सोन्यापेक्षा तिप्पट महाग रंग, जो कोणी वापरला तर त्या व्यक्तीची हत्याही केली जायची

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, ALAMY

    • Author, झारिया गोर्व्हेट
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

पहिल्या नजरेत ते एखाद्या डागासारखे वाटत होते. सीरियन वाळवंटाच्या एका कोपऱ्यात, कतानी राजमहालाचे अवशेष एका तलावाच्या काठावर पडले आहेत. हा तलाव बऱ्याच काळापासून कोरडा पडलाय. 2002 मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ इथे एका शाही कबरीचा शोध घेत होते, तेव्हा त्यांना हे अवशेष सापडले.

एका खोल बोगद्याच्या सुरुवातीला एक बंद फाटक होतं. त्या फाटकाच्या दोन्ही बगलेत जणू पहारेकरीच बसवलेत असे दोन पुतळे होते. या फाटकाच्या आत सोन्यानाण्याचा खजिना होता. यात दोन हजार वस्तू आणि एक सोन्याचा हात देखील होता.

या ठिकाणी बरेच डाग होते. जेव्हा प्रयोगशाळेत या डागांचे नमुने तपासले तेव्हा एक विशिष्ट जांभळा थर दिसून आला.

या संशोधकांनी नकळत प्राचीन जगातून एका दुर्मिळ वस्तूचा मागोवा घेतला होता. या मौल्यवान वस्तूने राजांना गादी सोडण्यास भाग पाडलं होतं. यामुळे जगावर राज्य करणाऱ्या साम्राज्यांच्या पिढ्यानपिढ्यांचं सामर्थ्य टिकवून ठेवलं होतं.

इजिप्तची राणी क्लियोपात्रालाही त्याचा इतका मोह होता की तिने तिच्या जहाजांचे पालही या रंगाने रंगवले होते. काही रोमन सम्राटांनी असं फर्मान काढलं की, त्यांच्याशिवाय कोणीही हा रंग बाळगला तर त्याला ठार मारलं जाईल.

या रंगाच्या शोधाला 'टेरियन पर्पल' किंवा 'शेलफिश पर्पल' असंही म्हणतात.

इसवी सन पूर्व 310 च्या रोमन आदेशानुसार, त्याची किंमत इतकी जास्त होती की आजच्या सोन्याच्या किमतीच्या तिप्पट म्हणावी लागेल. पण आता हा रंग कसा तयार होतो हे कोणालाच माहीत नाही.

15 व्या शतकापर्यंत हा रंग तयार करण्याचे तंत्र नष्ट झाले.

पण या रंगाचं तंत्र नष्ट कसं झालं?

ईशान्य ट्युनिशियामध्ये, जेथे कार्थेज नावाचं प्राचीन शहर होतं त्या ठिकाणी राहणारा एक माणूस गेल्या 16 वर्षांपासून एका लहान बागेतील भिंतीवर समुद्रातील गोगलगाय मारत असे. तो त्यांच्या आतून ‘टेरियन पर्पल’ (गडद जांभळ्या) रंगा सारखा पदार्थ काढण्याचा प्रयत्न करायचा.

सामर्थ्य आणि संपत्तीचं प्रतीक

सीरियन वाळवंटातल्या कतानी पॅलेसचे अवशेष

फोटो स्रोत, ALAMY

फोटो कॅप्शन, सीरियन वाळवंटातल्या कतानी पॅलेसचे अवशेष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शतकानुशतके हा रंग समाजातील सर्वात प्रभावशाली वर्गासाठी राखीव होता. हा शक्ती, अधिकार आणि संपत्तीचं प्रतीक मानला जायचा.

किंचित काळ्या रंगाची छटा असलेल्या गोठलेल्या रक्तासारखा खोल लाल-जांभळा रंग असण्याबद्दल प्राचीन लेखकांचं मत अगदी स्पष्ट होतं. प्राचीन लेखक प्लिनी द एल्डर यांनी या रंगाबद्दल लिहिलंय की, 'जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा हा रंग चमकतो.'

हा विशिष्ट रंग सहजासहजी तयार व्हायचा नाही. त्यामुळेच कदाचित दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिकेपासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या विविध संस्कृतींमध्ये त्याला मानाचं स्थान होतं. हा रंग फोनिशियन संस्कृतीच्या इतका जवळचा होता की त्याला 'पर्पल पीपल' हे नाव देण्यात आलं होतं. टायरच्या राज्याच्या नावावरून रंगाला नाव देण्यात आलं होतं.

इ.स. 40 मध्ये, सम्राटाच्या आदेशानुसार मॉरिटानियाच्या राजाला रोममध्ये मारण्यात आलं. हत्येमागील कारण आश्चर्यकारक होतं. मॉरिटानियाचा हा राजा रोमनांचा मित्र मानला जात होता. पण त्याने मोठा गुन्हा केला होता. त्याने ग्लॅडिएटर स्पर्धा पाहण्यासाठी तोच जांभळा शाही झगा परिधान केला होता.

असं म्हटलं जातं की, या रंगाशी संबंधित मत्सराची तुलना बऱ्याचदा वेडेपणाच्या प्रकाराशी केली जाते.

न उलगडलेलं कोडं

फोटो

फोटो स्रोत, ALAMY

विचित्र गोष्ट म्हणजे, एकेकाळी जो जगातील सर्वात प्रसिद्ध रंग होता तो लॅपिस लाझुली सारख्या सुंदर दगडापासून बनवला गेला नाही तर, त्याचा जन्म समुद्रातील गोगलगायींपासून तयार केलेल्या पदार्थाच्या स्वरूपात झाला.

टेरियन पर्पल फक्त तीन प्रकारच्या गोगलगायींपासून तयार करतात आणि या तिन्ही एकाच रंगाच्या नसतात. यामध्ये हेझाप्लेक्स ट्रंक्युलस (निळसर जांभळा), बोलिनस ब्रँडरिस (लालसर जांभळा), तर स्ट्रॉमोनिटा हेमास्टोमा (लाल) यांचा समावेश आहे.

हा रंग बनवण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत लागते.

शंख

फोटो स्रोत, MOHAMMED GHASSEN NOUIRA

सर्वप्रथम गोगलगायी गोळा करून नंतर त्यांच्या ग्रंथी चाकूने कापल्या जातात आणि हा पदार्थ काढला जातो. एका रोमन लेखकाने लिहिलं आहे की, 'जखमेतून हा पदार्थ वाहायचा, जणू काही ते अश्रूच असावेत.'

मग हे साहित्य मातीच्या भांड्यांमध्ये गोळा करून ढवळलं जायचं.

त्यानंतर काय व्हायचं, हे निश्चितपणे सांगता येत नाही. या रंगहीन गोगलगायीच्या मिश्रणातून रंग कसा तयार केला जायचा हा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विषय आहे.

अॅरिस्टॉटलच्या मते, हा रंग तयार करण्यासाठी जांभळ्या माशाच्या गळ्यातील ग्रंथी वापरल्या जात होत्या. परंतु हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं आहे. कारण रंगकर्मी त्यांच्या कामाबद्दल खूप सावध असायचे आणि जास्त माहिती द्यायचे नाहीत. प्रत्येक रंगकर्म्याची स्वतःची पद्धत आणि सूत्र होतं, जे नेहमीच गुप्त ठेवलं जायचं.

मारिया मेलो या लिस्बन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्या सांगतात, "अडचण अशी आहे की लोकांनी महत्त्वाच्या पायऱ्या लिहून ठेवल्या नाहीत."

सर्वात तपशीलवार माहिती प्लिनीकडून मिळते. त्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात या रंगाची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन केले होते.

रंगाची पावडर

फोटो स्रोत, ALAMY

प्लिनीच्या म्हणण्यानुसार, गोगलगायीच्या ग्रंथी रिकाम्या केल्यानंतर या पदार्थात मीठ मिसळून ते तीन दिवस ठेवले जायचे. नंतर ते योग्य तापमानात शिजवून आटवलं जायचं.

10 व्या दिवशी तो रंग खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी कापडावर रंग लावला जायचा. जर कपड्यावर हवा तसा रंग दिसला तर रंग तयार आहे असं समजायचं.

पण प्रत्येक गोगलगायीमध्ये या पदार्थाचं प्रमाण कमी असायचं आणि एक ग्रॅम रंगासाठी 10,000 गोगलगायी आवश्यक असायच्या.

ज्या भागात हा रंग तयार केला गेला त्या भागात कोट्यवधी गोगलगाईंची कवचं सापडली आहेत. या रंगाच्या उत्पादनामुळे जगातील पहिल्या रासायनिक उद्योगाची पायाभरणी झाली असं म्हटलं जातं.

कारापनगिओटिस हे ग्रीसमधील अॅरिस्टॉटल विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

ते सांगतात, "हा रंग शोधून काढणं सोपं नव्हतं. हा रंग इतर रंगांपेक्षा वेगळा होता कारण त्याच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य दुर्मिळ होते."

अचानक घट

29 मे 1453 रोजी कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी ताब्यात घेतलं आणि पूर्व रोमन साम्राज्य किंवा बायझंटाईन साम्राज्याचा अंत केला. आणि त्यासोबत या रंगाचंही अस्तित्व नष्ट झालं.

त्या वेळी हा उद्योग कॉन्स्टँटिनोपलमध्ये केंद्रित होता आणि हा रंग कॅथोलिक धर्माशी संबंधित होता. याचा वापर ख्रिश्चन धर्मातील धार्मिक व्यक्तींनी केला. शिवाय धार्मिक साहित्यात याचा वापर केला गेला.

पण त्याआधी करवाढीमुळेही या रंगावर बराच परिणाम झाला होता. पोपने ख्रिस्ती धर्माचे चिन्ह लाल रंगात बदलण्याचा निर्णय घेतला. हे सहज आणि स्वस्तात केलं जाऊ शकत होतं.

या रंगाचं अस्तित्व संपुष्टात येण्याचं आणखी एक संभाव्य कारण आहे. 2003 मध्ये शास्त्रज्ञांना दक्षिण तुर्कीतील एका प्राचीन बंदरात समुद्री गोगलगायींचा ढीग सापडला. त्याच्या अंदाजानुसार हा ढिगारा इसवी सन सहाव्या शतकातील होता आणि त्यात 60 दशलक्ष गोगलगायींचे अवशेष होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ढिगाऱ्याच्या तळाशी काही जुने नमुने होते जे आकाराने लहान होते आणि वयाने खूपच तरुण होते. असं म्हणतात की, समुद्री गोगलगायींचा अतिवापर होतो, ज्यामुळे त्यांची संख्या कमी झाली. यामुळे या प्रदेशातील रंग उद्योग कमी झाला.

मात्र पुढच्याच काही वर्षात आणखी एक शोध लागला ज्यामुळे या प्राचीन रंगाचे पुनरुज्जीवन होण्याची आशा निर्माण झाली.

रंग

फोटो स्रोत, MOHAMMED GHASSEN NOUIRA

सप्टेंबर 2007 मध्ये अशाच एका दिवशी मोहम्मद गासन ट्युनिसच्या बाहेरील भागात रात्रीच्या जेवणानंतर फिरत होते

ते म्हणतात की, आदल्या रात्री वादळामुळे समुद्रकिनाऱ्याच्या वाळूवर जेलीफिश, खेकडे आणि इतर गोष्टी जमा झाल्या होत्या.

तेव्हा त्यांना किनाऱ्यावर तुटलेल्या गोगलगाईतून एक रंग निघताना दिसला.

गासन यांना शाळेत वाचलेली एक कथा लगेच आठवली ज्यात ‘टेरियन पर्पल’चा उल्लेख होता. ते स्थानिक बंदरात गेले जेथे त्यांना गोगलगाई दिसल्या. पण त्या जाळ्यात अडकायच्या म्हणून मच्छीमारांना त्यांचा राग यायचा.

गासन यांनी गोगलगाय घेतल्या आणि घरी आले. पण त्यांचा सुरुवातीचा अनुभव खूपच निराशाजनक होता. त्या रात्री त्यांनी गोगलगाय फोडून त्यांना समुद्र किनाऱ्यावर दिसलेला पदार्थ शोधण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांना मांसाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यांनी या गोगलगायी फेकण्यासाठी एका पिशवीत ठेवल्या. दुसऱ्या दिवशी पिशवीचा रंग बदलला होता.

गासन सांगतात, 'हा जांभळा रंग सुरुवातीला पाण्यासारखा आहे याची मला त्यावेळी कल्पना नव्हती."

गोगलगायींमध्ये आढळणाऱ्या या रंगहीन पदार्थातील रसायने सक्रिय करण्यासाठी प्रकाशाची गरज असल्याचे आता शास्त्रज्ञांना समजले आहे. हा रंगहीन पदार्थ आधी हिरवा, निळा आणि शेवटी जांभळा होतो.

इथूनच गासन यांना हा विस्मरणात गेलेला रंग बनवण्याची पद्धत शोधून काढण्याचं वेड लागलं. समुद्रातील गोगलगायींच्या स्रावांची अनेकांनी तपासणी केली असली तरी एका शास्त्रज्ञाने 1200 गोगलगायांपासून 1.4 किलो पावडरही बनवली. परंतु शतकानुशतके पवित्र मानल्या गेलेल्या मूळ रंगाचा शोध घेण्यासाठी गासन यांना सर्व जुन्या पद्धतीचा अवलंब करायचा होता.

मोहम्मद गासन

फोटो स्रोत, MOHAMMED GHASSEN NOUIRA

फोटो कॅप्शन, मोहम्मद गासन

त्यांच्या लग्नाला फक्त आठवडाच झाला होता, जेव्हा ते पहिल्यांदा गोगलगायी घरी घेऊन आले. ते सांगतात, 'माझ्या बायकोला त्या वासाने किळस आली आणि तिने मला घराबाहेर काढले.'

पहिला रंग विकसित करण्यासाठी त्यांना बरीच वर्षे लागली. पण हा पहिला रंग टेरियन पर्पलसारखा नव्हता. अनेक वर्ष शिकल्यानंतर गासन अखेरीस प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या कृती शिकले. म्हणजेच सूर्यप्रकाश आणि अंधाराचा वापर, वेगवेगळ्या कालावधीसाठी गोगलगाईच्या पदार्थांचे मिश्रण.

या कामासाठी, गासनने बायझंटाईन सम्राट जस्टिनियन पहिला आणि त्याची पत्नी थिओडोराच्या प्रतिमा वापरल्या. मात्र नंतर त्यांनी या रंगाची तुलना त्या काळातील कपड्यांशी केली. अखेरीस ते मूळ रंगाशी साम्य असलेला रंग प्राप्त करण्यात सक्षम झाले.

ते सांगतात, "हा रंग खूप दोलायमान आहे. तो प्रकाशानुसार बदलतो. "

अनेक वर्षांच्या अनुभवानंतर गासन यांना जगभरातील प्रदर्शनांमध्ये त्यांचे रंग प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांना लंडनमधील ब्रिटिश म्युझियम तसेच बोस्टनमधील अमेरिकन म्युझियम ऑफ फाइन आर्ट्समध्ये आमंत्रित करण्यात आले.

पण ‘टेरियन पर्पल’ या रंगावर पुन्हा धोक्याचं सावट निर्माण झालं आहे. यावेळी धोका असा आहे की विशिष्ट म्युरेक्स गोगलगायी दुर्मिळ होत चालल्या आहेत. सागरी प्रदूषण आणि हवामान बदलामुळे स्ट्रॉमोनिटा हेमास्टोमा गोगलगायी आधीच विलुप्त झाल्या आहे. त्यामुळे हा रंग अस्तित्वात राहील की नाही हे सांगणं कठीण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)