इस्रायल-हमास युद्ध : ‘मग कधी कधी वाटतं आपणं हे सगळं करून काय फायदा’

    • Author, डेरेक कै
    • Role, बीबीसी न्यूज

गाझा पट्टीमध्ये 'चॅरिटी ट्रिप'वर असलेल्या एका ब्रिटिश सर्जननं युद्धाचं वर्णन केलं आहे. हे ब्रिटिश डॉक्टर सांगतात की इस्रायलकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळं त्यांना सर्व नियोजित शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या.

ब्रिटिश सर्जन डॉ. अब्दुल कादिर हम्माद हे लिव्हरपूल इंटरनॅशनल ट्रान्सप्लांट इनिशिएटिव्ह या संस्थेसोबत काम करतात, जे गंभीर आजारासाठी गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवतात.

ते सांगतात शनिवारी (7 ऑक्टोबर) मी रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार होतो. त्याच दिवशी इस्रायलमध्ये घुसून हमासच्या कट्टरवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझावर हवाई हल्ले सुरू केले.

डॉक्टर हम्माद म्हणाले की, "शुक्रवारी (6 ऑक्टोबर) जेव्हा ते गाझा पट्टीतील सर्वांत मोठं सार्वजनिक आरोग्य सेवा संकुल असलेल्या अल-शिफा रूग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी गेले तेव्हा दुसऱ्या दिवशी असं काय होणार आहे, याची कुणालाही कल्पना नसेल."

ते अनेक दशकांपासून गाझा पट्टीला भेट देऊन इथल्या रुग्णांना मदत करत आहेत.

पण ते सांगतात की, "शुक्रवारी रात्री जेव्हा मी झोपलो तेव्हा दुसऱ्या दिवशी असं काही घडेल याची कल्पना केली नव्हती. शनिवारी सकाळी मी स्फोटांच्या आवाजानं जागा झालो."

"मी ताबडतोब अल-शिफा हॉस्पिटलच्या संचालकांशी संपर्क केला आणि विचारलं की शस्त्रक्रिया करणं आता सुरक्षित आहे का, त्यांनी उत्तर दिलं, 'होय. मला वाटतं शक्य आहे."

पुढे हम्माद म्हणाले की, "परंतु त्यानंतर 20 मिनिटांत बातम्या पाहिल्यावर हे स्पष्ट झालं की अशी परिस्थिती नव्हती, त्यांना सर्व नियोजित शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या."

गाझातील भितीचं वातावरण पाहता त्यांनी, सुरक्षिततेच्या कारणानं जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधला, तेव्हा हॉटेलमध्ये राहणं त्यांच्यासाठी सुरक्षित नाही, असं सांगण्यात आलं.

गाझापट्टीत सतत हवाई हल्ले आणि गोळीबार होत आहेत. त्यांनी बीबीसीच्या न्यूज अव्हर रेडिओ कार्यक्रमामध्ये सांगितलं की संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या सुविधेमध्ये ते आणि इतर 20 परदेशी नागरिक रविवारपासून (8 ऑक्टोबर) राहत आहेत.

"गाझापट्टीतील वीज, अन्न आणि पाणी बंद करणं सामान्य नागरिक आणि रुग्णालयांसाठी त्रासदायक ठरलंय. हे मानवतेसाठी संकट उभं ठाकलं आहे," असं ते म्हणतात.

अनेक मानवाधिकार आणि स्वयंसेवी संस्थांनी हमासच्या कट्टरवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद हल्ल्यावर टीका केलीय, पण असं असताना इस्रायलनं गाझापट्टीत अन्न आणि ऊर्जा पुरवठा बंद करण्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

डॉ हम्माद म्हणाले, "जगाच्या कोणत्याही भागातील रूग्ण असो, त्याची किडनी निकामी झाल्यास खूप आर्थिक भार पडतो. या रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपण जीव वाचवणारं आहे."

परंतु गाझामधील आताची परिस्थिती पाहता ते जीवघेणं आहे.

त्यांना स्वत:च्या सुरक्षिततेची देखील चिंता आहे, ते म्हणाले की ते ब्रिटनमधील आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं की संघर्षामुळं इस्रायलमध्ये जाणं कठीण आहे. त्यांच्यासाठी गाझा सोडण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे इजिप्त आहे. सुरक्षित मार्गाची व्यवस्था करण्यासाठी इस्रायली आणि इजिप्शियन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी आवश्यक आहेत.

डॉ हम्माद म्हणाले की, ते ज्या ठिकाणी आहेत ती सुविधा तुलनेनं सुरक्षित आहे, वीज, अन्न, पाणी आणि अगदी इंटरनेट इथं उपलब्ध आहे. पण गाझामधील लोकांचं काय याची त्यांना चिंता आहे.

डॉ हम्माद पुढे सांगतात की "जेव्हा मी इथं येतो, तेव्हा किडनी प्रत्यारोपण करून तीन, चार, कदाचित पाच जीव वाचवण्याचं माझं उद्दिष्ट असतं. पण दुसरीकडे पण दोन दिवसात 2000 लोकांना मारणं सोपं आहे."

"मग कधी कधी वाटतं आपणं हे सगळं करून काय फायदा."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)