You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गेल्या 24 तासांत 300 पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी, हॉस्पिटल रिकामे करण्याचे इस्रायलचे आदेश
- इस्रायलनं उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 11 लाख पॅलेस्टिनींना दक्षिणेस जाण्याचा इशारा दिला होता आणि हजारो लोक वाहनांनी किंवा पायी पळून जात आहेत.
- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर अत्यंत धोकादायक आहे. त्यांना मानवतावादी दृष्टीकोन ठेवून प्रवेश द्यावा असं आवाहन त्यांनी केलं.
- हमासनं 7 ऑक्टोबरला सीमा ओलंडून केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 1,300 हून अधिक लोक मारले गेले होते.
- त्यानंतर गाझा पट्टीवर इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 2,000 लोक मारले गेले आहेत, असं पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार गेल्या 24 तासात गाझा पट्टीत अंदाजे 300 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. त्यात बहुतांश लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे.
गाझामधील हॉस्पिटल रिकामे करण्याच्या इस्रायलच्या आदेशावर जागतिक आरोग्य संघटनेने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हा प्रकार मृत्यूदंड देण्यासारखा आहे असं त्यांनी म्हटलं.
इस्रायलने उत्तर गाझातील 22 हॉस्पिटल रिकामे करायला सांगितलं आहे. तिथे 2000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण गाझाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. घटनास्थळी कत्तल सुरू असल्याचे व्हीडिओ काही वेळातच समोर आले.
बीबीसीने सल्लाह-अल-दिन रस्त्यावर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. हा रस्ता उत्तर गाझा ते दक्षिणेकडील दोन निर्वासन मार्गांपैकी एक आहे.
उत्तरेकडील लोकांना हा रस्ता रिकामा करण्याचा इशारा इस्त्रायलने दिला होता. मात्र तरीही शुक्रवारी दिवसभर रस्त्यावर वाहतूक सुरू होती.
व्हीडिओ फुटेजमध्ये कमीतकमी 12 मृतदेह दिसत आहेत. यातील बहुतेक मृतदेह महिला आणि लहान मुलांचे असून त्यापैकी काही मुलं दोन ते पाच वर्ष वयोगटातील आहेत. व्हीडिओमधील सावल्या पाहता हा व्हीडिओ स्थानिक वेळ 5.30 च्या दरम्यान चित्रित केलेला असावा.
बहुतेक मृतदेह ट्रकच्या फळीवर पडलेले दिसतात. तर काहीजण रस्त्यावर पडलेले आहेत. रस्त्यावर खराब झालेल्या वाहनांचा खच पडला आहे.
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी 70 लोक ठार झाले असून इस्रायलला या हल्ल्यासाठी जबाबदार आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) च्या म्हणण्यानुसार ते याचा तपास करत आहेत. पण त्यांचे शत्रू उत्तरेकडे जाणाऱ्या नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असा त्यांचा दावा आहे.
बीबीसी परिस्थितीवर लक्ष असून येणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेटस पुरविले जातील.
आतापर्यंत काय काय घडलं आहे?
- इस्रायली लष्करानं गाझा भागात छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका पोस्टमध्ये, “लष्करानं लिहिलं आहे की ते हमासच्या ठिकाण्यांवर आणि त्यांच्या अँटी-टँक लाँचर्सवर सतत हल्ले करत आहेत.”
- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी कतारच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पॅलेस्टिनी नागरिकांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे.
- इस्रायली संरक्षण दलानं सांगितलं की, लेबनॉनच्या इस्रायलच्या सीमेवर सुरक्षा कुंपणाजवळ झालेल्या स्फोटामुळं नुकसान झालं.
- इस्रायली लष्कराच्या सततच्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर हमासने शुक्रवारी (13 ऑक्टोबर) इस्रायलवर रॉकेट मारा केला .
- अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे संरक्षण मंत्री यांची तेल अवीव इथं भेट घेतली आणि इस्रायलला 'सर्व मदत' देण्याच्या वचनाचा पुनरुच्चार केला आहे.
गाझा शहरातील रुग्णालय रिकामं करण्यासाठी नवीन अंतिम मुदत
उत्तर गाझामधून सुरू असलेल्या स्थलांतराच्या दरम्यान गाझा शहरातील अल-कुड्स रुग्णालयामधून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना हलविण्यासाठी इस्रायलकडून अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पॅलेस्टाईनच्या रेड क्रेसेंट सोसायटीला ( पीआरसीएस ) शनिवार (14 ऑक्टोबर) स्थानिक वेळ दुपारी 4 वाजताची सुधारित अंतिम मुदत प्राप्त झाली आहे.
'एक्स'ला पोस्ट केलेल्या एका निवेदनात, पीआरसीएस म्हणतं की 14 ऑक्टोबर सकाळी 6 वाजेपर्यंत प्रारंभिक अंतिम मुदत देण्यात आली होती. नंतर त्यात बदल करण्यात आला आणि शेवटी शनिवारी (14 ऑक्टोबर) दुपारी 4 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
पण 'पीआरसीएस'नं स्पष्ट केलं की ते रुग्णालय रिकामं करू शकत नाहीत, कारण मानवतावादी दृष्टीकोनातून आजारी आणि जखमींना सेवा देण्यास ते बांधिल आहेत.
इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आहे – आयडीएफ
इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्त्यांनी उत्तर गाझामधील लोकांना जबरदस्तीनं बाहेर काढणं हा युद्ध गुन्हा आहे, या आरोपाला उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं आहे की, इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कार्य करत आहे.
इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच्त यांनी याबात भूमिका मांडली आणि ओस्लो करारात सामील असलेले आणि पॅलेस्टाईन-इस्रायल यांच्यातील मध्यस्ताच्या भूमिकेत राहिलेले माजी मुत्सद्दी जॅन एगेलँड यांनी केलेल्या टिप्पण्यांना उत्तर दिलं.
रिचर्ड हेच्त यांनी बीबीसी न्यूज चॅनेलला सांगतात. "आम्ही लोकांना ट्रकमध्ये बसवत नाही, आम्ही लोकांना दक्षिणेकडे जाण्यास सांगत आहोत. हमासला जर त्यांची काळजी असल्यास तर त्यांच्या स्थलांतराची व्यवस्था करावी, ही त्यांची जबाबदारी आहे."
पलायन करणाऱ्या उत्तर गाझाच्या रहिवाशांबाबत ते सांगतात की, “नातेवाईकांसोबत राहा किंवा तंबू बांधून रहा, आम्हाला खात्री आहे की त्यांना राहण्यासाठी ठिकाणं सापडतील".
शनिवारच्या हल्ल्याबाबत ते सांगतात की, "आपण शनिवारी जे पाहिलं, तो युद्ध गुन्हा आहे." ते पुढे म्हणतात, "आम्ही माणुसकी सोडलेली नाही."
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)