You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल गाझावर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, 11 लाख लोकांना उत्तर गाझा सोडण्याचा इशारा
• संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार इस्रायलनं उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना 24 तासांच्या आत परिसर रिकामा करून दक्षिणेकडे जाण्यास सांगितलं आहे.
• इस्रायलनं म्हटलं आहे की, "स्वत:ची सुरक्षितता आणि बचाव करण्यासाठी गाझापट्टीतील लोकांनी हा परिसर रिकामा करावा."
• हा संपूर्ण परिसर हा गाझा पट्टीच्या जवळपास निम्मा भाग आहे. गाझा शहराचाही यात समावेश आहे.
• संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे की इस्रायलच्या या निर्णयामुळं नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर संकट निर्माण होण्याची भीती आहे.
• गाझामध्ये घुसून हमासच्या तळांवर कारवाई करण्याच्या उद्देशानं इस्रायलनं हा इशारा दिला आहे.
इस्रायलनं 24 तासांत गाझाचा उत्तर भाग रिकामा करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर गाझामधले रहिवासी आपापल्या सामानासह घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत.
इस्रायलनं गाझामधील लोकांना दक्षिणेकडे जाण्याचा इशारा दिल्यानंतर अशी अनेक छायाचित्र समोर येत आहेत ज्यात लोक आपलं सर्व सामान बांधून गाझा शहर सोडत आहेत.
सुरक्षित आश्रयासाठी जाणाऱ्यांपैकी बहुतांश मुलं आहेत. गाझाची जवळपास निम्मी लोकसंख्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.
गाझा शहरातील रहिवासी असलेल्या फराह एबो सीडो यांनी बीबीसी न्यूज अवर कार्यक्रमात सांगितलं की, “शहर रिकामं करण्याचा इशारा दिल्यानंतर काय करावं हे त्यांना कळत नव्हतं.”
त्या म्हणाल्या की, "मला असे लोक दिसले जे आपलं सामान घेऊन जात आहेत, पण आपण इथून कुठे जायचं? हे खूप छोटं शहर आहे. इथून जायलाही मार्ग नाही. आम्ही आमचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत."
त्या म्हणाल्या, "रोज रात्री ते आमच्यावर कोणतीही दयामाया न ठेवता बॉम्ब हल्ले करतात. इथं काहीच उरलं नाही."
फराह या सांगतात की, "आमचं कोणीही संरक्षण करत नाही, ना कोणी मदत पाठवत, इथं कोणतीही जागा सुरक्षित उरलेली नाही. लहान मुलं आणि गर्भवती महिला मोठ्या संख्येनं आहेत, आमची कुणीही मदत करत नाही."
संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “इस्रायली लष्कारानं माहिती दिली आहे की त्यांनी वादी गाझाच्या उत्तरेला राहणाऱ्या लोकांना 24 तासांच्या आत परिसर रिकामा करून दक्षिण गाझाला जाण्यास सांगितलं आहे.”
“इस्रायलच्या या निर्णयामुळं गाझा पट्टीत राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येवर परिणाम होईलं, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. यात गाझा शहराचाही समावेश आहे.
इस्रायली संरक्षण दलानं (आयडीएफ) गाझा आणि जेरुसलेमच्या वेळेनुसार रात्री 11 वाजता हा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, "एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे मानवतावादाच्या दृष्टीनं गंभीर परिणाम होतील."
गेल्या शनिवारी (7 ऑक्टोबरला) इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनं गाझामधील हमासच्या तळांवर वेगानं हवाई हल्ले केले आहेत.
इस्रायल लष्करानं गाझा सीमेजवळ सैनिकांसह रणगाडे, दारूगोळा आणि उपकरणं गोळा करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर असा अंदाज बांधला जात आहे की, ते लवकरच गाझामध्ये घुसून कारवाई करू शकतात.
काय म्हणालं इस्रायली लष्कर?
13 ऑक्टोबर रोजी इस्रायली लष्करानं गाझामधील रहिवाशांसाठी एक निवेदन प्रसिद्ध केलं. लष्करानं थेट गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना गाझाचा उत्तर भाग सोडून दक्षिणेकडे जाण्यास सांगितलं.
इस्रायली संरक्षण दलानं जाहीर केलं आहे की, "आगामी काही दिवसात गाझा शहरात त्यांचं लष्कर आपली कारवाई सुरू ठेवेल, तसंच नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जाईल."
निवेदनात आयडीएफ (IDF)नं म्हटलं आहे की, हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. जेव्हा परवानगी देणारं दुसरं निवेदन प्रसिद्ध केलं जाईल त्यावेळेस तुम्ही गाझा शहरात परत येऊ शकता.
दरम्यान, इस्रायलच्या दिशेनं असलेल्या सुरक्षा कुंपणाकडे कोणीही जाऊ नका, असा इशारा देण्यात आलाय.
आयडीएफचं म्हणणं आहे की, हमासचे कट्टरवादी गाझा शहरातील निष्पाप नागरिकांमध्ये लपले आहेत. गाझा शहरातील जमिनीखालील बोगद्यांमध्ये आणि निवासी इमारतींना त्यांनी आपला तळ बनवलाय.
"तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी गाझा शहरातील नागरिकांनी गाझाच्या दक्षिणेकडे जावं आणि हमासच्या दहशतवाद्यांपासून स्वतःला दूर ठेवाव. हमासचे दहशतवादी तुमचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत," असं आयडीएफ (IDF)नं म्हटलं आहे.
इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गाझामध्ये उपस्थित असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या टीम लीडर्सना या आदेशाची माहिती दिली आहे.
त्यानुसार यामध्ये उत्तर गाझामधील सर्व संयुक्त राष्ट्रांच्या तळांचा समावेश आहे, ज्यात संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी, शाळा, रुग्णालयं आणि दवाखाने यासारख्या सेवांचा समावेश आहे आणि त्यांना हे क्षेत्र रिकामं करण्यास सांगण्यात आलं आहे.
बीबीसीचे मिडल इस्ट प्रतिनिधी टॉम बेटमॅन म्हणतात की, “याचा अर्थ दर तासाला 40 हजार लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे जातील, जे जवळजवळ अशक्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी आणि इंटरनॅशनल रेड क्रॉस यांचे ताफे गाझा शहरातून दक्षिणेकडे जाताना दिसले आहेत.
लोकांची कदाचित इथून निघायची तयारी असेल. हा परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा आहे. इस्रायली हल्ल्यांमुळं जखमी लोक इथं रुग्णालयात आधीच उपचार घेत आहेत. ज्यात मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार या युद्धामुळं पॅलेस्टिनी लोक विस्थापित झाले आहेत.”
इस्रायली लष्कराच्या या विधानावर संयुक्त राष्ट्रांनं टीका केली असून हा आदेश तात्काळ मागे घ्यावा, असं म्हटलं आहे. मानवी जीवनावर त्यांचे गंभीर परिणाम होतील आणि ही एक शोकांतिक असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे की, "संयुक्त राष्ट्र आवाहन करतं की जर असा आदेश देण्यात आला असेल तर तो त्वरित मागे घ्यावा. यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होईल."
संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक म्हणाले की, "गाझामधील संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्यांना इस्रायली लष्कराच्या संपर्क विभागाच्या अधिकार्यांनी सांगितलं आहे की वादी गाझा भागातील संपूर्ण लोकसंख्येला म्हणजे गाझाच्या उत्तरेतील नागरिकांना पुढील 24 तासांत दक्षिण गाझाकडे जाण्याची गरज आहे."
"गाझापट्टीची एकूण लोकसंख्या सुमारे 23 लाख आहे आणि या ऑर्डरचा अर्थ असा आहे की सुमारे 11 लाख लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे जातील. गाझा शहर देखील वादी गाझामध्ये आहे, जे दाट लोकवस्तीच आहे. हे गाझामधील सर्वात मोठं शहर आहे."
इस्रायली राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांचा प्रतिसाद 'लज्जास्पद' असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांतील इस्रायलचे राजदूत गिलाड अर्दान म्हणाले की, "गाझामधील रहिवाशांना इस्रायलनं दिलेल्या इशाऱ्याला संयुक्त राष्ट्रानं दिलेला प्रतिसाद लज्जास्पद आहे."
वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, गिलाड यांनी असं म्हटंल आहे की संयुक्त राष्ट्रानं हमासचा तीव्र निषेध करण्यावर आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी इस्रायलच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
ते म्हणाले की “इस्रायलनं गाझामधील लोकांना वेळीच सावध केलं होतं कारण ते हमास विरुद्धच्या लष्करी मोहिमेत नागरिकांना इजा पोहोचवू इच्छित नाही."
गिलाड अर्दान म्हणाले, "हमास अनेक वर्षांपासून शस्त्रं जमा करत आहे आणि अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. हमास लपण्यासाठी नागरी इमारतींचा वापर करत आहे. त्यांनी गाझा पट्टीचा वापर शस्त्रं आणि हत्या लपवण्यासाठी केला आहे."
"शेकडो निरपराध लोकांचे बळी जाणाऱ्या इस्रायलच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी आता संयुक्त राष्ट्र इस्रायललाच शिकवत आहे. संयुक्त राष्ट्रानं ओलीसांना मुक्त करण्याकडे आपलं लक्ष वळवलं पाहिजे हमासवर टीका केली पाहिजे आणि इस्रायलच्या स्वतःचा बचाव करण्याच्या अधिकाराचं समर्थन केलं पाहिजे."
हमासचे मीडिया प्रमुख सलमा मारुफ यांनी म्हटलं आहे की, “इस्रायलचा इशारा हा खोटा प्रचार पसरवण्याचा हेतू आहे आणि त्याचा उद्देश आमच्या लोकांमध्ये संभ्रम पसरवणं आणि त्यांचं नुकसान करणं आहे.”
गाझातील लोकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करावं, असं आवाहन हमासनं केलं आहे.
वादी गाझा कुठे आहे?
गाझा पट्टीच्या मध्यभागी वादी गाझा नावाची एक नदी आहे जी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. या नदीमुळे गाझा दोन भागात विभागला आहे. त्याच्या सभोवतालचा परिसर म्हणजे वादी गाझा खोरं म्हणून ओळखला जातो. तो जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. इस्रायलच्या आदेशामुळं वादी गाझा म्हणजेच गाझापट्टीच्या संपूर्ण उत्तरेकडील भागावर त्याचा परिणाम झाला आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)