खटावमधल्या पिढ्यानपिढ्या दुष्काळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर मात करण्याच्या चिकाटीची गोष्ट

श्रीदेवी खाडे

फोटो स्रोत, nitin nagarkar

फोटो कॅप्शन, श्रीदेवी खाडे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, खटावहून

“दुष्काळी आमचा भाग. यानं बोलवलं त्यानं बोलवलं, इकडं काम निघालं तिकडं काम निघालं, तर मजूर म्हणून जायचं. आमच्यातली लोकं लाजत नाहीत मजुरी करायला. 2011 ला छावण्या बसल्या होत्या, त्यावेळेला आम्ही नाला बिल्डिंगवरती कामं करत होतो.”

55 वर्षीय रामचंद्र खाडेंच्या बोलण्यातून खटावच्या शेतकऱ्यांची चिकाटी दिसून येतो. खटाव हा महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या एक तालुका.

साताऱ्यातल्या एकूण 11 तालुक्यांपैकी मान, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांना नियमितपणे दुष्काळाचा सामना करावा लागतो.

त्यातही मान आणि खटाव हे दोन्ही तालुके कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात.

पण, पिढ्यानपिढ्या दुष्काळ सोसूनही इथले शेतकरी टिकून आहेत. कारण त्यामागे आहे त्यांची टिकून राहण्याची ही चिकाटी आणि ही चिकाटी त्यांना देण्यात ते करत असलेल्या जोडधंद्यांचा मोठा वाटा आहे.

यामुळेच इथले शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत नाहीत.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

रामचंद्र खाडे हे सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील एनकुळ गावचे शेतकरी. गावातील नढवळे वस्तीवर आमची त्यांच्याशी भेट झाली.

चर्चा सुरू असताना ते म्हणाले, “आमचा दुष्काळी भाग आहे म्हणूनच कुठलं पिक येईल आणि चार रुपये येतील, आपल्या हातात राहतील, अशा हिशेबानं आम्ही वेगवेगळी पिकं घेतो.”

रामचंद्र यांच्याकडे 6 एकर शेती आहे. त्यात ते प्रामुख्यानं ज्वारीचं पीक घेतात. पण, नुसतं शेतीवर त्यांचं भागत नाही.

रामचंद्र खाडे

फोटो स्रोत, nitin nagarkar

फोटो कॅप्शन, रामचंद्र खाडे

त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे आजकाल जो शेतकरी अॅक्युरेट शेती करेल त्याचीच शेती आहे.

याचा अर्थ समजून सांगताना ते म्हणतात, “आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे गायी पाळायच्या, म्हशी पाळायच्या. एक-दोन शेळी पाळायची, 4 कोंबड्या पाळायच्या. त्याच्यावर आम्ही आमचा खर्च भागवतो.”

दूध व्यवसायाचा हातभार

एनकुळ गावातले 80% शेतकरी शेतीसोबत दूधाचा जोडधंदा करतात. आम्ही सकाळी 7 वाजता गावात पोहोचलो तेव्हा अनेक घरांसमोरील गोठ्यांमध्ये गाई-म्हशींच्या धारा काढायला सुरुवात झाली होती.

यात अनेक महिलाही धारा काढत होत्या. एकदा का दूध काढून झालं की, त्यानंतर दूध संकलनासाठीच्या गाड्या घरोघरी येतात. याच गावात आमची भेट नीलेशकुमार ओंबासे या तरुणाशी झाली.

34 वर्षांच्या नीलेशकुमार ओंबासेनं एम.ए केलंय. नीलेशकडे 2 एकर शेती आहे. शेतीसोबत तो दूग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन करत आहे.

नीलेशनं काही दिवस सरकारी परीक्षांची तयारी केली. पण त्यात आपलं जमू शकत नाही, असं लक्षात आल्यावर त्यानं शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

नीलेशकुमार ओंबासे

फोटो स्रोत, nitin nagarkar

फोटो कॅप्शन, नीलेशकुमार ओंबासे

आमच्याशी बोलताना तो म्हणाला, “माझी साधारणात: 12 ते 13 जनावरं आहेत. मी गेल्यावर्षी 70 हजाराचा मूरघास तयार केला होता. तो 3-4 महिने माझ्या जनावराला पुरला. जास्त दूध कलेक्शन असेल, तर 70 ते 75 हजार रुपये माझं महिन्याचं पेमेंट निघतं. साधारणत: 25 ते 30 हजार पेंढीवरती खर्च होतात, 40-45 हजार माझ्या हातामध्ये राहतात महिन्याला.”

सातारा जिल्ह्यापासून एनकुळ 70 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाअभावी गावातील विहिरी, नदी-ओढे कोरडेठाण पडल्याचं दिसत होतं. यंदा खरिप हंगाम पावसाअभावी वाया गेलाच, तर रब्बी हंगामात जेवढं पेरलं त्यापैकी केवळ 20 टक्के क्षेत्रावरचं बियाणं उगवल्याचं चित्र दिसत होतं.

सीझननुसार बिझनेस

आम्ही गावात फिरत असताना, शेतीविषयी माहिती जाणून घेत असताना आमची भेट श्रीदेवी खाडे यांच्याशी झाली. दूध संकलनाची गाडी कधी येईल, याची त्या वाट पाहत होत्या.

श्रीदेवी खाडे यांचं अर्धा एकर शेत पावसाअभावी पडीक होतं. उदरनिर्वाहासाठी त्या दूग्धव्यवसायासोबतच विणकाम, मशीनकामही करतात.

त्या म्हणाल्या, “लग्नसराई सुरू झाली की विणकाम चालू करायचं, कारण लग्न सराईत टेलरिंग व्यवसाय तेजीत असतो. त्याच्यामुळे आम्ही दोन व्यवसाय सीझनेबल करतो.”

प्रत्येक सीझननुसार बिझनेस केला तर पैसे भेटतात, असं त्या म्हणाल्या.

याशिवाय, श्रीदेवी या कुक्कुटपालनही करतात.

“कुक्कुटपालन असल्यामुळे कोंबड्याचे दिवसाला 15-20 अंडे तर भेटतातच. म्हणजे दुसरं काही नाही झालं तरी दिवसाचा माझा रोजगार भागतो त्यातून,” त्यांनी सांगितलं.

पावसाअभावी खटामधील पाट कोरडे पडलेत.

फोटो स्रोत, nitin nagarkar

फोटो कॅप्शन, पावसाअभावी खटावमधील पाट कोरडे पडलेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खटाव तालुक्यातली शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. असं असलं तरी इथले शेतकरी मात्र बदल स्वीकारण्यास सहज तयार होत असल्याचं दिसतं.

मग तो बदल पीक पद्धतींमधला असो की उत्पन्नाचं साधन म्हणून वेगवेगळ्या पद्धतींचा जोडव्यवसाय करण्यातला असो.

साताऱ्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे-पवार सांगतात, “खटामध्ये पिकांचं डायव्हर्सिफिकेशन हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे जसंजसं काळ बदलतोय, तसंतसं पिकांमध्ये बदल होतोय. 50 वर्षांपूर्वी बघितलं तर तिथं फक्त बाजरी घेतली जात होती. आता तसं नाही. आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात फळबागा दिसतील.

“यंदा सातारा जिल्ह्यात बांबू लागवड हे महत्त्वाचं मिशन आहे. तर माझ्याकडे सर्वांत जास्त अर्ज मान-खटावमधून आलेत. म्हणजे जिथं नवीन संधी मिळेल तिथं इथल्या शेतकऱ्यांची काम करण्याची तयारी आहे.”

खटावचं भौगोलिक क्षेत्र 1 लाख 38 हजार हेक्टर असून त्यापैकी 20% क्षेत्र बागायती, तर 80 % क्षेत्र कोरडवाहू आहे. इथले शेतकरी आता ऊस पिकाकडेही वळालेत. तालुक्यात 15 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आलीय.

दुष्काळ असूनही शेतकरी आत्महत्या करत नाही, कारण...

खटाव तालुक्यात सरासरी 450 मिलिमीटर पाऊस पडतो. 2023 मध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असून जून ते सप्टेंबर दरम्यान पडलेला पाऊस 253 मिलिमीटर एवढा आहे.

यंदा खटाव तालुक्यात सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. या संकटाशी लोक मात्र वर्षानुवर्षं जोडधंद्याच्या मदतीने लढतायत.

महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या 11 महिन्यांच्या कालावधीत 2,610 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या झाल्यात त्यापैकी सर्वांत कमी 2 आत्महत्या सातारा जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे यापैकी एकही आत्महत्या दुष्काळग्रस्त खटाव तालुक्यातील नाहीये.

पण, यामागचं कारण काय?

सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी सांगतात, “जिल्ह्यात दुष्काळी पट्टा मोठा जरी असला तरी इथल्या शेतकऱ्यांची मानसिकता आत्महत्येपर्यंत जात नाही, त्याला कारण की इथं सहकार क्षेत्र खूप मजबूत आहे. म्हणजे पतसंस्था, बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या अशी मोठी व्यवस्था या जिल्ह्यात उभी आहे.

“सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावलौकिक मिळालेली बँक आहे, जी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदरानं देते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो. सावकारकीचा बिमोड मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यातून झालेला आहे.”

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनकूळ गावातील शाखा.

फोटो स्रोत, Nitin nagarkar

फोटो कॅप्शन, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनकूळ गावातील शाखा.

खटावमधील शेतकऱ्यांना दररोजच्या कामासाठीचे पैसे जोडधंद्यातून उपलब्ध होतात.

नीलेशकुमार सांगतो, “लहान मुलांचे दवाखाने असतील, लहान मुलांचा शाळेचा खर्च असेल, जनावरांचे दवाखाने असेल, शेतीची मशागत असेल, मजुरांचे पैसे द्यायचे असेल तर हे सगळं आमचं जोडधंद्यातून अडजस्ट होतं.

“इथला शेतकरी सावकाराकडून कोणत्या प्रकारची उचल वगैरे घेत नाही. जर त्याला खर्च वगैरे लागला, तर शेतकरी डायरेक्ट बँकेशी, सोसायट्यांशी निगडित आहे.”

खटावमधील शेतकरी पीक कर्जाची 100% परतफेड करत असल्याचं स्थानिक प्रशासन सांगतं. पण, खटावमधील शेतकऱ्यांची चिकाटी आहे त्या परिस्थितीत टिकून राहण्याचा असला तरी त्यांना सरकारकडून काही अपेक्षाही आहेत.

“शासनानं आम्हाला कॅनॉलवगैरे द्यावेत. इथली शेती पाण्याखाली यावी, अशी आमची अपेक्षा आहे. विदर्भातला-मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतोय, इकडचा करत नाही. त्यामुळे सरकारनं इकडच्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये, याचीबी सोय करावी. पाण्याची सोय करावी,” नीलेशकुमार अपेक्षा व्यक्त करतो.

खटावमधील शेतकऱ्यांना पिढ्यानपिढ्या दुष्काळ का सोसावा लागतोय? यामागे केवळ कमी पाऊस हेच एकमेव कारण आहे का?

पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था.

फोटो स्रोत, nitin nagarkar

फोटो कॅप्शन, पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था.

विनोद कुलकर्णी सांगतात, “राजकीय इच्छाशक्ती कमी आहे. आमच्या जिल्ह्याला यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत दोन मुख्यमंत्री मिळाले. पण जेवढ्या वेगानं विकास व्हायला पाहिजे होता, तेवढ्या वेगानं तो झाला नाही.

सिंचनाची उपलब्धता असूनसुद्धा ते पाणी वापरता आलेलं नाहीये. म्हणजे जसा दुष्काळी भाग आहे, तसं कोयनेसारखं धरणंसुद्धा आमच्याकडे आहे. किंवा छोटीछोटी धरणं भरपूर आहेत. पण त्याचं पाणी आम्हाला वापरता आलेलं नाहीये.”

नेहमीच्या दुष्काळामुळे खटावमधून रोजगार निर्मितीच्या शोधात काही जण मुंबई-पुणे या शहरांमध्ये स्थलांतरही करतात.

मान-खटावमधून सनदी अधिकारी होणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहेत. शिक्षणामुळे इथल्या माणसांचे विचार दुष्काळातही त्यांना जगण्याचा मार्ग दाखवत आले आहेत.

“विचार महत्त्वाचे हायेत हो. विचार जर आपण पॉझिटिव्ह केले तर आपल्या बाबतीत समधं पॉझिटिव्हच होणार आणि चांगलंच होत जाणार.

घरातले पती-पत्नीचे विचार आणि कुटुंबाचे विचार एकमेकांना कळले तर त्यातनं सोल्यूशन निघतं,” श्रीदेवींचे हेच ते विचार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)