जॉन ऑफ टिनटर्न: मध्ययुगातील एक संन्यासी ज्याने 'गॅंगस्टर' होऊन संपत्ती कमावली

- Author, सोफी पार्कर
- Role, बीबीसी न्यूज, माल्म्सबरी
रॉबिन शर्मा या लेखकाचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे, 'संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली.' पण जर ही कहाणी तुम्ही वाचली तर म्हणाल की संन्यासी ज्याने गॅंगस्टर होऊन संपत्ती कमावली.
इतकंच नाही तर त्याने पैसा टाकून आपले गुन्हे पण माफ करून घेतले. तो संन्यासी कोण होता आणि त्याने काय केलं याची गोष्ट.
एका स्थानिक इतिहासकारानं जेव्हा त्याच्या गावातील एका मठामध्ये संशोधन सुरू केलं, तेव्हा त्याला काहीतरी आश्चर्यकारक समोर येईल अशी अपेक्षा होती. पण एका दुष्ट किंवा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला.
जॉन ऑफ टिनटर्न नावाच्या एका स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या संन्याशाचे जीवन एवढं विविधरंगी आणि गुन्हेगारीनं भरलेलं होतं की, टोनी मॅकलेव्ही यांना पुस्तकात त्यांच्यावर एक संपूर्ण अध्याय लिहावा लागला.
आयडिलिक माल्म्सबरी हे कॉट्सवोल्ड्समधील एक व्यापारी शहर होतं. ते शहर त्या ठिकाणचे मॉनेस्टरी (मठ - नॉर्मन अॅबे), धावणारी डुकरं आणि अँग्लो सॅक्सन राजा अॅथेलस्टन याला दफन केलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं.
पण ते कायमच एवढं शांत वाटत नव्हतं.
राजा हेन्री (आठवे) यांनी मॉनेस्टरीची (मठ) व्यवस्था विसर्जित केल्यामुळं एक मोठं धार्मिक परिवर्तन निर्माण झालेलं होतं. पण तोपर्यंत ते अनेक शतकांपर्यंत शिक्षण आणि सत्तेचं केंद्र होतं.
बीबीसी रेडिओ विल्टशायरशी बोलताना मॅकलेव्ही यांनी सांगितलं की, 'जॉन टिनटर्न यांची खूप मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याची सुरुवात 1318 मध्ये झाली होती.'
त्यांची कहाणी सर्वांसमोर मांडण्यासाठी त्यांनी अनेक शतकं जुन्या कागदपत्रांचा ढीग हातावेगळा केला होता.
'एक छोटं सैन्य'
त्यावर्षी जॉन यांना राजा एजवर्डज (दुसरे) यांच्यासमोर हजर करण्यात आलं. ते तेव्हा तरुण संन्यासी होते. त्यांच्यावर दंगलींमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. ही घटना लेक्लेड शहरातील एका सामूहिक वादाशी संबंधित होती.
"ते माल्म्सबरीमधून 40 जणांसह त्याठिकाणी गेले. ते अगदी छोटंसं सैन्य होतं. त्याठिकाणी जमीन आणि पैशासंदर्भात त्यांचा एक छोटासा वाद झाला."

मॉनेस्टरीकडून एक मोठं बांधकाम केलं जात होतं. त्यासाठी त्यांना रोख रकमेची आवश्यकता होती, "ही व्यक्ती संपूर्ण वेळ प्रार्थनेच्या पुस्तकाबरोबर घालवणारी नसून, ती व्यवसायाशी संबंधित आहे."
माल्म्सबरी मॉनेस्टरी आज जशी आहे, त्याला इतिहासातील एक क्षण कारणीभूत आहे. त्याचा खालचा भाग किंवा पाया आधीपासूनच होता, तर त्याचा वरचा भाग या क्षणाला तयार करण्यात आला होता.
सध्या तिथं असलेली इमारत लहान पण भव्य आहे. त्यामुळं पूर्ण मॉनेस्टरीची आठवण होते. इसवीसन 1500 मध्ये मॉनेस्टरी व्यवस्था विसर्जित करण्यात आल्यानंतर, त्याचा खंडित भाग चर्च म्हणून शिल्लक होता.
'गूढ गुपित'
1320 च्या दशकामध्ये हा मठ एका 10 हजार पाऊंड रकमेच्या वादामध्ये अडकला. आजच्या काळात ही रक्कम कोट्यवधींच्या वर आहे.
त्यावेळी मॉनेस्टरींची राजकीय निष्ठा असायची. माल्म्सबरीमध्ये ते स्थानिक डेस्पेंसर्स नावाच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवत होते.
या कुटुंबानं मोठ्या प्रमाणात रोख रक्कम या मठामध्ये ठेवण्यासाठी दिली होती.
पण जेव्हा वातावरण त्यांच्या विरोधात गेलं आणि कुटुंबाच्या प्रमुखाची हत्या करण्यात आली त्यावेळी मॉनेस्टरीने त्यांच्याकडं जमा करण्यात आलेल्या धनाच्या रकमेसंदर्भात शांत राहण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर त्यांनी त्याठिकाणी रोख रक्कम लपवलेली असताना एका शाही भेटीचं आयोजनही केलं होतं. ते त्यांच्या राहण्याच्या भागातही होतं. शहरातील मॉनेस्टरीच्या तळघरातील हा एकमेव भाग शिल्लक राहिला होता.

"संन्याशांना हे गूढ गुपित माहिती असल्यामुळं ते नक्कीच प्रचंड घाबरलेले असतील," असं मॅकलेव्ही म्हणाले.
"ते याबाबत शांत राहिले. त्यानंतर दहा वर्षांनी हे सर्व समोर आलं. कोणीतरी याबाबत त्यांची गंमतही केली होती."
त्यावेळी मॉनेस्टरींच्या प्रमुखांचा उजवा हात म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॉन यांना रॉयल्टीसमोर हजर करण्यात आलं आणि पुन्हा त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं.
मात्र, अखेरीस माल्म्सबरीमधील संन्याशांना माफ करण्यात आलं. "असाधारण बाब म्हणजे राजानं 10,000 च्या मोबदल्यात त्यांना जाऊ दिलं. म्हणजे एकूण काय तर ते यातून वाचले."
'गँगस्टर म्हणून काम'
मॅकलेव्ही यांनी सांगितलं की, '1340 मध्ये मॉनेस्टरीचे प्रमुख म्हणून निवडून आल्यानंतरही जॉन ऑफ टिनटर्न यांची स्थिती प्रचंड वाईट होती.'
"ते गँगस्टर म्हणून काम करत होते. असे गँगस्टर जे शत्रूची हत्या करण्यासाठीही तयार होते."

साधू-संन्याशाच्या वर्तनाच्या टोकाचं उलट वर्तन करण्याबरोबरच ते माल्म्सबरीच्या पुढं असलेल्या गावात मार्गारेट ऑफ ली नावाच्या महिलेसोबत खुलेआम राहतही होते.
महिला आणि त्यांचे पती राहत असलेल्या मालमत्तेची जाळपोळ करून महिलेचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
ही शहरातली अत्यंत प्रसिद्ध अशी कहाणी होती. कारण न्यायाधीश जेव्हा लंडनहून माल्म्सबरीमध्ये आले तेव्हा अनेक स्थानिक लोक त्यांच्या गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी पोहोचले होते.
त्यांच्यावर फक्त जाळपोळ आणि अपहरण एवढेच आरोप करण्यात आले होते असं नाही. तर जॉन ऑफ टिनटर्न यांच्यावर इतर चार हत्यांचाही आरोप होता.
मारले गेलेले लोक हे स्थानिक चांगल्या कुटुंबांमधले होते. तर काही मॉनेस्टरीच्या जमिनीवरील भाडेकरू होते. "जॉन यांना या सर्वांपासून सुटका हवी होती. कारण त्यामुळं त्यांना जमीन देऊन टाकता आली असती किंवा मित्रांना भाड्यानं देता आली असती, असं वाटतं."
सगळं अधिक भ्रष्ट बनवण्यासाठी त्यांचे सहकारी शेरीफ ऑफ विल्टशायर आणि गिल्बर्ट ऑफ बर्विक होते. त्यांना काऊंटीतील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार समजलं जात होतं.

जेव्हा हत्या झाल्या तेव्हा जॉन त्याठिकाणी नव्हते. त्यांनी जवळच्या बॅडमिंटनमधून अशा हत्या, मारहाणीच्या किंवा वाईट कृत्यं करण्यासाठी एका जणाला बोलावून घेतलं होतं.
पुढं अटक वॉरंट जारी झालं आणि त्यांनी पळ काढला. मार्गारेटचाही त्यात समावेश होता.
नेमकं काय घडलं हे अगदी स्पष्ट नव्हतं. पण त्यांना शोधून लंडन येथील न्यायालयात खटला चालवण्यात आला.
कदाचित जॉन ऑफ टिनटर्न याच्या पलायनाचा शेवट असाच व्हायला हवा होता.
'त्यांना माफ करण्यात आलं'
"तो अक्षरशः हत्या करून त्यातून सुटला," असं मॅकलेव्ही म्हणाले.
"कोर्टानं त्यांचा गुन्हा मान्य केला. प्रचंड दंडाच्या मोबदल्यात त्यांना माफ करण्यात आलं. म्हणजे हत्या करण्यासाठी त्यांना दंड ठोठावण्यात आला होता."

हा दंड तेव्हाच्या 500 पाऊंड म्हणजे आताच्या हजारो-लाखो पाऊंड एवढा होता.
मॅकलेव्ही यांच्या मते या सर्वामध्ये पैशानं मोठी भूमिका बजावली. मॉनेस्टरीने त्यावेळी मोठ्या प्रमाणात बांधकामं करण्यासाठी एकाचवेळी अनेक प्रमुख शिल्पकारांना काम दिलं होतं.
'अपराधीपणाची भावना'
व्हॅटिकनच्या लेखागारात असलेल्या पुराव्यांनुसार जॉन ऑफ टिनटर्न यांना काहीशी अपराधीपणाची भावना मात्र निर्माण झालेलीच होती.
त्यांनी पोपकडं माफीसाठी अर्जही केला होता.
मॅकलेव्ही यांच्या मते याचा अर्थ असा होतो की, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची सर्व पापं माफ होतील, याला पोपचं अनुमोदन होतं.
"त्यावेळी पैशाच्या मोबदल्यातील हा अगदी सर्वसामान्य व्यवहार होता.
"मला वाटतं कदचित त्यांना काहीशी अपराधीपणाची भावना निर्माण झाली असेल."
1349 मध्ये जॉन ऑफ टिनटर्न यांचा मृत्यू झाला. नेमका कसा झाला हे माहिती नाही. पण या ब्लॅक डेथची संपूर्ण देशामध्ये चर्चा होती.
टोनी मॅकलेव्ही यांच्यासाठी हा एक दीर्घ शोधप्रवास होता. त्यांच्या मते : "तुम्ही जेव्हा हे दस्तऐवज पाहता तेव्हा तुम्हाला स्वतःला चिमटा काढून पाहावा लागतो.
"हे सगळं खरं कसं असू शकतं. या अशा प्रकारच्या धार्मिक व्यक्तीनं एवढं टोकाचं वाईट वर्तन कसं केलं असणार?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








