'बारकोड'चा हा 'विचित्र इतिहास', तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ख्रिस बेरेनियक
- Role, बीबीसी फ्युचर
मॉलमधील शॉपिंग असो, घरात येणारं पार्सल असो की सुपर मार्केटमधील किराणा मालाची खरेदी असो. एका गोष्टीनं जगभरात क्रांती घडवली आहे. किंबहुना या संकल्पनेनं आज अवघं जग व्यापलं आहे. ते म्हणजेच बारकोड.
उद्योग-व्यवसायांबरोबरच जगातील प्रत्येक क्षेत्रात बारकोडनं क्रांती घडवून आणली आहे. बारकोडचा जन्म कधी, कसा आणि कुठे झाला, हे तंत्रज्ञान कसं विकसित झालं, त्यात सुरुवातीच्या काळात कोणकोणत्या अडचणी आल्या आणि यापुढील काळातील त्याचा प्रवास कसा असणार आहे, या मुद्द्यांचा परामर्श घेणारा हा लेख...
काही जण शॉपिंग करताना बारकोड्स (barcodes) बद्दल साशंक असतात. मात्र 75 वर्षांपूर्वी या संकल्पनेचा जन्म झाल्यापासून बारकोडचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे.

फोटो स्रोत, Alamy
असंख्य लोकांचा जीव वाचवण्यास बारकोडची मदत झाली आहे. बारकोडचा वापर अंतराळातदेखील होतो आहे. मात्र, एकेकाळी हा बारकोड 'ख्रिस्तविरोधी' असण्याची भीतीदेखील निर्माण झाली होती.
लेझर! सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्यांची हीच गरज आहे, असं पॉल मॅकेनरो (Paul McEnroe) म्हणतात. सुपरमार्केटमध्ये चेक आऊट करायच्या ठिकाणी स्कॅनर्स आणि छोट्या पिस्तुलाच्या आकाराच्या लेझर गन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे विक्रीची प्रक्रिया सोपी होते. वस्तूंवर हे लेझर गन धरा, बटण दाबा आणि विका!
1969 मध्ये बारकोड ही एक भविष्यवेधी आणि अद्भूत कल्पना होती. या लेझरचा वापर करून वस्तू किंवा उत्पादनांच्या पाठीमागच्या बाजूस असणाऱ्या विचित्र पांढऱ्या आणि काळ्या खुणांना स्कॅन करायचं डिझाईन मॅकेनरो आणि आयबीएम या कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलं होतं.
त्यांनी बारकोडबद्दल सांगितलं होतं की यामुळे सुपरमार्केटमध्ये असणाऱ्या ग्राहकांच्या रांगा वेगानं पुढे सरकणार होत्या. या सुविधेला किंवा डिझाईनला 'बारकोड' या नावानं ओळखलं जाऊ लागलं.
बारकोडचा जन्म आणि वापराची सुरूवात
यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यासंदर्भातील विचार अनेक दशकांपासून सुरू होता. 20 ऑक्टोबर 1949 ला एका इंजिनीअरनं यासाठीचं पेटंट घेतलं होतं. मात्र, असं असूनही त्या वेळेपावेतो बारकोड्सचा वापर व्यावसायिक स्वरुपात कधीही करण्यात आला नव्हता.
ज्या इंजिनीअरनं हे पेटंट घेतलं होतं तोच आता मॅकेनरो यांच्या टीममध्ये होता.
आयबीएमचे इंजिनीअर बारकोड्सचा वापर सर्वत्र करू इच्छित होते.
त्यांच्या डोळ्यासमोर भविष्यातील अशा योजना आणि दृश्य होतं की ज्यात ग्राहक त्यांच्या आवडीच्या प्रत्येक वस्तू किंवा उत्पादनाला लेझर स्कॅनिंग करून चेकआऊट करून वेगानं पुढे सरकू शकत होते.
मात्र, आयबीएमच्या वकिलांना बारकोडच्या वापरासंदर्भात एक अडचण होती. बारकोडच्या वापरातून भविष्यात काही समस्या उद्भू शकतात, असं त्यांना वाटत होतं.
मॅकेनरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "याचा वापर शक्य नाही," असं आयबीएमचे वकील म्हणाले होते. मॅकेनरो आता निवृत्त झालेले इंजिनीअर आहेत.
वकिलांना भीती वाटत होती की, हे "आत्मघातकी लेझर" ठरू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
जर एखाद्या ग्राहकानं लेझर स्कॅनर्सचा वापर करून मुद्दामहून स्वत:च्या डोळ्यांना अपाय करून घेतला आणि नंतर आयबीएमवर खटला दाखल केला तर? जर सुपरमार्केटमधील कर्मचारी या लेझरमुळे आंधळे झाले तर?
"नाही, असं होऊ शकत नाही, हे फक्त अर्ध्या मिलीवॅटचं लेझर किरण होतं," असं मॅकेनरो यांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. या लेझर किरणांपेक्षा 60 वॅटच्या बल्बमध्ये 12,000 पट अधिक ऊर्जा असते. मात्र त्यांच्या युक्तिवादांचा काहीही उपयोग झाला नाही.
यानंतर त्यांनी आफ्रिकेतून आयात केलेल्या ऱ्हिसस माकडांकडे लक्ष वळवलं. अर्थात ती एकूण किती माकडं होतं ते आता त्यांना आठवत नाही.
"मला वाटतं की ते सहा होते. पण मी खात्रीनं सांगू शकत नाही," असं ते सांगतात.
जवळच्याच एक प्रयोगशाळेत माकडांवर चाचणी केल्यानंतर हे सिद्ध झालं की या छोट्या लेझर किरणांशी संपर्क आल्यामुळे प्राण्यांच्या डोळ्यांना कोणताही अपाय किंवा हानी होत नाही. यानंतर वकिलांचा विरोध मावळला.
आणि अशा प्रकारे संपूर्ण अमेरिकेतील सुपरमार्केट्समध्ये बारकोड्सची स्कॅनिंग सर्रासपणे होऊ लागली. त्यानंतर जगभरातदेखील सर्वत्र बारकोड्सचा वापर होऊ लागला.
"बारकोड्समुळे काही लोक नेहमीच अस्वस्थ झाले आहेत. काही कट्टरपंथियांसाठी ते एखाद्या दुष्कृत्यापेक्षा कमी नाहीत."
त्यानंतर अनपेक्षितपणे एक गोष्ट घडली. मॅकेनरो यांनी ज्या प्रयोगशाळेत माकडांवर चाचणी केली होती, त्या प्रयोगशाळेनं त्यांना सांगितलं की ती माकडं आता ते त्यांच्याकडे परत पाठवत आहेत. आता ती माकडं मॅकेनरो यांची डोकेदुखी होती.


"ही खूप वेडेपणाची गोष्ट होती. त्या माकडांसाठी मला उत्तर कॅरोलिनामध्ये एक प्राणी संग्रहालय सापडलं," असं मॅकेनरो हसत सांगतात.
त्या माकडांबरोबरच मॅकेनरो यांच्या टीममधील प्रत्येक व्यक्तीला देखील युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड (UPC) चं श्रेय जातं. कारण बारकोडची त्यांची आवृत्ती सर्वत्र परिचित झाली होती.
जो वूडलँड हे त्यांच्या टीममधीलच एक इंजिनिअर होते आणि त्यांना काही दशकांपूर्वीच ही कल्पना सुचली होती. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रेषा ओढत असताना त्यांना हे सुचलं होतं.
ऑक्टोबर 1949 मध्ये वूडलँड आणि आणखी एका इंजिनिअरनं बारकोडच्या मूळ संकल्पनेच्या पेटंटसाठी अर्ज केला होता.
जॉर्ज लॉरर आणि आयबीएमच्या टीममधील इतर सदस्यांनी त्यानंतर बारकोडच्या शैलीतील खुणांसाठी आधीच अस्तित्वात असलेला प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी त्याला काळ्या, उभ्या रेषांच्या व्यवस्थित आयताकृती आकारात विकसित केलं.
या रेषा म्हणजे एक विशिष्ट नंबर होता ज्याच्याद्वारे सुपरमार्केटमधील कोणत्याही वस्तू किंवा उत्पादनाची ओळख पटवता येणार होती. साबणाच्या डब्यापासून ते तृणधान्यांचे बॉक्स किंवा स्पॅगेटीच्या पॅकेट्सपर्यंत सर्व काही यामुळे ओळखता येणार होतं.
1973 मध्ये किराणा उद्योगानं औपचारिकपणे यूपीसी (UPC) संकल्पना स्वीकारली.
त्यानंतर 1974 मध्ये अमेरिकेतील ओहियो येथील सुपरमार्केटमध्ये पहिल्यांदा एखाद्या उत्पादनाचं स्कॅनिंग या पद्धतीद्वारे करण्यात आलं. तिथून पुढे मग या संकल्पनेनं सगळं जगच पादाक्रांत केलं.
बारकोड कसा वाचावा?
प्रत्येक वेळेस जेव्हा बारकोडवर लेझर किरण पडतो तेव्हा काही मिलिसेकंदांमध्ये एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया पार पडते.
एक यूपीसी (UPC) बारकोड काळ्या उभ्या रेषांनी बनलेला असतो. या रेषा एकतर जाड असतात किंवा बारीक असतात. यातून एखाद्या उत्पादनाच्या खालच्या बाजूला मशीनद्वारे वाचता येऊन शकणारी एक 12 आकडी संख्या तयार होते. हा एक प्रकारे आभासी मोर्स कोडच असतो.
याच्या दोन्ही बाजूला 'गाईड बार' असतात जे स्कॅनरला निर्देश देतात की कोणत्या दिशेनं बारकोड वाचला गेला पाहिजे. याचा अर्थ ते वरून खालच्या बाजूला देखील वाचले जाऊ शकतात.
याच्यामध्ये पहिले 6 ते 10 अंक त्या उत्पादनाच्या कंपनी किंवा ब्रँडशी निगडीत असतात. तर त्यानंतरचे 1 ते 5 अंक त्या उत्पादनाचा क्रमांक असतात आणि शेवटचा अंक हा आधीच्या 11 अंकाच्या आधारावर तयार केला जाणारा चेक डिजिट असतो.
एकदा का स्कॅनरनं ती संख्या वाचली की कॉम्प्युटर त्याचा वापर उत्पादनाच्या डेटाबेसमधील माहिती जाणून घेण्यासाठी करतो. या डेटाबेटमध्ये त्या उत्पादनाची किंमत आणि इतर संबंधित माहिती असते.
इतर प्रकारचे बारकोड लवकरच तयार करण्यात आले आणि यूपीसीनं क्यूआर कोडसारख्या तथाकथित "2 डी बारकोड्स"चा देखील पाया घातला. यामध्ये आणखी माहिती साठवता येऊ शकते.
मात्र, या काळ्या आणि पांढऱ्या खुणांच्या बारकोडचा इतिहास तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक व्यापक आणि चढउतारांनी भरलेला आहे.
अगदी तुम्ही याबाबतीत असंही म्हणून शकता की याची सुरूवात अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) पासून झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
मॅकेनरो सांगतात, "मी सीआयएसाठी विविध गोष्टींचं स्कनिंग करत होतो. ते म्हणजे महत्त्वाचे मोठे नकाशे." हे त्यांचं आयबीएम मधील नोकरीच्या सुरूवातीच्या काळातील काम होतं. यात फोटोंच्या स्कॅनर्सचाही समावेश होता.
ते त्यांच्या पुस्तकात यूपीसी बारकोड च्या शोधाबद्दल सांगतात त्यानुसार यामुळे त्यांना पूर्णपणे नव्या पण संबंधित तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी सज्ज केलं. असं तंत्रज्ञान जे रिटेल उद्योगात क्रांती घडवून आणणार होतं.
मॅकेनरो यांना माहित होतं की यामुळे दुकानांमधील कर्मचाऱ्यांनी उत्पादनांवर स्टॅम्प मारलेल्या किंमती वाचण्याऐवजी कॉम्प्युटरवर फक्त स्कॅन केल्यानंतर मोठा बदल घडणार होता.
दुकानांमध्ये असणाऱ्या या रेषांमुळे उत्पादनं किंवा वस्तू वेगानं पुढे सरकणार होत्या आणि यामुळे विक्रीदेखील वेगानं होणार होती.
अर्थात यासाठी याप्रकारची कोड स्कॅन करणारी सिस्टम प्रत्येक वेळेस कार्यरत असली पाहिजे आणि त्या सिस्टमनं तो कोड अचूकपणे वाचायला हवा.
अगदी स्कॅनरसमोरून ती वस्तू 100 इंच प्रति सेकंदाच्या (2.5 मीटर/सेकंद) वेगानं जरी नेण्यात आली तरी अचूकपणे तो कोड वाचला जायला हवा.
आयबीएमच्या टीमनं यावर काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी वूडलँड आणि त्याच्या सहकाऱ्यानं पेटंट घेतलेल्या डिझाईनवर एका महत्त्वाच्या बदलानिशी काम सुरू केलं. या बारकोडमध्ये सुरूवातीला काळ्या रेषांची जाडी वाचण्यावर भर देण्यात आला होता.
पेटंटमध्ये त्यांनी प्रस्तावित केलेल्या एका संकल्पनेत गोल, बैलाच्या डोळ्यासारख्या आकाराचे बारकोड वर्तुळाकारात तयार होणार होते. त्यांच्या प्रतिस्पर्धी गटानं तसे ते विकसित देखील केले होते.
मात्र, तशाप्रकारच्या कोडची छपाई करणं कठीण होतं आणि उत्पादनांच्या पॅकेजिंगवर ते व्यवस्थित फीट बसणं तर त्याहून अवघड होतं.
आयबीएमच्या टीमनं त्यावर उपाय शोधत उभ्या रेषांची मांडणी केली, ज्या छपाई करण्यासाठी सोप्या होत्या. तसंच यातील मूळ स्कॅनिंग प्रक्रिया ही त्या रेषांची जाडी मोजण्याची नव्हती.
तर या प्रक्रियेत एका रेषेची सुरूवातीची धार आणि त्यापुढील रेषेची सुरूवातीची धार यामधील अंतर मोजलं जाणार होतं. ही बाब अधिक स्पष्टपणे मोजता येणारी आणि स्कॅनरवर सहजपणे पकडली जाणारी होती.
अशाप्रकारे लेबल प्रिंटरमध्ये खूप जास्त शाई आहे का की छापण्यात आलेल्या रेषा अपेक्षेपेक्षा अधिक जाड आहेत, या गोष्टीचा फरक पडणार नव्हता. कारण प्रत्येक वेळेस स्कॅनर अगदी योग्यरित्या त्याचं मोजमाप करणार होता.
बारकोडबद्दलचे वाद आणि गैरसमज
1974 मध्ये अमेरिकेच्या सुपरमार्केटमध्ये बारकोड छापलेलं पहिलं उत्पादन जरी विकलं गेलं तरी ब्रिटनमधील सुपरमार्केटमध्ये हे बारकोड पोहोचण्यासाठी पुढील पाच वर्षांचा कालावधी लागला.
ब्रिटनमध्ये हे बारकोड पोहोचल्यानंतर तिथे ज्या पहिल्या उत्पादनावर बारकोड छापून त्याची स्कॅनिंग करण्यात आली ते म्हणजे चहाच्या पॅकेट्सचे खोके.
मॅकेनरो या गोष्टीवर भर देतात की यूपीसी बारकोड तंत्रज्ञान बाजारात आणण्याची प्रक्रिया वादाशिवाय घडली नव्हती.
"आमचं पहिलं स्टोअर सुरू झालं नव्हतं," असं ते सांगतात.
यापुढे प्रत्येक उत्पादनावर ती स्टोअरमध्ये जिथे शेल्फ मध्ये ठेवली जात होती तिथे त्याची किंमत छापली जाणार नव्हती किंवा त्याचा शिक्का मारला जाणार नव्हता. या गोष्टीला विरोध करत स्टोअर बाहेर असलेले लोक निदर्शनं करत होते.
त्यावेळेस काही कामगार संघटनांना वाटलं होतं की या स्कॅनिंग तंत्रज्ञानामुळे सुपर मार्केटमधील काही नोकऱ्या जातील. शेवटी ते बरोबरदेखील होतं.
याशिवाय, उत्पादनांच्या किंमतीबद्दल मुद्दामहून गोंधळ निर्माण करण्यासाठी बारकोड्सचा वापर केला जाईल अशीही चिंता काहींना वाटत होती.
मॅकेनरो यांना आठवतं की पूर्वी ग्राहक सुपर मार्केटमध्ये जुन्या वस्तू शोधत असत. कारण त्यावर कदाचित कमी किंमतीचा शिक्का मारलेला असण्याची शक्यता असायची.
बारकोडचा वापर सर्रास सुरू झाल्यावर अशाप्रकारे मोलभाव करण्याची संधी याप्रकारच्या ग्राहकांच्या हातून जाण्याची शक्यता होती.
ही चिंता लवकरच दूर झाली. मात्र बारकोडनं काही लोक नेहमीच अस्वस्थ झाले आहेत.
काही कट्टरपंथियांसाठी ते एखाद्या दुष्कृत्यापेक्षा कमी नाहीत. 2023 मध्ये जॉर्डन फ्रिथ या दक्षिण कॅरोलिनामधील क्लेमसन विद्यापीठातील कम्युनिकेशन्स या विषयाच्या प्राध्यापकानं बारकोड्सच्या इतिहासावरचं एक पुस्तक प्रकाशित केलं.
यासंदर्भात अभ्यास करताना त्यांना गॉस्पेल कॉल या प्रकाशनात 1975 सालचा एक लेख आढळला. या लेखात म्हटलं होतं की बारकोड हे "पशुचं चिन्ह" (द मार्क ऑफ द बीस्ट) असू शकतं. जगाच्या अंताबाबतच्या एका पुस्तकात बायबलमधील भविष्यवाणीचा त्यात संदर्भ होता.
नवीन टेस्टामेंटमधील एका परिच्छेदात एका पशुचा संदर्भ येतो. याचा काही वेळा ख्रिस्तविरोधी म्हणून अर्थ लावला जातो. त्या संदर्भानुसार तो प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर खूण करण्यास भाग पाडतो.
या भविष्यवाणीत अशा प्रकारची खूण स्वीकारणाऱ्या लोकांनाच खरेदी किंवा विक्री करण्याची परवानगी आहे.
1975 सालच्या या लेखात असं सुचवलं आहे की अखेर, प्रत्येकाच्या कपाळावर किंवा हाताच्या मागील बाजूस बारकोड्स 'लेझरनं टॅटू' केले जातील. जे सुपरमार्केटमध्ये चेक आऊट करण्यासाठी तयार असतील.
जरी बारकोड्सची कल्पना विचित्र असली तरी ती आश्चर्यकारकरित्या सातत्यानं वापरात राहिली आहे.
बायबल आणि ख्रिस्तावर श्रद्धा असणाऱ्या लेखिका मेरी स्टीवर्ट रेल्फ यांच्या 1982 च्या 'द न्यू मनी सिस्टम' या पुस्तकानं यूपीसी बारकोड्स आणि 'द मार्क ऑफ द बीस्ट' यांच्यातील कथित संबंध आणखी लोकप्रिय केला.
ज्यात त्यांनी दावा केला होती की 666 हा क्रमांक प्रत्येक बारकोडच्या दोन्ही टोकांना असलेल्या रेषांमध्ये आणि बारकोडच्या मध्यभागी 'दडलेला' आहे.
प्रत्यक्षात या 'गार्ड लाईन्स' लेझर स्कॅनरला प्रत्येक यूपीसी क्रमाची सुरूवात आणि शेवट निवडण्यास मदत करण्यासाठीचा एक संदर्भ बिंदू म्हणून काम करतात.
आयबीएमच्या टीममधील लॉरर यांना यूपीसीचा सह-शोधकर्ता मानलं जातं. त्यांनी नंतर सांगितलं होतं की यामध्ये भीतीदायक असं काहीही नव्हतं आणि सहा या संख्येला कोड म्हणून वापरण्यात आलेल्या पॅटर्नशी असलेलं साधर्म्य हा एक निव्वळ योगायोग होता.

मात्र, हा विचित्र सिद्धांत अजूनही इंटरनेटवर पाहिला जाऊ शकतो. काहीजण तर बारकोड्स टाळण्यासाठी टोकाची पावलं देखील उचलतात. यात रशियातील परंपरावादी ख्रिश्चन गटाच्या सदस्यांचा समावेश आहे. त्यांना ओल्ड बिलिव्हर्स म्हणून ओळखलं जातं.
अगाफिया लिकोव या सैबेरियाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या महिला अशाच एक ओल्ड बिलीव्हर आहेत. त्यांनी 2013 मध्ये वाईसच्या पत्रकारांना सांगितलं होतं की बारकोड्स म्हणजे "ख्रिस्तविरोधी असण्याचा शिक्का" आहे.
त्या पुढे म्हणाल्या होत्या की जर एखाद्यानं त्यांना बारकोड असलेल्या बियांचं पॅकेट दिलं तर त्या पॅकेटमधील सामान बाहेर काढून ते पॅकेट जाळून टाकतात.
याशिवाय 2014 मध्ये एका रशियन डेअरी कंपनीनं त्यांच्या वेबसाईटवर एक वक्तव्य दिलं होतं ज्यात सांगण्यात आलं होतं की त्यांच्या दुधाच्या खोक्यांवरील बारकोड वर रेड क्रॉस का छापण्यात आला आहे.
सर्वांनाच माहित असल्याप्रमाणे त्या वक्तव्यात म्हटलं आहे की बारकोड पशुंचं चिन्ह आहे. तेव्हापासून कंपनीच्या वेबसाईटवरून हे वक्तव्यं हटवण्यात आलं आहे.
मॅकेनरो म्हणतात की बारकोडविषयीच्या या विचित्र धारणांची त्यांना जाणीव आहे. "यात असं काहीही नाही ज्याबद्दल मी विचार करेन," असं ते म्हणतात. फ्रिथ दुसरा मुद्दा मांडतात.
ते म्हणतात, "किराणा दुकानातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा एक समूह सर्वनाशाच्या दिशेनं घेऊन जात आहेत ही कल्पना करणंदेखील विचित्र गोष्ट आहे."
आणि तरीदेखील, बारकोड्सबद्दल काही विचित्र निराशावादी गोष्टी आहेत. काहीजणांसाठी ते सर्वात थंड स्वरुपातील भांडवलशाहीचं प्रतीक बनले आहेत. अनेकदा ते चित्रपटांमध्ये भयानक दृश्यांमध्ये देखील दिसतात.
'द टर्मिनेटर' या चित्रपटात आपल्याला दिसतं की भविष्यातील मारेकरी रोबोटच्या कैद्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या हातांवर बारकोडच्या खुणा असतात. "हे लेझर स्कॅनद्वारे जाळण्यात आलं आहे," काळाचा प्रवास किंवा टाइम ट्रॅव्हल करणारा नायक काइल रीझ हे घाबरलेल्या साराह कॉनरला सांगतो. "आपल्यापैकी काहींना काम करण्यासाठी जिवंत ठेवण्यात आलं होतं, मृतदेहांना हाताळण्यासाठी."
यासंदर्भात बारकोडच्या खुणा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या छळछावण्यांमधील कैद्यांच्या हातावर गोंदलेल्या किंवा टॅटू करण्यात आलेल्या संख्येचे प्रतिध्वनी आहेत.
बारकोड आणि क्यूआर कोडचा गैरवापर
काहीवेळा लोक बारकोडचा गैरवापर करतात. विशेषकरून क्युआर कोडचा (QR code) गैरवापर केला जातो. ज्यात उभ्या रेषांऐवजी छोट्या काळ्या आणि पांढऱ्या चौरसांच्या समूहाचा एक पॅटर्न असतो, जो स्मार्टफोनच्या कॅमेराद्वारे वाचला जाऊ शकतो.
कारण तुमच्या फोननं क्यूआर कोड (QR code) स्कॅन केल्यास तुमचा फोन चुकीच्या वेबसाईटशी कनेक्ट होऊ शकतो. उदाहरणार्थ कधी कधी क्यू आर कोडचा वापर हॅकर्सकडून केला जातो.
युकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरनं लोकांना क्यू आर कोड संदर्भात सावध राहण्याची चेतावणी दिली आहे.
युकेमधील अनेक शहरांमधील वाहनचालकांना बनावट क्यूआर कोडच्या घोटाळ्यासंदर्भात चेतावणी देण्यात आली आहे. यात वाहनचालकांच्या नकळत त्यांच्याकडून पैसे चोरण्यासाठी पार्किंग मशीनवर बनावट क्यूआर कोड लावण्यात आले होते.
युकेमधील लेस्टर शहरातील कार पार्किंगमध्ये वापरण्यात आलेल्या एका क्यूआर कोडचा संबंध तर रशियाशी होता.
आणि सप्टेंबर महिन्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनेनं इस्रायलवर धोकादायक बारकोड असलेली पत्रकं टाकल्याचा आरोप केला होता.
काही वृत्तांमध्ये म्हटलं होतं की या क्यूआर कोडला स्कॅन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही उपकरणामधील "सर्व माहिती काढून घेतली जाऊ शकते." बीबीसीला या दाव्यांची पडताळणी करता आली नाही.
बारकोडच्या वापराची प्रचंड व्याप्ती
बारकोडचा काही गैरवापर किंवा घृणास्पद वापर केल्यानंतर आणि बारकोड हे पशुंच्या चिन्हाचं प्रतिनिधित्व करतात असा दावा केल्यानंतरदेखील बारकोड जगभरातील हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक प्रक्रियांचा आधार बनले आहेत.
यूपीसी आणि क्यूआर कोड मानकांवर देखरेख करणाऱ्या, GS1 या संस्थेनुसार, जगभरात दररोज अंदाजे 10 अब्ज बारकोड स्कॅन केले जातात.
उदहरणार्थ, तुमच्या घरी पोस्टाद्वारे किंवा कुरियरद्वारे येणाऱ्या वस्तू किंवा उत्पादनांच्या पॅकेजिंगवर बारकोड किंवा क्यूआर कोड तुम्ही पाहिले असतील.
फ्रिथ म्हणतात, गोदामामधून निघून तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या प्रवासात एक पॅकेट असंख्य वेळा स्कॅन केलं जातं.
बारकोडमुळे किरकोळ विक्रेत्यांना उत्पादनांच्या लांबलचक यादीचा माग ठेवणं, त्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. याचाच अर्थ मोठाले स्टोअर, सुपरमार्केट्स किंवा दुकानांमध्ये तुलनात्मकरित्या कमी कर्मचाऱ्यांनिशी कामकाज केलं जाऊ शकतं.
फ्रिथ म्हणतात, "बारकोडशिवाय सुपरस्टोअर किंवा सुपरमार्केटसारखं काहीही तुम्हाला दिसलं नसतं. बारकोडमुळे किरकोळ व्यापाराचं भौतिक स्वरूप बदलून गेलं आहे."
एरिन टेमेन, इलेक्ट्रॉनिक इमेजिंग मटेरियल्स या लेबलिंग फर्मच्या अकाउंट मॅनेजर आहेत. या मूल्यमापनाशी त्या सहमत आहेत. इतर काही कंपन्यांप्रमाणेच त्यांची कंपनी देखील प्रत्यक्षात कोणत्याही वातावरणात काम करतील अशा बारकोड लेबलचं उत्पादन करते.
उदाहरणार्थ, यामध्ये थंडी-रोधक लेबल्सचाही समावेश आहे, जी द्रव नायट्रोजननं भरलेल्या उपकरणांमधून पडणार नाहीत. आणि रसायन-रोधक लेबल्स जे प्रयोगशाळेत रसायनं किंवा इतर द्रवांचे थेंब उडाल्यावर देखील त्यावरील बारकोड टिकवून ठेवतील.

फोटो स्रोत, Getty Images
ही कंपनी अतिरिक्त परावर्तीत होणाऱ्या बारकोड लेबल्सचं देखील उत्पादन करते. "यामुळे स्कॅन करण्याचं अंतर वाढतं. म्हणजेच अधिक अंतरावरून स्कॅन करता येतं," असं टेमेन म्हणतात.
यामुळे कामाच्या घाईत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 45 फूट (14 मीटर) अंतरावरून देखील सहजपणे बारकोडचं स्कॅनिंग करणं शक्य होतं. उदाहरणार्थ समजा एखादी वस्तू किंवा उत्पादन जर शेल्फमध्ये उंचावर ठेवलेलं असेल तरीदेखील त्यावरील बारकोड स्कॅन करता येतो.
यासारख्या गोष्टींमधून प्रत्यक्षात बारकोड्स किती वैविध्यपूर्ण रित्या वापरले जातात त्याबद्दल संकेत मिळतात.
बारकोडमुळे मधमाशा आणि गाणाऱ्या पक्षांच्या वर्तनाचा आणि हालचालींचा माग ठेवण्यास मदत होते. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये अंडी आणि भ्रूण यांच्यावर खुणा करून त्यांचा माग ठेवता येतो, जेणेकरून त्यांची अदलाबदल होऊ नये.
मृत व्यक्तींच्या ऑनलाइन स्वरुपातील स्मारकांना भेट देणाऱ्यांना सूचित करण्यासाठी थडग्यांवर बारकोडचा वापर केला जातो.
अमेरिकेचं सैन्य देखील सैनिकांच्या हजेरीसाठी आणि प्रशिक्षणाचा माग ठेवण्यासाठी बारकोडचा वापर करतं. सौदी अरेबियातील एका विद्यापीठानं लेक्चर्स मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बारकोडच्या वापराची चाचणी घेतली.
बारकोड आता अंतराळातदेखील पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) असलेले अंतराळवीर उपकरणं आणि मशीनच्या भागांची ओळख पटवण्यासाठी बारकोड स्कॅनरचा वापर करतात.
अर्थात आता या बारकोडऐवजी मोठ्या प्रमाणात रेडिओ फ्रिक्वेन्सी (RFID)टॅगचा वापर केला जातो आहे.
बारकोडचा वापर अंतराळवीरांकडून सेवन केल्या जाणाऱ्या अन्न आणि द्रव्यांची नोंद ठेवण्याबरोबरच त्यांचं रक्त, लाळ आणि मूत्राच्या नमुन्यांची ओळख पटवण्यासाठी देखील केला जातो.
अंतराळातील बारकोडचा वापर जाणून घेतल्यानंतर पुन्हा पृथ्वीवरील त्यांच्या वापराचा विचार करता, हे शक्य आहे की बारकोड मुळे अनेकांचे जीव वाचले असावेत.
हॉस्पिटल्स रक्ताचे नमुने, औषधं आणि हिप रिप्लेसमेंटसारख्या वैद्यकीय उपकरणांचा माग ठेवण्यासाठी बारकोड सिस्टम वापरत आहेत.
युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) कडे अशाप्रकारच्या गोष्टींचा माग ठेवण्यासाठी बारकोडचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्कॅन4सेफ्टी (Scan4Safety) कार्यक्रम आहे.
उदाहरणार्थ, मशीनच्या मदतीनं ओळख पटवण्यात आल्यामुळे हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना योग्य रुग्णास योग्य औषध देण्यास मदत होते.
स्कॅन4सेफ्टी वरील एका वृत्तानुसार, या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा 1,40,000 तासांचा वेळ मोकळा झाला आहे. एरवी तो वेळ प्रशासकीय कामकाज आणि इन्व्हेंटरी तपासणीसारख्या कामांमध्ये गेला असता.
यात दावा करण्यात आला आहे की बारकोड स्कॅनिंगमुळे आरोग्य सेवांची लाखो पौंडांची बचत देखील झाली आहे.
व्हॅलेंटिना लिक्टनर, लीड्स युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलमध्ये डिजिटल हेल्थ आणि डिसिजन मेकिंग या विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
त्या म्हणतात, "हॉस्पिटलमधील इन्व्हेंट्रीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी मी बोलते - ते सर्वजण याच्या फायद्यांबद्दल बोलतात."
सध्या त्या आरोग्य सेवा क्षेत्रात बारकोड ट्रॅकिंग सिस्टम मुळे होणाऱ्या प्रभावावर संशोधन करत आहेत.
"वूडलँडनं समुद्रकिनाऱ्यावर ओढलेल्या रेषांशिवाय यापैकी काहीही शक्य झालं नसतं"
आणि असं जग जिथे जवळपास सर्वत्र बारकोड आहेत, त्यांच्या अवतीभोवती मनोरंजक गेम्स आणि अनुभवाचं डिझाइन करणं शक्य आहे.
यातील सर्वात कल्पक उदाहरणांपैकी एक म्हणजे Skannerz. हा 2000 च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळातील एक हॅंडहेल्ड व्हिडिओ गेम होता. ज्यामध्ये उपकरणातच बारकोड स्कॅनरचा समावेश करण्यात आला होता.
हा गेम खेळणाऱ्यांना किराणा मालावरील रँडम बारकोड स्कॅन करावे लागायचे.
उदाहरणार्थ, जोपर्यंत त्यांना असा कोड मिळत नाही जो परग्रहावरील राक्षसाच्या 'कॅप्चर'ला ट्रिगर करतो तोपर्यंत कोड स्कॅन करावे लागायचे. हे पोकेमॉन गेम्सशी खूपच साधर्म्य दाखवणारं आहे.
जपानच्या बारकोड बॅटलरसह (Barcode Battler) इतर गेम्समध्ये देखील 'मजा किंवा गंमत' म्हणून गेम्स खेळणाऱ्यांनी बारकोड स्कॅन करण्यावर अवलंबून आहेत.

या बातम्याही वाचा :

वूडलँडनं समुद्रकिनाऱ्यावर ओढलेल्या रेषांशिवाय आणि मॅकेनरो आणि त्यांच्या आयबीएममधील टीमच्या कामाशिवाय यापैकी काहीही शक्य झालं नसतं.
सध्या किरकोळ विक्रेत्यांना उभ्या रेषांवर आधारित डिझाईनच्या ऐवजी क्यूआर स्टाईलचे कोड्स स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'सनराइज 2027' नावाचा कार्यक्रम राबवला जातो आहे. यामुळे त्यांना कोड मधून अधिक माहिती देता येईल.
उदाहरणार्थ, खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरील वापराची तारीख किंवा विशिष्ट साफसफाईचं उत्पादन कसं वापरायचं याबद्दलच्या सूचना.
मात्र फ्रिथ म्हणतात की त्यांना वाटतं की परंपरागत बारकोडचाच वापर प्रदीर्घ काळ होत राहील.
फ्रिथ पुढे म्हणतात, हे एक फसवे सोपं तंत्रज्ञान आहे, ज्याचा असंख्य उद्योगांवर, क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.
आणि तरीदेखील, बारकोड सर्वत्र वापरले जात असूनही, बहुतांश लोक बारकोडबद्दल शंका घेत नाहीत.
"आपण त्यांच्याबद्दल कधीच विचार करत नाही हा त्यांच्या यशाच्या सर्वात मोठा पुरावा आहे," असं फ्रिथ म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











