सूर्यग्रहणामुळे खरंच आपल्यातील अहंकार कमी होऊन आपण नम्र बनतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डेव्हिड रॉबसन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या खगोलशास्त्रीय घटना तुमच्या मनावर जबरदस्त परिणाम करू शकतात.
इसवी सनापूर्वी 28 मे 585 ही ती तारीख. तुर्कीतील आजचं एनाटोलिया हे ठिकाण होतं. आजच्या ईराणमधील दे मेडेस ही प्राचीन जमात आणि आजच्या दक्षिण तुर्कीतील एक राज्य असलेलं लिडियन्स यांच्यात सहा वर्षांपासून युद्ध सुरू होतं. हिरोडोटस या ग्रीक इतिहासकारानुसार हे युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नव्हती. त्याचबरोबर कोणत्याही बाजूची सरशी होताना देखील दिसत नव्हती. एक सूर्यग्रहण हे युद्ध, रक्तपात थांबवणार होतं.
"युद्धामुळं वातावरण तापलेलं असतानाच अचानक दिवसाची रात्र झाली," असं हिरोडोटसनं लिहून ठेवलं आहे.
"द मेडेस आणि लिडियन्स यांनी जेव्हा हा बदल पाहिला, त्यांनी लगेच युद्ध थांबवलं आणि शांततेच्या करारासाठीच्या अटींचा ते विचार करू लागले."
आता असं नाट्य सूर्यग्रहणाच्या वेळेस पाहायला मिळणार नाही.
पण संशोधकांच्या मते, या प्रकारच्या सूर्यग्रहणाचा आपल्या मनावर किंवा विचार करण्यावर खूप जबरदस्त प्रभाव पडू शकतो.
अंतराळातील घटनांच्या शृंखलांमुळं आपल्याला दिसणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणासारख्या घटनांसारखा किंवा त्यातून जबरदस्त प्रभाव टाकणाऱ्या घटना फारच कमी असतात. पृथ्वीपासून योग्य अंतरावर आणि सूर्याच्या योग्य कक्षेत, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यानंतर काही क्षणांसाठी संपूर्ण सूर्यप्रकाश रोखला जातो आणि अंधार होतो. अशा थक्क करणाऱ्या, विराट गोष्टीचा अनुभव घटनांमुळं आपल्याला एकमेकांशी अधिक नम्रपणे वागण्याची आणि एकमेकांची काळजी घेण्याची प्रेरणा मिळू शकते, असं या संशोधनातून आढळलं आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ सीन गोल्डी म्हणतात, "लोक अधिक सहकार्यशील होऊ शकतात. ते एकमेकांच्या आणखी जवळ येऊ शकतात. यातून सामाजिक एकोपा, सलोख्यात वाढ झालेली दिसू शकते."
जॉन्स यांनी 2017च्या सूर्यग्रहणाचा मानवी मनावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला होता.
विराटतेचा, भव्यतेचा धक्का
विज्ञान विश्वाकडून दीर्घकाळ दुर्लक्षिलं गेलेल्या या क्षेत्राकडं आता अधिकाधिक लक्ष वेधलं जातं आहे. मागील दोन दशकात अफाट, प्रचंड आणि किंवा विश्वाच्या अमर्यादतेसंदर्भातील गोष्टींचा वैज्ञानिक अभ्यास करणं अधिकाधिक फॅशनेबल बनत चाललं आहे. या गोष्टी म्हणजे विस्मयकारक, थरारक अशा घटना ज्यामुळे मानवाला आपण खूपच खुजे, लहान असल्याची जाणीव होते.
टोरोंटो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ जेनिफर स्टेलर सांगते, ''जेव्हा तुम्ही एखादी अफाट, विराट अशी गोष्ट अनुभवता, तेव्हा तुमच्यात एक खासप्रकारची भावना निर्माण होते. त्यातून तुमच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनालाच आव्हान मिळतं. एखाद्या अती भव्य किंवा असामान्य व्यक्ती किंवा वस्तू जी तुमच्या आकलनापलीकडची असते तिच्याबद्दलची तुमची ही भावना असते.''

फोटो स्रोत, Getty Images
या अनुभवामुळं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनेमुळं आयुष्यच बदलून जाऊ शकतं. बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॅचर केटनर यांनी त्यांच्या 'एव' (म्हणजे दरारा, भीतीयुक्त आदर) या पुस्तकात लिहिलं आहे की विस्मयकारक भावनेमुळं किंवा विराटाचा अनुभव घेण्यामुळं आपल्यातील नकारात्मक, दबदबा निर्माण करण्याच्या किंवा अहंकाराला वेसण घातली जाते किंवा या नष्ट होतात आणि त्याऐवजी सहकार्य करणं, खुलेपणा स्वीकारणं आणि आयुष्याचा गांभीर्याने विचार करण्यास आपण उद्युक्त होतो.
हा खूप मोठा मुद्दा केटनर मांडतात. मात्र ते आणि त्यांच्या सहकार्यांनी या मुद्याला सिद्ध करण्यासाठी असंख्य प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत. प्रयोगशाळेतील एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगात सहभागी होणाऱ्यांना मानसशास्त्रज्ञ निसर्गाचे थक्क करणारे, विस्मयकारक व्हिडिओ पाहण्यास सांगतात. त्यानंतर त्यांना काही प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितलं जातं. यातून त्या व्यक्तीच्या वर्तणुकीत, दृष्टीकोनात झालेले बदल मोजले जातात.
''आपल्या दृष्टीकोनावर, विचारांवर आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर आपल्या अहंकाराचा प्रभाव असतो. मात्र जेव्हा तुम्ही आंतरबाह्य बदलून टाकणाऱ्या, स्वत:पलीकडचा विचार करणाऱ्या विस्मयकारक, थक्क होणं यासारख्या भावनांमधून जाता, तेव्हा अहंकाराचा तुमच्यावर असणारा प्रभाव कमी किंवा नष्ट होतो.'' - जेनिफर स्टेलर
या थक्क करणाऱ्या भावनेचा अभ्यास करणाऱ्या 2018च्या एका अभ्यासाचा विचार करूया. हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या टीमने त्या अभ्यासात सहभागी झालेल्या अर्ध्या डझनहून अधिक जणांच्या एका गटाला एक व्हिडिओ पाहण्यास सांगितलं.
या व्हिडिओमध्ये पृथ्वीवरून झूम आऊट करून हळूहळू विश्वाचं विराट रुप दाखवण्यात येत होतं. तर उर्वरित सहभागींच्या गटाला कुंपण कसं बांधलं जातं हे दाखवणारा व्हिडिओ दाखवण्यात आला.
व्हिडिओ पाहून झाल्यानंतर दोन्ही गटांना दोन मिनिटात त्यांच्या क्षमता आणि मर्यादांबद्दल लिहिण्यास सांगण्यात आलं.
आधी मांडलेल्या गृहितकाप्रमाणंच ज्यांनी तो अंतराळाचा, विश्वाचं विराट रुप दाखवणारा व्हिडिओ पाहिला होता त्यांनी त्यांच्या क्षमतांऐवजी मर्यादांचं वर्णन अधिक केलं. हे नम्रपणाचं लक्षण होतं.
आणखी एका शोधनिबंधातील अभ्यासात संशोधकांनी त्यात सहभागी झालेल्या एक तृतियांश जणांना, थक्क झाल्याच्या किंवा त्यांनी घेतलेल्या विस्मयकारक अनुभवाची आठवण करण्यास सांगितलं.
आणखी एक तृतियांश जणांना एखाद्या मजेदार गोष्टीमुळं त्यांची करमणूक झाल्याच्या प्रसंगाची आठवण करण्यास सांगितलं.
तर उर्वरित एक तृतियांश सहभागींना किराणा इत्यादी वस्तू विकत घेण्यास गेल्याच्या प्रसंगाची आठवण करण्यास सांगितलं. त्यानंतर या सहभागींना काही प्रश्न विचारण्यात आले.
यात त्यांना आयुष्यात त्यांनी साध्य केलेल्या गोष्टीसाठी किंवा त्यांच्या यशामध्ये महत्त्वाच्या ठरलेल्या घटकांना 0 ते 100 टक्क्यांनी गुण देण्यास सांगण्यात आलं. यामध्ये त्यांची स्वत:ची गुणवत्ता किंवा नशीब, देव इत्यादी गोष्टींचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
यातील जी माणसं अधिक नम्र आहेत ते त्यांच्या यशात बाह्य घटकांचा अधिक प्रभाव मान्य करतील असं तुम्हाला वाटेल.
संशोधकांनी नेमकं याचसंदर्भातील दृष्टीकोन शोधून काढला. ज्या लोकांनी विराट, थक्क करणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेतला होता ते अधिक नम्र होते आणि बाह्य घटकांना आपल्या यशाचे अधिक श्रेय देत होते.
स्टेलर या शोधनिबंधाच्या प्रमुख लेखिका होत्या. त्या स्टेलर सांगतात, ''यातून असं दिसून येतं की विराट, थक्क करणाऱ्या, विस्मयकारक गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर माणसातील अहंकार आणि आत्मकेंद्रीतपणा कमी होतो. आपला दृष्टीकोन आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया यावर आपल्या अहंकाराचा प्रभाव असतो.
मात्र जेव्हा स्वत:पलीकडे पाहण्याच्या विराट, थक्क करणाऱ्या गोष्टीचा किंवा भावनेचा अनुभव आपण घेतो तेव्हा आपल्यातील अहंकार कमी होतो. आपल्यावरील अहंकाराचा प्रभाव कमी होतो.''
धुसर सीमा, बदलता दृष्टीकोन
आपल्या क्षमतांबद्दल विनम्र होण्याबरोबरच, अहंकाराचा संकोच होण्यामुळं इतर लोकांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन आपल्याला लाभतो.
''जेव्हा माझा आत्मकेंद्रीपणा कमी झाला त्यावेळेस माझ्या आणि तुमच्यातील सीमारेषा धुसर होते. त्यावेळेस आपणा सर्वांकडे मी मानवजातीचा एक भाग म्हणून पाहू लागतो,'' असं स्टेलर सांगतात.
या विचारांनिशी संशोधकांनी अभ्यास प्रकल्पात भाग घेतलेल्या सहभागींना त्यांच्या समुदायाबद्दल त्यांना काय वाटतं आहे असं विचारलं.
यासाठी त्यांना वर्तुळाच्या जोड्या देण्यात आल्या. यातील एक वर्तुळ त्यांचं प्रतिनिधित्व करत होतं तर दुसरं वर्तुळ त्यांच्याभोवती असणाऱ्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करत होतं.
गणिताच्या व्हेन डायग्रामसारखंच हे चित्र दिसत होतं. ही दोन वर्तुळं जिथं एकमेकांना छेदतात आणि त्यातून तो सामाईक भाग निर्माण होतो तो समुदायाशी आपल्या बांधिलकी, जवळकीच्या ताकदीचं प्रतिनिधित्व करतो. त्या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात समुदायाचे महत्व हा भाग अधोरेखित करतो.
एखादा थक्क करणारा, विराटतेचं अनुभव देणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यात सहभागी झालेले लोक जेव्हा ही दोन वर्तुळ काढतात त्यात हा सामाईक भाग आकाराने मोठा झालेला असतो.
''जे लोक काहीतरी विस्मयकारक, महत्त्वाच्या गोष्टीचा अनुभव घेत होते, अशा लोकांचा अभ्यास करण्यासाठीच्या मार्गाचा, पद्धतीचा मी शोध घेत होतो.'' -सीन गोल्डी
एस कॅथरिन नेल्सन-कॉफे यांच्या अभ्यासातदेखील आपल्याला याचप्रकारचा परिणाम दिसून येतो. त्या ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ आहेत.
एस कॅथरिन नेल्सन-कॉफे आणि त्यांच्या सहसंशोधिकांनी 47 जणांच्या एका गटाला आभासी वास्तवातील स्पेसवॉकचा अनुभव घेण्यास सांगितला. त्याच्या सोबतीला कार्ल सगन यांच्या पेल ब्ल्यू डॉटमधून घेतलेल्या निवेदनाची ऑडिओ क्लिप होती.
तर दुसऱ्या गटातील लोकांना पृथ्वी आणि प्लुटोचे छोटे मॉडेल दाखविण्यात आले होते. पहिल्या गटातील लोकांनी इतर गटांच्या तुलनेत ते इतरांच्या जवळ आल्याचं आणि मानवजातीच्या अधिक जवळ आल्याचं सांगण्याची शक्यता अधिक होती. विस्मय किंवा थक्क करणारा अनुभव माणसाला अधिक परोपकारी वर्तनाकडे नेऊ शकतो.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले पॉल पिफ, इरविन आणि इतर सहकाऱ्यांनी लोकांना बीबीसीची प्लॅनेट अर्थ सीरिजचा व्हिडिओ पाहण्यास सांगितलं.
ते लोक रॅफलचं 100 डॉलरची तिकिटं शेअर करण्याची शक्यता अधिक होती. ज्या लोकांनी बीबीसीचा वाईल्ड साईड या विनोदी फिल्ममधील दृश्य पाहिली होती त्यांच्या तुलनेत प्लॅनेट अर्थचा व्हिडिओ पाहणारे समुदायाशी अधिक जोडले जाण्याची शक्यता होती.

फोटो स्रोत, Getty Images
हे प्रयोग मनोरंजक स्वरूपाचे असल्यामुळं त्यातून प्रयोग शाळेबाहेर नैसर्गिक अनुभवानंतर उमटणाऱ्या लोकांच्या स्वाभाविक प्रतिक्रिया कदाचित दिसून येत नाहीत, हे सीन गोल्डी यांच्यासाठी चिंतेचं कारण होतं. ते पीएच.डी करत होते.
''मी लोकांचा अभ्यास करणाऱ्या अशा पद्धतीचा शोध घेत होतो ज्यात ते खरोखरंच काहीतरी महत्त्वाची गोष्ट अनुभवत होते,'' असं गोल्डी सांगतात.
2017 च्या सूर्यग्रहणाच्या वेळेस यावरील उत्तर मिळालं. तेव्हा चंद्र आणि सूर्य एका खास स्थितीत आल्यामुळं एक नेत्रदिपक दृश्य निर्माण झालं होतं. यातून उच्च कोटीच्या विस्मयकारक भावना निर्माण होण्याची शक्यता अधिक होती.
त्याचबरोबर सोशल मीडियावरील टाकल्या जाणाऱ्या पोस्टवर या घटनेचा अधिक प्रभावशाली परिणाम होण्याची शक्यता होती. या ग्रहणावरील लोकांच्या प्रतिक्रियांची मोजणी करण्याची योग्य संधी लाभणार होती.
ही माहिती गोळा करण्यासाठी गोल्डी यांनी सध्याच्या एक्स (पूर्वाश्रमीच्या ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठाची मदत घेतली.
या व्यासपीठावरील युजर्सच्या प्रोफाईलमधून त्यांच्या लोकेशनची माहिती घेत गोल्डी यांना हे निश्चित करता येत होतं की त्या व्यक्तीने संपूर्ण सूर्यग्रहण पाहिलं की ती अद्भूत घटना पाहिली नाही. मग त्यांनी या युजर्सने केलेल्या पोस्टमधील मजकूरातील भाषेचे साहित्यिक विश्लेषण केलं.
ज्या लोकांनी 'आश्चर्यकारक', 'अद्भूत', 'मनस्वी आनंद देणारा' अशा शब्दांनी त्या विराट घटनेचं वर्णन केलं होतं ते लोक कदाचित, किंबहुना अशा शब्दांचा वापर करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त विनम्र होते.
काळजी, स्वयंसेवक या शब्दांबरोबरच कृतज्ञता आणि प्रेम या शब्दांमधून सामाजिकतेला पूरक भावना, आपुलकी दिसून येत होती.
या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांनी त्यांनाच स्वत:ला स्तिमित केलं होतं. ज्या लोकांना सूर्यग्रहण अनुभवता आलं होतं त्यांच्या ट्विटमधून ही विस्मयकारक भावना जवळपास दुपटीनं व्यक्त होण्याची शक्यता होती.
आधीच अंदाज बांधल्याप्रमाणं ही बाब अधिक विनम्रता आणि सामाजिकतेशी जोडलेली होती. हा परिणाम लोकांच्या व्यक्त होण्यात दिसून येत होता. ज्या लोकांना सूर्यग्रहणाचा अनुभव घेता आला होता किंवा ते पाहता आलं होतं त्यांच्या व्यक्त होण्यात आपण, आम्ही असे शब्द होते.
या शब्दांमधून एकसंधपणा प्रतिबिंबित होतो. सूर्यग्रहणाच्या कक्षेबाहेरील लोक व्यक्त होत असताना त्यांच्या भाषेत या शब्दांचा वापर नव्हता किंवा कमी प्रमाणात होता.
हा प्रभाव तुलनेनं थोड्या काळासाठी होता यावर गोल्डी भर देतात. ''तो परिणाम सूर्यग्रहणानंतर 24 तासाच्या कालावधीच्या आत झालेला होता.'' आपण सर्व आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभवत असलेल्या तणावापेक्षा असंख्य लोकांच्या बाबतीतील या छोट्या क्षणांचं आपण स्वागत केलं पाहिजे.
या ध्रुवीकरणाच्या आणि समाज विभागला जात असण्याच्या युगात, आपल्या अवतीभोवतीच्या जगाबद्दल आश्चर्य, विस्मय वाटण्यासाठी एक समान व्यासपीठ आपल्याला यातून मिळू शकतं. 8 एप्रिलच्या सूर्यग्रहणातून त्याच गोष्टीचा आस्वाद घेतला जाणार आहे.
(डेव्हिड रॉबसन हे एक पुरस्कारविजेते विज्ञान लेखक आहेत. 'द लॉज ऑफ कनेक्शन : 13 सोशल स्ट्रॅटेजीस दॅट विल ट्रान्सफॉर्म युवर लाईफ' हे त्यांचं पुढील पुस्तक आहे. कॅनोगेट (इंग्लंड) आणि पेगासस बूक्स (अमेरिका आणि कॅनडा) जून 2024 मध्ये या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत.)











