बातम्या पाहणाऱ्यांची, वाचणाऱ्यांची संख्या घटतेय- रिपोर्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नूर नांझी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अधिकाधिक लोक बातम्या पाहाणं, वाचणं बंद करत आहेत. त्यांच्या मते बातम्यांचा सतत भडीमार होत असतो, त्या कंटाळवाण्या आणि नैराश्यजनक होत चालल्या आहेत.
जगातल्या दहा पैकी चार म्हणजेच 39 टक्के लोकांनी सांगितलं की ते बऱ्याचदा बातम्या पाहाणं, वाचणं जाणीवपूर्वक टाळतात. याच्या तुलनेत 2017 साली हीच टक्केवारी 29 टक्के इतकी होती. ही आकडेवारी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॉयटर्स इंस्टिट्यूटच्या अभ्यासातून समोर आली आहे.
यूक्रेन आणि मध्यपूर्वेतल्या युद्धांमुळे लोकांना बातम्या बघाव्याशा वाटत नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे.
'न्यूज अव्हॉयडन्स' म्हणजे बातम्या बघणं टाळण्याची मानसिकता सर्वोच्च पातळीवर पोचली आहे.
यु-गव्ह (YouGov) या संस्थेने यंदाच्या डिजिटल न्यूज रिपोर्टसाठी जगातल्या 47 देशांपैकी एकूण 94,943 लोकांचं सर्वेक्षण केलं.
2024 हे निवडणुकांचं वर्षं आहे. यावर्षी जगातली अब्जावधी लोक मतदान करतील. राष्ट्रीय आणि प्रादेशिक निवडणुका होत आहेत. भारतात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या तर आता राज्यात विधानसभेच्या होऊ घातल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर लोकांचा बातम्यांमधला रस संपत चालला आहे अशी आकडेवारी समोर आली आहे.
अर्थात काही देशांमध्ये लोकांचा बातम्यांमधला रस वाढला आहे असंही हा अहवाल सांगतो. उदाहरणार्थ अमेरिका.

फोटो स्रोत, Getty Images
पण एकंदरीतच बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचा ट्रेंड वाढीस लागल्याचं दिसून येतं.
जगभरात साधारण 46 टक्के लोकांनी म्हटलं की त्यांना बातम्यांमध्ये फारच रस आहे. पण 2017 साली ही टक्केवारी 63 टक्के इतकी होती. त्यामुळे यात घसरण झालेली दिसते.
यूकेमध्ये 2015 पासून ते आत्तापर्यंत बातम्यांमध्ये असलेला इंटरेस्ट अर्ध्यावर आला आहे.
“गेल्या काही वर्षांत न्यूज अजेंडा अवघड होत चालला आहे,” या अभ्यासाचे लेखक निक न्यूमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
“आधी जागतिक महामारी आणि आता युद्ध, त्यामुळे लोक बातम्यांपासून दूर चालले आहेत. ते नैसर्गिक आहे. कदाचित त्यांना आपलं मानसिक आरोग्य जपायचं असेल किंवा आपण बरं आणि आपलं आयुष्य बरं अशा प्रकारे जगायचं असेल,” ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Reuters
न्यूमन यांच्या मते लोक जाणीवपूर्वक बातम्या टाळतात कारण त्यांना 'हताश’ आणि ‘आपण काहीही करू शकत नाही’ असं वाटतं.
“जगात एवढं काही होत असताना आपल्या हातात काहीच नाही असं वाटतं त्यांना. काही लोकांना सतत चालू असलेला बातम्यांचा भडिमार नको नको होतो तर काहींना राजकारणामुळे नकोसं होतं,” निमन सांगतात.
महिला आणि तरुण वर्ग दुरावतोय
महिला आणि तरुण वर्ग बातम्यांपासून जास्त लांब होत चालला आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.
पण लोकांचा अजूनही बातम्यावर विश्वास आहे. 40 टक्के लोकांनी म्हटलं आहे की त्यांचा पत्रकारितेवर विश्वास आहे. अर्थात हा टक्का कोरोना व्हायरसच्या आधीच्या आकडेवारीपेक्षा 4 टक्क्यांनी कमीच आहे.
यूकेत बातम्या विश्वासार्ह असतात असं 36 टक्के लोकांना वाटतं. हा टक्का जरा वाढला असला तरी ब्रेक्झिट सार्वमताच्या आधीच्या आकडेवारीपेक्षा 15 टक्क्यांनी कमी आहे.
यूकेत पत्रकारितेतली सर्वांत विश्वासू संस्था म्हणजे बीबीसीच आहे. त्या खालोखाल चॅनल 4 आणि ITV चा नंबर लागतो.
ट्विटरपेक्षा टिकटॉक भारी
या अहवालात असंही म्हटलं आहे की टीव्ही आणि वर्तमानपत्रांसारखी पारंपरिक माध्यमं गेल्या दशकात फारच मागे पडली आहेत, विशेषतः तरुण वर्ग त्यांच्या बातम्या सोशल मीडिया आणि वेबसाईट, अँप्सद्वारे मिळवतो.

फोटो स्रोत, Getty Images
यूकेत 73 टक्के लोकांनी सांगितलं की ते ऑनलाईन बातम्या पहातात, वाचतात. त्या तुलनेत 50 टक्के लोक टीव्हीवर बातम्या पहातात आणि फक्त 14 टक्के लोक वर्तमानपत्रात बातम्या वाचतात.
बातम्यांसाठी सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अजूनही फेसबुकच आहे, पण बऱ्याच काळापासून तिथे बातम्यांची घसरण होतेय.
युट्यूब आणि व्हॉट्सअप हे दोन बातम्यांचे महत्त्वाचे स्रोत आहेत. टिकटॉकने याबाबतीत X ला (पूर्वीचं ट्विटर) मागे टाकलं आहे.
13 टक्के लोक आता टिकटॉकवर बातम्या पाहातात तर फक्त 10 टक्के लोक बातम्यांसाठी X चा वापर करतात.
'बातम्यांसाठी पण टिकटॉकच'
जगभरात 18-24 या वयोगटात तर 23 टक्के लोक बातम्यांसाठी टिकटॉक वापरतात.
तरुण गटांमध्ये व्हीडिओच सर्वाधिक महत्त्वाचे ठरत आहेत हे यावरून दिसतंय.
बातम्यांच्या छोट्या छोट्या व्हीडिओला सर्वाधिक पसंती मिळतेय असंही या अभ्यासात नमूद केलेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूमन म्हणतात, “लोकांना व्हीडिओ आवडतात कारण ते वापरायला सोपे असतात, त्यातून विविध विषय कव्हर होतात आणि त्यात त्यांच्या मनासारखं, त्यांना हवं तसं कंटेट असतं.”
“पण पारंपरिक न्यूजरूम्स अजूनही लिखित मजकुराला महत्त्व देतात आणि त्यांना अजून व्हीडिओच्या माध्यमांतून बातम्या सांगणं नीट जमत नाही.”
न्यूज पॉडकास्टिंग हा एक चांगला पर्याय असू शकतो असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
पण हा पर्याय अजूनही मर्यादित प्रामुख्याने सुशिक्षित श्रोते/ प्रेक्षकांपर्यंत असणाऱ्या पोचू शकतो, असंही यात म्हटलं आहे.
त्यातल्या त्यात पत्रकारांसाठी जमेची बाजू अशी की प्रेक्षक अजूनही AI च्या पत्रकारितेतल्या वापराबाबत साशंक आहेत. युद्ध किंवा राजकीय बातम्यांमध्ये AI च्या वापराकडे ते संशयाने पाहातात.
“AI मुख्यत्वेकरून अनुवाद, किंवा ऑडियो व्हीडिओ ऐकून त्यातले मुद्दे लिहून काढणं यासाठी वापरावा असं त्यांचं मत आहे,” असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.











