ख्रिसमस: विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारे मराठी ख्रिश्चन तुम्हाला माहिती आहेत का?

ख्रिसमसः विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारे मराठी ख्रिश्चन तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापारी आणि आक्रमक भारतात येऊ लागल्यापासून भारतातील किनारी प्रांतावरील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, खाद्यसंस्कृती आणि धार्मिक रचनेवरही प्रभाव पडू लागला.

(तत्कालीन) महाराष्ट्रावरही हा प्रभाव दिसून आला. हिंदू धर्मातील अनेक लोकांनी धर्मांतरही करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात साधारणतः किनारपट्टी भागात रोमन कॅथलिक ख्रिश्चन दिसून येतात. हे ख्रिश्चन मुंबई, वसई आणि रायगडमध्ये आढळतात.

15 व्या शतकापासून पोर्तुगीजांच्या प्रभावामुळे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या या समुदायाला ईस्ट इंडियन ख्रिश्चन समुदाय असं म्हटलं जातं. वसई आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहाणाऱ्या समुदायाला कुपारी समुदाय असं म्हटलं जातं.

त्यानंतर मराठी ख्रिश्चन समुदाय म्हणून ओळखला जाणाऱ्या समुदायातील लोक मुख्यत्वे प्रोटेस्टंट पंथाचे पाईक आहेत. अमेरिकन मराठी मिशनद्वारे महाराष्ट्रात ख्रिस्तधर्म प्रसाराचे काम सुरू झाल्यानंतर हा समुदाय उदयाला आला.

यमुनापर्यटन लिहिणारे बाबा पद्मनजी

यमुनापर्यटन ही मराठीमधील पहिले कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी मुळे यांचा जन्म 1831 साली झाला. त्यांचे शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे झाला. त्यांनी 1854 साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

1857 साली त्यांनी यमुनापर्यटन ही कादंबरी लिहिली. स्त्रीविद्याभ्यास निबंध, व्यभिचारनिषेधक बोध, यमुनापर्यटन, सर्वसंग्रही ऊर्फ निबंधमाला हे त्यांचे काही ग्रंथ प्रसिद्ध होते. त्यांनी अरुणोदय या नावाने आत्मचरित्रही लिहिले होते. मराठी साहित्यात आणि मराठी ख्रिस्ती साहित्यामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

शारदासदन स्थापन करणाऱ्या पंडिता रमाबाई

पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव रमाबाई डोंगरे असं होतं. बिपिनबिहारी दास मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. रमाबाई यांनी इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.

रमाबाईंनी शारदासदन या संस्थेची स्थापना 11 मार्च 1889रोजी मुंबईत विल्सन कॉलेजजवळ एका घरात केली. त्यानंतर रमाबाईंनी शारदासदन 1890च्या नोव्हेंबरात पुण्यात नेण्यात आलं.

महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समुदायातील अनेक लोकांनी, समाजसुधारकांनी, साहित्यिकांनी, खेळाडूंनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यापैकी काहींची आपण येथे ओळख करुन घेऊ.

फोटो स्रोत, ANUPAMA UJAGARE

फोटो कॅप्शन, पंडिता रमाबाई

पुण्यामध्ये प्लेग आल्यानंतर 1898 साली शारदासदन केडगाव येथे नेण्यात आलं. शारदासदनचं आणि गुलबर्गा येथे स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळेचं कामकाज रमाबाईंसह त्यांची मुलगी मनोरमा मेधावी या पाहात असत. त्यांना कैसर ए हिंद पदकाने गौरवण्यात आलं होतं. मनोरमा मेधावी यांचा ऑगस्ट 1921 तर पंडिता रमाबाईंचा 5 एप्रिल 1922 साली मृत्यू झाला.

ख्रिस्तायन लिहिणारे ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक

नारायण वामन टिळक यांचा जन्म वामनराव आणि जानकीबाई यांच्यापोटी 6 डिसेंबर 1861 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात करंजगाव इथं झाला.

10 फेब्रुवारी 1895 रोजी मुंबईतील भेंडीबाजारातल्या चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. यावेळेस भरपूर गर्दीही जमली होती. अगदी सुरुवातीच्या काळापासून टिळकांचं काव्यलेखन सुरू होतं.

ख्रिस्ती झाल्यावर त्यांच्या काव्यहोत्राला आणखी गती आली. 1895 पासून त्यांनी धर्मप्रसाराचं कार्य सुरू केलं. मराठी ख्रिस्ती मंडळींसाठी त्यांनी अनेक अभंग, ओव्या रचल्या. त्यांच्या अनेक अभंगांना चाल लावली गेली आणि भजनांमध्ये त्यांचा समावेश झाला.

महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समुदायातील अनेक लोकांनी, समाजसुधारकांनी, साहित्यिकांनी, खेळाडूंनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यापैकी काहींची आपण येथे ओळख करुन घेऊ.

फोटो स्रोत, ONKAR KARAMBELKAR

फोटो कॅप्शन, नारायण वामन टिळक

त्यांचं 'ख्रिस्तायन' हे महाकाव्यही प्रसिद्ध आहे. ख्रिस्तायनाच्या 11 व्या अध्यायानंतरचे सर्व लेखन लक्ष्मीबाई टिळकांनी केले आणि ख्रिस्तायन पूर्ण झाले.

टिळकांबरोबर लक्ष्मीबाई टिळकांनीही कीर्तनाला सुरुवात केली. 1915 साली झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1842 पासून नगरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे नियतकालिक सुरू केले होते.

ना. वा. टिळकांनी 1900-1919 या कालावधीमध्ये या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचं कार्य पुढे नेलं. निपाणी येथे झालेल्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देवदत्त टिळक होते. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे मराठीमधलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणून ओळखलं जात. ना. वा. टिळक यांनी 9 मे 1919 रोजी मुंबईत जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कुष्ठरोग्यांची सेवा करणारे हरि गोविंद केळकर

हरि गोविंद केळकर हे मूळचे अलिबागचे. त्यांचा जन्म 1861 साली झाला. 1881 साली त्यांनी पेण येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांनी कोकणामध्ये ख्रिस्तीधर्मोपदेशकाचे काम केले त्याचप्रमाणे पुष्कळ गद्य आणि पद्य लेखनही केले.

1895 साली त्यांनी पोलादपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केला. 11 जुलै 1904 रोजी त्यांचे अलिबाग येथे निधन झाले. हरि गोविंद केळकर यांचे पुत्र रत्नाकर केळकर यांनी 1959 साली त्यांचं चरित्र लिहिलं. रत्नाकर केळकर यांनीही ज्ञानोदयचे संपादक म्हणून कार्य केले. रत्नाकर केळकर यांचे पुत्र डॉ. रंजन केळकर भारतीय हवामान विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले.

भाषाप्रभू भास्करराव उजगरे

मराठी ख्रिस्ती साहित्यामध्ये भास्करराव उजगरे यांचं मान आदराने घेतलं जातं. ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना त्यांनीच मांडली होती. बालकवी आणि ना. वा. टिळक यांच्याशी त्यांचा खूप स्नेह होता.

भास्करराव उजगरे

फोटो स्रोत, ANUPAMA UZGARE

फोटो कॅप्शन, भास्करराव उजगरे

भास्करराव उजगरे यांनी ना. वा. टिळकांच्या कवितांचे संपादन केले होते. दातेसूचीमध्ये ख्रिस्ती धर्मातल्या उपासना संज्ञांची मराठी रुपे त्यांनी दिली होती. त्यामुळेच त्यांना भाषाभास्कर, भाषाप्रभू म्हटलं जाई.

भास्करराव उजगरे मसाप पुणेचे सरचिटणीसही होते. भास्करराव उजगरे यांचे पुत्र हरिश्चंद्र उजगरे 1978 ते 1994 या कालावधीत ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादक होते. हरिश्चंद्र उजगरे यांचे पुत्र निरंजन उजगरे मराठीतील एक प्रसिद्ध कवी होते. निरंजन उजगरे यांच्या पत्नी अनुपमा उजगरे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच निरंजन आणि अनुपमा उजगरे यांनी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

हिवाळे कॉलेजचे भास्कर पांडुरंग हिवाळे

अहमदनगरच्या गरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणसंस्था आणि कॉलेज काढणारे भास्कर पांडुरंग हिवाळे यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या कॉलेजला हिवाळे कॉलेजही म्हटलं जातं. हिवाळे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पी.एचडी पदवी संपादन केली होती.

भारताला पहिला कसोटी 'विजय' मिळवून देणारे विजय हजारे

विजय हजारे यांचा जन्म 1915 साली सांगली येथे झाला. फर्स्ट क्लास् क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारे, दोन त्रिशतकं झळकवणारे, दोन्ही डावांमध्ये शतक झळकवणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

विजय हजारे

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय संघाला पहिला कसोटी विजय त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाला. सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकवणारे पहिले फलंदाज म्हणूनही त्यांची ओळख आहे. कसोटी खेळात 1000 धावा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत. त्यांचे 2004 साली बडोदा येथे निधन झाले.

ख्रिस्ती आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी

सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचा जन्म 1916 साली अहमदनगर येथे झाला. कीर्तनकार, धर्मोपदेशक, लेखक, पत्रकार, नाटककार अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी असे आदराने संबोधले जाई. अगा जे कल्पिले नाही, गोल देऊळ, चटकचांदणी ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.

पडद्यावरती पहिला डबल रोल साकारणारे शाहू मोडक

मराठी, हिंदी चित्रपट आणि त्यातही सुरुवातीच्या काळामध्ये जे पौराणिक विषयांवरचे चित्रपट आले त्यात महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे शाहू मोडक. शाहू मोडक यांचा जन्म 25 एप्रिल 1918 रोजी अहमदनगर येथे झाला.

भारतीय बोलपटांमध्ये पहिली दुहेरी भूमिका (डबल रोलः करणारे आणि 29 वेळा कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून शाहू मोडक प्रसिद्ध आहेत. 1931 साली त्यांनी सर्वात पहिली कृष्णाची भूमिका श्यामसुंदर या सिनेमात साकारली. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

मराठी आणि हिंदीमधील अनेक उत्तमोत्तम पौराणिक-धार्मिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. 1993 साली शाहू मोडक यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित प्रतिभा मोडक यांनी लिहिलेले, 'शाहू मोडक प्रवास एका देवमाणसाचा' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

नेता, प्रशासक एनकेपी साळवे

स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय नेत्यांमध्ये एनकेपी साळवे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1921 साली छिंदवाडा येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्रकुमार साळवे असे होते.

शिक्षणाने चार्टर्ड अकौंटंट मग राजकीय नेता आणि त्यानंतर क्रिकेट संघटनांचे प्रशासक म्हणून त्यांची ख्याती होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली. ते स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते.

शेषराव वानखेडे यांच्यानंतर त्यांनी बीसीसीआयची जबाबदारी पार पाडली. 1 एप्रिल 2012 रोजी त्यांचे दिल्लीमध्ये निधन झाले. त्यांच्या भगिनी निर्मला श्रीवास्तव यांनी सहजयोग चळवळीची स्थापना केली होती. एनकेपी साळवे यांचे पुत्र हरिश साळवे आज भारतातील सुप्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जातात. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी कामकाज पाहिले आहे.

धर्मोपदेशक साहित्यिक फादर दिब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1943 साली नंदाखाल येथे झाला. लेखनाबरोबरच पर्यावरण रक्षणाच्या चळवळीतही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. सुवार्ता या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

फादर फ्रान्सीस दिब्रिटो

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, फादर फ्रान्सीस दिब्रिटो

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. हरित वसई चळवळीच्या माध्यमातून पर्यावरण चळवळीत त्यांचे नाव प्रसिद्ध झाले.

अष्टपैलू चंदू बोर्डे

विजय हजारे यांच्याप्रमाणे भारतीय संघात महत्त्वाची कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत चंदू बोर्डे. 1934 साली पुणे येथे त्यांचा जन्म झाला. 1954 पासून त्यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार तसेच सी. के नायडू जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

चंदू बोर्डे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चंदू बोर्डे

यासर्व महान व्यक्तीमत्वांबरोबरच अनेक मराठीख्रिस्ती बांधवांनी विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)