सुनिता विल्यम्स अंतराळातून कधी परतणार? NASA ने सांगितली नवी तारीख

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर हे 19 किंवा 20 मार्च रोजी अंतराळातून परतू शकतात. दोघेही जवळपास 10 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहेत.

या दोघांनीही 5 जून 2024 रोजी या चाचणी मोहिमेसाठी स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले. यानंतर आठ दिवसांनी ते परत येणार होते.

स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात येताच, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. दिशादर्शन करणारे अंतराळयानाचे पाच थ्रस्टर खराब झाले. अंतराळयानातील हेलियमही संपले. त्यामुळे, अंतराळयानाला जळणाऱ्या इंधनावर अवलंबून राहावं लागलं. याच कारणांमुळे दोन्ही अंतराळवीरांच्या परत येण्यास विलंब झाला.

61 वर्षीय विल्मोर आणि 58 वर्षीय सुनिता यांना बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेण्यात आलं. माणसं असलेलं हे अशा प्रकारचं पहिलंच अंतराळयान होतं.

हे अंतराळ मोहीम एक चाचणी होती. यात नवीन अंतराळयान नियमित वापरात आणण्यापूर्वी ते कसे कार्य करेल हे पाहिलं जाणार होतं.

मात्र, जसजसं हे अंतराळयान पुढे पुढे सरकत गेले, तसतशा यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्याच्या प्रोपल्शन सिस्टममध्ये गळती झाली. तसेच काही थ्रस्टर देखील बंद होऊ लागले.

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली आहे. नासाच्या मते, दोन्ही अंतराळवीरांना 19 किंवा 20 मार्चच्या सुमारास परत आणलं जाऊ शकतं.

नासाच्या स्पेसएक्स क्रू-9 चे सदस्य असलेल्या निक हॉज, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 4 मार्च 2025 रोजी अंतराळातून निघण्यापूर्वी पत्रकार परिषदेद्वारे सर्वांशी संवाद साधला होता.

सुनिता विल्यम्सनं रचला पुन्हा एकदा विक्रम

सुनिता विल्यम्स 9 महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहे. यासह, ती सलगपणे सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी पहिली महिला बनली आहे.

हा सुनिता विल्यम्सचा पहिला विक्रम नाही. तिने 22 तास 27 मिनिटे अंतराळात चालत राहून एका महिलेने सर्वात जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रमही केला आहे.

यापूर्वी हा विक्रम अंतराळवीर कॅथरीन थॉर्नटन यांच्या नावावर होता. कॅथरीन यांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रम केला होता.

सुनिता विल्यम्सचा हा तिसरा अंतराळ प्रवास आहे. तिन्ही मोहिमांसह तिने आतापर्यंत 9 वेळा स्पेसवॉक केला आहे. या काळात त्यांनी 62 तास 6 मिनिटे अंतराळयात्रा केली.

सुनिता विल्यम्स निवृत्त नौदलाची हेलिकॉप्टर पायलट आहे, तर विल्मोर माजी फायटर जेट पायलट आहे असून यापूर्वी दोनदा अंतराळ प्रवासही केला आहे.

सुनीता विल्यम्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनीता विल्यम्स

61 वर्षांचे विल्मोर आणि 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलायनरमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. या स्टारलायनरची ही पहिली मानवी सहभाग असणारी मोहीम होती. हे नवीन स्पेसक्राफ्ट - अंतराळयान कसं काम करतं, त्याचा नियमित वापर केला जाऊ शकतो का, याची चाचणी करण्यासाठीची ही मोहीम होती.

पण या मोहीमेच्या उड्डाणाच्या आधीपासूनच अडथळे येत गेले. उड्डाण पुढे ढकलण्यात आलं. आणि जेव्हा हे स्टारलायनर झेपावलं, तेव्हा त्याच्या प्रॉपल्शन सिस्टीम म्हणजे यानाला पुढे ढकलणाऱ्या यंत्रणेत गळती झाली, यान पुढे नेण्याचं काम करणारे काही थ्रस्टर्स (Thrusters) बंद पडले.

हे अंतराळवीर सुरक्षितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले खरे, पण स्टारलायर परतीसाठी सुरक्षित नसेल तर ते सुरक्षितपणे परत कसे येणार, याची चर्चा सुरू झाली.

अंतराळातल्या दीर्घ वास्तव्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

अंतराळामध्ये दीर्घ काळ राहण्याचा अंतराळवीरांच्या शरीरातील स्नायू, मेंदू, डोळे यांवर परिणाम होतो.

अमेरिकेचे अंतराळवीर फ्रँक रुबिओ यांच्या अंतराळातल्या दीर्घ वास्तव्याचा त्यांच्या शरीरावर कसा परिणाम झाला, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. व्यायामाची मोजकी साधनं वापरून अंतराळात व्यायाम करण्याचा शरीरावर कसा परिणाम होतोय, हे तपासण्यासाठीच्या प्रयोगामध्ये सहभागी झालेले ते पहिले अंतराळवीर होते.

पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडत चंद्रापेक्षाही दूर अंतरावरच्या अंतराळ मोहिमांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल. कारण मंगळावर मानवी अंतराळमोहीम काढायची झाल्यास सध्याच्या आकडेवारीनुसार मंगळावर जाऊन परत येण्यासाठी साधारण 1100 दिवस - 3 वर्षांपेक्षाही जास्त काळ लागण्याचा अंदाज आहे. मंगळावर हे अंतराळवीर ज्या यानाने जातील ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपेक्षा बरंच लहान असेल. याचा अर्थ अंतराळवीरांना व्यायाम करण्यासाठी लहान, कमी वजनाची उपकरणंच नेता येतील.

अंतराळात व्यायाम करणारा अंतराळवीर

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, नासाचे अंतराळवीर दररोज अंतराळ स्थानकात दोन ते अडीच तास व्यायाम करतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मग अंतराळात राहण्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होत असल्याचं आतापर्यंत लक्षात आलंय?

सगळ्यात मोठा परिणाम होतो - गुरुत्वाकर्षण नसल्याचा. गुरुत्वाकर्षाची ओढ नसल्याने हाता-पायाच्यां स्नायूंचं प्रमाण आणि हाडांची घनता कमी व्हायला लागते. ताठ उभं राहता येण्यासाठी - Posture नीट राखण्यासाठी ज्या स्नायूंची आपल्याला मदत होत असते, ते आपल्या पाठीचे, मानेचे, पोटऱ्या आणि मांडीचे स्नायू यांवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये या स्नायूंना कामच राहत नाही आणि ते कमकुवत व्हायला लागतात.

अंतराळातल्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यानंतरच Muscle Mass अगदी 20% कमी होतं आणि दोन ते सहा महिन्यांच्या वास्तव्यामुळे ते 30% कमी होऊ शकतं.

यासोबतच शरीरातल्या सांगाड्यावर - हाडांवरही पृथ्वीसारखा कामाचा ताण नसतो. त्यामुळे हाडं ठिसूळ होऊ लागतात आणि त्यांच्यातली शक्ती कमी होते. सहा महिन्यांच्या काळात अंतराळवीरांच्या शरीरातलं 10 टक्क्यांपर्यंतचं Bone Mass कमी होतं. पृथ्वीवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हेच प्रमाण दरवर्षी 0.5 - 1% असतं.

यामुळेच अंतराळवीरांना फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं आणि ते भरून येण्यासाठी जास्त काळ लागतो. पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरातली हाडं पूर्णपणे पहिल्यासारखी व्हायला चार वर्षं लागू शकतात.

सुनीता विल्यम्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनीता विल्यम्स

यासाठीच अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये असताना रोज अडीच तास व्यायाम करतात आणि चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करतात.

अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने या अंतराळवीरांचा कणा प्रसरण पावतो आणि त्यांची उंची थोडीशी वाढतेही.

अंतराळामध्ये वजन कायम राखणं, हे देखील एक आव्हान असतं. अंतराळवीरांना विविध प्रकारे सकस आहार मिळेल याचा प्रयत्न नासाद्वारे करण्यात येतो. यासाठी अगदी अंतराळ स्थानकात सॅलडची पानं रूजवून उगवण्याचा प्रयोगही नुकताच करण्यात आला.

अंतराळात 340 दिवस राहून आलेल्या स्कॉट केली यांचं Body Mass हे त्यांच्या पृथ्वीवर असलेल्या जुळ्या भावापेक्षा 7% कमी झालं होतं.

पृथ्वीवर असताना गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातलं रक्त खाली वाहतं आणि हृदय ते पुन्हा वर पाठवतं. पण अंतराळात ही प्रक्रिया बिघडते. आणि डोक्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त रक्त साठू लागतं. यातलं काही द्रव्य डोळ्याच्या मागच्या बाजूला आणि ऑप्टिक नर्व्हच्या भोवती साठून सूज येऊ शकते. यामुळे दृष्टीवर परिणाम होतो किंवा डोळ्यांच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो. अंतराळात दोनच आठवडे राहिल्यानंतर हे घडायला सुरुवात होऊ शकते. पण वाढत्या कालावधीसोबत हा धोका वाढतो.

Galactic Cosmic Rays, ऊर्जा असणारे सौर कण यामुळेही डोळ्यांना इजा होऊ शकते. पृथ्वीवरचं वातावरण आपलं या सगळ्यापासून संरक्षण करतं. पण स्पेस स्टेशनमध्ये हे संरक्षक आवरण नसतं. अंतराळ केंद्र अंतराळवीरांचं रेडिएशनपासून संरक्षण करत असलं तरी कॉस्मिक किरण आणि सौर कणांचा डोळ्यांवर परिणाम होतोच.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)