पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र

फोटो स्रोत, Getty Images
सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीला अजून एक छोटा चंद्र - Mini Moon मिळणार आहे. आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? आणि तो दोनच महिने पृथ्वीच्या कक्षेत का असेल?
2024 PT5 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीचा Mini Moon म्हणजे लहानसा चंद्र बनेल.
सगळ्यात आधी Asteroid म्हणजे काय? तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान, खडकाळ गोष्ट. लघुग्रह. मग हे लघुग्रह आले कुठून? तर 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आपली सौरमाला निर्माण होणारा स्फोट झाला, त्यातून उरलेल्या गोष्टी म्हणजे लघुग्रह.
आपल्या सौरमालेत (Solar System) मध्ये मंगळ आणि गुरू ग्रहादरम्यान अशा लघुग्रहांचा मोठा पट्टा आहे.
नासाच्या पाठिंब्यासह संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना एका लघुग्रहाचा (Asteroid) ऑगस्ट महिन्यात शोध लागला. दक्षिण आफ्रिकेतल्या Asteroid Terrestrial-Impact Last Alert System (ATLAS) ने अंतराळातला हा लघुग्रह टिपला.
याला त्यांनी नाव दिलं - 2024 PT5
2024 PT5 लघुग्रह आला कुठून?
पृथ्वीपासून 9.3 कोटी मैलांच्या अंतरावर लघुग्रहांचा एक पट्टा आहे. याला म्हटलं जातं Arjuna Asteroid Belt. या पट्ट्यामध्ये असणाऱ्या लघुग्रहांची कक्षा ही पृथ्वीसारखी आहे.
सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या आणि पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळून जाणाऱ्या लघुग्रह वा धूमकेतूंना म्हटलं जातं NEO म्हणजे Near Earth Object.
याच पट्ट्यातला 2024 PT5 हा लघुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या त्याच्या प्रवासादरम्यान पृथ्वीच्या जवळ येईल आणि गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत ओढला जाईल. अशाप्रकारे जे लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीभोवती फिरायला लागतात त्यांना Mini Moon म्हणजे लघु-चंद्र म्हटलं जातं.
यापूर्वी 2022 NX1 या लघुग्रहाला पृथ्वीने पकडलं आणि तो 1981 आणि 2022 मध्ये काही काळासाठी पृथ्वीचा लघुचंद्र झाला होता.

पृथ्वीजवळ येणाऱ्या लघुग्रहाचा वेग किती आहे, त्यांची Trajectory म्हणजे पुढच्या प्रवासाची अपेक्षित दिशा कशी आहे यावर हा लघुग्रह पृथ्वीचा लघु-चंद्र म्हणून किती काळ राहणार ते ठरतं.
पृथ्वीपासून ठराविक अंतरावर गेल्यावर हे लघुग्रह गुरुत्वाकर्षण बलातून बाहेर पडतात आणि कक्षेतून सुटे होतात.
धातूचे अंश, कार्बन, क्ले आणि सिलीकेटपासून हा लघुग्रह तयार झालाय.
पृथ्वीचा हा लघु-चंद्र डोळ्यांना दिसणार का?
2024 PT5 लघुग्रह 33 फूट लांब आहे. म्हणजे साधारण एखाद्या बसच्या आकाराचा आहे. साध्या डोळ्यांना हा दिसणार नाही. तो पाहण्यासाठी प्रोफेशनल टेलिस्कोप वापरावा लागेल.
संशोधकांच्या मते हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत ओढला गेल्यानंतर ग्रहाला पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. त्याऐवजी या लघुग्रहाची पृथ्वीचा मिनी मून झाल्यानंतर घोड्याच्या नालीच्या आकाराची कक्षा असेल.
साधारण दोन महिने हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत असेल. त्यानंतरही काही काळ तो पृथ्वीपासून जवळ असेल. जानेवारी 2025 मध्ये तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ असेल. त्यानंतर थेट 2055 मध्ये हा लघुग्रह पुन्हा पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचं संशोधन सांगतं.
29 सप्टेंबरला हा 2024 PT5 पृथ्वी प्रदक्षिणा सुरू करेल आणि 25 नोव्हेंबरपर्यंत तो अशी प्रदक्षिणा घालेल. सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हा लघुग्रह पुन्हा अर्जुन लघुग्रह पट्ट्यात परतेल.
त्यामुळे संधी मिळाली तरी या पृथ्वीचा हा दोन महिन्यांसाठीचा मिनी - मून पहायला विसरू नका.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











