाचा फटका बसायचा.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
शेताकडे निघालेल्या 65 वर्षांच्या शालन धुमाळ यांच्याशी आमची भेट झाली तेव्हा त्यांनी जुन्या दिवसांना उजाळा दिला.
“आधी सगळा दुष्काळ असायचा. बाजरी काढायचो, खुडायला जायचो. ज्वारी-बाजरी होती पहिली, दुसरं काहीसुद्धा नव्हतं,” शालन धुमाळ म्हणाल्या.
आधीच्या परिस्थितीविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या, “अहो, आत शिराय येत नव्हतं घरात. धडाधड लागत होतं. कशाचे घर होते? आता हे बांधलेत बंगले. पहिलं आत शिरायचं म्हटलं की वाकावं लागायची खाली असं. आधी कुठं कवलं ठोकलेलं, तर कुठं पत्र्याचे दोन-चार खण होते, असे घरं होते.”

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
फळबागांसाठी धुमाळवाडीत जवळपास 100 % ठिबक सिंचन करण्यात आलंय. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होत आहे. शेतकरी रवींद्र धुमाळ यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यातल्या 8 एकर क्षेत्रावर फळबाग आहे.
रवींद्र धुमाळ सांगतात, “अतिशय दुष्काळी परिस्थिती होती. पाणी कधी रब्बीत पडायचा तर कधी खरिपात पडायचा. पण बागेला 8 महिने तर पाणी पाहिजे. त्यामुळे फलटणहून 2 हजार रुपये टँकरनं पाणी आणून आम्ही बागा जगवत होतो.
"आता धोम-बलकवडी धरणाचं 2015 ला पाणी आल्यानंतर त्याच्या 2 पाळ्या सुटत्यात, त्यामुळे आमची पाण्याची गरज थोडीशी भागायला लागली. 2 पाळ्या आल्या की 8 महिने आमचं भागतं.”
धुमाळवाडी गावातच व्यापारी माल खरेदी करण्यासाठी येतात. इथली फळं राज्यातील मुंबई, पुणे तसंच पंजाब, चेन्नई, केरळ, दिल्ली या परराज्यांमध्येही जातात. फळांची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी इथले शेतकरी विशेष काळजी घेतात.
विवेकानंद सांगतो, “आता या बागेला तुम्हाला दिसू शकतं यावरती यूव्ही लाईट नेट प्रोटेक्शन म्हणून टाकलेलं आहे आम्ही. याच्यामुळे फळांची क्वालिटी निकृष्ट होत नाही, कारण यामुळे फळावर सूर्याचा डायरेक्ट इफेक्ट होत नाही. त्यामुळे फळाची क्वालिटी चांगली राहते.”

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
धुमाळवाडीप्रमाणे राज्यातील ज्या गावांमधील बहुतेक क्षेत्र फळपिकांखाली आहे, त्यांना फळांचं गाव म्हणून घोषित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्राचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोटे सांगतात, “ज्या गावांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक क्षेत्र फळ लागवडीखाली आहे, अशा गावांना फळांचं गाव म्हणून घोषित करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर तिथल्या फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशा मूलभूत सुविधा एकत्रितरित्या त्यांना कशा देता येईल?
"यात पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, मालाच्या वाहतुकीसाठी वाहने असतील, फवारणीसाठी ब्लोअर्स, शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर्स असतील अशा स्वरुपाचं बेनिफिट त्या गावांसाठी देण्यासाठी आमचं नियोजन आहे.”

इतर पिकांप्रमाणे फळपिकांनाही हवामान बदलाचा फटका बसत आहे. हंगाम हातात आला तर ठीक नाहीतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. याशिवाय फळपिकांतून पैसा कमवायचा असेल तर ते खूप कष्टाचं काम आहे.
विवेकानंद सांगतो, “कष्टाचं काम एवढं आहे की, तुम्हाला लहान मुलासारखं फळांना जपावं लागतं. लहान मुलांची जेवढी काळजी घेतो, तेवढं यांना जपावं लागतं. तुम्हाला एक तरी राऊंड दररोज पूर्ण रानातून मारावा लागतो. तेव्हा तुम्हाला समजतं की आपल्या डाळिंबात, आपल्या बागेत चाललंय काय.”
फळपिकांच्या लागवडीतलही धुमाळवडीचे शेतकरी प्रयोगशील आहेत. गावातील सुनील भोसले आधी डाळिंब आणि पेरुचं उत्पादन घेत होते. आम्ही धुमाळवाडीत पोहोचलो तेव्हा त्यांच्या शेतात ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी खांब रोवण्याचं काम सुरू होतं.
बीबीसी मराठीशी बोलताना सुनील भोसले म्हणाले, “माझ्याकडे या रानात आधी 1 एकरवर पेरू होता. पण मी ड्रॅगन फ्रूट लावण्याचा निर्णय घेतला. कारण आमच्याकडे आता पेरूची लागवड जास्त झाली आहे. त्यामुळे पेरूला स्थिर भाव मिळेना. शिवाय पेरूला जास्त दिवस भविष्य नसतं.
“ड्रॅगन एकदा लावलं की ते आपल्याला 20 वर्षे साथ देतं. लागवडीवेळी खर्च येतो जास्त, पण पुढची 20 वर्षे पाहायचं काम नाही. शिवाय ड्रॅगनला मार्केट चांगलं आहे. सरासरी 100 रुपये किलो दर मिळतोय. त्यापेक्षा कमी मिळाला तरी आपला खर्च निघून हातात पैसे शिल्लक राहतात.”











