हमासने इस्रायलवरील हल्ल्याला 'ऑपरेशन अल अक्सा' का म्हटलं? या मशिदीचा इतिहास काय आहे?

पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमासनं गेल्या शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलवर हल्ला केला, ज्यात शेकडो इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला.

हमासनं या मोहिमेला ‘ऑपरेशन अल-अक्सा’असं नाव दिलं होतं. हे त्या पवित्र स्थानाचं नाव आहे जे ज्यू आणि मुस्लिम यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचं कारण ठरलं आहे.

सध्या या मशिदीचं व्यवस्थापन वक्फ ट्रस्टकडे आहे. या प्रकरणात ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यासाठी केलेल्या करारानुसार या ट्रस्टचं नियंत्रण जॉर्डनकडे देण्यात आलं आहे.

पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास, जे इस्रायल-नियंत्रित वेस्ट बँकचं प्रशासन करतात, त्यांचं अल-अक्सावर नियंत्रण नाही.

अब्बास म्हणतात की, 'अन्य अनेक कारणांबरोबरच इस्रायलची अल-अक्सा मशिदीसारख्या इस्लामिक ठिकाणांबद्दलची आक्रमक वृत्तीही सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत आहे.'

मात्र, इस्रायल सरकारनं हा दावा फेटाळून लावला आहे.

या वर्षी, अरब आणि इस्रायली यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला जेव्हा इस्रायली पोलिसांनी कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

या घटनेच्या छायाचित्रांमुळं पॅलेस्टाईनमध्येच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम जगतात संताप निर्माण झाला होता.

या घटना रमजानच्या महिन्यात आणि ज्यूंच्या सणांच्या आधी घडल्या.

शनिवारी (7 ऑक्टोबर) हमास या कट्टरवादी संघटनेनं 'ऑपरेशन अल-अक्सा' केलं आणि प्रत्युत्तरादाखल गाझापट्टीमध्ये इस्त्रायलनं केलेली कारवाई यामुळे

या मशिदीची कथा अधिक महत्त्वाची झाली आहे.

अल-अक्सा मशीद कुठे आहे? तिचा वाद काय आहे?

ही मशीद जेरुसलेमच्या जुन्या शहराच्या मध्यभागी आहे. मुस्लिम धर्मग्रंथानुसार, अल-अक्सा मशीद ज्या टेकडीवर वसलेली आहे तिचं नाव 'अल-हराम-अल-शरीफ' आहे.

मशीद संकुलात मुस्लिम समाजाची दोन पवित्र स्थळं आहेत. पहिला 'डोम ऑफ द रॉक'. कुराणच्या सुरा-17 मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यानुसार ज्या खडकावर घुमट आहे, तिथून प्रेषित मोहम्मद यांनी स्वर्गाचा ( जन्नतचा) प्रवास केला होता.

दुसरं स्थान म्हणजे अल-अक्सा मशीद, ज्याचा अरबी भाषेत अर्थ'प्रार्थनेचं सर्वात दूरचं ठिकाण' असा होतो.

ही मशीद 8 व्या शतकात बांधण्यात आली. इस्लाममध्ये हे तिसरं पवित्र स्थान मानलं जातं.

इस्लामिक धर्म ग्रंथानुसार, इ.स. 620 मध्ये, प्रेषित मोहम्मद यांना मक्का येथून अल अक्सा इथं नेण्यात आलं, तिथून त्यांनी एका रात्रीत स्वर्गाचा ( जन्नतचा) प्रवास पूर्ण केला.

कुराणानुसार ज्या लोकांनी इथं तीर्थस्थान बांधलं त्यात इब्राहिम, दाऊद, सुलेमान, इलियास आणि ईसा यांचा समावेश आहे. या सर्वांना कुराणात पैगंबर मानलं गेलं आहे.

मुस्लिम वर्षभर या ठिकाणी येतात. पण रमजान महिन्यातील प्रत्येक शुक्रवार इथं खूप खास असतो. या दिवशी जगभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम इथं नमाज अदा करण्यासाठी येतात.

14 एकरांवर पसरलेल्या अल-अक्साला ज्यू धर्माचे लोक सुद्धा सर्वात पवित्र प्रार्थनास्थान मानतात. ते त्याला 'हर हा बइत' किंवा 'टेंपल माउंट' म्हणतात.

ज्यूंच्या मान्यतेनुसार, राजा सोलोमन यानं 3000 वर्षांपूर्वी इथं पहिलं मंदिर बांधलं. इथं बांधलेलं दुसरं ज्यू मंदिर सन 70 मध्ये रोमन लोकांनी नष्ट केलं.

बायबलमध्ये उल्लेख केलेली ज्यू मंदिरं इथेच होती असं ज्यू मानतात. या संकुलाची पश्चिमेकडील भिंत 'वेलिंग वॉल' (शोक भिंत) म्हणून ओळखली जाते.

असं मानलं जातं की, हा ज्यू मंदिराचा भाग आहे. मुस्लिम त्याला अल-बुराकची भिंत म्हणतात.

असं मानलं जातं की, इथंचं पैगंबर मोहम्मद यांनी अल-बुराक नावाच्या प्राण्याला बांधलं होतं. याद्वारे त्यांनी स्वर्गाचा (जन्नतचा) प्रवास केला आणि तिथं अल्लाहशी संवाद साधला.

त्यामुळं ते स्थान मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं.

अल-अक्सा मशिदीचं नियंत्रण कोणाकडे आहे?

इस्रायलनं 1967 च्या अरब देशांसोबतच्या युद्धानंतर मशिदी संकुलाचा काही भाग ताब्यात घेतला होता.

यानंतर इस्रायलनंहा परिसर जेरुसलेम शहराचा पूर्व भाग आणि वेस्ट बँकच्या भागापासून वेगळा घोषित केला. त्यावेळी हा भाग इजिप्त आणि जॉर्डनच्या ताब्यात होता.

मात्र, आजतागायत इस्रायलच्या ताब्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही.

आजही जॉर्डनचे 'हॅशेमाईट साम्राज्य' इथल्या दोन्ही मुस्लिम पवित्र स्थळांचे संरक्षक आहेत.

आजही ते मशिदीची देखभाल करणाऱ्या इस्लामिक वक्फचे सदस्य निवडतात. यामध्ये इस्रायल सरकारची कोणतीही भूमिका नाही.

अल-अक्सा संकुलात बिगर-मुस्लिमांनाही भेट देण्याची परवानगी आहे. मात्र त्यात फक्त मुस्लिम लोकांनाच नमाज अदा करण्याची परवानगी आहे.

ज्यूंच्या श्रद्धेनुसार, त्यांचे प्रमुख धार्मिक नेते सुद्धा ज्यू लोकांना 'टेम्पल माउंट' च्या आत न जाण्याची सूचना देतात.

त्यांच्या दृष्टीनं ही जागा इतकी पवित्र आहे की इथं कोणी पाऊल ठेवू शकत नाही.

इस्रायली सरकार ज्यू आणि ख्रिश्चन लोकांना इथं फक्त पर्यटक म्हणून जाण्याची परवानगी देते. तेही आठवड्यातून फक्त पाच दिवस काही तासांसाठी.

कोणत्या मुद्द्यावर दोन्ही समुदायांमध्ये वाद आहे?

इस्रायलनं 1967 मध्ये जुन्या शहरासह वेस्ट बँक, गाझापट्टी आणि पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतल्यापासून या जागेबाबत वाद आहे. मात्र, इस्रायल अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच याबाबतचा वाद सुरू आहे.

1947 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी स्वतंत्र पॅलेस्टिनी प्रदेशासाठी विभाजन योजना तयार केली. त्यावेळी पॅलेस्टाईन ब्रिटनच्या ताब्यात होता. या योजनेनुसार दोन देश निर्माण करायचे होते, एक युरोपातून येणाऱ्या ज्यूंसाठी आणि दुसरा पॅलेस्टिनींसाठी.

55 टक्के जमीन ज्यूंना देण्यात आली आणि उर्वरित 45 टक्के जमीन पॅलेस्टिनींना देण्यात आली. जेरुसलेम, जिथं अल-अक्सा आहे, तो परिसर संयुक्त राष्ट्र प्रशासनाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रांत घोषित करण्यात आला.

1948 मध्ये, इस्रायलनं वेस्ट बँक आणि गाझा पट्टीसह 72 टक्के भूभाग ताब्यात घेतला आणि स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलं.

यानंतर 1967 मध्ये दुसऱ्या अरब-इस्रायल युद्धानंतर इस्रायलनं जेरुसलेम शहराचा पूर्वेकडील भाग ताब्यात घेतला.त्यामुळं शहरातील जुन्या भागातील अल-अक्सा संकुलही त्यांच्या ताब्यात आलं.

इस्रायलनं ते जॉर्डनकडून ताब्यात घेतलं होतं. मात्र पवित्र स्थळांच्या नियंत्रणावरून वाद निर्माण झाल्यानंतर यथास्थिती कायम ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.

या व्यवस्थेअंतर्गत जॉर्डनला या ठिकाणचा कस्टोडियन (संरक्षक) बनवण्यात आलं.

तर सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी इस्रायलकडे आली.

मात्र, नमाज अदा करण्याची परवानगी फक्त मुस्लिमांनाच होती. ज्यू इथं येऊ शकत होते परंतु त्यांना प्रार्थना करण्यास मनाई होती.

वाद कधी चिघळला?

साल 2000 मध्ये, इस्रायलचे प्रमुख विरोधी नेते एरियल शेरॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या लिकुड पक्षाच्या काही खासदारांसह अल-अक्साला भेट दिली.

या दौऱ्यानंतर शेरॉन यांनी घोषणा केली होती, "टेम्पल माउंट आमच्या नियंत्रणाखाली आहे आणि भविष्यातही राहील. जेरुसलेममधील ज्यूंसाठी हे सर्वात पवित्र ठिकाण आहे आणि प्रत्येक ज्यूला इथं येण्याचा मूलभूत अधिकार आहे.”

शेरॉन यांच्या या घोषणेला पॅलेस्टिनींनी विरोध केला. यानंतर सुरू झालेल्या संघर्ष आणि हिंसाचाराच्या कालखंडाला दुसरा पॅलेस्टिनी 'इंतिफादा' (हा अरबी शब्द आहे- याचा अर्थ एक बंड किंवा उठाव किंवा प्रतिकार चळवळ ) म्हणतात.

त्या हिंसाचारात 3000 हून अधिक पॅलेस्टिनी आणि एक हजाराहून अधिक इस्रायली मारले गेले यावरून त्याचं गांभीर्य लक्षात येतं.

मे 2021 मध्ये अशाच प्रकारची हिंसक चकमक झाली, जेव्हा या भागातून काही कुटुंबांना काढून टाकण्याच्या निर्णयाला पॅलेस्टिनींनी विरोध केला.

अल अक्साजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत 17 इस्रायली पोलीस आणि 163 पॅलेस्टिनी जखमी झाले.

या घटनेनंतर इस्लामिक कट्टरवादी गट हमासनं गाझा तळावरून जेरुसलेमवर रॉकेट मारा केला. हा संघर्ष 11 दिवस चालला.

गेल्या वर्षीही रमजान महिन्यात अशा हिंसक चकमकी पाहायला मिळाल्या होत्या.

तीन दशकांनंतर पहिल्यांदाच रमजानसोबत 'पासओव्हर' ही ज्यू सुट्टी आली. यासाठी इस्रायली पोलीस ज्यू लोक इथं पोहचण्यापूर्वी अल अक्सा संकुलातील काही भाग रिकामा करत होते.

तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, ज्यू लोकांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या वेस्टर्न वॉलवरही दगडफेक करण्यात आली होती.

त्या वर्षी एप्रिलमध्ये, इस्रायली पोलिसांनी अल अक्सा मशिदीच्या संकुलावर छापा टाकला, त्याचं कारण असं सांगितलं की काही आंदोलक तिथं नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांसह लपले होते.

ज्यू समाजातील काही कट्टरवादी 'पासओव्हर'च्या सुट्टीच्या दिवशी टेम्पल माऊंटवर बोकडाचा बळी देणार असल्याची बातमी आल्यावर निषेधाची मालिका सुरू झाली होती.

ज्यूंच्या श्रद्धेनुसार, बायबलमध्ये बोकडाच्या बळीचा उल्लेख आहे आणि ती प्रथा रोमन आक्रमणापूर्वी सुरु होती. पण इस्रायली पोलिसांसह धार्मिक संघटनांनी असा बळी दिला जाणार नसल्याचं सांगितलं.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वत: पोलिसांना अल अक्सामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि पूर्वी जशी सर्व धर्माच्या लोकांना इथं जाण्याची परवानगी होती, ती तशीच कायम ठेवण्यास सांगितली.

पण, अल-अक्सा संकुलाच्या व्यवस्थापनावर देखरेख करणार्‍या वक्फनं पोलिसांच्या छाप्याला मशिदीच्या कामकाजात मोठा हस्तक्षेप म्हटलं. वक्फचा असा विश्वास आहे की अल-अक्सा हे केवळ मुस्लिमांसाठी प्रार्थना करण्याचं ठिकाण आहे.

'अल-अक्सा' बाबत वाद का होतात ?

इस्रायल आणि जॉर्डन यांच्यात 1967 मध्ये अल-अक्सा संकुलाच्या संदर्भात झालेल्या करारानुसार, जॉर्डनच्या वक्फ बोर्डाला मशिदीच्या आतील भागाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मिळाली.

बाह्य सुरक्षेची जबाबदारी इस्रायलकडे आली. बिगर मुस्लीमांना या संकुलाला भेट देण्याचा अधिकार होता, परंतु त्यांना प्रार्थना करण्याची परवानगी नव्हती.

दरम्यान, टेम्पल माउंटवर विश्वास ठेवणाऱ्या टेंपल इन्स्टिट्यूटनं इस्रायलींच्या कंपाऊंडमध्ये जाण्यासाठी असलेली बंदी उठवण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरुवात केली.

कॅम्पसमध्ये तिसरं ज्यू मंदिर बांधण्याचाही त्यांचा मानस आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार इस्त्रायली सरकार अशा गटांना पैसेही देतं. मात्र, इस्रायल सरकारनं ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवू इच्छित असल्याचं सांगितलं. पण हळूहळू इथं तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी भागात स्थायिक झालेल्या ज्यूंना इथं जाण्याची परवानगी द्यायला सुरुवात केली.

अल जझिरानं दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना पोलीस आणि लष्कराच्या संरक्षणात या संकुलात आणण्यात आलं आहे. यामुळं पॅलेस्टिनी लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती की इस्रायल ते ताब्यात घेऊ शकतं.

अल-जझिराच्य वृत्तानुसार, 1999 मध्ये टेंपल टाउनबाबत श्रद्धा असणाऱ्यांनी घोषणा केली की ते डोम ऑफ द रॉकच्या जागी तिसऱ्या मंदिराची पायाभरणी करतील.

यानंतर त्या भागात पॅलेस्टिनी आणि इस्रायली सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली. यामध्ये 20 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)