मंगळ ग्रहावर नदीच्या खुणा, मग पाणी गेलं कुठं? या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं

फोटो स्रोत, NASA
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
मंगळावरच्या खडकाळ पृष्ठभागाच्या खोलवर आत वैज्ञानिकांना पाण्याचा साठा सापडला आहे.
नासाच्या मार्स इनसाईट लँडर (Mars Insight Lander) च्या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला आहे. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता.
या लँडरवर सेस्मोमीटर (Seismometer) म्हणजे भूकंप मोजणारं उपकरण होतं. या उपकरणाने 4 वर्षं मंगळाच्या गर्भातली खोलवरची कंपनं आणि हालचाली नोंदवल्या.
या कंपनांचा आणि हा ग्रह नेमका कसा फिरतो, याचं विश्लेषण करताना संशोधकांना द्रव अवस्थेतल्या पाण्याच्या साठ्याची कंपनं (Seismic Signals) आढळले.
मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेलं पाणी आणि वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेच्या अस्तित्त्वाचे पुरावे यापूर्वीच आढळले आहेत. पण मंगळावर द्रव स्थितीतलं पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळलं आहे.
प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
चार वर्षं मंगळावरील प्रत्येक हालचालीची नोंद केल्यानंतर या मार्स इनसाईट लँडरची मोहीम डिसेंबर 2022मध्येच संपुष्टात आली. या चार वर्षांत या प्रोबने 1,319 कंप (Quakes) नोंदवले.
कंपन लहरी वेगवेगळ्या पदार्थांतून किंवा माध्यमांमधून वेगळ्या वेगाने वाहतात. त्यामुळे मंगळावरच्या या कंपनांचा त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला. या कंपनांच्या वेगावरून या लहरी नेमक्या कशामधून आल्या याचा अंदाज लावण्यात आला.
या संशोधनात सहभागी असलेले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रा. मायकल मांगा सांगतात, "ही तीच पद्धत आहे, जी वापरून पृथ्वीवर पाण्याचा शोध घेतला जातो. किंवा तेल आणि गॅसचा शोध घेतला जातो."

फोटो स्रोत, NASA
मंगळाच्या पृष्ठभागाच्या खाली 10 ते 20 किलोमीटरवर हे पाण्याचे साठे असल्याचं विश्लेषणातून आढळलंय.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगोमधल्या स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीचे प्रमुख संशोधक डॉ. वशान राईट सांगतात, "मंगळावरील वातावरण, पृष्ठभाग आणि गाभा यामध्ये घडत आलेले बदल समजून घेण्यासाठी आधी मंगळावरील जलचक्र (Water Cycle) समजणं महत्त्वाचं आहे."
एखाद्या ग्रहाच्या उत्त्कांतीमध्ये पाण्याचा रेणू सर्वात महत्त्वाचा असल्याचं प्रा. मांगा म्हणतात. मंगळावरचं सगळं पाणी कुठे गेलं या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर या शोधामुळे मिळत असल्याचंही ते सांगतात.


कधीकाळी मंगळावर नद्या आणि तलाव होते हे मंगळाच्या पृष्ठभागावरील प्रवाहाच्या आणि घळींवरून (Channels and ripples) सिद्ध होतं. पण आता गेली तीन अब्ज वर्षं तिथे वाळवंट आहे.
मंगळावरचं वातावरण (Atmosphere) नष्ट झालं तेव्हा यातलं काही पाणी अवकाशात हरवलं. प्रा. मांगा म्हणतात, "इथे पृथ्वीवर आपलं बहुतेक पाणी हे जमिनीखाली आहे. असंच मंगळावर असण्याचीही शक्यता आहे."
मंगळावर उतरलेल्या इनसाईट प्रोबने त्याच जमिनीखालच्या हालचालींची नोंद केली जी जमीन बरोबर या प्रोबच्या खाली होती. पण संपूर्ण ग्रहावरच अशाप्रकारचे पाण्याचे साठे असून मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाण्याचा साधारण अर्धा मैल किंवा त्यापेक्षा जास्त खोलीचा थर संपूर्ण ग्रहभर असण्याचा अंदाज संशोधक मांडत आहेत.

फोटो स्रोत, NASA
पण मंगळावर कॉलनी उभारण्याची योजना आखणाऱ्यांसाठी मंगळावर असं पाणी सापडणं चांगली बातमी नसल्याचंही संशोधक म्हणतायत.
बीबीसी न्यूजशी बोलताना प्रा. मांगा म्हणाले, "हे पाणी पृष्ठभागाखाली 10 - 20 किलोमीटर खोल दडलेलं आहे. मंगळावर 10 किलोमीटर खोल खोदणं हे अगदी (इलॉन) मस्कसाठीही कठीण आहे. पण मंगळावर आयुष्य आहे का, याचा शोध घेण्यात येतोय, आणि त्यादृष्टीने पाण्याचा शोध महत्त्वाचा असेल. कारण द्रव अवस्थेतल्या पाण्याशिवाय जीवन टिकणं कठीण असतं. म्हणजे जर मंगळावर जीवसृष्टीसाठी पोषक पर्यावरण असलंच, तर ते आता जमिनीखाली खोलवर असण्याची शक्यता निर्माण झालीय."











