प्रयोगशाळेत तयार केला 'जगातला पहिला' रुबी, काय आहे याचे वैशिष्ट्य?

प्रयोगशाळेत तयार केलेला रुबी

फोटो स्रोत, University of the West of England

फोटो कॅप्शन, रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून हा रत्न तयार करण्यात आला आहे.
    • Author, कॅथी अ‍ॅलेक्झांडर
    • Role, बीबीसी न्यूज, वेस्ट ऑफ इंग्लंड

अनेक ठिकाणी सिंथेटिक डायमंड म्हणजेच कृत्रिम पद्धतीने हिरे तयार केले जातात. पण हा रुबी कृत्रिम नाहीये. रुबी तयार होण्यासाठी नैसर्गिक वातावरणात जास्त वेळ लागतो. परंतु हीच प्रक्रिया प्रयोगशाळेत जलद केली जाते, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

प्लॅटिनम दागिने तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेदरम्यान संशोधकांनी ही किमया केली आहे. या प्रकारची जगातील ही पहिलीच प्रक्रिया आहे.

सोफी बून्स असं त्या संशोधकांचं नाव आहे. त्या ब्रिस्टॉलमधील 'युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड' (UWE)मध्ये वरिष्ठ प्राध्यापिका आहेत आणि दागिन्यांच्या डिझाइनमधील संशोधक आहेत.

सोफी बून्स यांनी प्रयोगशाळेत एक रासायनिक प्रकिया विकसित केली आहे. त्यामुळे रुबीची वाढ होण्याची प्रक्रिया जलद होते.

या प्रक्रियेतून खऱ्या रत्नाचा एक छोटासा कण अनेकपटीने मोठा होतो.

'युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड'चं म्हणणं आहे की, प्रयोगशाळेत आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं.

रत्नाला पैलू पाडताना जे बारीक कण पडतात त्याचा वापर करुन सोफी यांनी रुबी तयार केले आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

फ्लक्स प्रक्रियेचा वापर

प्लॅटिनमच्या अंगठीत रुबीचा हा छोटा कण ठेवला आणि मग 'फ्लक्स' (flux)या रसायनाचा वापर केला. (हे रसायन धातूकामात आणि वेल्डिंगच्या कामात वापरलं जातं. धातू वितळून त्यातील अशुद्धता दूर करण्यासाठी त्याचा वापर होतो.)

फ्लक्समुळे तापमान कमी होतं आणि त्याद्वारे रत्नाची वाढ होण्यास मदत होते.

प्रयोगशाळेत पूर्णत: नव्यानंच तयार करण्यात आलेली रत्नं किंवा खाणीतून निघालेली रत्न उर्जा किंवा तापमानाच्या बाबतीत संवेदनशील असतात.

त्याउलट रत्नांच्या वाया गेलेल्या कणांपासून किंवा तुकड्यांपासून भट्टीमध्ये माणिक किंवा रत्नं विकसित होतात किंवा आकारानं वाढतात.

काही दिवसांतच ती विकसित होतात. यासाठी त्यांना भट्टीमध्ये फक्त पाच तास लागतात.

प्रयोगशाळेत रुबी तयार करण्यास 5 ते 50 तास लागतात असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

फोटो स्रोत, UWE

फोटो कॅप्शन, प्रयोगशाळेत रुबी तयार करण्यास 5 ते 50 तास लागतात असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

आपल्या प्रयोगांबाबत बोलताना बून्स म्हणतात, "मी त्यांना भट्टीमध्ये 5 ते 50 तास ठेवून वाढवण्याच्या प्रक्रियेसंदर्भात प्रयोग करते आहे. जितका जास्त काळ ही रत्नं किंवा रुबीच्या भट्टीत राहतील तितक्या अधिक प्रमाणात त्यातील स्फटीक स्वच्छ आणि मोठ्या आकाराची असतील."

"त्याचबरोबर मी या प्रक्रियेचा कालावधी कमी करण्यावर काम करत आहे. यामुळं ही रत्नं अधिक टिकाऊ बनतील."

'ही नवीन पद्धत मानवनिर्मित रत्नं सिंथेटिक किंवा कृत्रिम असतात या विचाराला आव्हान देते', असं त्या पुढे म्हणाल्या.

"या रत्नांचा आकार किती वाढू शकतो हे आपल्याला आधी सांगता येत नाही. या वैशिष्ट्यामुळे यात नैसर्गिकपणा आहे असं वाटतं, एक दागिन्यांची डिझायनर म्हणून मला ही गोष्ट विस्मयकारक वाटली," असं त्या सांगतात.

थोडक्यात, एक कण का असेना पण पण अस्सल रुबीचा अंश असल्याशिवाय प्रयोगशाळेत रुबीचा आकार वाढवता येऊ शकणार नाही.

प्रयोगशाळेत तयार होतात, तरीही अस्सल

रेबेका एंडर्बी या ब्रिस्टॉलमधीलच दागिन्यांच्या डिझायनर आहेत. त्यांनी प्रयोगशाळेत विकसित केलेल्या किंवा तयार केलेल्या हिऱ्यांवर लेख लिहिले आहेत. त्या म्हणाल्या की, प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिऱ्यांबाबतची धारणा किंवा दृष्टीकोन बदलतो आहे.

"प्रयोगशाळेत तयार झालेली रत्नं ही कृत्रिम नसतात. पृथ्वीवर नैसर्गिकरित्या ज्याप्रमाणे हजारो वर्षात रत्नं तयार होतात, त्याच प्रक्रियेची ही प्रयोगशाळेत केलेली पुनरावृत्ती किंवा नक्कल असते."

"त्यामुळं प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्यामुळं रत्नं खाणीतून काढण्यात आलेल्या रत्नांपेक्षा अधिक स्वस्त असतात. एक प्रकारे महागड्या रत्नांना हा तुलनात्मकरीत्या स्वस्त पर्याय असतो."

कारण खाणीतून रत्नं काढणं, त्यांना पैलू पाडणं ही एकूणच प्रक्रिया महागडी असते. त्या तुलनेत प्रयोगशाळेतील रत्नांच्या बाबतीत याप्रकारचा बराचसा खर्च होत नाही. साहजिकच त्यांची किंमत तुलनात्मकरित्या कमी असते.

एंडर्बी पुढे म्हणाल्या की, प्रयोगशाळेत तयार किंवा विकसित केलेल्या रत्नांमध्ये 'पर्यावरणाच्या दृष्टीनं अधिक चांगलं' असण्याची क्षमता असते.

रेबेका एंडर्बी

फोटो स्रोत, Chris King

फोटो कॅप्शन, रेबेका एंडर्बी यांच्या मते, प्रयोगशाळेत तयार केलेले रत्न कृत्रिम नाहीत.

"मात्र या रत्नांना तयार करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. त्यामुळं या रत्नांची निर्मिती ऊर्जेचे पर्यावरणपूरक पर्याय वापरून केली पाहिजे," असं त्या म्हणाल्या.

प्रयोगशाळेत रत्नं तयार करण्याचा प्रकल्प हा बून्स यांच्या पी. एच. डी. प्रबंधाचाच भाग आहे. या प्रकल्पातील यशामुळे त्यासाठी आता युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड (UWE)मधून दुसऱ्या टप्प्यातील निधी देखील मिळाला आहे.

ब्रिस्टॉल विद्यापीठानं देखील या प्रकल्पात सहभागी झालं आहे, जेणेकरून इतर रत्नांवरील संशोधनाचा समावेश करण्यासाठी या संशोधन प्रकल्पाची व्याप्ती वाढवता यावी.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.