क्लिओपात्रा : आपल्या भावांशीच लग्न करणारी राणी, जिच्या प्रियकरांची 'फौज' होती...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आंद्रे बर्नार्डो
- Role, बीबीसी न्यूज, ब्राझील
इजिप्तच्या बाराव्या टोलेमीची कन्या म्हणजे आपल्या सौंदर्याने आणि कर्तृत्वाने प्रसिद्ध झालेली क्लिओपात्रा.
क्लिओपात्राबद्दल लोकांना इतकं आकर्षण आहे की, तिच्यावर अनेक चित्रपट, नाटकं, टीव्ही सिरियल्स आल्या.
पण असं विशेष काय होतं क्लिओपात्रेत ?
इजिप्तच्या टोलेमी राजघराण्यात इसवीसन पूर्व 69 ते 30 या काळात जन्माला आलेली क्लिओपात्रा थे फिलोपेटर ही तिच्या वडिलांची अतिशय लाडकी होती.
तिला एकूण पाच भावंड होती. टॉलेमी XIII आणि टॉलेमी XIV हे दोन भाऊ होते आणि ट्रिफेना, बेरेनिस आणि आर्सिनो अशा तीन बहिणी होत्या.
टोलेमी राजघराण्यात आपली वंशावळ शुद्ध राहावी यासाठी बहीण-भावांमध्ये लग्न लावण्याची पद्धत होती. त्यामुळे क्लिओपात्रेने तिच्या भावाशी लग्न केलं.
फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ ग्रॅन्डे डो सुल या विद्यापीठात प्राचीन इतिहासात डॉक्टरेट करणाऱ्या प्रिस्किला स्कोविल सांगतात की, "त्या काळात भाऊ आणि बहिणीने लग्न करणं सामान्य होतं. टोलेमी राजघराणं सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना ठार करायचे. या संघर्षात क्लिओपात्रेला तिच्याच मृत्यूसाठी जबाबदार धरणं सोपं असलं तरी ते अन्यायकारक होतं."
या राजघराण्यात एकूण सात क्लिओपात्रा आणि 15 टॉलेमी होते.
या वंशाची स्थापना पहिल्या टॉलेमीने केली. तो अलेक्झांडर द ग्रेटच्या प्रमुख सेनापतींपैकी एक होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर टॉलेमीने इजिप्तवर आपली सत्ता प्रस्थापित केली. अलेक्झांडरच्या मृत्यूवेळी त्याचं साम्राज्य ग्रीसपासून भारतापर्यंत विस्तारलं होतं.
इसवीसन पूर्व 280 मध्ये दुसऱ्या टॉलेमीने अलेक्झांड्रियामध्ये 140 मीटर उंचीचे दीपगृह बांधले. त्या काळात ते सातवं आश्चर्य म्हणून गणलं जायचं कारण या दीपगृहाचा प्रकाश 50 किलोमीटर अंतरावरून दिसायचा.
इसवीसन पूर्व 51 मध्ये बाराव्या टॉलेमीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर क्लिओपात्रा आणि तिचा दहा वर्षांचा धाकटा भाऊ तेरावा टोलेमी संयुक्तपणे राज्यावर आले.
धाकटा भाऊ परंपरेप्रमाणे क्लिओपात्राचा नवराही होता. इसवीसन पूर्व 47 मध्ये तिने तिच्या दुसऱ्या भावाबरोबर म्हणजेच चौदाव्या टॉलेमी बरोबर लग्न केलं. तेव्हा ती बारा वर्षांची होती.

फोटो स्रोत, Getty Images
या दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इजिप्त सोडताना नाईलच्या पाण्यातून बाहेर पडता न आल्याने तेराव्या टॉलेमीचा बुडून मृत्यू झाला. चौदाव्या टॉलेमीला बहिणीनेच विष घालून मारल्याचं म्हटलं जातं.
फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सांता कॅटरिनामध्ये जागतिक इतिहासात डॉक्टरेट करणाऱ्या रायसा सग्रेडो सांगतात की, "क्लिओपात्रेच्या हातात सत्ता आली त्या घडीला देश कर्जबाजारी झाला होता. ती जिवंत असेपर्यंत इजिप्शियन सार्वभौमत्वाची लढाई सुरू होती. शेवटी क्लिओपात्रेच्या मृत्यूनंतर या देशात रोमन सत्ता प्रस्थापित झाली."
हॉलिवूडपटांमध्ये क्लिओपात्राची प्रतिमा उभी करताना पुरुषांना भुरळ घालणारी, त्यांना उध्वस्त करणारी स्त्री अशी दाखवण्यात आलीय. पण ही प्रतिमा हॉलिवूडपटांनी स्वतः उभी केलेली नसून ग्रीको-रोमन इतिहासकारांनी तिची तशी प्रतिमा तयार केलीय.
क्लिओपात्रेच्या मृत्यूनंतर बरीच शतकं लोटल्यावर मग तिच्याविषयी लिहिण्यात आलंय. ती अत्यंत कुशल रणनीतीकार होती, मात्र तिची प्रतिमा झाकोळली गेली ती मोहपाशात अडकवणाऱ्या तिच्या स्वभावामुळे. तिने रोमन गव्हर्नर मार्क अँटोनीला लष्करी युद्धासाठी पैसे पुरवले होते.

फोटो स्रोत, BP Average
ग्रीक प्लुटार्कने क्लिओपात्रेबद्दल बरंच काही लिहून ठेवलंय.
त्याने रोमन गव्हर्नर मार्क अँटनीचंही चरित्र लिहिलंय, यात त्याने क्लिओपात्रेला ‘भ्रष्ट बाई’ म्हटलंय. असं म्हणणारा प्लुटार्क एकटाच नव्हता.
इतिहासकार प्रॉपर्टियस आणि होरेस यांनी सुद्धा क्लिओपात्रेचं वर्णन ‘क्रूर राक्षसी’ असं केलंय. लुकान नावाच्या इतिहासकाराने तिला ‘इजिप्तवरचा डाग’ असं म्हटलंय.
दोन्ही भावांशी लग्न आणि पराक्रम
क्लिओपात्रा चर्चेत होती ते तिच्या दोन्ही भावांसोबत लग्न केल्याने. पण ती इतिहासात अजरामर होण्याची इतरही कारणं आहेत.
हुकूमशहा ज्युलियस सीझर आणि क्लिओपात्राचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी लग्न केलं. सीझरच्या मृत्यूनंतर रोमन गव्हर्नर अँटनी याच्याशीही तिचे प्रेमसंबंध जुळले.
सांता कॅटरिना फेडरल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक फॅबियो मोरालेस सांगतात की, "इसवीसन पूर्व पहिल्या शतकाच्या शेवटी रोम हे भूमध्य प्रदेशातील सर्वात मोठं साम्राज्य होतं, तर इजिप्त स्वतंत्र राज्य होतं."

फोटो स्रोत, Getty Images
फॅबियो मोरालेस सांगतात की, "क्लिओपात्रेने लग्न करण्याची रणनीती स्वीकारली होती. त्याकाळी आपलं साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी बरेच राजे आणि राण्या अशापद्धतीने लग्नाचं धोरण स्वीकारायचे. आधी ज्युलियस सीझर आणि नंतर मार्क अँटोनी यांच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिने इजिप्शियन आणि रोमन राजवंश एकत्र आणला.
क्लिओपात्रा इजिप्तची राणी होती. तिच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वतःसाठी जे काही शक्य प्रयत्न करता येतील ते तिने केले होते."
इसवीसन पूर्व 48 मध्ये क्लिओपात्रा आणि ज्युलियस सीझरची पहिली भेट झाली. त्यावेळी ज्युलियस सीझर 52 वर्षांचा, तर क्लिओपात्रा 19 वर्षांची होती.
धाकटा भाऊ म्हणजेच तेरावा टॉलेमी आणि त्याच्या तीन सरदारांनी क्लिओपात्राला दूर करून राज्य करण्याचं कारस्थान रचलं. या सरदारांमध्ये थिओडोटस, पोथिनस आणि अक्विलास असे तिघेजण होते.
त्याच दरम्यान रोमन सम्राट ज्यूलिअस सीझर अलेक्झांड्रियामध्ये आलेला होता. त्याची मदत घेऊन क्लिओपात्राने आपला नवरा ऊर्फ भावाचं कारस्थान आणि अंतर्गत बंडाळी मोडून काढण्याचं ठरवलं.
ज्यूलिअस सीझरला भेटण्यासाठी क्लिओपात्राने अपोलोडोरस नावाच्या नोकराची मदत घेतली. त्याने क्लिओपात्राला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून ज्युलियस सीझरच्या चेंबरमध्ये नेलं. जेव्हा ते ब्लँकेट उघडलं तेव्हा क्लिओपात्राचं सौंदर्य बघून रोमन सम्राट अवाक् झाला होता.
पुढे सीझर आणि क्लिओपात्राचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नही केले. सीझरपासून तिला मुलगा झाला. याचं नाव टॉलेमी सीझॅरियस (पंधरावा) असं ठेवण्यात आलं.
क्लिओपात्राविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की, तिच्याजवळ प्रियकरांची ‘फौज’ होती. काही ठिकाणी असंही म्हटलं गेलंय की, क्लिओपात्रा बऱ्याच सेक्स पार्टीजमध्ये सहभागी व्हायची.
प्रिस्किला स्कोव्हिल सांगतात की, "क्लिओपात्रा मोहक स्त्री होती. पण ती तिच्या मोहक रूपाने अनेक पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायची असं जे सांगितलं जातं ते अत्यंत चुकीचं आहे. राजकीय कारणांसाठी तिने तिच्या भावांसोबत लग्न केलं. त्यानंतर तिचं नाव ज्युलियस सीझर आणि मार्क अँटोनीशी जोडण्यात आलं. पण ती या दोघांशीही एकनिष्ठ राहिली."
ज्युलियस सीझरसोबतचं तिचं नातं फारच कमी काळासाठी टिकलं. कारण ज्युलियस सीझरच्या मुलाने ब्रुटसने त्याच्या हत्येचा कट रचला होता. इसवीसन पूर्व 44 च्या मार्च महिन्यातील 15 तारखेला सिनेटमध्ये ज्युलियस सीझरची हत्या करण्यात आली.
क्लिओपात्रा काही काळ रोममध्ये होती पण सिझरच्या मृत्यूनंतर तिने इजिप्तला परतण्याचा निर्णय घेतला.
39 व्या वर्षी मृत्यू : आत्महत्या की हत्या?

फोटो स्रोत, Getty Images
ज्युलियस सीझरच्या हत्येनंतर मार्क अँटनी रोममधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून पुढे आला. इसवी सन पूर्व 41 मध्ये तुर्कीच्या टार्ससमध्ये त्याची भेट क्लिओपात्राशी झाली.
जेव्हा मार्क अँटनीने क्लिओपात्रेला पाहिलं तेव्हा ती एखादया ग्रीक देवतेप्रमाणे पोशाख परिधान करून बोटीत बसली होती. तिला पाहताच मार्क अँटनी तिच्या प्रेमात पडला. तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने क्लिओपात्रेच्या सांगण्यावरून तिची धाकटी बहीण आर्सिनोच्या हत्येचा आदेश दिले होते.
बहिणीच्या हत्येनंतर टॉलेमीच्या राजघराण्यात क्लिओपात्रा एकमेव वारसदार उरली आणि इजिप्तच्या सिंहासनावर बसण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला.
ज्युलियस सीझरची पत्नी कॅलपुर्नियाप्रमाणेच मार्क अँटोनीची बायको फुलव्हिया हिनेही आपल्या नवऱ्याच्या क्लिओपात्राशी असलेल्या संबंधांकडे काणाडोळा केला.
क्लिओपात्रा आणि मार्क अँटोनाली तीन मुलं झाली. अलेक्झांडर, सेलेनिया आणि फिलाडेल्फस अशी त्यांची नावं होती. रोमन सैन्यानं जिंकलेलं साम्राज्य इसवी सन पूर्व 34 मध्ये मार्क अँटोनीनं आपल्या या तीन मुलांमध्ये वाटून दिलं.
त्याने क्लिओपात्राला ‘क्वीन ऑफ किंग्ज’ अशी उपाधीही दिली.
अलेक्झांड्रिया दिल्यामुळे संतापलेल्या ऑक्टाव्हियसने मार्क अँटोनीविरोधात युद्ध पुकारलं. इसवी सन पूर्व 31 मध्ये या दोघांच्या आरमारांमध्ये युद्ध झालं. त्यात मार्क अँटोनीचा पराभव झाला. आपलीच तलवार पोटात खुपसून मार्क अँटोनीने प्राणत्याग केला.
ऑक्टाव्हियसच्या सैन्याने अलेक्झांड्रियावर ताबा मिळवला. क्लिओपात्राने त्याला आपल्या मोहपाशात ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो तिला बधला नाही.
क्लिओपात्राची रवानगी तुरुंगात झाली. तिने तिथे इजिप्तमध्ये मिळणारा एक विषारी साप स्वतःला डसून घेतला. वयाच्या 39 व्या वर्षी, इसवी सन पूर्व 30 मध्ये तिचा मृत्यू झाला.
तेव्हापासून आजपर्यंत इजिप्तवर 21 वर्षं राज्य करणाऱ्या या राणीची कबर नेमकी कुठे आहे, हे कोणालाही कळलेलं नाहीये.
"क्लिओपात्राची कबर हे पुरातन काळातील एक रहस्य आहे", फ्लुमिनन्स फेडरल युनिव्हर्सिटी (UFF) मधील इतिहासकार आणि नॅशनल म्युझियम इजिप्तोलॉजी लॅबोरेटरी (UFRJ) मधील संशोधक जिसेला शापो सांगतात.
"सर्वाधिक स्वीकृत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ती फारोस बेटावरील देवी आयरिसच्या मंदिरात होती. हे संपूर्ण बेट, तसेच अलेक्झांड्रियाचे दीपगृह, 1375 मध्ये झालेल्या भूकंपात समुद्राने गिळंकृत केले होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








