ख्रिसमस: भारतात नाताळसाठी पहिल्यांदाच तयार झालेल्या केकची गोष्ट

फोटो स्रोत, MAMBALLY FAMILY
- Author, अश्रफ पदान्ना
- Role, प्रतिनिधी, बीबीसी न्यूजसाठी
- Reporting from, त्रिवेंद्रम, केरळ
भारतात ख्रिसमससाठीचा पहिला वाहिला केक बनवण्यामागेही एक रुचकर गोष्ट आहे. केरळच्या प्रकाश मांबली यांनी बीबीसीशी बोलताना ही गोष्ट सांगितली.
ही घटना आहे, नोव्हेंबर 1883 सालची. दक्षिण भारतातील केरळ राज्यात रॉयल बिस्किट फॅक्टरी नावाची एक बेकरी होती.
केरळ मध्ये राहत असलेला मर्डॉक ब्राउन नावाचा एक ब्रिटिश व्यापारी त्या बेकरीत गेला आणि ख्रिसमससाठी केक बनवून द्याल का? अशी विचारणा बेकरी चालक असलेल्या मांबली बापू यांच्याकडे केली.
याच केरळच्या मलबार भागात दालचिनीची लागवड करणाऱ्या स्कॉटने ब्रिटनमधून केकचं सॅम्पल आणलं होतं. त्याने बापूंना केक कसा बनवायचा ते समजावून सांगितलं.
बापू तेव्हाच्या बर्मा आणि आताच्या म्यानमार मध्ये एका बिस्कीट कारखान्यात बिस्कीट आणि ब्रेड बनवायला शिकले होते. पण त्यांनी केक काही बनवला नव्हता. यावेळी मात्र मिस्टर ब्राउनने सांगितल्याप्रमाणे केक बनवून बघू असं बापूंनी ठरवलं.
त्यांनी प्रयोग तर केला मात्र त्यात बऱ्याच सुधारणा करणं गरजेचं होतं.

फोटो स्रोत, SK MOHAN
केकचं मिश्रण हे ब्रॅण्डी मध्ये भिजवायचं होतं, मात्र ब्रॅण्डी मिळाली नाही म्हटल्यावर काजू फळापासून बनवलेली स्थानिक बियर मिक्स करून केक बनवायचं असं बापूंनी ठरवलं. ही बीयर माहेच्या फ्रेंच कॉलनीत मिळते याची माहिती मिस्टर ब्राउनने बापूंना दिली.
सगळ्या स्थानिक पदार्थांचा वापर करून बनवण्यात आलेला प्लम केक एकदम सुग्रास झाला होता. मिस्टर ब्राउनने जेव्हा तो केक पाहिला तेव्हा त्याला तो खूपच आवडला आणि त्याने आणखीन डझनभर केक ऑर्डर केले.
अशा पद्धतीने भारतात ख्रिसमससाठीचा पहिला वाहिला केक बनवण्यात आल्याचं बापूंचे पणतू प्रकाश मांबली सांगतात.
आता ही 'गोष्ट' गोष्टच आहे, ती सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे किंवा कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. मात्र मांबली बापूंनी सुरू केलेली ती बेकरी आजही तेल्लीचेरी (आताच्या थलासेरी) मध्ये आहे.
बापूंच्या मागच्या चार पिढ्या त्यांनी दिलेला वारसा जपतायत आणि या वारशाचा त्यांना अभिमान आहे.

फोटो स्रोत, SK MOHAN
मांबली सांगतात, "बापूंनी ब्रिटिशांच्या रेसिपीज भारतीयांमध्ये लोकप्रिय केल्या. त्यांनी पहिल्या महायुद्धात सैनिकांना केक आणि मिठाई देखील पाठवून दिली होती."
आता मांबली कुटुंबियांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बेकरी आउटलेट सुरू केले आहेत. खाद्यप्रेमींसाठी आणि विशेषतः केक प्रेमी लोकांसाठी मांबली बेकरी म्हणजे आवडतं ठिकाण आहे. थलासेरी इथं जी मूळ बेकरी आहे ती प्रकाश मांबली चालवतात.
त्यांचे आजोबा गोपाल मांबली यांना आईकडून ही बेकरी मिळाली. गोपाल मांबली यांना एकूण 11 मुलं होती. ती सर्वच जणं या कौटुंबिक व्यवसायात सामील झाली.
थलासेरी इथं सुरू झालेला हा छोटासा उद्योग आता वटवृक्षाप्रमाणे ठिकठिकाणी पसरला असल्याचं मांबली सांगतात.
मांबली यांचं वय आज 60 वर्ष आहे. ते बीबीसीशी बोलताना सांगतात, केकचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पारंपारिक पद्धतीनेच मिश्रण तयार करतो.
मांबली यांच्या बेकरीत फक्त पारंपारिक पद्धतीचा केक मिळतो असं नाही. तर त्यांचेकडे बऱ्याच फ्लेवर्सचे केक आहेत. ते सांगतात, "ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही केक बनवतो. आज आमच्याकडे दोन डझनाहून अधिक फ्लेवर्स आहेत."
त्यांच्या पत्नी लिझी प्रकाश सांगतात की त्यांच्या बहुतेक ऑर्डर्स या मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमधून येत असतात.

फोटो स्रोत, MAMBALLY FAMILY
"आम्ही आमचे निवडक फ्लेवर्स त्यांना कुरिअरने पाठवतो."
3 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या केरळ राज्यात जवळपास 18 टक्के लोक ख्रिश्चन आहेत. त्यामुळे केरळ मध्ये ख्रिसमससाठी केकची बाजारपेठ मोठी आहे. केरळ मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बेकरी आणि कॅफेज आहेत.
2020 च्या जानेवारी महिन्यात केरळच्या बेकर्स असोसिएशनने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलंय.
त्यांनी जवळपास 5.3 किमी लांबीचा जगातील सर्वांत लांब केक बनवला होता. याआधी चीनने 3.2 किमी लांबीचा केक बनवून विक्रम केला होता, तो केरळने मोडीत काढला.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोव्हीडमुळे सर्व जग थांबलं होतं. सण साजरे करण्यावर मर्यादा येत होत्या मात्र आता केरळ ख्रिसमससाठी सज्ज आहे.
मांबली यांच्या बेकरीमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून लगबग सुरू झाली होती. त्यांनी केकसाठी लागणारे जिन्नस वाइनमध्ये भिजवण्यास सुरुवात केली होती.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तर सर्व केक तयार होते.
मांबली बीबीसीशी बोलताना सांगतात की, "तरुणांना फ्रेश क्रीम केक आवडतात. याची शेल्फ लाईफ कमी असली तरी या केकला मोठ्या प्रमाणात मागणी असते."
मांबली पुढं सांगतात, ख्रिसमसच्या आदल्या आठवड्यात आमच्या आऊटलेटवर जी गर्दी आणि लगबग सुरू होते, ती जवळपास नवीन वर्ष सुरू होईपर्यंत टिकून असते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








