You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहम्मद जाएफ : एक डोळ्याचा 'हा' हमास प्रमुख इस्रायलला 40 वर्षं चकवा देतोय
- Author, जोशुआ नेवेट
- Role, बीबीसी न्यूज
मे 2021 मध्ये पॅलेस्टाईनच्या कट्टरतावाद्यांकडून एका ऑडिओ रेकॉर्डींगद्वारे इस्रायलला इशारा देण्यात आला.
हमासच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, तर इस्रायलला 'मोठी किंमत' चुकवावी लागले, असं या ऑडिओमध्ये म्हणण्यात आलं होतं.
हमास ही गाझावर राज्य करणारी एक कट्टरतावादी संघटना आहे. ऑडिओमधला आवाज हा मोहम्मद जाएफचा होता, तो हमासच्या लष्करी विंगचा प्रमुख आहे. तो इस्रायलच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये असून, सात वर्षांनंतर त्यानं मौन सोडलंय.
पण त्यांच्या इशाऱ्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. इस्रायल आणि गाझा यांच्यात शस्त्रसंधी होण्यापूर्वी 11 दिवसांपर्यंत युद्ध चाललं.
संयुक्त राष्ट्रांच्या मते यात गाझामध्ये 242 जणांचा मृत्यू झाला. 10 ते 21 मे दरम्यानच्या या युद्धामध्ये इस्रायलच्या 13 जणांचा मृत्यू झाला.
संयुक्त राष्ट्रांच्या मते, गाझामध्ये मृत्यू झालेल्यांपैकी 129 हे सामान्य नागरिक होते. हमासचा नेता याह्या सिनमार याच्या मते त्यांचे 80 सदस्य या युद्धात मारले गेले. जाएफदेखिल फायरिंग लाईनवर होता, पण मृतांच्या यादीत त्याचा समावेश नाही.
जाएफ हा गाझामध्ये लष्करी ऑपरेशन राबवतो.
गाझातील 'पाहुणा'
जाएफबाबत बहुतांश माहिती ही इस्रायलच्या किंवा पॅलेस्टाईनच्या मीडिया रिपोर्ट्समधून मिळते. त्यांच्यानुसार जाएफचा जन्म 1965 मध्ये गाझाच्या खान यूनिस येथील निर्वासितांच्या छावणीत झाला होता. त्यावेळी त्याठिकाणी इजिप्तचं राज्य होतं.
त्याचं नाव मोहम्मद दियाब इब्राहीम अल-मरसी ठेवण्यात आलं होतं. पण त्याची भटकंतीची जीवनशैली आणि इस्रायलच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सतत पळून जावं लागत असल्यानं त्याला जाएफ असं म्हटलं जाऊ लागलं. अरबीमध्ये या शब्दाचा अर्थ 'पाहुणा' असा आहे.
तो लहानाचा मोठा कसा झाला या बाबतची फारशी माहिती उपलब्ध नाही. जेव्हा हमास संघटना तयार झाली, तेव्हा तो तरुण असेल. 1980 मध्ये तो या गटात सहभागी झाला. इस्रायलच्या विरोधात सशस्त्र बंडखोरीसाठी नेहमी सज्ज राहणारा जाएफ लवकरच हमासचे लष्करी विंग इजेदिन अल-कसम ब्रिगेडमधील एक महत्त्वाचा भाग बनला.
गाझावर राज्य करणारी पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी दहशतवाद-विरोधी सल्लागार लेविट सांगतात की, "त्याला हमासमधील अत्यंत कट्टर अधिकारी म्हणून ओळखतात."
असंही म्हटलं जातं की, जाएफ हा कट्टर कमांडर याह्या अय्याश याचा नीकटवर्तीय होता. बॉम्ब तयार करण्यासाठी प्रसिद्ध याह्या अय्याशला 'इंजिनीअर' म्हटलं जातं.
90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इस्रायलमध्ये बॉम्बने अनेक बस उडवल्याचा आरोप अय्याशवरच आहे. 1996 मध्ये इस्रायलने त्याची हत्या केल्यानंतर बसवर होणारे हल्ले वाढले होते. अय्याशच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जाएफ हे कट रचत होता, असं म्हटलं जातं. याशिवाय इतर अनेक हल्ल्यांमागे त्याचा हात आहे.
यानंतर हमासमध्ये जाएफची उंची आणि पदही वाढलं. 2020 मध्ये हमासच्या लष्करी विंगचा संस्थापक सलाह सहेदेहच्या हत्येनंतर त्यानं ही जबाबदारी स्वीकारली, हमासच्या खास कसम रॉकेट आणि गाझामधील भुयारांचं श्रेय जाएफलाच दिलं जातं.
जाएफ बहुतांश वेळ या भुयारांमध्येच घालवतो, असं म्हटलं जातं. इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचता यावं आणि लपून हमासचं ऑपरेशन चालवता यावं यासाठी तो या भुयारांमध्येच राहतो.
'नऊ जीवांची मांजर'
जाएफ रडारवर असल्याने त्याला कायम जीवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 2000 च्या दशकामध्ये इस्रायलने चारवेळा त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. पण तो बचावला. काही हल्ल्यांमध्ये तो गंभीर जखमीही झाला. यात त्याचा एक डोळा आणि आणखी काही अवयवांचं नुकसान झालं.
आयडीएफच्या एका माजी प्रमुखांनी 2006 मध्ये हमासच्या एका सदस्याच्या घरावर केलेल्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "लोकांना वाटलं तो पुन्हा नेता किंवा लष्कराच्या विंगसाठी नियोजनाचं काम करू शकणार नाही. पण तो ठीक झाला आणि एक डोळा त्याने गमावला तो गमावलाच."
हत्येच्या या अपयशी प्रयत्नांमधून वारंवार वाचत असल्यामुळं जाएफ आणखी चर्चेत आला आणि त्याच्या शत्रुंनी त्याला "द कॅट विथ नाइन लाइव्स" म्हणजेच 'नऊ जीवांची मांजर' म्हणणं सुरू केलं.
2014 मध्ये जाएफच्या हत्येचा पाचवा प्रयत्न करण्यात आला.
इस्रायलने त्याचा शेजारी शेख रादवान याच्या घरावर हल्ला केला. त्यात जाएफची पत्नी, जवळचा मित्र आणि लहान मुलाचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या काही वेळानंतर हमासने म्हटलं की, ''जाएफ अजूनही जिवंत आहे आणि लष्करी कारवायांचे नेतृत्व करत आहे."
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, त्याचं इस्रायलच्या लष्कराच्या तावडीतून वाचण्याचं एक मोठं कारण म्हणजे, जाएफ कोणत्याही आधुनिक संवाद माध्यमांचा किंवा तंत्राचा वापर करत नाही.
लेविट यांच्या मते, "जर तुम्ही फोन किंवा कम्प्युटरचा वापर करत नसाल, तर अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणांसाठीदेखिल तुमची माहिती मिळवणं कठीण आहे.
लेविट यांच्या मते, हमासच्या खंदकांची खोली, जुनी गुप्तचर यंत्रणा, मनुष्य आणि वित्तिय हानीचा धोका आणि ऐनवेळी शस्त्रं काम न करणं ही देखील त्याच्या हत्येचे प्रयत्न अपयशी ठरल्याची काही कारणं आहेत.
'वेगळी' आणि महत्त्वाची भूमिका
युद्ध संपण्याच्या एक दिवस आधी हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितलं होतं की, जाएफ गाझामध्ये लष्करी कारवायांचं नेतृत्व करत होता. त्यामुळे शस्त्रसंधीनंतरही जबाबदारी त्यांच्यात हाती आहे, असं समजलं जात आहे.
आयडीएफमधील एका अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना म्हटलं की, जाएफबाबत प्रयत्न सुरू आहेत. पण गोपनीय मिशन असल्यामुळे याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
लेविट सांगतात की, "त्यांना (इस्रायल) त्याला मारायचं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे तो जुन्या काळातील असल्याने, त्याची वेगळी शक्ती (पोहोच) आहे."
"सध्या सुरुवातीपासून असलेल्या अशा वरिष्ठ सदस्यांची संख्या अत्यंत कमी आहे. यादृष्टीने तो इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे."
जाएफचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो एक गूढ स्वरुपाचा व्यक्ती आहे. सोबतच तो कुख्यात आणि अनामिकही आहे. गाझामध्येदेखिल काही मोजके लोकच त्याला ओळखू शकतात.
लेविट सांगतात की, पॅलेस्टिनींवर "हमासच्या बहुतांश लोकांचा प्रभाव" पडत नाही.
पण जेव्हा शस्त्रसंधीची घोषणा झाली, त्यावेळी काही पॅलेस्टिनींनी जाएफच्या नावाची घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. गाझामध्ये एवढ्या उलथापालथीनंतरही काही लोक जल्लोष करत, "आम्ही तुमच्या बरोबर आहोत जाएफ" असं गात होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)