ख्रिसमस : 'सांताक्लॉज’ला कुठे पुरण्यात आलंय, त्याचे अवशेष आयर्लंडला कसे पोहोचले?

सांता क्लॉज

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, एस.जे. वेलास्क्वेझ
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

मेव्ह आणि जो कॉनेल यांच्या कुटुंबियांच्या घरात संत निकोलस चर्च टॉवरचे अवशेष आहेत. 13 व्या शतकातील या अवशेषांमध्ये एक स्मशानभूमी देखील आहे, जी हिरव्यागार कुरणांच्या आणि टेकड्यांच्या बरोबर मध्यभागी आहे.

या स्मशानभूमीत पुरण्यात आलेली बहुतेक लोक या मालमत्तेच्या सुरुवातीच्या रहिवाशांपैकी आहेत आणि स्थानिक लोकांच्या मते, मायरा येथील संत निकोलस यांची समाधीदेखील या लोकांमध्ये आहे.

होय, तुम्ही बरोबर ओळखलंत, तेच संत निक, ज्यांना सांताक्लॉज या पात्राचा प्रणेता मानलं जातं आणि असं देखील म्हटलं जातं की त्यांच्या दान करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनाच सांताक्लॉज मानलं जायचं.

आजघडिला ओ कॉनेल हे जोरपॉइंट पार्कचे एकमेव मालक आहेत आणि इथे राहणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत.

120 एकरांवर पसरलेलं हे 12 व्या शतकातील मध्ययुगीन शहर आयर्लंडच्या किलकेनी शहराच्या दक्षिणेपासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे.

नोर आणि लिटिल एरिंगल नद्या जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी हे शहर वसलेलं आहे आणि असं मानतात की, 1160 साली आयर्लंडमध्ये आलेल्या नोरमंस लोकांनी या प्रदेशात वस्त्या स्थापन केल्या होत्या.

शहर कसं होतं आणि लोक कुठे गायब झाली?

आयर्लंडच्या हेरिटेज कौन्सिलच्या एका संरक्षण योजनेनुसार या शहरामध्ये 15 व्या शतकात आणखी सुधारणा करण्यात आल्या. पुरातत्वीय पुरावे असं दर्शवतात की या काळात घरं, एक बाजार, एक टॉवर, एक पूल, रस्ते, एक गिरणी, एक पाणी व्यवस्थापन यंत्रणा आणि जेरपॉईंट अॅबे देखील बांधण्यात आला. जेरपॉईंट अॅबे आजही तिथे दिमाखात उभा आहे.

मात्र, 17 व्या शतकात या शहरातील लोकं गायब झाले. हिंसक हल्ले किंवा साथीच्या आजारामुळे लोकं इथून निघून गेल्याचा अंदाज आहे.

पण मग असं कसं घडलं की, संत निकोलस यांची स्मशानभूमी म्हटल्या जाणा-या या शहराचं एका झपाटलेल्या शहरातून खाजगी मालमत्तेत कसं परिवर्तन झालं आणि नंतर याबद्दल बरंच गूढ निर्माण झालं. खरंतर, ओ कॉनेल यांच्यासह स्थानिक विचारवंतच याबाबत अधिक माहिती देऊ शकतात.

ख्रिसमस

फोटो स्रोत, Getty Images

ही मालमत्ता दाखवत असताना, मेव्ह आणि त्यांच्या टीमने आम्हाला सांगितलं की इथे अनादी काळापासून प्रसिद्ध व्यक्तीचा (संत निक) वावर राहिलाय. आम्हाला त्यांनी चर्चच्या स्मशानभूमीत दगडावर कोरलेली एक आकृती दाखवली. या आकृतीमध्ये संत निक समोर बघत आहेत आणि त्यातून त्यांचा दानशूर स्वभाव दिसून येतो.

मेव्ह म्हणतात की, “ते वस्तूंचं वाटप करतायत.’

सांताक्लॉज आणि संत निक एकच आहेत का?

खरंतर याकडे परोपकाराचं लक्षण म्हणून पाहिलं जाऊ शकतं आणि असं मानलं जातं की, सांताक्लॉज, क्रिस क्रिंगल, फादर ख्रिसमस आणि संत निक हे एकाच नावाचे लोक होते जे भेटवस्तू देत असत.

धार्मिक श्रद्धा म्हणून हेसुद्धा मानलं जातं की, सांताक्लॉज जिवंत आहेत आणि जे लोक त्यांना मानतात त्यांच्या ह्रदयात आजही ते घर करून आहेत. मात्र मायरा येथील संत निकोलस हेच या ऐतिहासिक पात्रामागची प्रेरणा होते.

संत होण्यापूर्वी निकोलस हे प्राचीन रोमन शहर पटारा येथे अनाथ मूल म्हणून जन्माला आले होते. व्हॅटिकन वृत्तवाहिनीनुसार, त्यांनी आपली संपूर्ण मालमत्ता गरजू, आजारी आणि गरीब लोकांना दान केली होती.

त्यानंतर आजघडिला आधुनिक तुर्कीचा भाग असलेल्या मायराचे ते बिशप झाले. ज्या 325 साली येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून घोषित करण्यात आलं त्याच वर्षी ते काऊंसिल ऑफ नायसियाचे बिशप झाले. 6 डिसेंबर 343 रोजी संत निकोलसचे मायरा इथे निधन झालं. तरी आजही संत निकोलस यांच्या समाधीस्थळावरून विद्वानांमध्ये संभ्रम असल्याचं दिसतं.

ख्रिसमस

फोटो स्रोत, Peter Horee/Alamy

काही लोकांना असं वाटतं की, त्यांची समाधी तुर्कीमधील अंतालया इथल्या संत निकोलस चर्चमध्ये आहे. काहींचा दावा आहे की, त्यांचा मृतदेह चोरीला गेला आणि इटलीतील बारी येथे पुरण्यात आला. असंही मानलं जातं की, त्यांचा मृतदेह इटलीतील बॅसिलिका डी सॅन निकोला चर्चच्या तळघरामध्ये पुरण्यात आला होता.

तर दुसरीकडे लोकं असंही म्हणतात की संत निक यांचे अवयव त्यांच्या शरीरातून काढून घेण्यात आले होते आणि विकले होते किंवा लोकांना भेटवस्तू म्हणून देण्यात आलेले.

अवशेष आयर्लंडला कसे पोहोचले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संत निकोलस यांच्या खांद्याच्या पाठीमागून दोन पुरुष डोकावत असल्याचं मेव्ह एका पुतळ्याकडे इशारा करत दाखवतात. ज्यामध्ये असं दिसतंय की दोन धर्मयोद्धे सेंट निकोलस यांचा मृतदेह तुर्कीहून इटलीला सुरक्षितपणे ठेवण्यासाठी घेऊ जात आहेत, असं त्यांनी विस्ताराने सांगितलं.

या मोहिमेदरम्यान योद्ध्यांनी संतांचे काही अवशेष आयर्लंडमध्ये आणले आणि त्यांना न्यूटाऊन जेरपॉईंट येथील संत निकोलस चर्चमध्ये पुरण्यात आलं आणि नंतर ते चर्चच्या स्मशानभूमीत पुरले गेले, असंही त्या सांगतात.

मेव्ह आणि जो इथे कसे आले याबद्दलही त्या सांगतात. त्या सांगतांत की 16 वर्षांपूर्वी त्या जेरपॉईंट पार्कमध्ये आल्या होत्या. "आम्ही केवळ आयर्लंडमध्येच नाही तर ब्रिटीश बेटांवरील निर्जन शहरांमधील काही जागा देखील विकत घेतल्या आहेत.”, असं त्या म्हणाल्या.

जेरपॉईंट पार्कच्या जमिनीवर अजूनही शेती केली जाते आणि ती एक 'व्हर्जिन साइट' आहे कारण त्यातील बहुतांश प्रदेशाला अद्याप भेट देण्यात आलेली नाही, असंही मेव्ह म्हणाल्या. पण काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गोंधळ माजला होता.

ख्रिसमस

फोटो स्रोत, SJ Velasquez

आयर्लंडचं इमिग्रेशन वस्तुसंग्रहालय ‘एपिक’ मधील प्रदर्शन आणि कार्यक्रमांचे प्रमुख नॅथन मॅनियन म्हणतात, “वर्तमानातील समाधीचं स्थान त्यांचं मूळ स्थान नाहीए. त्यांना 1839 मध्ये इथे आणण्यात आलं होतं.

मॅनिअन स्वतः मूळचे काउंटी किलकेनीचे आहे आणि जेरपॉईंट पार्क येथे संत निकच्या समाधीबद्दल अफवा ऐकतच मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांची उत्सुकता आणखी वाढली.

ते म्हणतात, "मला नेहमीच इतिहास या विषयात रस होता आणि त्याचकारणाने मी या क्षेत्रात आलो .”

सांताला खरोखरंच इथे पुरण्यात आलंय का?

जेरपॉईंट पार्क समाधीच्या आतमध्ये काय आहे यावर ते म्हणतात की, या कथेबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.

काहींच्या मते इथे संत निकोलस यांचे अवशेष पुरण्यात आले आहेत, तर काहींचं म्हणणं आहे की या समाधीबद्दल असंख्य गैरसमज आहेत आणि खरंतर ती स्थानिक धर्मगुरूंची समाधी आहे.

“1839 मध्ये जेव्हा ही समाधी इथे आणली गेली तेव्हा कदाचित त्यांना त्यामध्ये काय असेल असा प्रश्न पडला असेल.”, असंही ते म्हणाले.

तरी, मेव्हो म्हणतात की, त्यांची समाधी खोदण्याची कोणतीही योजना नाही आणि त्यांचा विश्वास आहे की त्यात संतांचे अवशेष आहेत.

त्या म्हणतात की, “प्रतिमेमध्ये त्यांचे अवशेष दाखवले गेले आहेत, त्यामुळे लोकांना हे ठिकाण महत्त्वाचं वाटतं. कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही एवढा मोठा पुतळा इथे बसवणार नाही. तुम्हाला माहिती आहे की इथे काहीतरी आहे.”

ख्रिसमस

फोटो स्रोत, Carol Di rinizo Cornwell

समाधीवरील पुतळ्याच्या खाली नेमकं काय आहे हे खोदल्याशिवाय कळू शकत नाही, याची मॅनियन यांना चांगली कल्पना आहे. हा श्रद्धेचा विषय असून जगभरात संतांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले असून त्याची खात्री करण्यासाठी डीएनए नमुने तपासणे हा एकमेव मार्ग आहे, असं त्यांचं मत आहे.

ते म्हणतात की, “याच कारणामुळे सांता खरंच आयर्लंडमध्ये आहे की नाही हे मी सांगू शकत नाही आणि मला ते करायचं देखील नाही.”

मेव्ह ख्रिसमसशी संबंधित गोष्टींवर काम करतात आणि जेरपॉईंट पार्कमधील समाधीवर दरवर्षी 10 हजार पर्यटक येतात.

जेरपॉईंट पार्क ही ख्रिसमसशी संबंधित लोकप्रिय जागा नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही जागा कायम खुली नसते, परंतु मेव्ह म्हणतात की पर्यटक जेरपॉईंट पार्कशी संपर्क साधून खाजगी सहलीचा आनंद घेऊ शकतात. जेरपॉईंट पार्कचा बहुतांश भाग डिसेंबरमध्ये खूप शांत असतो.

मेव्ह म्हणतात की त्या स्वत:, जो आणि त्यांची दोन मुलं 6 डिसेंबर रोजी सेंट निकोलस यांचा उत्सव त्यांच्या कुटुंबासोबत अतिशय साध्या पद्धतीने साजरा करतात. ख्रिसमसच्या दिवशी ते आणि त्यांची जवळची लोकं एकत्र येऊन आनंद साजरा करतात.

मेव्ह म्हणतात, “मला ख्रिसमस हा सण खूप आवडतो. हा अतिशय जादुई सण आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)