जेव्हा पुण्यातल्या चर्चसाठी पेशव्यांनी जागा दिली होती

सिटी चर्च पुणे

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/PUNE

फोटो कॅप्शन, सिटी चर्च, पुणे
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

18 वं शतक. छ. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं साताऱ्यात तर कोल्हापूरमध्ये ताराराणी यांचं राज्य होतं. याच शतकात पेशव्यांचा उदय, पानिपतचं युद्ध, निजामाविरुद्ध लढाया, दिल्ली, अटकेपर्यंत स्वाऱ्या झाल्या.

बहुतांश कामकाजासाठी पुण्याला महत्त्व येत गेलं आणि एखाद्या राजधानीसारखं महत्त्व या शहराला प्राप्त झालं. वेगवेगळ्या लोकांचा, विविध जाती-धर्मातील लोकांचा या काळात पुण्यात वावर आणि वस्ती वाढली. व्यापारी आले लोकसंख्याही वाढली.

पण पुण्याच्या पेशव्यांचा आणि पोर्तुगीज धर्मगुरूंचा संबंध कसा आला याची कहाणी एकदम रंजक आहे. तसं पाहायला गेलं तर पेशव्यांचा सर्व धर्मिय लोकांचा आणि त्या धर्मातील देवस्थानांचा संबंध आलेला दिसून येतो. 

सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये पोर्तुगीजांनी भारतात कोचीनमध्ये आपले पाय घट्ट रोवले, मग त्या पाठोपाठ ते गोव्यात आले. त्याच्यानंतर वसई, दमण, मुंबई असे एकेक भाग त्यांनी आधी व्यापार म्हणून मग नंतर प्रशासन म्हणून काबिज केले.

पोर्तुगीज येताना आपला धर्मही भारतात घेऊन आले होते. धर्मप्रसारासाठी त्यांनी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला.

सिटी चर्च पुणे

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC

फोटो कॅप्शन, सिटी चर्च, पुणे

सोळाव्या शतकातच वसईमध्ये, गोव्यात धर्मांतर होण्यास सुरुवात झाली होती. व्यापारासाठी पोर्तुगीजांनी वेगवेगळ्या राजवटी, संस्थानं आणि शहरांशी संपर्क ठेवला होता. त्यामुळे या शहरांशी त्यांचा संपर्क येईच आणि पाठोपाठ ख्रिश्चन धर्मही तेथे जाई.

पुणे शहरात सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, पंचहौद चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट इग्नेशिय चर्चसारखी जुनी चर्च आहेत.

पुण्यातल्या चर्चला जागा

पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध आलेला दिसून येतो. सैनिकी, व्यापारी आणि इतर राजकीय संबंध दोघांत असल्याचे दिसते. एकमेकांचे वकील परस्परांकडे जाणं, पत्रव्यवहार तसेच एकमेकांसदर्भातील घडामोडींवर दोघांचीही बारीक नजर असल्याचं दिसतं.

पेशवाईतील महत्त्वाचा आणि मोठा काळ नाना फडणवीसांद्वारे कारभार चालवला गेला. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांच्याशी असलेल्या संबंधांत त्यांचा मोठा वाटा होता.

डॉम मिंगेल दी नोरोन्हा हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते. गोवा आणि पोर्तुगीज प्रांतातील सैनिक या सैन्यात होते असं सांगितलं जातं.

या ख्रिस्ती सैनिकांच्या धार्मिक गरजांसाठी फादर विन्सेंट जोआकिम मेनेझिस यांची नेमणूक करण्यात आली होती.

नोरोन्हा यांनी आपल्या ख्रिस्तीबांधवांना धार्मिक कार्यासाठी आणि प्रार्थनेसाठी चर्चची गरज असल्याची मागणी केली. त्यानुसार तेव्हा कारभार सांभाळणाऱ्या सवाई माधवरावांनी नाना पेठेतील एक भूखंड या चर्चसाठी दिला. 

सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार, सोबत नाना फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार, सोबत नाना फडणवीस

हे चर्च नाना पेठेत आहे. ही पेठ नाना फडणवीसांनी विकसित केली होती. तिचं मूळ नाव हनुमंत पेठ असं होतं.

'पेशवेकालीन पुणे' या पुस्तकाचे लेखक अ. रा कुलकर्णी लिहितात, ‘1789 च्या सुमारास फिरंगोजी खाडे याच्याकडे या पेठेचे शेटेपण होते. या पेठेत प्रामुख्याने ठोक व्यापाऱ्यांची घरं होती, कंपनी सरकारच्या सुरुवातीच्या काळात या पेठेची वस्ती काहीशी घटली. 1819 साली या पेठेत 2742 लोक राहात होते, पण पुढच्याच वर्षी 1820मध्ये ही संख्या हजाराने कमी झाली.

कुणबी, ब्राह्मण आणि चांभार समाज यांची वस्ती येथे अधिक होती. या पेठेतील देवळांची संख्या 11 होती. मुसलमानांची घोडेपीर नावाची मशीद नथुखान या नाना फडणिसाच्या विश्वासू सेवकाने बांधली होती. नानाच्या स्मरणार्थ या पेठेतून एक ताबूतही निघत असे.’

नाना फडणवीसांचे बंगळुरू येथील संग्रहालयातील चित्र

फोटो स्रोत, KARAN RASKAR/PUNE

फोटो कॅप्शन, नाना फडणवीसांचे बंगळुरू येथील संग्रहालयातील चित्र

1792 साली पेशव्यांनी दिलेल्या जागेवर लहानसे चर्च बांधण्यात आले. त्याला 'अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन' असं नाव मिळालं. त्याला 'सिटी चर्च' असंही म्हटलं जातं.

याचवर्षी या चर्चमधला पहिला नाताळ साजरा झाला. ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी आपल्या 'संस्कृतीची विविध रुपे' या पुस्तकात या चर्चबद्दल माहिती दिली आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “सुरुवातीचे मातीच्या बांधकामाचे हे चर्च पाडून 1852 मध्ये आता वापरत असलेले नवे चर्च बांधण्यात आले. असं म्हणतात की, इथं पुणे शहराचं एक प्रवेशद्वार (क्वार्टरगेट) होतं.”

'पुना गाईड अँड डिरेक्टरी' या पुस्तकात या चर्चचं (जुन्या) वर्णन केलं आहे. या पुस्तकातील वर्णन असं आहे, ‘हे चर्च पांढऱ्या रंगात असून रोमन स्थापत्यशैलीत आहे. त्याचं तोंड सूर्य उगवण्याच्या (पूर्वेच्या) दिशेने आहे. हे चर्च गोव्याच्या आर्चबिशपच्या अधिपत्याखाली आहे. 1794 साली सवाई माधवरावांनी या चर्चला जागा आणि बांधकामासाठी निधी दिला.’

पेशवाईनंतर ब्रिटिशांनी आपले पाय पुण्यात रोवले आणि त्यांनीही या चर्चला मदत सुरू ठेवली. या चर्चच्या परिसरातील स्मशानभूमीत पोर्तुगीज आणि ब्रिटिश सैनिकांची थडगी दिसतात असंही वर्णन या पुस्तकात आहे. 

कामिल पारखे यांनीही या स्मशानभूमीची माहिती 'संस्कृतीची विविध रुपे' या पुस्तकात दिली आहे.

पुण्यातील व्यापाराच्या संधी लक्षात घेता पुण्यात ख्रिस्ती लोकसंख्याही वाढली. या चर्चमध्ये प्रार्थना आणि इतर कार्यासाठी येणाऱ्या ख्रिस्तींची संख्या वाढली. त्यामुळे ती जागा अपुरी पडू लागली.

1842 साली जुनं चर्च पाडायची परवानगी मिळाली आणि 1852 मध्ये सध्या दिसणाऱ्या सिटी चर्चची निर्मिती पूर्ण झाली.

सिटी चर्च, पुणे

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC

फोटो कॅप्शन, सिटी चर्च, पुणे

याच परिसरात डी आयस डी ऑर्नेला या गोव्याच्या आर्चबिशपच्या नावाने ऑर्नेलाज स्कूल आहे. 

पुण्यातील इतिहास अभ्यासक आणि हेरिटेज वॉक आयोजित करणारे संदीप गोडबोले यांनी बीबीसी मराठीला बोलताना सांगितले, “ज्या नाना पेठेत या चर्चची जागा आहे, तेथे अनेक धर्मियांची प्रार्थनागृहे दिसून येतात. चर्चबरोबर अग्यारी आणि सिनेगॉगही इथे आहे. 1810 साली दुसऱ्या बाजीरावांनी दक्षणा वाटप केले त्यात मंदिरं, दर्ग्यांनाही दक्षणा दिल्याचं दिसतं पण या चर्चचा उल्लेख त्यात नाही. या चर्चच्या परिसरात असणाऱ्या ऑर्नेलाज स्कूलचं बोधचिन्ह पाहिल्यास एक विशेष गोष्ट दिसून येते. या बोधचिन्हात शनिवारवाड्याचं चित्र असून त्यात देवनागरीत जरीपटका असं लिहिलं आहे. ही पेशव्यांनी जागेच्या रुपाने दिलेल्या दानाप्रती कृतज्ञता असावी.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)