अननसाच्या चोरीसाठी जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जायची...अननस एवढे महाग का होते?

अननस

फोटो स्रोत, PEOPLEIMAGES.COM/ADOBE STOCK

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार, संशोधक

आजपासून जवळपास 222 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियाला आपली वसाहत बनवलं. या वसाहतीमध्ये ब्रिटिश गुन्हेगारांना सक्तमजुरीसाठी पाठवलं जायचं. असाच एक गुन्हेगार होता जॉन गुडिंग, ज्याला गुडविन म्हणूनही ओळखलं जायचं.

ऑस्ट्रेलियाचं वसाहतीत रुपांतर होऊन 20 वर्ष पूर्ण झाली असतानाच गुडविनला सात वर्षांच्या सक्तमजुरीसाठी पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता.

त्यावेळच्या न्यायालयीन कामकाजावरून असं दिसून येतं की, गुन्हेगाराची वर्तणूक चांगली असेल तर त्याची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्यात यायची.

अशाच वर्तणुकीमुळे गुडविनची शिक्षा कमी झाली. पण त्याला शिक्षा कोणत्या आरोपांखाली झाली होती? तर अननस चोरीच्या.

28 वर्षीय गुडविनने 25 जून 1807 रोजी कोर्टात आपल्या बचावात म्हटलं होतं की, त्याला रस्त्यावरून जात असताना अननसांची टोपली दिसली. ती मी बाजारात विकली कारण तिला कोणी मालक नव्हतं. म्हणजे अननसासारख्या महत्वाच्या फळाचा कोणी मालकच नाही हे कसं शक्य आहे. म्हणजेच त्यानं त्याची चोरी केली असणार असा अर्थ लावला गेला.

त्याकाळी अननस हे अती मौल्यवान असं दुर्मिळ फळ होतं. याचा शोध घेतला ख्रिस्तोफर कोलंबसने 1493 साली. आताच्या ग्वाडेलूप मध्ये हे फळ उगवायचं. पण याचा योग्य वापर झाला तो सतराव्या शतकात. कारण त्याआधी ही फळं कच्ची तोडून युरोपात नेली जायची. पण युरोपात पोहोचेपर्यंत ती फळं सडायची.

राजा अननस

सतराव्या शतकाच्या मध्यात, ब्रिटनच्या राजघराण्यात अननसाला 'फळांचा राजा' म्हणून घोषित करण्यात आलं.

फ्रान्सचे वैद्य पीयर पोमेट यांच्या म्हणण्यानुसार, "अननसाला फळांचा राजा म्हणणं योग्य होतं कारण ते पृथ्वीवरील सर्वोत्तम फळ होतं. त्याच्या डोक्यावर असलेला मुकुट तो राजा असण्याची खूण आहे."

युरोपला पोहोचण्यासाठी अननसाला मोठं अंतर पार करावं लागायचं. त्यामुळेच की काय खूप कमी लोकांना त्याचं दर्शन व्हायचं आणि ते फळ चाखता यायचं. यामुळे या फळाबाबत खूप साऱ्या कथा सुद्धा तयार झाल्या होत्या.

अननस

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एकप्रकारे हे एक असं फळ होतं ज्याचा केवळ राजे-रजवाडे आणि श्रीमंतांनाच उपभोग घेता यायचा.

अननसाच्या लोकप्रियतेवर पुस्तक लिहिणारे फ्रेन ब्युमन यांच्या मते, पुढच्या दोन-तीन शतकांत तर लोकांची संपत्ती आणि प्रसिद्धी अननसातूनच व्यक्त होऊ लागली.

पहिल्या चार्ल्सचे शाही वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन पार्किन्सन यांनी अननसाच्या वासाचं आणि चवीचं वर्णन करताना म्हटलं होतं की, 'हे फळ वाईन, गुलाबपाणी आणि गोड पदार्थ एकत्रितपणे केल्यानंतर तयार होणाऱ्या मिश्रणासारखं आहे."

पण 1642 च्या गृहयुद्धानंतर काही वर्ष अननसाचा उल्लेख कुठेच आढळत नाही. ब्युमन त्यांच्या पुस्तकात लिहितात की, कट्टर प्रोटेस्टंट ऑलिव्हर क्रॉमवेलच्या दृष्टीने, "पेर हे गरीब फळं होतं तर अननस एक विलासी फळ होतं." त्यामुळे तेवढ्याच काळात अननस शत्रूसारखं होतं.

त्यानंतर 1660 मध्ये चार्ल्स द्वितीय सिंहासनावर बसले. आणि इथून पुढे राजा आणि अननस दोघांसाठीही समृद्धीची नवी सुरुवात झाली.

1668 मध्ये इंग्लंडमधील फ्रेंच राजदूत वेस्ट इंडिजमधील सेंट किट्स बेटावर भांडणासाठी आले.

त्यावेळी चार्ल्स द्वितीयने बार्बाडोसमधून आयात केलेलं अननस जेवणाच्या टेबलावर ठेवलं. त्या भागात इंग्रजांचं वर्चस्व आहे हे दाखवणं एवढाच त्यांचा उद्देश होता. म्हणजे आम्ही अननस घेऊ शकतो पण तुम्हाला ते शक्य नाही असं त्यांना दाखवायचं होतं.

तेव्हापासून अननस हे चार्ल्स द्वितीय यांच्या श्रेष्ठत्वाचं प्रतीक बनलं होतं.

श्रेष्ठत्वाचं प्रतीक

आज जसं आपण एखाद्या सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढतो तसंच 1675 च्या आसपास, शाही माळ्याने उगवलेलं पहिलं अननस जवळ ठेवून चार्ल्स द्वितीय यांनी स्वतःचं चित्र काढून घेतलं होतं.

पुढे या दाव्यावर संशय व्यक्त करताना म्हटलं गेलं की, कदाचित हे कच्चं अननस एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आणलं असावं आणि ते इंग्लंडमध्ये पिकवलं असावं.

अननस

फोटो स्रोत, HERITAGE IMAGES

ब्युमन लिहितात की, युरोपातील देश वसाहतींचं सामर्थ्य दाखविण्यासाठी लढत होते, परंतु इंग्लंडच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणजे अननस मिळवणं.

"एकाबाजूल डच देखील अननसाबाबत उत्साही होते, शिवाय ते चांगले बागायतदारही होते. 1682 मध्ये हॉलंडमध्ये पहिलं हरितगृह

बांधण्यात आलं, ज्यामुळे इंग्लंड आणि डचांमधील वैमनस्य वाढलं. जेव्हा डच व्यापारी पीटर डी लकोर्ट अननसाचं पीक काढण्यात यशस्वी ठरला तेव्हा ब्रिटिशांना त्याचा हेवा वाटू लागला."

"त्यांच्यातील ही ईर्षा तेव्हाच संपली जेव्हा एक इंग्लिश राजकन्या आणि तिचा डच पती विल्यम ऑफ ऑरेंज यांनी सिंहासन ताब्यात घेतलं. विल्यम राजा झाल्यावर अननसाचा वाद संपू लागला."

18 व्या शतकाच्या सुरूवातीस ब्रिटनमध्ये अननसाची लागवड सुरू झाली होती. पण आता अननसाचं महत्त्व कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलं.

एवढं महागडं फळं खाणार कोण?

1764 च्या जेंटलमन्स मॅगझिननुसार, अननसाची लागवड करण्यासाठी 150 पौंड इतका खर्च यायचा. बँक ऑफ इंग्लंडच्या महागाई कॅल्क्युलेटरनुसार, आजच्या काळात ही रक्कम जवळपास 82 हजार पौंड इतकी होती.

18 व्या शतकात जे लोक अननस खाऊ शकत नव्हते ते त्या आकाराची भांडी विकत घ्यायचे.

फोटो स्रोत, CAROLYN STODDART-SCOTT

फोटो कॅप्शन, 18 व्या शतकात जे लोक अननस खाऊ शकत नव्हते ते त्या आकाराची भांडी विकत घ्यायचे.

मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या अननसाची किंमत 60 पौंड होती. म्हणजे आजच्या हिशोबाने बघायला गेलं तर 11 हजार पौंड इतकी. त्यावर पानं असतील तर त्याची किंमत आणखीन वाढायची, त्यामुळे एवढं महागडं फळं खाणार कोण?

बेथान बेलने लिहिल्यानुसार, हे फळ ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत उच्चभ्रू लोकांच्या सामाजिक समारंभांचा एक महत्त्वाचा भाग होतं. पण हे फळ खाण्यासाठी दिलं जायचं नाही. एवढ्या महागड्या फळाचा मालक अननसाला खास प्लेट्समध्ये सजवून डायनिंग टेबलवर ठेवायचा. अननस फक्त दुरून पाहिले जायचे. कारण खाण्यासाठी दुसरी स्वस्त फळं ठेवलेली असायची

बऱ्याचदा एकच अननस अनेक समारंभात दाखवण्यासाठी ठेवलं जायचं आणि ते शेवटी सडून जायचं.

अननसासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले जायचे कारण घरकाम करायला येणारे नोकर ते फळ चोरून नेण्याची भीती असायची.

अननस भाड्याने मिळायचे...

एवढंच नाही तर अननस भाड्याने देण्याचा व्यवसाय देखील चालायचा. जे लोक कमी श्रीमंत असायचे ते आपली श्रीमंती दाखवण्यासाठी एखाद्या खास कार्यक्रमासाठी, डिनर पार्टीसाठी हे फळ भाड्याने घ्यायचे. आणि हातात घेऊन मिरवायचे.

अननस

फोटो स्रोत, Getty Images

18 व्या शतकात तर अननसाच्या वरच्या स्वरुपापासून प्रेरणा घेऊन कलाकृती बनवल्या जायच्या. या फळाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत अननसावर आधारित वस्तू बाजारात आणल्या गेल्या.

या फळाच्या धरतीचे घड्याळ, भांडी आणि चित्रांची विक्री भरमसाठ वाढली. एवढंच काय तर या फळाच्या आकराच्या इमारतीही बांधल्या जाऊ लागल्या. फॅशनेबल स्त्रिया त्यांच्या कपड्यांवर, त्यांच्या पिशव्या आणि बूटांवरही या फळांची चित्रं काढून घेऊ लागल्या.

अननस हे आदरातिथ्याचं प्रतीक बनलं. पाहुण्यांना खूश करण्यासाठी टॉवेल, टेबल क्लॉथ, वॉलपेपर आणि अगदी बेडही अननसाच्या चित्रांनी सजवले जायचे.

ज्या लोकांची खरं फळ घेण्याची किंवा ते भाडेतत्वावर घेण्याची देखील ऐपत नव्हती ते लोक अननसाच्या आकाराची चीनी मातीची भांडी आणि चहाची भांडी खरेदी करायचे.

18 व्या शतकाच्या अखेरपर्यंत जर एखाद्या चविष्ट गोष्टीचं उदाहरण द्यायचं असल्यास अननसाचं उदाहरण दिलं जायचं.

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात जॉन विल्क्सच्या लेखनासारखीच अननसाची रम देखील लोकप्रिय झाली. आणि नंतर 19 व्या शतकातील काही लेख, चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्या यांसह बऱ्याच ठिकाणी अननसाचा उल्लेख करण्यात आला.

विम्बल्डनमध्ये अननस

1877 मध्ये विम्बल्डन सुरू झालं तेव्हा चषकाच्या वरच्या बाजूला छोटं सोन्याचं अननस लावण्यात आलं होतं. आता ही टेनिस चॅम्पियनशिप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय, त्यामुळे पुढच्या वेळी विजेत्याने चषक उचलल्यावर त्याकडे बारकाईने लक्ष द्या.

लक्षपूर्वक पाहिल्यास या चषकामध्ये अननसाचं चित्र दिसेल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लक्षपूर्वक पाहिल्यास या चषकामध्ये अननसाचं चित्र दिसेल.

1947 मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने महाराणी एलिझाबेथ यांच्या लग्नात अननसाच्या 500 पेट्या भेट म्हणून पाठवल्या होत्या.

केवळ इंग्रजांनीच अननसात खूप रस दाखवला. 1789 च्या क्रांतीनंतर फ्रान्समधून अननस गायब झाले आणि इतरही देश जसे की स्पेन, पोर्तुगाल आणि अगदी रशियानेही अननसाची लागवड बंद केली.

एकेकाळी रशियाच्या कॅथरीन द ग्रेटच्या दरबारातही अननसांना स्थान मिळालं होतं.

श्रीमंतांना मोठा धक्का बसला

पुढील काळात जेव्हा अननस वसाहतींमधून जहाजांद्वारे नियमितपणे ब्रिटनमध्ये येऊ लागले तशा त्याच्या किंमती घसरल्या.

ब्युमन यांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी श्रीमंतांचं फळं म्हणून नावाजलेलं अननस ब्रिटनमधील बहुतांश शहरांमध्ये, गावांमध्ये अगदी रस्तोरस्ती स्वस्त दरात मिळू लागलं.

यामुळे केवळ मध्यमवर्गीयच नव्हे तर नोकरदार वर्गही अननस विकत घेऊ लागले. आणि याचा श्रीमंतांना मोठा धक्का बसला.

अननस जेव्हा सामान्य लोकांपर्यंत पोहचलं तेव्हा श्रीमंत लोक सामान्यांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करू लागले.

पण मला प्रश्न पडलाय की जर गुडविनने त्यांच्या खरं बोलल्याची साक्ष दिली नसती तर त्याला किती वर्षांसाठी काळया पाण्याची शिक्षा झाली असती?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)