अण्वस्त्रमुक्त जगासाठी झगडणाऱ्या जपानी संस्थेला मिळाला यंदाचा 'शांतता' नोबेल पुरस्कार

फोटो स्रोत, X/@NobelPrize
विज्ञान, साहित्य आणि शांततेच्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार हे जगात सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी एक मानले जातात. यंदाचे विजेते कोण आहेत, जाणून घ्या.
यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जपानच्या एका संस्थेला देण्यात आला आहे. निहॉन हिडानक्यो असं जपानच्या या संस्थेचं नाव आहे.
हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या शहरांवर अणूबॉम्बने हल्ला केला होता. त्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते. या स्फोटात बचावलेल्या लोकांसाठी ही संस्था काम करते.
या चळवळीला हिबाकुशा असं नाव दिलं गेलं आहे.
ही चळवळ राबवल्याबद्दल आणि या लोकांच्या गोष्टींच्या माध्यमातून संपूर्ण जग आण्विक हल्ल्यांपासून मुक्त करणे आणि ते कधीच वापरले जाऊ नये असा प्रयत्न करणं हे या चळवळीचं उद्दिष्ट होतं.
ऑगस्ट 1945 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर एक जागतिक चळवळ उभी राहिली होती. या हल्ल्यामुळे जे मानवी संकट उभं राहिलं होतं त्याबद्दल अथक जागृती करण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.
त्यातून एक पायंडा घालून देण्यात आला. आण्विक शस्त्रं वापरणं हे नैतिकदृष्ट्या अस्वीकारार्ह आहे, तो एक प्रकारचा टॅबू आहे असा ठराव संमत करण्यात आला. त्यालाच ‘न्यूक्लिअर टॅबू’ असंही म्हटलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
53 वर्षीय हान कांग हा बहुमान मिळवणाऱ्या पहिल्या दक्षिण कोरियाई लेखक आणि एकूण अठरावी महिला ठरल्या आहेत.
पुरस्कार जाहीर करताना निवड समितीनं त्यांच्या लेखनाविषयी म्हटलं आहे, "त्यांचं काव्यात्मक लिखाण ऐतिहासिक वेदनांचा जाब विचारतं आणि मानवी जीवनाचं नाजूकपण दाखवून देतं."
त्यांनी प्रचलित मर्यादा ओलांडून हिंसा, शोक आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेविषयी लिखाण केल्याचंही समितीनं नमूद केलं.
हान कांग यांना याआधी 2016 साली द व्हेजिटेरियन या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार मिळाला. हान यांनी हे पुस्तक दशकभर आधी लिहिलं होतं, पण त्याचं भाषांतर इंग्रजीत 2015 साली प्रखाशित झालं.
हान कांग यांनी द व्हाईट बुक, ह्यूमन अॅक्ट्स आणि ग्रीक लेसन्स अशी पुस्तकंही लिहिली आहेत.


हान कांग यांचा जन्म दक्षिण कोरियातल्या ग्वांगजू शहरात झाला. त्यांचे वडील हान सेऊंग-वॉन हेही लेखक आहेत.
तरुणपणीच कांग राजधानी सोल इथे आल्या आणि त्यांनी कोरियन साहित्याचा अभ्यास केला. 1993 मध्ये त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या. तेव्हापासून त्यांचा लेखनप्रवास सुरू आहे.
त्या सोल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्समध्ये रचनात्मक लेखनही शिकवतात. त्यांची पुस्तकं 30 हून अधिका भाषांत भाषांतरीत झाली आहेत.
प्रथिनांवरील संशोधनास रसायनशास्त्राचं नोबेल
यंदा रसायनशास्त्राचं नोबेल प्रथिनांच्या रचनेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना जाहीर झालं आहे.
पुरस्काराचा अर्धा भाग डेव्हिड बेकर यांना दिला जाईल. तर अर्धा हिस्सा डेमिस हसाबिस आणि जॉन एम जंपर यांना विभागून दिला जाईल.
प्रथिनांच्या अभ्यासासाठी या तिघांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सजीवसृष्टीचे मूलभूत घटक म्हणून प्रथिनांकडे पाहिलं जातं. पेशींच्या निर्मितीमध्ये प्रथिनांचं योगदान महत्त्वाचं आहे.
निसर्गतः आढळणाऱ्या प्रथिनांची प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या निर्मिती करता येते. मात्र त्यातली बहुतांश प्रथिनं म्हणजे नैसर्गिक प्रथिनांच्या प्रतिकृती होत्या.

डेव्हिड बेकर (62) यांनी मात्र पहिलंच पूर्णतः नवं कृत्रिम प्रथिन तयार केलं होतं. 2003 साली त्यांनी तयार केलेलं Top7 हे प्रथिन निसर्गतः सापडणाऱ्या ज्ञात प्रथिनांपेक्षा पूर्णत: वेगळं होतं.
डेमिस हसाबिस (48) आणि त्यांचे सहकारी जॉन जंपर यांनी अल्फा फोल्ड 2 नावाचं एआय मॉडेल तयार केलं, ज्याच्या मदतीनं जवळपास 20 कोटी प्रथिनांची रचना कशी आहे हे सांगता येतं.
संशोधनाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. अँटीबायोटिक औषधांना प्रतिरोध कसा निर्णाण होतो हे समजण्यासठी तसंच प्लॅस्टिकचं विघटन करण्यासाठी केला जाऊ शकतो.
AI साठी भौतिकशास्त्राचं नोबेल
यंदा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 'गॉडफादर ऑफ AI' किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रणेता म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन आणि याच विषयात पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांना यांना विभागून दिला दिला जाणार आहे.
76 वंशाचे जेफ्री हिंटन ब्रिटिश-कॅनेडियन नागरीक असून कॅनडातल्या टोरोंटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर 91 वर्षीय जॉन हॉपफील्ड अमेरिकेचे नागरीक असून अमेरिकेतल्या प्रिंस्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
दोघांच्या पायाभूत संशोधनानं मशिन लर्निंग आणि संगणकाचं विश्वच बदलून टाकलं, असं नोबेल पुरस्कार जाहीर करताना समितीनं नमूद केलं.
संगणक स्वतःला माहितीचं विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षित करतो, त्याला मशिन लर्निंग म्हणतात. इंटरनेटवर एखाद्या गोष्टीचा शोध घेणं, फोटो एडिट करणं हे सगळं या मशिन लर्निंगमुळेच शक्य होतं.
पण हे मशिन लर्निंग कशामुळे शक्य होतं? तर त्यासाठी न्यूरल नेटवर्क्स महत्त्वाची असतात.
आपल्या मेंदूतल्या पेशी किंवा न्यूरॉन्स एकमेकांशी संपर्क साधतात आणि त्यातून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. मानवी मेंदूतल्या अशा नेटवर्क्ससारखीच न्यूरल नेटवर्क ही संगणकीय प्रणाली आहे, ज्यातून AI नव्या गोष्टी शिकत जातं.

आज भाषांतरापासून ते चेहरा ओळखण्यापर्यंत संगणक सर्व काही प्रभावीपणे करू लागला आहे, त्यामागे हॉपफील्ड आणि हिंटन या दोघांचं म्हत्त्वाचं योगदान आहे.
त्यांच्या संशोधनावर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तसंच वैद्यकीय क्षेत्रात विश्लेषणासाठीही केला जातो आहे, हे पुरस्काराची निवड करताना समितीनं अधोरेखित केलं आहे.
जेफ्री हिंटन यांच्या संशोधनामुळेच ChatGPT सारख्या तंत्राचा विकास शक्य झाला. पण हिंटन गेल्या वर्षीच गुगलमधून राजीनामा दिल्यामुळेही चर्चेत आले होते.
त्यावेळी हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांविषयीही भाष्य केलं होतं.
आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान असलेल्या यंत्रणा (मशीन) हळूहळू कदाचित सगळ्या गोष्टींचा ताबा घेईल, अशी भीती हिंटन यांनी व्यक्त केली होती.
वैद्यकशास्त्राचं नोबेल
व्हिक्टर अँब्रोज आणि गॅरी रुवकुन या अमेरिकेच्या जीवशास्त्रज्ञांना 2024 सालचा वैद्यकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघांनी मायक्रो-RNA वर संशोधन केलं होतं.
मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये डीएनए असतो आणि त्यातील गुणसुत्रांमध्ये शरिराविषयीची माहिती साठलेली असते.
एका मानवाच्या शरिरातील प्रत्येक पेशीतला डीएनए समान असतो पण हृदयातल्या पेशी यकृतातल्या पेशी काम मात्र वेगळ्या पद्धतीनं करतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आणि अवयवांची निर्मिती कशी होते, याचं उत्तर मायक्रो-RNA मध्ये दडलं आहे.

मायक्रो-RNA हे पेशीतल्या RNA मधले अतीसूक्ष्म कण असतात आणि ते गुणसूत्रांवर वेगवेगळ्या पद्धतीनं कसा प्रभाव टाकतात याचा शोध अँब्रोज आणि रुवकुन यांनी लावला.
या संशोधनामुळे मानवी शरीरातील गुणसूत्रे कसं काम करतात आणि त्यातून शरीरातील वेगवेगळ्या उतींची निर्मिती कशी होते हे समजण्यास मदत झाली.
पृथ्वीवर जटील प्राण्यांची निर्मिती कशी झाली आणि मानवी शरीराचा विकास कसा झाला, याचा अभ्यास करण्यातही या संशोधनानं मदत झाली आहे.
नोबेल पुरस्कार कुणाला दिले जातात?
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. त्याशिवाय नोबेल पुरस्कार समिती दरवर्षी अर्थशास्त्रातल्या कामगिरीसाठीही पुरस्कार जाहीर करते.
नोबेल मानपत्र, पदक आणि पुरस्कार निधी असं या मानाचं स्वरूप असतं.
स्विडीश उद्योजक आणि संशोधक आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रानुसार 1901 पासून हे पुरस्कार दिले जातात.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांची घोषणा केली जाते आणि साधारण 10 डिसेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












