नारायण वामन टिळक ते रेव्हरंड टिळक; विस्मृतीत गेलेल्या कवीचा प्रवास

मालगुंड येथील केशवसुत स्मारकामध्ये लावलेले ना. वा. टिळक यांचे चित्र

फोटो स्रोत, BBC/ONKAR KARAMBELKAR

फोटो कॅप्शन, मालगुंड येथील केशवसुत स्मारकामध्ये लावलेले ना. वा. टिळक यांचे चित्र
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

9 मे 1919 म्हणजे बरोबर 100 वर्षांपूर्वी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात एका महाकवीनं डोळे मिटले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कवीच्या इच्छेनुसार काळा रंग पूर्ण वर्ज्य करून अंत्ययात्रा काढण्यात आली.

'भय काय तया प्रभु ज्याचा रे. सर्व विसरली प्रभुमय झाली पूर्ण जयाची वाचा रे!' हे त्या कवीनंच रचलेलं भजन म्हणत मंडळींनी कवीला अखेरचा निरोप दिला. हे कवी होते रे. ना. वा. टिळक.

रेव्हरंड ना. वा. टिळक हे नाव आजकालच्या वाचनामध्ये फारसं येत नसलं तरी मराठी साहित्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनामध्ये त्यांनी निर्माण केलेला ठसा अजूनही अमीट असाच आहे.

आज त्यांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्तानं थोड्याशा विस्मृतीत गेलेल्या टिळकांचं स्मरण करण्याची, त्यांच्या कविता पुन्हा वाचण्याची आणि तत्कालीन महाराष्ट्राचा विचार करण्याची नवी संधी आपल्याला मिळाली आहे असं म्हणावं लागेल.

रे. ना. वा. टिळक या नावानं शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी टाकलेल्या क्रांतीकारक पावलांमुळं संपूर्ण महाराष्ट्राचं समाजजीवन ढवळून गेलं होतं.

कोकणातून आलेल्या एका गरीब कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात सोवळं ओवळं पाळणाऱ्या रूढींचा पगडा असलेल्या जीवनातून बाहेर पडणं, कविता करणं, ख्रिस्ती धर्म स्वीकारणं मग ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणं हे त्या काळामध्ये एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नव्हतं.

रे. टिळकांच्या आयुष्याची ओळख त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेल्या 'स्मृतिचित्रे' आणि नातू अशोक टिळक यांनी लिहिलेल्या ' चालता बोलता चमत्कार' या पुस्तकांमधून होते.

फोटो स्रोत, BBC/ONKAR KARAMBELKAR

फोटो कॅप्शन, रे. टिळकांच्या आयुष्याची ओळख त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेल्या 'स्मृतिचित्रे' आणि नातू अशोक टिळक यांनी लिहिलेल्या ' चालता बोलता चमत्कार' या पुस्तकांमधून होते.

नारायण वामन टिळक यांचा जन्म वामनराव आणि जानकीबाई यांच्यापोटी 6 डिसेंबर 1861 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात करंजगाव इथं झाला. घरामधलं अस्थैर्य, वडिलांचा रागीट-तापट स्वभाव, आर्थिक चणचण यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या.

कल्याण, मोखाडा, नाशिक, राहुरी, अहमदनगर, पंढरपूर, नागपूर, राजनांदगाव (छत्तीसगड), वाई, महाबळेश्वर, सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते सतत फिरत राहिले. प्रत्येक ठिकाणी नवं घर आणि प्रत्येक ठिकाणी वस्तूंची जमवाजमव करत ते जगत राहिले.

ख्रिस्ती धर्माकडे ओढा

वेगवेगळ्या गावांमध्ये विविध नोकऱ्या आणि फिरस्ती झाल्यावर नागपूरनंतर टिळक छत्तीसगडमधील राजनांदगाव इथं नोकरी करू लागले. एकदा नागपूर-राजनांदगाव प्रवासात त्यांची एका ख्रिस्ती मिशनऱ्याची भेट झाली. दोघांनी या प्रवासात धर्मासह विविध विषयांवर भरपूर चर्चा केली.

रे. टिळकांनी लक्ष्मीबाईंना पाठवलेले पत्र

फोटो स्रोत, FACEBOOK/MUKTA ASHOK TILAK

फोटो कॅप्शन, रे. टिळकांनी लक्ष्मीबाईंना पाठवलेले पत्र

टिळकांच्या विचारांनी ते मिशनरी चांगलेच प्रभावित झाले. जाताना त्यांनी बायबलची एक प्रत टिळकांच्या हातात ठेवली आणि येत्या दोन वर्षांमध्ये तुम्ही ख्रिस्ती व्हाल असे सांगून ते निघून गेले. आश्चर्य म्हणजे या दोघांनीही एकमेकांना आपली नावं विचारली नव्हती आणि सांगितलीही नव्हती.

काही दिवसांनंतर टिळकांचा प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक बाबा पद्मनजी, रे. डॉ. अॅबट यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला होता. त्यांच्या सुचनेवरून त्यांनी रे. पद्मनजी, रे. करमरकर, रे. मोडक, रे. हरी रामचंद्र यांची चरित्रं आणि इतर धार्मिक तुलनाग्रंथ वाचल्याचे त्यांच्या डायऱ्यांवरून समजते.

19 फेब्रुवारी 1894 च्या डायरीमध्ये त्यांनी आपला ख्रिस्ती धर्मकडे ओढा वाढत असल्याचं लिहिलं आहे. त्यानंतर रायपूरलाही त्यांनी या ख्रिस्ती पुस्तकांचें वाचन कायम ठेवले.

नातेवाईकांचे प्रयत्न आणि धर्मांतर

ख्रिस्ती अधिकाऱ्यांच्या घरी जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं अशामुळं टिळक आता ख्रिस्ती होणार अशा चर्चा सर्वत्र होऊ लागल्या. अनेक लोक, पाहुणे त्यांचं मन वळवण्यासाठी येऊ लागले.

ना. वा . टिळक

फोटो स्रोत, FACEBOOK/MUKTA ASHOK TILAK

फोटो कॅप्शन, शिव्याश्याप द्या मारा झोडा, काय हवें ते बघा करोनी, मर्यादेच्या बाहिर तुमच्या, आज धांवलों!!

एका व्यक्तीने तर मी सगळी संपत्ती तुमच्या नावावर करून देतो असे सांगितले तर नागपूरच्या आप्पासाहेब बुटी यांनी मी तुमच्या संपूर्ण हयातभर दरमहा 100 रुपये आणि घर, मुलाचे शिक्षण करून देतो असे सांगितले. नातलगांनीही वाटेल ती मदत करण्याची तयारी दाखवली. मात्र टिळकांच्या निर्णयात बदल झाला नाही.

टिळकांचे मन दुसरीकडे जावे यासाठी त्यांना सर्वांनी नाशिकला नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र त्यांनी तेथून निघून सरळ मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी रे. जस्टीन अॅबट, रे. ई. एम. ह्यूम आणि रे. आनंदराव हिवाळे यांची भेट घेतली आणि ख्रिस्ती होण्याची इच्छा व्यक्त केली.

ख्रिस्ती होण्यासाठी आपल्याला बाप्तिस्मा युरोपियन व्यक्तीने ब्राह्मणांमधून ख्रिस्ती झालेल्या व्यक्तीऐवजी रे. तुकाराम नथोजी यांनी द्यावा अशी विनंती टिळकांनी केली आणि 10 फेब्रुवारी 1895 रोजी मुंबईतील भेंडीबाजारातल्या चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. यावेळेस भरपूर गर्दीही जमली होती. टिळकांनी आपल्या ख्रिस्त धर्म स्वीकारण्यावर

आज मी ख्रिस्ति जाहलो, भयकर भवनद पार तरोनी, निजकर पसरून इतर जनांस्तव उभा राहिलो!!ख्रिस्तासंगे मरण पावलो, ख्रिस्तासंगे पुनरपि उठलो नवीन जीवन हृद्यहि नूतन, आज पावलो!! शिव्याश्याप द्या मारा झोडा, काय हवें ते बघा करोनी, मर्यादेच्या बाहिर तुमच्या, आज धांवलों!!

अशी कविताही केली होती. टिळकांच्या या ख्रिस्ती होण्याने त्यांच्या कुटुंबात, नातलगांमध्ये आणि समाजामध्येही मोठी खळबळ उडाली. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, मुलगा देवदत्त आणि टिळक यांची दीर्घकाळासाठी ताटातूटही झाली.

ज्ञानोदय आणि काव्यरचना

अगदी सुरुवातीच्या काळापासून टिळकांचं काव्यलेखन सुरू होतं. ख्रिस्ती झाल्यावर त्यांच्या काव्यहोत्राला आणखी गती आली. 1895 पासून त्यांनी धर्मप्रसाराचं कार्य सुरू केलं.

जुने भेंडीबजार चर्च. येथे टिळकांचा बाप्तिस्मा झाला. आता येथे मांडवी टेलीफोन केंद्र आहे.

फोटो स्रोत, CYRIL DARA

फोटो कॅप्शन, जुने भेंडीबजार चर्च. येथे टिळकांचा बाप्तिस्मा झाला. आता येथे मांडवी टेलीफोन केंद्र आहे.

मराठी ख्रिस्ती मंडळींसाठी त्यांनी अनेक अभंग, ओव्या रचल्या. त्यांच्या अनेक अभंगांना चाल लावली गेली आणि भजनांमध्ये त्यांचा समावेश झाला.

त्यांचं 'ख्रिस्तायन' हे महाकाव्यही प्रसिद्ध आहे. ख्रिस्तायनाच्या 11 व्या अध्यायानंतरचे सर्व लेखन लक्ष्मीबाई टिळकांनी केले आणि ख्रिस्तायन पूर्ण झाले.

टिळकांबरोबर लक्ष्मीबाई टिळकांनीही कीर्तनाला सुरुवात केली. 1915 साली झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ख्रिस्ती झाल्यावर त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ राहुरी, अहमदनगर, महाबळेश्वर, वाई अशा गावांमध्ये गेला.

1842 पासून नगरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे नियतकालिक सुरू केले होते. ना. वा. टिळकांनी 1900-1919 या कालावधीमध्ये या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचं कार्य पुढे नेलं.

'स्मृतिचित्रे'चा शांता गोखले यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे.

फोटो स्रोत, SPEAKING TIGER BOOKS

फोटो कॅप्शन, 'स्मृतिचित्रे'चा शांता गोखले यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे.

1919मध्ये टिळकांचं शेवटचं आजारपण सुरू झालं. 9 मे 1919 रोजी त्यांनी मुंबईत जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आदल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात टिळकांनी आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं.

त्यामध्ये मृत्यूनंतर आपल्या देहाचं दहन करण्यात यावं, आपल्या अस्थींवर कबर उभारून पुष्कळ अजुनी उणा! प्रभु, मी पुष्कळ अजुनी उणा!! हा चरण कोरावा असं त्यांनी लिहून ठेवलं होतं.

तसेच माझ्या नावाच्या पूर्वी रेव्हरंड किंवा मि. किंवा रा. रा. यातले कोणतेही उपपद लावू नये. एन. व्ही. टिळक असे इंग्रजीप्रमाणे न लिहिता मराठीत नारायण वामन टिळक असे लिहावे असे त्यांनी मृत्युपत्रात नमूद केलं होतं.

आज टिळकांना जाऊन 100 वर्षं झाली. काळाच्या ओघात ते थोडे विस्मृतीत चालले आहेत. कदाचित त्यांच्या कविता पुन्हा वाचण्यानं, 'स्मृतिचित्रे' वाचण्यानं ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाईंचा काळ शब्दांमधून तरी आपल्याला अनुभवायला मिळेल.

'टिळकांची उपासनं गीतं आजही लोकप्रिय'

रे. टिळकांनी लिहिलेली उपासनं गीतं आजही मराठी ख्रिस्ती मंडळी विविध चर्चेसमध्ये म्हणतात अशी माहिती डॉ. रंजन केळकर देतात.

डॉ. केळकर भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक होते, त्यांचे वडील रत्नाकर हरी केळकर ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादक होते तसेच त्यांचे आजोबा हरी गोविंद केळकर यांनी पोलादपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी रूग्णालय चालवले होते.

टिळकांच्या कवितांबद्दल बोलताना डॉ. केळकर म्हणाले, "मराठी ख्रिस्त मंडळींमध्ये 'उपासना संगीत' नावाचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये विविध मराठी कवींनी लिहिलेली भजनं आणि गाणी आहेत. त्यात सुमारे 600 गाणी असावीत, त्यातील निम्मी गीतं एकट्या टिळकांचीच आहेत. टिळकांची गीतं गेय आणि रसाळ आहेत. एकेकाळी चर्चमध्ये हार्मोनियम, चिपळ्या घेऊन भजनं होत असत. माझे वडील टिळकांचे ख्रिस्तायन आणि अभंगांजली शिकवायचे. टिळकांच्या गीतांचा वारसा लुप्त होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

'वृत्तबद्ध कविता'

'ना. वा. टिळकांची कविता वृत्तबद्ध आणि संस्कृतप्रचुर होती, पण आजच्या काळात अशा कविता मागे पडण्याचं तेच कारण असावं', असं मत विद्यागौरी टिळक यांनी व्यक्त केलं होतं. देवदत्त टिळक हे विद्यागौरी यांचे आजोबा.

टिळकांच्या कवितेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, टिळकांची कविता भक्तीपर असल्याने काही लोकांना ती धार्मिक वाटली. संस्कृतचा प्रभाव असली तरी ती सोपी होती. परंतु त्या काळातील सर्वच कविता आजच्या पिढीला वाचणे थोडे कठीण वाटते. टिळकांची कविता आकाशवाणीवरही म्हटली गेली आहे. त्याप्रकारे या कवितांचा प्रसार पुन्हा होऊ शकतो. तसेच वृत्तबद्ध कविता चालीमध्ये पुन्हा म्हटल्या जाऊ शकतात."

'काव्य, संगीत, गायन, नाट्य यांचं मिश्रण'

'टिळकांच्या कवितांमध्ये काव्य, संगीत, गायन, नाट्य या सर्वांचं मिश्रण दिसून येतं', असं मत कवियत्री अनुपमा उजगरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

त्या म्हणाल्या, "टिळकांनी अतिशय सोपी आणि संस्कृतप्रचुर अशा दोन्ही प्रकारच्या मराठीत कविता लिहिली. वसंतोपवास (लेन्त) या उपवास काळाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हटल्या जाणाऱ्या भजनांमध्ये त्यांच्या गीतांचा समावेश होता. टिळकांची कविता अभंगरूपाने लहान मुलांपर्यंत पोहोचली होती. उपासना संगीतामुळे त्यांची गीतं आजही गायली जातात. त्यांच्या कवितेत शाश्वत ख्रिस्तनिष्ठा दिसून येते. आता त्यांचं अभंगांजली पुन्हा एकदा नव्या आवृत्तीत प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या वाचकांना ते वाचण्यास, अभ्यासासाठी उपलब्ध होईल."

संदर्भः 1) स्मृतिचित्रे, टिळक लक्ष्मीबाई, वरदा प्रकाशन

2) चालता बोलता चमत्कार, अशोक देवदत्त टिळक, पॉप्युलर प्रकाशन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)