कासवांचं मिलन ते अंतराळातील गूढ रहस्यं; सूर्यग्रहण काळात संशोधक या गोष्टींवर लक्ष ठेवणार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॉर्जिना रनार्ड
- Role, बीबीसी, विज्ञान प्रतिनिधी
सध्या 8 एप्रिलला होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहाणाची चर्चा सुरू आहे. सोमवारी चंद्र पूर्णपणे सूर्याच्या समोर आल्यामुळं सूर्यप्रकाश अडवला जाईल. त्यामुळं उत्तर अमेरिकेत जवळपास चार मिनिटे पूर्ण अंधार होईल, अशी अपेक्षा आहे.
काही अभ्यासकांसाठी ही चार मिनिटं म्हणजे साधारणपणे अशक्य असलेल्या विज्ञानाचे काही प्रयोग करण्याची सुवर्णसंधी असेल. कारण त्यामुळं ब्रह्मांडाचं गूढ जाणण्याची संधी मिळणार आहे.
संशोधक ग्रहण मार्गावर रॉकेट पाठवतील, प्राणी संग्रहालयात जाऊन प्राण्यांमधील हालचालींचं निरीक्षण करतील, जगभरात रेडिओ सिग्नल पाठवले जातील आणि मोठ्या कॅमेऱ्यांच्या मदतीनं अंतराळातही डोकावण्याचा प्रयत्न करतील.
पण यात सहभागी होण्यासाठी तुम्हीही शास्त्रज्ञच असायला हवं असंही काही नाही.
पण तरीही यापासून सावध राहायला हवं. कारण सूर्याचा एक किरण किंवा काही ढगही आडवे आल्यास या सर्व योजना हवेतच विरुन जाऊ शकतात.
कासवांचे मिलन, गोरिल्ला झोपण्याची शक्यता
नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अॅडम हार्टस्टोन-रोझ हे सोमवारी संपूर्ण दिवस टेक्सासमधील फोर्ट वर्थ या प्राणीसंग्रहालयात घालवणार आहेत.
यावेळी ते गोरिल्लांपासून ते जिराफ आणि गॅलापागोस कासवांसारख्या प्राण्यांमध्ये काही विचित्र बदल दिसतात का? याचा अभ्यास करतील.
2017 च्या ग्रहणादरम्यान कासवांचे अचानक मिलन सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

बहुतांश प्राणी अचानक निर्माण झालेल्या अंधारामुळं अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देतात असं या यावरून जाणवतं.
"गेल्यावेळी फ्लेमिंगोंनी एक खास बाब केली होती. ग्रहण सुरू होताच मोठ्या फ्लेमिंगोंनी पिलांना एकत्र केलं आणि सगळे आकाशाच्या दिशेनं वर पाहत होते. जणू आकाशातून कोणीतरी त्यांच्यावर हल्ला करायला येत आहे, अशा प्रकारची चिंता त्यांना असल्याचं जाणवत होतं," असं त्यांनी सांगितलं.
त्याचवेळी गोरिल्ला अंधार झाल्यानं झोपायच्या जागी गेले आणि झोपण्याची तयारी सुरू केली. 'सरकॅडियन रिदम'मध्ये (शरीराची नैसर्गिक लय) अडथळा आल्यानं त्यांनी तसं केलं होतं.

टावनी फ्रॉगमाऊथ नावाचा निशाचर पक्षी सुकलेल्या झाडाच्या खोडासारखा असल्यानं तो झाडावर सर्वांपासून लपलेला असतो.
गेल्यावेळी ग्रहण झालं तेव्हा, अंधार होताच तो अचानकपणे जागा झाला आणि भोजनाचा शोध घेऊ लागला. पण सूर्यप्रकाश आल्यानं तो पुन्हा त्यानं आधीसारखं रुप घेतलं होतं.
या प्रयोगात कोणीही सहभागी होऊ शकतं. तुम्ही ग्रहणादरम्यान पाळीव प्राणी, शेतीतील किंवा वन्य प्राणी यांच्या वर्तनात काही बदल अनुभवला तर तुम्हीही याबाबत मार्क यांच्या टीमला ऑनलाइन माहिती देऊ शकता.
प्लाझ्माची झलक दिसणार
उत्तर अमेरिकेच्या काही भागात पूर्णपणे अंधकार पसरेल त्यावेळी सूर्याचा एक असा भाग दिसेल ज्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधक अनेक शतकांपासून प्रयत्न करत आहेत. तो म्हणजे सूर्याभोवतीचं वातावरण किंवा सूर्याचा कोरोना नावाचा भाग.
सूर्याचा हा गूढ परिसर चुंबकीय प्लाझ्मापासून तयार झालेला आहे. त्याठिकाणचं तापमान दहा लाख अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे.
साधारणपणे सूर्याच्या प्रचंड प्रकाशामुळं कोरोनाचा भाग पाहणं शक्य होत नाही. पण सोमवारी डलास, टेक्सासमध्ये वैज्ञानिकांना उपकरणांच्या मदतीनं त्याचे फोटो आणि इतर माहिती मिळवणं शक्य होईल.
वेल्समधील एबरिस्टविथ युनिव्हर्सिटी आणि नासाच्या शास्त्रज्ञांना सौर हवेबाबत माहिती मिळण्याचीही आशा आहे. हा सूर्याच्या पृष्ठभागापासून फेकला गेलेला प्लाझ्मा असतो.
आणखी एक गूढ किंवा कोडं म्हणजे सूर्याच्या किनाऱ्यावर असूनही कोरोनाचं तापमान सूर्यापेक्षा जास्त असल्याचं का जाणवतं?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनल मास इंजेक्शन म्हणून ओळखली जाणारी घटनाही ते पाहू शकतात. त्यात प्लाझ्माचे मोठ्या आकाराचे ढग वातावरणातून अंतराळात फेकले जातात. या इंजेक्शनमुळं पृथ्वीवर आपण ज्या उपग्रहांची मदत घेत असतो, त्या उपग्रहांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
या चार मिनिटांच्या वेळेतील घटनांच्या अभ्यासावर प्रचंड पैसा, वेळ आणि इतर गोष्टीं खर्च झाल्या असल्याचं एबरिस्टविथ युनिव्हर्सिटीतील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक ह्यू मॉर्गन यांनी म्हटलं.
"जेव्हा सर्व काही हवं तसं घडतं तेव्हा खरा उत्साह आणि आनंद जाणवत असतो, कारण तुम्ही यासाठी दीर्घकाळ तयारी केलेली असते. पण जर ढग मध्ये आले तर ते अडथळा निर्माण करू शकतात. त्याबाबत आपल्या हाती काही नाही," असंही ते म्हणाले.
रेडियो पार्टी
सूर्याच्या या हालचालीमुळं आपल्या जवळपास सर्व संचार यंत्रणांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यात लांब पल्ल्याच्या ध्वनी लहरी (रेडिओ वेव्ह) चाही समावेश आहे.
सूर्याच्या ऊर्जेमुळं वातावरणातील वरच्या भागात असलेल्या आयनोस्फेअर नावाच्या भागाला ऊर्जा मिळते. त्यामुळं ग्रहांच्या सर्व बाजुनं रेडिओ प्रसारणातही मदत होत असते. पण जेव्हा चंद्र सूर्यासमोर अडथळा निर्माण करतो तेव्हा आयनोस्फेअरवर त्याचा प्रभाव पडत असतो.
त्यामुळं याचा रेडिओवर नेमका काय परिमाण होतो, हे तपासण्यासाठी शेकडो रेडिओ ऑपरेटर एका प्रयोगात (रेडिओ पार्टी) सहभागी होतील. ते जगभरात एकमेकांना सिग्नल पाठवतील आणि जास्तीत जास्त कनेक्शनसाठी त्यांच्यात स्पर्धा असेल. ते मोर्स कोडच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष बोलून संवाद साधू शकतात.
यातून समोर येणाऱ्या तथ्यांमुळं शास्त्रज्ञांना आपत्कालीन कर्मचारी, विमानं आणि जहाजांबरोबरच जीपीएस द्वारे वापरल्या जाणाऱ्या ध्वनी लहरींना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी मदत होऊ शकते, असं मत या पार्टीचं आयोजन करणारे स्क्रँटन युनिवव्हर्सिटीचे नाथनियल फ्रिसेल यांनी व्यक्त केलं.

डॉ. फ्रिसेल यांच्याबरोबरच इलेक्ट्रिक इंजिनीयरिंगचे विद्यार्थी असलेले थॉमस पिसानो हे देखील प्रयोग करणार आहेत. रेडियो उपकरणासह एका ठिकाणाहून सिग्नल पाठवून ते जगभरात शक्य तितक्या ऑपरेटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील.
"याठिकाणी समुदायाची मजबूत भावना निर्माण झालेली आहे. सगळेच हा डेटा मिळवण्यासाठी खरंच उत्साहीत आहेत," असं ते म्हणाले.
बहुतांश संवाद हे औपचारिक असतात. स्टेशनचं नाव आणि ठिकाण असतं. पण प्रत्येक संवाद "73" नं संपतो. हा शुभेच्छांसाठीचा एक कोड आहे.
"निरोप घेण्याची आणि काळजी घ्या असं सांगण्याची रेडिओची ही पद्धत आहे," असं ते म्हणाले.
ग्रहणाच्या मार्गावर जेट पाठवणार
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पृथ्वीपासून 50,000 फूट (15,240 मीटर) उंचीवरून फोटो घेण्यासाठी ग्रहणाच्या मार्गावर WB-57 जेट पाठवणार आहे.
ढगांच्या वरून उड्डाण करणार असल्यानं या जेटना अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही. तसंच पृथ्वीपासून शक्य नसेल अशा अंतरावरून त्यांना फोटो काढता येणार असल्यानं त्यांना अधिक स्पष्ट फोटो घ्यावे लागतील.
कोरोनामध्ये नवे तपशील शोधण्याबरोबरच नासा सूर्याच्या आजूबाजूच्या असलेल्या धुळीच्या कड्याचाही अभ्यास करणार आहे. तसंच त्याच्या आसपास फिरणाऱ्या काही लहान ग्रहांचाही शोध लागण्याची शक्यता आहे.

विमानांवर असलेल्या स्पेक्ट्रोमीटर या उपकरणामुळं त्यांना सूर्यावरून उडणाऱ्या इतर घटकांबाबत अधिक माहिती मिळण्यासही मदत होते.
विमानांमुळं ग्रहणकाळात अधिक वेळही मिळेल. ही विमानं ताशी 460 मैल वेगानं (ताशी 740 किमी) प्रवास करतात. त्यामुळं ते चंद्राच्या सावलीमध्ये 6 मिनिटं आणि 22 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घालवतील.
म्हणजे पृथ्वीवरील वेळेपेक्षा जवळपास दोन मिनिटे अधिक वेळ त्यांना मिळेल. पृथ्वीवर मात्र केवळ साडेचार मिनिटे वेळ मिळणार आहे, तीही नशिबानं साथ दिली तर.











