Polaris Dawn : जेरर्ड आयझॅकमन यांनी रचला इतिहास, पहिला खासगी स्पेसवॉक करत, अंतराळातून पृथ्वीचे असे केले वर्णन

साराह गिलिस

फोटो स्रोत, SpaceX

    • Author, पल्लब घोष
    • Role, विज्ञान प्रतिनिधी

अब्जाधीश जेरर्ड आयझॅकमन हे अंतराळवीर नसूनही स्पेसवॉक करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. जगामध्ये पहिल्यांदाच खासगी पैशांतून स्पेसवॉक करण्यात आला. स्पेस एक्सच्या फाल्कन-9 रॉकेटने 10 सप्टेंबरला झेप घेतली होती.

या मोहिमेचं नावं आहे 'पोलारिस डॉन'.

जेरर्ड आयझॅकमन यांच्या Shift4 या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहीमांपैकी ही पहिली मोहीम आहे.

'फाल्कन 9' च्या या 'पोलारिस डॉन' मोहिमेत जेरर्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र असणारे निवृत्त एअर फोर्स पायलट स्कॉट 'किड' पोटीट आणि स्पेस एक्सचे दोन इंजिनियर्स अॅना मेनन आणि सारा गिलीस सहभागी आहेत.

तिसऱ्या दिनशी आयझॅकमन यांच्यासह सारा गिलिस आणि चालक दलाचे सदस्य स्कॉट पोटेट यानातून बाहेर आले. यावेळी जेरर्ड आयझॅकमन म्हणाले की, इथून पृथ्वीही नक्कीच एक आदर्श जग असल्याची जाणीव होते.

पोलारिस डॉन मोहिमेचं वेगळेपण काय?

अंतराळात झेपावलेल्या या यानाचं नाव आहे 'रेजिलियन्स' (Resilience).

पृथ्वीपासून तब्बल 1400 किलोमीटर्स (870 मैल) उंचीवर हे यान झेपावले.

यापूर्वी 1970च्या दशकामध्ये नासाच्या अपोलो अंतराळ मोहिमांमधली यानं इतक्या उंचीवर अंतराळवीरांना घेऊन गेली होती.

अंतराळातल्या वॅन अॅलन बेल्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यातून हे अंतराळवीर जातील. या भागामध्ये किरणोत्सर्गाचं (Radiation) प्रमाण सर्वाधिक आहे.

पण अंतराळयान आणि अंतराळामध्ये वापरण्यात येत असलेले नवे स्पेससूट्स यामुळे या किरणोत्सर्गापासून अंतराळवीरांचं संरक्षण होईल.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तीन महिने राहिल्यानंतर अंतराळवीरांना जितक्या किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो, तेवढ्या रेडिएशनचा सामना या लोकांना काही वेळा या पट्ट्यातून गेल्यामुळे करावा लागेल.

किरणोत्सर्गाची एवढी पातळी Acceptable म्हणजे झेपण्याजोगी मानली जाते. थोडाकाळ सुरक्षेच्या उपाययोजना करून रेडिएशनला सामोरं गेल्यास त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास ही टीम करणार आहे.

10 सप्टेंबरला लाँच झालेल्या मोहिमेनं दुसऱ्या दिवशी अंतराळात सर्वोच्च उंची गाठणं अपेक्षित होतं.

इथे साधारण 40 प्रयोग केले जातील. या अंतराळवीरांचं ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आणि स्पेस एक्सचाच स्टारलिंक कॉन्स्टिलेशन उपग्रह यांच्यामध्ये अंतराळातला संवाद - intersatellite communication करण्याचाही प्रयत्न मोहिमेत करण्यात येणार आहे.

हे ठरवल्यानुसार पार पडल्यास मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी आयझॅकमन आणि सारा गिलीस यांनी स्पेसवॉक केला.

दोन तासांचा हा स्पेस वॉक खासगी निधीतून आयोजित करण्यात आलेला जगातील पहिला स्पेसवॉक ठरला.

नवीन स्पेससूटची वैशिष्ट्यं

स्पेसवॉकवेळी पृथ्वीपासून 700 किलोमीटर्सच्या कक्षेत असतील. अंतराळात गेलेल्या या व्यक्तींकडे नवीन एक्स्ट्रावेहिक्युलर अॅक्टिव्हिटी (Extravehicular Activity - EVA) अॅस्टॉनॉट सूट्स आहेत.

म्हणजे अंतराळ यानाच्या आत वापरण्याच्या (Intravehicular Activity - IVA) सूट्समध्ये सुधारणा करून अंतराळ यानाच्या बाहेरच्या कामांसाठी वापरण्यात येण्याचे स्पेससूट तयार करण्यात आले आहेत.

नवा स्पेससूट

फोटो स्रोत, X\/PolarisProgram

फोटो कॅप्शन, स्पेस एक्सने विकसित केलेला नवा स्पेससूट
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या EVA सूट्च्या हेल्मेट्समध्ये डिस्प्ले आहे ज्यावर हा सूट वापरात असताना सूटबद्दलची माहिती मिळेल. हे EVA सूट्स लाँच आणि लँडिंगसाठीही वापरण्याजोगे आणि लवचिक (Comfortable and flexible) असल्याचं म्हटलं जातंय. यामुळेच या लोकांना यानाच्या आत असताना वेगळे - IVA सूट्स घालण्याची गरज नाही.

स्पेस एक्सचे हे नवे स्पेस सूट्स महत्त्वाचे असल्याचं सारा गिलीस यांनी स्पेसवॉकसाठीचं ट्रेनिंग सुरू असताना म्हटलं होतं.

"आतापर्यंत फक्त देशांकडूनच स्पेसवॉकची मोहीम करण्यात आले आहेत. मंगळावर जाऊन तिथेही आयुष्य निर्माण करण्याची मोठी महत्त्वाकांक्षा स्पेस एक्सने बाळगली आहे. तिथे जाण्यासाठीची सुरुवात आम्हाला कुठूनतरी करायलाच हवी. यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे EVA स्पेससूट्सची चाचणी घेणं. यामुळे स्पेसवॉक्सही करता येतील आणि भविष्यासाठी स्पेससूटच्या डिझाईनमध्ये सुधारणाही करता येईल."

आयझॅकमन यांनीही हेच बोलून दाखवलं.

"भविष्यात कधीतरी दुसऱ्या ग्रहावर वसती निर्माण करायचं दीर्घकालीन उद्दिष्टं स्पेस एक्सने बाळगलं असेल, तर त्यासाठी सक्षम EVA सूट्स असणं गरजेचं आहे."

अंतराळात जाताना वापरण्यात येणारे स्पेससूट्स हे प्रत्येक व्यक्तीनुसार तयार करण्यात आलेले युनिफॉर्म न रहाता यापुढे कमर्शियली म्हणजे पैसे भरून अंतराळ जाणाऱ्या लोकांसाठी ते त्यांच्या साईझ आणि आकारात उपलब्ध व्हावेत, अशी कल्पना आता समोर येतेय. यामुळे अंतराळ प्रवास हा अधिक नियमित वा सामान्य होईल आणि त्यासाठीचा खर्चही कमी होईल.

स्पेसवॉक आणि एअरलॉक

या पोलारिस डॉन मोहिमेतल्या स्पेसवॉकबद्दलचे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रेजिलियन्स नावाच्या ड्रॅगन अंतराळयानाला एअरलॉक (Airlock) नाही.

म्हणजे एरवी अंतराळयानाचं दार आणि बाहेरील अंतराळ पोकळी यांदरम्यान एक बंद खोली (Sealed room) असते.

अंतराळवीर स्पेसवॉकसाठी यानाबाहेर पडताना या खोलीत जातात, तिथून हवा काढून टाकून पोकळी तयार करण्यात येते आणि मग बाहेरचा दरवाजा उघडून अंतराळपोकळीत प्रवेश केला जातो.

यानात परत शिरण्यासाठी हीच प्रक्रिया उलट करत या बंद खोलीत हवेचा दाब निर्माण केला जातो आणि मग यानाचा आतला दरवाजा उघडत अंतराळवीर यानात पुन्हा प्रवेश करतात. पण रेजिलियन्स यानाला असं एअरलॉक नाही.

लाल रेष
लाल रेष

स्पेसवॉकसाठी बाहेर पडताना अख्ख्या यानामधलाच हवेचा दाब काढून टाकला जाईल (Depressurised) त्यामुळे स्पेसवॉकसाठी बाहेर न पडणाऱ्या सदस्यांनाही पूर्ण सूट घालून बसावं लागेल.

पोकळीमध्ये टिकून राहण्याजोगी या यानाची बांधणी करण्यात आली आहे. यानात अधिकचे नायट्रोजन आणि ऑक्सिजन टँक्स असून, दोनच जण स्पेसवॉकसाठी बाहेर पडणार असले, तरी चारही अंतराळवीर EVA सूट्स घालतील.

एकाचवेळी सर्वाधिक लोक Vacuum of Space म्हणजे अंतराळ पोकळीत असण्याचा विक्रम ही मोहीम मोडेल.

अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा प्रवेश

Decompression म्हणजे सगळा दाब (Pressure) काढून टाकण्याचे (Decompression sickness)चे शरीरावर आणि दृष्टीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याचं आव्हान या टीमने स्वीकारलं आहे. याला Neuro-Ocular Syndrome म्हटलं जातं.

किरणोत्सर्ग सर्वाधिक असणाऱ्या वॅन अॅलन बेल्टमधल्या प्रवासाचे परिणाम, स्पेसवॉक दरम्यानचे प्रयोग याचा फायदा यापुढच्या High Altitude Missions ना विशेषतः मंगळावर वा चंद्रावर जाणाऱ्या खासगी मोहीमांना होईल.

या मोहिमेद्वारे अंतराळात गेलेल्या चौघांपैकी एकटे आयझॅकमन यापूर्वी एकदा अंतराळात गेलेले आहेत तर इतर तिघांनी यापूर्वी अंतराळ झेप घेतलेली नाही.

क्रॅनफिल्ड विद्यापीठातले रॉकेट प्रोपल्शन तज्ज्ञ डॉ. अॅडम बेकर सांगतात, "यामध्ये अनेक धोके असल्यासारखं वाटतंय. त्यांनी स्वतःसमोर फार मोठी उद्दिष्टं ठेवली आहेत आणि त्यांच्याकडे तुलनेने फारच मर्यादित अंतराळ प्रवासाचा अनुभव आहे. पण यासाठी त्यांनी सिम्युलेट मिशन्सद्वारे हजारो तास तयारी केली आहे. धोका शक्य तितका कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे."

पोलारिस डॉन मोहीमेचे सदस्य

फोटो स्रोत, X\PolarisProgram

फोटो कॅप्शन, पोलारिस डॉन मोहीमेचे सदस्य

ही मोहीम यशस्वी ठरली तर यामुळे अंतराळामध्ये जाणाऱ्या खासगी मोहिमांमध्ये प्रचंड वाढ होईल आणि त्यातही सरकारी अंतराळ संस्थांपेक्षा अधिक उंचीवर नेणाऱ्या, स्वस्तात प्रवास घडवणाऱ्या मोहिमा सुरू होण्याचा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

डॉ. बेकर सांगतात, "आतापर्यंत खासगी क्षेत्राला यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागलाय, त्यातून थोडीफार प्रसिद्धी मिळाली आहे. आतापर्यंत सरकारी मोहिमांमधून सुमारे 500 जण अंतराळात जाऊन आले असतील तर खासगी प्रवास 100 जणांनी केला आहे. आणि यातल्या अनेक अवकाश मोहिमा तर अगदी लहान होत्या. अंतराळात झेपावणं कठीण, महागडं आणि धोकादायक आहे. म्हणून अगदी गर्भश्रीमंत वर्गांमधील व्यक्ती अंतराळात जातील. श्रीमंत वर्गाची गर्दी होण्याची शक्यता इतक्यात दिसत नाही."

अंतराळात जाण्यासाठी अब्जाधीशांनी पैसे खर्च करणं ही संकल्पनाच काहींना पटत नाही, तर पैसे खर्च करणारी व्यक्तीच ज्या मोहिमेची कमांडर म्हणजे प्रमुख आहे, त्याबद्दल काहींनी साशंकता व्यक्त केली आहे.

पण या मोहिमेकडे हौस म्हणून पाहत दुर्लक्ष करता येणार नाही, असं ओपन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सायमन बार्बर यांना वाटतं.

ते म्हणतात, "या क्रू मधील सर्वांत अनुभवी अंतराळवीर आहेत आयझॅकमन. ते यापूर्वी स्पेस एक्सद्वारे स्वतःच्या खर्चाने अंतराळप्रवास करून आले आहेत. त्या मोहिमेचे ते कमांडरही होते. त्यामुळे या मोहिमेसाठीही ते कमांडर असणं हा स्वाभाविक पर्याय होता. शिवाय या अंतराळ प्रवासासाठी त्यांनी जो खर्च केलाय त्याचा फायदा पृथ्वीवरच होणार आहे.

"या पैशांतून साहित्य आणि सेवा खरेदी करता येतील, पगार देता येतील आणि पर्यायाने टॅक्सही भरला जाईल. शिवाय या मिशनमधून चॅरिटीसाठीही निधी उभा करण्यात येणार आहे. अंतराळ क्षेत्रात श्रीमंत व्यक्तींनी रस घेणं चांगलं आहे. जर त्यांना या ग्रहावरून दुसरीकडे जायचंय - अगदी चंद्रावर किंवा मंगळावर...तर त्यातून यादरम्यान विज्ञानासाठीच्या संधी निर्माण होतील. शिवाय अंतराळ क्षेत्र चाचपण्याची जितकी विविध कारणं वा उद्दिष्टं मिळतील तितक्या अंतराळ मोहिमा सक्षम होत जातील," असं बार्बर सांगतात.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)