शाहजहान बादशहाचे आपली मुलगी जहाँआराशी संबंध इतके वादग्रस्त का होते?

शाहजहान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

मुघल बादशाह शहाजहान त्याची सर्वांत मोठी मुलगी जहाँआरासोबत बुद्धिबळ खेळत होता, तेव्हा मुमताज महलच्या कक्षातून एक हरकारा धावत आला आणि मलिका मुमताज महलची तब्येत बिघडल्याची बातमी त्याने दिली.

जहाँआरा धावत आपल्या आईकडे गेली आणि धावत परत आपल्या वडिलांकडे आली. आईला असहनीय प्रसववेदना होत असून मूल तिच्या पोटातून बाहेरच पडत नाहीये, असं तिने शहाजहाँला सांगितलं.

शाहजहानने त्याचा जवळचा मित्र हकमी आलिम-अल-दीन वझीर खाँ याला बोलावून घेतलं, पण त्याला मुमताज महलच्या वेदना कमी करता आल्या नाहीत.

विख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी 'स्टडीज् इन मुघल इंडिया' या पुस्तकामध्ये कवी कासिम अली आफ्रिदीच्या आत्मकथेतील भाग उर्द्धृत करताना म्हटलं आहे की, "आपल्या आईची मदत करता येत नसल्यामुळे असहाय झालेल्या जहाँआराने गरीबांना रत्नं वाटायला सुरुवात केली. असं केल्यावर ईश्वर आपली प्रार्थना ऐकून आईला बरं करेल, अशी आशा तिला होती. दुसरीकडे शहाजहाँदेखील रडायचा थांबत नव्हता. त्याच्या डोळ्यांमळून अश्रूपात होत होता. तेव्हाच मुमताज महलच्या गर्भातून एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला."

मुमताजची इच्छा

सरकार लिहितात, "बाळाने गर्भातच रडायला सुरुवात केली, तर आईचा जीव वाचणं अशक्य असतं, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मुमताज महलने बादशाह शाहजहानला जवळ बोलावलं, स्वतःच्या चुकांबद्दल माफी मागितली, आणि तिची अखेरची इच्छा व्यक्त केली. शक्य असल्यास ही इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करावा, असं ती म्हणाली. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाईल, असं बादशाहने स्वतःची शपथ घेऊन सांगितलं. यानंतर मुमताज म्हणाली, मी मेल्यानंतर जगात कुठेच बांधली गेली नसेल अशी समाधी बांधावी."

पुस्तक

फोटो स्रोत, IRA MUKHOTY

जदुनाथ सरकार लिहितात, "यानंतर लगेचच गौहर आराचा जन्म झाला आणि मुमताजने कायमचे डोळे मिटले."

शाहजहान या धक्क्यातून कधीच सावरू शकला नाही, असं अनेक इतिहासकारांनी नमूद केलं आहे. डब्ल्यू. ई. बेगली व झेड. ए. देसाई यांनी 'शहाजहाँनामा ऑफ इनायत खान' या पुस्तकात लिहिलं आहे की, "शाहजहानने संगीत ऐकणं सोडून दिलं आणि तो पांढरे कपडे घालू लागला. रोज रडत राहिल्याने त्याचे डोळे कमकुवत झाले आणि तो चश्मा लावू लागला. आधी त्याच्या डोक्यावर एखादा पांढरा केस दिसला तरी तो लगेच असा केस उचकटून घेत असे, पण मुमताज मरण पावल्यानंतर आठवड्याभरात त्याचे डोक्यावरचे व दाढीचे केस पांढरे झाले."

जहाँआरा व मुलगा दारा शिकोह यांचा आधार

यानंतर शाहजहान त्यांची सर्वांत मोठी मुलगी जहाँआरा व मुलगा दारा शिकोर यांच्या आधारे जगू लागले. जहाँआराचा जन्म 2 एप्रिल 1614 रोजी झाला होता. शहाजहान यांच्या दरबारातील एका मंत्र्याची पत्नी हरी खानम बेगम यांनी तिला शाही जीवनाचे रितीरिवाज शिकवले. जहाँआरा विलक्षण सुंदर होती आणि विदुषीदेखील होती. तिने फार्सीमध्ये दोन ग्रंथ लिहिले होते.

शाहजहान आणि मुमताज महल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहजहान आणि मुमताज महल

1648 साली उभ्या राहिलेल्या शाहजहानाबादमधील 19 इमारतींपैकी पाच इमारती जहाँआराच्या देखरेखीखाली बांधल्या गेल्या होत्या. सूरत बंदरातून मिळणारा संपूर्ण कर तिच्या वाट्याचा असे. तिचं स्वतःचं 'साहिबी' नावाचं जहाज होतं आणि डच व इंग्रजांशी व्यापार करण्यासाठी हे जहाज समुद्रापार प्रवास करत असे.

दारा शिकोह

फोटो स्रोत, DARA SHIKOH A MAN WOULD BE A KING

फोटो कॅप्शन, दारा शिकोह

विख्यात इतिहासकार आणि 'डॉटर्स ऑफ द सन'च्या लेखिका इरा मुखौटी सांगतात, "मी मुघल स्त्रियांवर संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की, आज आपण ज्या भागाला पुरानी दिल्ली म्हणतो त्या शाहजहानाबादची रचना जहाँआराच्या देखरेखीखाली झाली होती. त्या काळातील सर्वांत सुंदर बाजारपेठ असणारा चांदनी चौकही तिच्यामुळेच अस्तित्वात आला. त्या काळातील दिल्लीमधील ती सर्वांत महत्त्वाची स्त्री होती तिला मानही दिला जात असे. पण त्याच वेळी ती चांगलीच चलाख होती. दारा शिकोह व औरंगजेब यांच्यात हाडवैर होतं. तेव्हा जहाँआराने दारा शिकोहची बाजू घेतली. पण औरंगजेब बादशाह झाल्यानंतर त्याने जहाँआरा बेगमला पादशाह बेगम केलं."

सर्वांत सुसंस्कृत स्त्री

मुघल काळातील सर्वांत सुसंस्कृत स्त्रियांमध्ये जहाँआरा बेगमची गणना केली जाते. तिचं त्या काळातील वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये होतं. आज ही रक्कम दीड अब्ज रुपये इतकी होईल.

लाल किल्ला

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE

फोटो कॅप्शन, शहाजहान काळातला लाल किल्ला

मुघल प्रजादेखील तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. इतिहासकार राना सफावी सांगतात, "ती शहजादी होती, शाहजहानची मुलगी होती किंवा औरंगजेबाची बहीण होती, एवढीच तिची ओळख नाही. ती तिच्या काळातील एक परिपूर्ण व्यक्तिमत्व होती. ती केवळ 17 वर्षांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला आणि तिला पादशाह बेगम करण्यात आलं. त्या काळी कोणत्याही स्त्रीसाठी हे सर्वोच्च स्थान होतं. ही पादशाह बेगम स्वतःच्या पोरक्या भावाबहिणींचा सांभाळ करत होती, पत्नीच्या निधनाने शोकाकुल झालेल्या वडिलांना आधार देत होती."

1644 साली जहाँआराला एका अत्यंत मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं. किल्ल्यामध्ये ती चालत असताना जवळच लावलेल्या मशालीने तिच्या कपड्यांना आग लागली आणि या अपघातामुळे 11महिने तिला पलंगाला खिळून राहावं लागलं होतं.

मुघलकाळातील अनेक गोष्टींबाबत विस्तृत अभ्यास केलेले आसिफ खाँ देहलवी म्हणतात, "तो जहाँआराचा वाढदिवस होता. तिने रेशमाचा पोशाख घातला होता. ती सेविकांसोबत बाहेर आली तेव्हा तिथल्या एका मशालीची ज्वाळा तिच्या पोशाखाच्या कडेला लागली आणि शहाजादीच्या कपड्यांना आग लागली."

जहाँआरा गंभीररित्या भाजली

खाँ देहलवी लिहितात, "सेविकांनी जहाँआराच्या अंगावर कांबळी फेकन कशीबशी आग विझवली. पण जहाँआरा गंभीररित्या भाजली होती. मथुरेतील वृंदावन इथे एक साधू राहतो, त्याने दिलेली विभुती जखमांवर लावली तर जखमा लगोलग भरून येतात, असं कोणीतरी सांगितलं. या उपायाने जहाँआराला बरं वाटायचं, पण काही दिवसांनी जखमा पुन्हा डोकं वर काढत."

देहलवी म्हणतात, "मग एका ज्योतिषाने शाहजहानला सांगितलं की, जहाँआरा बेगमला कोणीतरी शाप दिलेला आहे, त्यातून तिला क्षमा मिळायला हवी. अलीकडे कधी जहाँआराने कोणाला शिक्षा सुनावली होती का, असं ज्योतिषाने तिच्या सेविकांना विचारलं. तेव्हा असं कळलं की, एक शिपाई जहाँआराच्या एका सेविकेवर नजर ठेवून होता, तेव्हा त्याला हत्तीच्या पायाखाली ठेचून ठार करण्यात आलं. ही बाब लक्षात आल्यावर शिपायाच्या कुटुंबीयांकडून माफीनामा लिहून घेण्यात आला आणि त्यांना काही पैसे देण्यात आले. यानंतर जहाँआला बरी झाली. त्या वेळी शहाजहाँने आपल्या कोषागाराची दारं उघडून लोकांना पैसा वाटला होता."

शाहजहानच्या सत्ताकाळात जहाँआराला इतकं उच्च स्थान प्राप्त झालं होतं की सर्व महत्त्वाचे निर्णय तिच्या सल्ल्याने घेतले जात असत. त्या काळी भारतात येऊन गेलेल्या पाश्चात्त्य इतिहासकारांनी 'गावगप्पां'ची नोंद केलेली सापडते. त्यानुसार, शहाजहाँ व त्यांची मुलगी जहाँआरा यांच्या अवैध संबंध असल्याचंही बोललं जात असे.

सामर्थ्यवान मुघल बेगम

इरा मुखौटी सांगतात, "पाश्चात्त्य प्रवासी भारतात येत असत तेव्हा त्यांना इथल्या सामर्थ्यवान मुघल बेगम बघून आश्चर्य वाटायचं. त्या काळी इंग्रज स्त्रियांना इतके अधिकार नसायचे. भारतात मात्र बेगम स्त्रिया व्यापार करायच्या आणि त्यांनाही कोणत्या वस्तूंचा व्यापार करावा याबद्दल हुकूम द्यायच्या. हे पाहून असे प्रवासी चकित व्हायचे. त्यामुळेच जहाँआराचे शाहजहानशी गैरसंबंध असतील, असं त्यांना वाटत होतं. शाहजहानची मुलगी खूप सुंदर आहे, असंही या प्रवाशांनी नमूद करून ठेवलं आहे. पण त्यांना जहाँआराकडे पाहायची संधी कधी मिळाली असेल, असं मला वाटत नाही. शाहजहानचे त्याच्या मुलीशी अवैध संबंध असतील, म्हणूनच तिला एवढे अधिकार मिळालेत, असा या मंडळींचा समज झाला होता."

फ्रेंच इतिहासकार फ्रांस्वा बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "जहाँआरा खूप सुंदर होती आणि शाहजहान तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा. जहाँआरा स्वतःच्या वडिलांची इतकी काळजी घ्यायची की शाही भोजनामध्ये वाढले जाणारे सर्व पदार्थ जहाँआराच्या नजरेखाली शिजवले जात असत."

बर्नियर लिहितात, "शाहजहानचे स्वतःच्या या मुलीसोबत अवैध संबंध असल्याचं त्या काळी सर्वत्र बोललं जात असे. स्वतः लावलेल्या झाडाची फळं चाखायचा अधिकार बादशाहाला आहेच, असंही काही दरबारी मंडळी पुटपुटत असत."

इतिहासकार निकोलाओ मनुची मात्र या प्रतिपादनाचं खंडन करतात. बर्नियर यांचं म्हणणं पूर्णतः पोकळ आहे, असं ते म्हणतात. पण जहाँआराचे काही प्रियकर तिला लपूनछपून भेटायला येत असत, हेही मनुची नमूद करतात.

मनुची यांच्या मुद्द्याची पुष्ट करत राना सफावी म्हणतात, "फक्त बर्नियर यांनीच शाहजहान व जहाँआरा यांच्यातील अवैध संबंधांचा मुद्दा नोंदवलेला आहे. ते औरंगजेबासोबत होते आणि दारा शिकोहवर नाराज होते. अशा संबंधांची चर्चा केवळ गावगप्पांसारखीच आहे, चुकीची आहे, असं तेव्हाही म्हटलं जात होतं. मुघल उत्तराधिकाऱ्याच्या स्थानासाठी सुरू असलेल्या लढाईत बर्नियर औरंगजेबाची बाजू घेत होते, तर जहाँआरा दारा शिकोहच्या बाजूला होती, त्यामुळे बर्नियरने अशा तऱ्हेच्या अफवा पसरवल्या. एखाद्या स्त्रीला खाली खेचायचं असेल, तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची ही परंपरा खूप पूर्वीपासून सुरू आहे."

जहाँआरा आयुष्यभर अविवाहित राहिली, याबद्दलही अनेक तर्कवितर्क लढवले जातात. तिला तिच्या तोडाचा कोणी माणूस मिळाला नाही, असा एक तर्क आहे.

आसिफ खाँ देहलवी म्हणतात, "बादशाह हुमायूँपर्यंत मुघल राजकुमारींच्या विवाहांचे उल्लेख सापडतात. बादशाह अकबरानेही त्याच्या सावत्र बहिणीचं लग्न अजमेर जवळच्या एका प्रांतातील सत्ताधीशाशी लावून दिलं होतं. अकबराच्या या मेव्हण्याने त्याच्या विरोधात बंड केलं. त्या वेळी मुघल शहाजाद्यांमध्ये आधीच बादशाह होण्यासाठी स्पर्धा लागलेली असायची."

सत्तास्थानासाठीच्या स्पर्धेत मुलींचं स्थान

देहलवी सांगतात, "आता या स्पर्धेत जावईसुद्धा सहभागी झाले, तर मुघल साम्राज्याचं काय होईल, असा विचार अकबराने केला होता. दुसऱ्या मुघल बादशाहांचं स्थान इतकं उंचावत गेलं होतं की आपल्या मुलींचं लग्न कुठल्या घराण्यात लावावं ही त्यांच्या समोरची एक व्यावहारिक अडचण होऊन गेली. बादशाहाच्या तोडीसतोड स्थान कोणाचं असणार? त्याने कोणाला आपली मुलगी दिली तर त्या माणसाचं स्थानही उंचावणार, त्यामुळे भविष्यात तो माणूस मुघल साम्राज्याला आव्हान देण्याचीही भीती वाढणार. तर, जहाँआरा बेगमचं स्थान खूप उच्चस्तरीय होतं, तिच्या पात्रतेचा वर मिळाला नाही."

औरंगजेब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, औरंगजेब

दारा शिकोह व औरंगजेब मुघल साम्राज्याच्या उत्तराधिकारी पदासाठी भांडत होते, तेव्हा जहाँआरा दारा शिकोहच्या बाजूने होती. या संघर्षात दारा शिकोहचा पराभव झाला, तेव्हा तिने औरंगजेबासमोर एक प्रस्ताव मांडला की, शहाजहाँचे चार मुलगे आणि औरंगजेबाचा सर्वांत मोठा मुलगा यांच्यात मुघल साम्राज्याची वाटणी करावी.

या योजनेनुसार पंजाब दाराला मिळणार होता, गुजरात मुरादला, बंगाल शाहशुजाला आणि दख्खनचा भाग औरंगजेबाचा सर्वांत मोठा मुलगा सुलताना मोहम्मद याला मिळणार होता. उर्वरित संपूर्ण हिंदुस्थानवर औरंगजेबाचं राज्य असणार होतं आणि बुलंद इक्बाल ही उपाधीही त्यालाच मिळणार होती. परंतु, औरंगजेबाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्याने शहाजहाँला आग्र्यातील किल्ल्यामध्ये नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपण वडिलांसोबत राहू असं जहाँआराने सांगितलं.

ताजमहाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ताजमहाल

आसिफ खाँ देहलवी म्हणतात, "मुमताज महल मृत्युशय्येवर असताना तिने शाहजहानसोबतच आपली सर्वांत मोठी मुलगी जहाँआराला जवळ बोलावलं आणि तिचा हात हातात घेऊन एक वचन मागितलं. आपल्या वडिलांना ती कायम आधार देईल, असं वचन जहाँआराने तिच्या आईला दिलं."

वादांनी वेढलेली जहाँआरा

देहलवी म्हणतात, "इतिहास बाजूला ठेवला आणि जच्या संदर्भात या गोष्टीचा विचार केला, तर आपल्या मरणशय्येवरील आईला दिलेलं वचन जहाँआराने पाळलं, असं म्हणता येतं. दारा शिकोह व औरंगजेब यांच्यातील लढाईवेळी जहाँआराने शाहजहानला विचारलंही होतं की, तुम्ही औरंगजेबाविरोधात दारा शिकोहला साथ का देत आहात. यात दारा शिकोहचा विजय झाला तर हा सिंहासनावरील विजय मानला जावा का?"

देहलवींच्या म्हणण्यानुसार, "शाहजहानने याचं उत्तर होकारार्थी दिलं. या लढाईत दारा हरला, तर शहाजहाँ यांनी सिंहासनावरील हक्क गमावले, असं मानावं का, असं जहाँआराने परत विचारलं. यावर शाहजहान काहीच बोलला नाही. औरंगजेबाने त्याला आग्र्यातील किल्ल्यावर नजरकैदेत ठेवलं, आणि तो त्याच्या वडिलांना ज्या रितीने वागवायचा, ते बघता आपण आपल्या वडिलांची साथ सोडायला नको, असं जहाँआराला वाटलं. एवढं सगळं होऊनदेखील दारा शिकोह व शहाजहाँ यांच्याप्रमाणेच औरंगजेबही जहाँआराला तितकाच मान देत असे."

शाहजहानचं निधन झाल्यावर, दारा शिकोहची बाजू घेतलेली असतानाही जहाँआराला औरंगजेबाने पादशाह बेगम हे स्थान दिलं. या संदर्भात इरा मुखौटी सांगतात, "उत्तराधिकाऱ्याच्या स्थानावरून झालेल्या संघर्षात औरंगजेबाची धाकटी बहीण रोशनारा बेगम त्याच्या सोबत होती, परंतु औरंगजेबाने मोठी बहीण जहाँआरा बेगम हिला पादशाह बेगम केलं. आपल्याला हक्काचं स्थान मिळालं नाही, अशी तक्रार रोशनारा बेगम आपल्या भावाकडे कायमच करत राहिली."

इरा म्हणतात, "जहाँआरा पादशाह बेगम झाल्यावर तिला किल्ल्याबाहेर एक सुंदर हवेली देण्यात आली, तर औरंगजेबाने रोशनारा बेगमला किल्ल्याच्या अंतःपुरातून बाहेर पडायची परवानगी दिली नाही. त्याचा रोशनारा बेगमवर पूर्ण विश्वास नसावा, असं वाटतं. कदाचित रोशनारा बेगमचे काही प्रियकर असतील, आणि त्याची कुणकुण औरंगजेबाच्या कानावर गेली असेल, अशीही शक्यता आहे."

सप्टेंबर 1681मध्ये 67 वर्षांच्या जहाँआराचं निधन झालं. औरंगजेब अजमेरहून दख्खनेकडे रवाना झाला असताना ही बातमी त्याच्यापर्यंत पोचली. जहाँआराच्या मृत्यूचा शोक म्हणून त्याने शाही काफिला तीन दिवस थांबवून ठेवला.

जहाँआराला तिच्या इच्छेनुसार दिल्लीतील निजामुद्दीन औलिया यांच्या कबरीजवळ दफन करण्यात आलं.

राना सफवी म्हणतात, "आपली कबर खुली असावी, तिचं पक्कं बांधकाम केलं जाऊ नये, असं जहाँआराने इच्छापत्रात लिहिलं होतं. मुघल इतिहासात केवळ औरंगजेब व जहाँआरा या दोघांच्याच कबरी पक्क्या बांधलेल्या नाहीत, त्या अतिशय सर्वसाधारण दिसतात. आजही जहाँआरा त्या कबरीमध्ये अस्तित्वात आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)