अंतराळात होणारा प्रचंड स्फोट जो 80 वर्षांनी एकदाच पाहायला मिळतो, पण तो होणार कधी?

नोव्हा

फोटो स्रोत, NASA

काही खगोलीय घटना इतक्या दुर्मिळ असतात, की आयुष्यात एकदाच अनुभवता येतात...जसं की दर 75 -80 वर्षांनी येणारा हॅलेचा धूमकेतू...

अंतराळातली अशीच एक घटना आपल्याला पहायला मिळणार आहे. अवकाशात होणारा एक प्रचंड मोठा स्फोट जो नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल.

80 वर्षांतून एकदाच होणारी ही घटना म्हणजे Nova Explosion वा Nova Eruption म्हणजेच ताऱ्याचा स्फोट.

पृथ्वीवर - रस्त्यावरचं अंतर मोजायला जसं किलोमीटर वा मैल हे एकक वापरतात, तसं अंतराळामध्ये ही अंतरं प्रकाश वर्षं - Light Years मध्ये मोजली जातात.

Light म्हणजेच प्रकाश एका वर्षात जितकं अंतर कापतो, त्याला प्रकाशवर्ष म्हणतात. (1 प्रकाशवर्ष = 9.46 ट्रिलियन किलोमीटर)

पृथ्वीपासून 3000 प्रकाशवर्षं (Light Years) दूर आहेत कोरोना बोरिआलीस नावाचे जोडतारे (Binary System)

यामध्ये एक मृत श्वेत बटू (dead white dwarf) आणि एक म्हातारा होत चाललेला लाल मोठा तारा (red giant star) आहेत.

White Dwarf Star - श्वेत बटू म्हणजे सूर्यासारख्या ताऱ्यांची शेवटची अवस्था. ज्यामध्ये त्यांच्यातलं आण्विक इंधन जवळपास संपलेलं असतं.

कोरोना बोरिआलिस (मराठीत उत्तर किरीट) जोडगोळीतल्या श्वेत बटू - व्हाईट ड्वार्फचं नाव आहे T Coronae Borealis म्हणजे T CrB. आणि हाच सध्या स्फोटाच्या म्हणजेच Nova Eruption च्या टप्प्यावर आहे.

ही दुर्मिळ खगोलीय घटना सप्टेंबर 2024पूर्वी घडेल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. आणि हा स्फोट जेव्हा होईल तेव्हा तो पाहण्यासाठी महागड्या टेलिस्कोपची गरज नाही, तर तो नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल, असं नासाने म्हटलंय.

T CrB मध्ये असा हा स्फोट दर 80 वर्षांनी एकदा होतो. यापूर्वी 1946 मध्ये असा स्फोट झाला होता.

नासाच्या मिटिओराईड इन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचे मॅनेजर विल्यम कूक सांगतात, "मी खूप उत्साहात आहे. हे म्हणजे 75-80 वर्षांनी दिसणाऱ्या हॅलेच्या धूमकेतूसारखं आहे. पण हॅलेच्या धूमकेतूला जशी माध्यमांत प्रसिद्धी मिळते तशी या नोव्हा स्फोटांना मिळत नाही. धूमकेतूंना कायमच प्रसिद्धी मिळते."

पण हा नोव्हा स्फोट कधी होणार हे वैज्ञानिकांना कसं माहित?

नोव्हा स्फोट नेमका कधी होईल याची बहुतेकदा संशोधकांना कल्पना नसते. पण असे साधारण 10 नोव्हा आहेत जिथे ठराविक कालावधीने स्फोट होत असल्याचं विल्यम कुक सांगतात.

"काही नोव्हांचे ठराविक काळ झाला की स्फोट होतात. टी कोरोने बोरिआलीस हे याचं मुख्य उदाहरण आहे."

नोव्हा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काल्पनिक चित्र

T CrBचा स्फोट होईल हे नासाला कसं सांगता आलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याआधीच्या स्फोटांचे पुरावे आणि काही आकडेमोडीनंतर हे वर्तवण्यात आलंय. याआधी 78 वर्षांपूर्वी 1946 मध्ये T CrB Nova पहायला मिळाला होता. त्यानुसार आता पुन्हा हा स्फोट होण्याची वेळ आलेली आहे. पण या नोव्हाचे इतरही काही संकेत संशोधकांनी टिपले आहेत.

विल्यम कुक सांगतात, "नोव्हा म्हणजे स्फोट होण्याआधी वर्षभर हे श्नेतबटू काहीसे धूसर होतात आणि टी कोरोने बोरिआलीसचा प्रकाश मार्च 2023पासून कमी व्हायला सुरुवात झाली. म्हणून आम्हाला वाटतंय की सप्टेंबर अखेरपर्यंत हा नोव्हा म्हणजे स्फोट होईल."

गेल्या काही वर्षांत ज्या इतर नोव्हांचा शोध लागला त्यासगळ्या पेक्षा T CrB वेगळा आहे कारण याचा नोव्हा म्हणजे स्फोट सातत्याने होतो.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या भौतिक आणि खगोलशास्त्र विभागाच्या असिस्टंट प्रोफेसर मेरिडिथ मॅकग्रॅगर सांगतात, "आजवर अनेक नोव्हांचा शोध लागला, पण त्यातल्या बहुतेकांचे पुन्हा स्फोट झाल्याची नोंद नाही. किंवा त्यांचे पुन्हा स्फोट होण्याचा कालावधी इतका मोठा आहे की ते स्फोट - नोव्हा पुन्हा कधी होतील हे आपल्याला माहिती नाही."

एखादा नोव्हा पुन्हा होण्याचा कालावधी हा एका वर्षापासून ते दशलक्ष वर्षांपर्यंतचा असू शकतो असं युनिर्व्हसिटी ऑफ विस्कॉन्सिन - मॅडिसनचे प्राध्यापक रिचर्ड टाऊनसेंडही म्हणतात.

नोव्हा कशामुळे होतो?

T CrB हा श्वेतबटू - White Dwarf हा जुळ्या ताऱ्यांपैकी (Binery System) एक आहे. या अशा जुळ्या ताऱ्यांमध्ये वा बायनरी सिस्टीममधले दोन तारे एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालत असतात. यासोबतचा दुसरा तारा रेड जायंट आहे.

Red Giant म्हणजे असा लाल विशालकाय तारा ज्यातला हायड्रोजन संपलाय आणि मृत्यूच्या जवळ आहे.

White Dwarf म्हणजेच श्वेतबटू हा सूर्यासारखाच पण त्यापेक्षा शंभर पटींनी लहान असतो...साधारण पृथ्वीच्या आकाराचा. आकारमान लहान असल्याने या व्हाईट ड्वार्फचं गुरुत्वाकर्षण तीव्र असतं.

नोव्हा

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना बोरिआलिसमधल्या रेड जायंटमधून उत्सर्जित होणाऱ्या गोष्टी T CrBचं गुरुत्वाकर्षण खेचून घेतं आणि ते या श्वेतबटूच्या पृष्ठभागावर गोळा होतं. असं वर्षानुवर्षं झाल्यावर क्षमता संपते.

नासाच्या मिटिओराईड इन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचे मॅनेजर विल्यम कूक सांगतात, "या जोड ताऱ्यांमधला रेड जायंट आता त्याचं सगळं मटेरियल श्वेतबटूच्या पृष्ठभागावर सांडतोय. T CrB च्या पृष्ठभागावर असा जास्त ऐवज गोळा झाला की त्यामध्ये अक्षरशः एखाद्या बॉम्बसारखी थर्मोन्यूक्लिअर रिअॅक्शन होतो आणि श्वेतबटूवर धमाका होतो."

म्हणजेच T CrB श्वेतबटूच्या पृष्ठभागावर पुरेसा ऐवज गोळा झाला आणि त्याचं तापमान काही दशलक्ष डिग्री सेल्शियसपर्यंत पोहोचलं की न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्शनमुळे - संमीलनामुळे मोठा स्फोट होतो.

युनिर्व्हसिटी ऑफ विस्कॉन्सिन - मॅडिसनचे प्राध्यापक रिचर्ड टाऊनसेंड म्हणतात, "या अशाच रिअॅक्शन्स सूर्याच्या गाभ्यात होत आहेत आणि त्यातूनच श्वेतबटूच्या पृष्ठभागावर प्रचंड ऊर्जा मोकळी होते. या ऊर्जेमुळे काही काळ हा श्वेतबटू त्याच्या सोबतच्या रेड जायंटपेक्षा आणि दोन्ही ताऱ्यांच्या एकत्र प्रकाशापेक्षाही जास्त चमकू लागतो. आणि म्हणूनच पृथ्वीवरून पाहताना हा श्वेतबटू अगदी हजार ते लाखपट जास्त चमकताना दिसतो."

T CrBच्या बाबत ही प्रक्रिया पुन्हापुन्हा घडते. मोठ्या लाल ताऱ्याकडून वस्तुमान गोळा होत राहतं आणि हे चक्र सुरू राहतं. नोव्हा म्हणजे स्फोट दिसण्यासाठी सहसा हजारो वर्षं अशा प्रकारे गोष्टी साठाव्या लागतात. पण टी कोरोने बोरिआलिस या व्हाईट ड्वार्फबाबत ही प्रक्रिया अधिक वेगाने होत असल्यानेच हा वेगळा ठरतो.

T CrB नोव्हा घडेल तेव्हा काय पहायला मिळेल?

एरव्ही कोरोना बोरिआलिस ही ताऱ्यांची जोडी नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. पण जेव्हा हा नोव्हा म्हणजेच स्फोट होईल तो नेहमीपेक्षा अधिक प्रकाशमान असेल. Polaris किंवा North Star म्हणजेच ध्रुवताऱ्या इतका प्रखर तो दिसेल.

नोव्हा

ज्यांना हा नोव्हा पहायचा आहे त्यांनी आकाशामध्ये कोरोनो बोरिआलिस तारकासमूहाजवळ पहावे. बॉटिज म्हणजेच भूतप आणि हॅक्युलस म्हणजे शौरी नक्षत्राच्या जवळच्या लहान कमानीजवळ हा नोव्हा दिसेल.

पण एक लक्षात ठेवायला हवं. या Nova म्हणजे स्फोटातून नवीन तारा जन्माला येणार नाही. फक्त आधीपासून अस्तित्वात असणारा T CrB हा श्वेतबटू स्फोटामुळे आपल्याला दिसू लागेल. हा तारा आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि होता. पण एरवी हा श्वेत बटू नुसत्या डोळ्यांनी दिसत नसल्याने आपल्याला एखादा नवीन तारा असल्यासारखं भासू शकेल.

या T CrBची प्रकाशमानता उच्च पातळीला पोचल्यावर पुढचे काही दिवस आकाशात मंगळ ग्रहासारखा स्पष्ट दिसेल. किमान आठवडाभर तरी हा नोव्हा स्फोट दिसेल.

आणि एकदा का या श्वेतबटूच्या पृष्ठभागावर जमलेलं लाल महाकाय ताऱ्याकडून आलेलं सगळं मटेरियल संपलं की मग T CrB पुन्हा मंदावेल आणि पुढची काही दशकं दिसणार नाही.